सध्याच्या महागाईच्या काळात काळात आणि वैद्यकीय उपचारांच्या वाढत्या खर्चामुळे आरोग्य विमा किती असावा, हा प्रत्येक सामान्यापुढील एक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. बाजारात सध्या १ कोटी रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध असले, तरी ही खरोखरच आजच्या काळाची गरज आहे की केवळ बाजारातील जाहिरातबाजी? या आणि अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकत, मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सचे उत्पादन विकास प्रमुख विनीत गुप्ता यांनी ग्राहकांना त्यांचे वय, जीवनशैली, कौटुंबिक जबाबदारी आणि वैद्यकीय खर्चातील वाढ यानुसार योग्य विमा संरक्षणाची अचूक रक्कम कशी ठरवावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
विनीत गुप्ता यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांनी विचारलेल्या विमा विषयक प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे दिली आहेत;
१ कोटींची आरोग्य विमा पॉलिसी घेणे गरजेचे आहे का?
मी व्यवसायाने नोकरी करतो. माझे वय ३२ वर्षे आहे. मी १० लाखांचा आरोग्य विमा घेतला आहे, मला कंपनीकडूनही आरोग्य विमा संरक्षण मिळाले आहे. सध्या अनेक विमा कंपन्या १ कोटीपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण देत आहेत. या मोठ्या रकमेचा विमा खरोखरच आवश्यक आहे की ही केवळ बाजारातील जाहिरातबाजीतली भूल आहे, हा प्रश्न सतावत आहे. ग्राहकांना त्यांचे वय, जीवनशैली, कौटुंबिक जबाबदारी आणि वाढता आरोग्य खर्च या बाबी लक्षात घेऊन आपल्या गरजेनुसार योग्य विमा संरक्षणाची नेमकी रक्कम ठरवण्याबाबत मार्गदर्शनाची गरज आहे. सर्वाधिक विमा संरक्षण निवडणे हा योग्य पर्याय ठरतो का ?
१. आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम कशी ठरवावी ?
योग्य विमा संरक्षणाची रक्कम ठरवण्याचे कोणतेही सार्वत्रिक सूत्र नाही. काही ग्राहकांना व्यावहारिक निकषांच्या आधारे आपले विमा संरक्षण पुरेसे आहे का, याबद्दल अंदाज येतो.
अ) सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक विमाधारक व्यक्तीसाठी किमान १० लाखांचे आरोग्य विमा संरक्षण असणे गरजेचे मानले जाते.
ब) आपल्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नातील १.५ ते २ पट रक्कम ही गरजेच्या आरोग्य विमा संरक्षणाचा महत्त्वाचा निकष म्हणून ग्राह्य धरली जाते.
क) फॅमिली फ्लोटर योजनेसाठी सध्या महानगरांमध्ये साधारण ३० ते ४० लाख तर छोट्या शहरांमधअये २० ते २५ लाखांचे विमा संरक्षण योग्य ठरू शकते. योजनेत तुमच्यावर अवलंबून असलेल्या आई-वडिलांचा समावेश असल्यास विमा संरक्षणात वाढ करावी.
वरील निकषांपैकी सर्वाधिक विमा संरक्षणेच्या निकषानुसार किमान विमा संरक्षण असावे, हेच आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरते.
आजच्या आरोग्यसेवा क्षेत्रातील वाढते खर्च लक्षात घेता हे निकष पाळत गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरते. भारतात वैद्यकीय उपचारांच्या खर्चात दरवर्षाला अंदाजे १४ टक्क्यांनी वाढ होते. या दराने वाढ होत राहिल्यास आजच्या काळातला १० लाखापर्यंतचा उपचारांचा खर्च येत्या १० वर्षांत ३७ लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्यसेवेच्या खर्चात दरवर्षाला वाढ होत असल्याने भविष्यात हा खर्च आटोपता राहील, याबाबतची खात्री देता येत नाही. अशा परिस्थितीत अमर्यादित विमा संरक्षण देणा-या योजना उपयुक्त ठरतात. आता विमा संरक्षण मर्यादा संपण्याची चिंताही मिटली आहे. त्यामुळे गंभीर आजार, दीर्घकाळाकरिता रुग्णालयात दाखल होणे, एकापेक्षा अधिक वेळा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येणे किंवा मोठ्या खर्चाच्या उपचारांची गरज भासणे अशा परिस्थितीतही आर्थिक सुरक्षितता वाढते.
२. विमा संरक्षणाची रक्कम ठरवताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात?
याकरिता सध्याच्या आरोग्यविषयक खर्चासह भविष्यातील आरोग्याबाबतीतील खर्चाचा अंदाज घ्यावा. कुटुंबातील आजारांचा इतिहास, जीवनशैली आणि आपल्या आरोग्य विमा योजनेवर अवलंबून असलेल्या व्यक्तींची संख्या या बाबींचाही विचार करणे आवश्यक आहे.
