How Much Home Loan To Take : साधारणपणे ३० ते ४० वयात बहुतेकजण आर्थिक स्थैर्य प्राप्त करतात. उत्पन्न वाढल्यामुळे प्रत्येकाला आपल्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावे असे वाटू लागते. गृहखरेदी हा आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय मानला जातो. अशावेळी एक चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यभर कर्जाच्या खाईत लोटू शकतो. घर खरेदी करताना काय काळजी घ्यावी? किती गृहकर्ज असावे? किती मोठे घर घ्यावे? अचानक आलेल्या पैशातून कर्ज फेडावे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आस्कअस् इन्व्हेस्टमेंटचे सह-संस्थापक समीर कुळकर्णी यांनी दिली आहेत.

घर खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

३० ते ४० या वयोगटात पहिल्यांदा घर घेणाऱ्यांची संख्या मोठी असते. घर ही गरज असेल तर त्याला प्राधान्य देणे चुकीचे नाही. मात्र घर घेताना त्यासाठी घेतले जाणारे होम लोन हे नेमके कसे काम करते, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घराच्या किमतीपैकी काही रक्कम स्वतःकडून आणि उर्वरित रक्कम कर्जाच्या माध्यमातून उभी केली जाते. त्यानंतर ईएमआय सुरू होतो. मात्र ईएमआय म्हणजे केवळ कर्जाची मूळ रक्कम परत करणे नाही. त्यामध्ये व्याजाचाही मोठा भाग असतो. विशेषतः कर्जाच्या सुरुवातीच्या काळात ईएमआयमधील मोठा हिस्सा व्याजाच्या परतफेडीसाठी जातो आणि मूळ कर्जाची रक्कम तुलनेने कमी प्रमाणात कमी होते. जसजसा कर्जाचा कालावधी पुढे जातो, तसतसे ईएमआयमधील मूळ रकमेचे प्रमाण वाढते आणि व्याजाचे प्रमाण कमी होत जाते.

ही गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण अनेकदा दहा वर्षे कर्ज फेडल्यानंतरही मूळ कर्जाची रक्कम अपेक्षेइतकी कमी झालेली दिसत नाही आणि त्यामुळे कर्जदाराला आश्चर्य वाटते.

अचानक मोठी रक्कम हातात आली तर ती होम लोन फेडण्यासाठी वापरावी की गुंतवणूक करावी?

यासाठी एकच उत्तर सर्वांसाठी लागू होणार नाही. मात्र जर एखाद्याने तुलनेने कमी व्याजदराचे होम लोन घेतले असेल, तर त्या कर्जाकडे केवळ ‘लायबिलिटी’ म्हणून न पाहता कॅपिटलच्या दृष्टिकोनातूनही पाहता येते.
उदाहरणार्थ, आपल्याकडे बोनस, वारसा किंवा अन्य कारणाने मोठी एकरकमी रक्कम आली आणि आपल्याकडे होम लोन सुरू असेल, तर ती संपूर्ण रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरण्याऐवजी काही भाग गुंतवता येईल का, याचा विचार करता येतो. यामध्ये एक साधा विचार आहे. कर्जाची किंमत किती आहे आणि आपल्या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा किती आहे? जर कर्जाचा खर्च कमी असेल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून त्यापेक्षा चांगला परतावा मिळण्याची शक्यता असेल, तर दोन्हींचा समतोल साधण्याचा विचार करता येतो. मात्र यामध्ये जोखीम लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. बाजारातील परतावा निश्चित नसतो. त्यामुळे केवळ अपेक्षित परताव्याच्या आधारावर कर्ज फेडू नये किंवा गुंतवणूक करू नये. स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता, आर्थिक स्थिती आणि भविष्यातील गरजा पाहून निर्णय घ्यावा.

‘स्मार्ट होम लोन’सारख्या पर्यायांकडे कसे पाहावे?

स्मार्ट होम लोनमध्ये साधारणपणे कर्जासोबत लिंक केलेल्या खात्यात आपल्याकडे अतिरिक्त पैसे ठेवता येतात. त्या खात्यातील रक्कम विचारात घेऊन बँक कर्जाच्या व्याजाची गणना करते. त्यामुळे अतिरिक्त पैसे त्या खात्यात ठेवल्यास व्याजाचा भार कमी होऊ शकतो. ही सुविधा ऐकायला आकर्षक आहे. मात्र, त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा कर्जाचा व्याजदर सामान्य होम लोनपेक्षा काही प्रमाणात जास्त असू शकतो. म्हणून प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारायला हवा—आपल्याकडे नियमितपणे एवढी अतिरिक्त रक्कम उपलब्ध राहणार आहे का? जर ती रक्कम सतत त्या खात्यात ठेवण्याची शक्यता नसेल, तर केवळ स्मार्ट लोनच्या नावामुळे तो पर्याय निवडण्याची गरज नाही.

मोठे घर घेण्याची इच्छा असते. बँकही जास्त कर्ज देण्यास तयार असते. मग किती कर्ज घ्यावे?

बँक किती कर्ज देऊ शकते आणि आपण किती कर्ज घ्यावे, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कर्ज घेताना स्वतःच्या उत्पन्नाचा आणि भविष्यातील खर्चाचा विचार करणे महत्त्वाचे आहे. केवळ बँक जास्त कर्ज देत आहे म्हणून तेवढे कर्ज घेणे योग्य नाही. आपण आर्थिकदृष्ट्या स्वतःला ओव्हर-स्ट्रेच करू नये. अनेकदा तुम्हाला ५० लाखांची गरज असताना बँक म्हणते ५५ लाख घ्या. मात्र, अशावेळी वरील ५ लाख तुम्हाला फेडण्यासाठी २ ते ३ वर्ष लागू शकतात.


एक ढोबळ समतोल साधायचा असेल तर उत्पन्नाचे वेगवेगळे भाग करता येतात. उदाहरणार्थ, उत्पन्नाचा एक भाग ईएमआय आणि विम्यासाठी, एक भाग नियमित खर्चांसाठी आणि एक भाग गुंतवणुकीसाठी ठेवण्याचा प्रयत्न करता येतो. यामुळे घर घेतल्यानंतरही इतर आर्थिक उद्दिष्टांसाठी पैसा उपलब्ध राहतो. कारण घर घेणे हे आयुष्यातील एकमेव आर्थिक उद्दिष्ट नाही. मुलांचे शिक्षण, निवृत्ती, आरोग्य, प्रवास आणि इतर गरजा यांच्यासाठीही पैसा लागणार असतो.