बैठी किंवा तणावपूर्व जीवनशैली, कुटुंबातील सदस्यांमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार यांसारख्या आजारांचा इतिहास असल्यास अतिरिक्त विमा संरक्षणाची गरज भासू शकते.
विमा संरक्षणाची रक्कम ठरवताना तुमचे वास्तव्य असलेल्या शहरांतील आरोग्यसेवेचा खर्च आणि भविष्यात उपचार घेण्याची शक्यता असलेल्या रुग्णालयांचा दर्जा आणि खर्च या दोन्ही बाबी लक्षात घ्यावात.
या प्रक्रियेत केवळ विमा संरक्षणाच्या रक्कमेपुरते मर्यादित राहता येत नाही. रुग्णालयातील रुमच्या खर्चाची मर्यादा, अतिदक्षता विभागातील खर्चाची मर्यादा, प्रतीक्षा कालावधी तसेच पॉलिसीमधील वगळण्यात आलेल्या बाबी यांचीही तपासणी करणे महत्त्वाचे आहे. फक्त उपलब्ध असलेले सर्वाधिक कव्हर निवडण्याऐवजी, पुरेसे आणि अर्थपूर्ण संरक्षण मिळण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
३. नियोक्त्याकडून मिळणाऱ्या आरोग्य विम्याचा विचार कसा करावा?
नियोक्त्याकडून मिळणारा आरोग्य विमा हा वैयक्तिक आरोग्य विम्याला पर्याय नसतो. याकडे केवळ अतिरिक्त संरक्षण म्हणून पाहावे. कंपनीच्या आरोग्य विम्याचे लाभ, विमा संरक्षणाची रक्कम आणि त्यातील समाविष्ट कुटुंबातील सदस्यांमध्ये बदल होऊ शकतो. नोकरी सोडल्यानंतर कंपनीकडून मिळणा-या विमा संरक्षणाचा कार्यकाळही संपुष्टात येतो.
हा धोका लक्षात घेता स्वतःच्या नावे वैयक्तिक आरोग्य विमा योजना असणेही गरजेचे आहे. यामुळे विमा संरक्षणात सातत्य राहते. कंपनीकडून मिळणारा विमा हा वैयक्तिक विम्याचे संरक्षण म्हणून वापरता येते. गरजेनुसार बेस हेल्थ इन्शुअरन्स योजनेसोबत सुपर टॉप-अप योजना घेतल्यास तुलनेने नियंत्रित प्रीमियममध्ये अधिक आरोग्य विमा संरक्षण मिळवता येऊ शकते.
४. सध्याचे विमा संरक्षण पुरेसे आहे की नाही, हे कसे तपासावे?
तुमच्या आरोग्य विम्याच्या कव्हरचा किमान वर्षातून एकदा आणि लग्न, मूल होणे, पालकांना पॉलिसीमध्ये समाविष्ट करणे, दुसऱ्या शहरात स्थलांतरित होणे किंवा एखाद्या वैद्यकीय आजाराचे निदान होणे यांसारख्या महत्त्वाच्या जीवनातील बदलांनंतर आढावा घ्या.
तुमच्या सध्याच्या सम इन्शुअर्डची तुलना तुमच्या पसंतीच्या रुग्णालयांमधील सध्याच्या उपचारांच्या खर्चाशी करा. तसेच, एखादा गंभीर आजार, दीर्घकाळ रुग्णालयात दाखल राहावे लागणे किंवा एकाच वर्षात अनेक वेळा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यास, तुमचे उपलब्ध कव्हर पूर्णपणे वापरले जाऊ शकते का, याचेही मूल्यांकन करा.
अ) सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक विमाधारक व्यक्तीसाठी किमान १० लाखांचे आरोग्य विमा संरक्षण असणे गरजेचे मानले जाते.
ब) आपल्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नातील १.५ ते २ पट रक्कम ही गरजेच्या आरोग्य विमा संरक्षणाचा महत्त्वाचा निकष म्हणून ग्राह्य धरली जाते.
क) फॅमिली फ्लोटर योजनेसाठी सध्या महानगरांमध्ये साधारण ३० ते ४० लाख तर छोट्या शहरांमधअये २० ते २५ लाखांचे विमा संरक्षण योग्य ठरू शकते. योजनेत तुमच्यावर अवलंबून असलेल्या आई-वडिलांचा समावेश असल्यास विमा संरक्षणात वाढ करावी.
पर्यायी मार्ग म्हणून, अमर्यादित विमा संरक्षण असलेल्या आरोग्य विमा योजनांची निवड केल्यास वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या आव्हानाला सामोरे जाताना वारंवार विमा संरक्षणाचा आढावा घेण्याची तसेच यात वाढ करण्याची गरज दूर होते.
