scorecardresearch

मार्ग सुबत्तेचा: गुंतवणूक पर्याय कसे निवडावेत ?

आतापर्यंत या स्तंभातील लेखांमधून, आर्थिक नियोजनाची सुरुवात कशी करावी, जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय, नुकसान व्यवस्थापन कसं करावं आणि पोर्टफोलिओ कसा बांधावा याबाबत माहिती दिलेली आहे.

investment options
मार्ग सुबत्तेचा : गुंतवणूक पर्याय कसे निवडावेत ?

तृप्ती राणे

आतापर्यंत या स्तंभातील लेखांमधून, आर्थिक नियोजनाची सुरुवात कशी करावी, जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय, नुकसान व्यवस्थापन कसं करावं आणि पोर्टफोलिओ कसा बांधावा याबाबत माहिती दिलेली आहे. आज आपण गुंतवणूक कशी पडताळावी या प्रश्नाकडे आपला मोर्चा वळवू या.
कोणताही सजग गुंतवणूकदार काही अंदाज, काही अभ्यास आणि काहीसा दुसऱ्यावरील विश्वास यांच्या आधाराने आपले पैसे निरनिराळ्या पर्यायांमध्ये घालत असतो. जोवर परतावे चांगले वाटत असतात तोवर सगळं ठीक, परंतु जेव्हा परतावे कमी होतात, किंवा गुंतवणूक विकून पैसे उभारायचा प्रश्न येतो तेव्हा कशातून बाहेर पडावं, किंवा अचानक मिळालेल्या मोठ्या रकमेला कसं गुंतवावं किंवा ढीगभर पर्यायांमधून आपल्यासाठी योग्य पर्याय कोणता – असे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. तसं पाहायला गेलं तर ‘गूगल’ आणि माहिती महाजाळामुळे बरीच माहिती आपल्या सर्वांना असते. परंतु आपली सर्वांची आर्थिक आणि मानसिक स्थिती एकसारखी नसते आणि म्हणून प्रत्येकाची गरज ही एकाच पर्यायाने (वन साइज फिट्स ऑल!) भागू शकत नाही.
आपली जोखीम क्षमता आणि गरज कळली की, गुंतवणूक पर्याय निवडताना पुढील चार गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात –

१. रोकड सुलभता/ तरलता – एखादी गुंतवणूक विकायला किती सहज आहे याचा मापदंड म्हणजे रोकड सुलभता अथवा तरलता होय.
२. जोखीम – गुंतवणुकीतून परतावे आणि मुद्दल दोघांची खात्री म्हणजे सुरक्षितता. यातील कोणतीही गोष्ट जर नक्की नाही तर तिथे जोखीम लक्षात येते. साधारण गुंतवणूकदार फक्त मागील परतावे बघून जोखमीचा अंदाज बांधतो. परंतु महागाई, बदलणारे व्याजदर, बदलणारं हवामान, राजनैतिक घटना – अशा प्रकारची जोखीम लक्षात येत नाही.

३. परतावे – प्रत्येक गुंतवणुकीची परतावे देण्याची एक क्षमता असते. एकाच प्रकारचे गुंतवणूक पर्याय हे थोड्याफार फरकाने जवळपास सारखेच परतावे देतात. परंतु एखादा गुंतवणूक पर्याय त्याच्या श्रेणीतील इतरांपेक्षा जर वेगळेच परतावे देतोय तर तिथे जरा नीट लक्ष देणं हे आलंच. यासाठी मुळात गुंतवणूक पर्यायांचं वर्गीकरण आणि त्यांच्याकडून मिळणारे सरासरी परतावे हे सर्वात आधी बघावं. याचं सर्वात सोप्पं उदाहरण म्हणजे – बँकेतील ठेवी. सरकारी बँकेतील ठेवींवर मिळणारं व्याज हे खासगी क्षेत्रातील आणि सहकारी बँकेतील ठेवींपेक्षा कमी असतं. परंतु त्याची तुलना ही म्युच्युअल फंड किंवा शेअर्सबरोबर करून चालणार नाही.

४. कर कार्यक्षमता – निरनिराळ्या गुंतवणूक पर्यायांचं कर आकलनासाठी वेगळं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. शिवाय प्रत्येक करदाता वेगवेळ्या ‘टॅक्स ब्रॅकेट’मध्ये बसतो. अजून पुढे बघितलं तर एकाच गुंतवणूकदाराचं प्रत्येक वर्षी ‘टॅक्स ब्रॅकेट’ / कराधीनता बदलते. नवीन कर प्रणाली व जुनी कर प्रणाली या बाबतीतसुद्धा नीट विचार करून निर्णय घ्यावा लागतो. उदाहरण घ्यायचं तर बँकेतील मुदत ठेव ही त्याच गुंतवणूकदारांसाठी कर कार्यक्षम आहे जो खूप कमी कर भरतो किंवा अजिबात भरत नाही. त्यांच्यासाठी संपूर्ण व्याज हाच परतावा. परंतु ३० टक्के दराने कर भरणाऱ्या व्यक्तीला ६ टक्के व्याज उत्पन्नातून १.८ टक्के कर भरल्यानंतर हातात ४.८ टक्के इतकाच परतावा मिळतो. शिवाय प्रत्येक वर्षी टीडीएस कापला जातो, भले कर भरायची गरज असेल किंवा नसेल. या उलट डेट फंडातील गुंतणुकीतून परतावे निश्चित नाहीत, परंतु जेव्हा गुंतवणूक विकणार त्या वर्षीच त्यावर कर भरावा लागतो.

कोष्टकातून वाचकांना वरील सर्व मापदंड सोप्या पद्धतीने कळतील:

वरील कोष्टकामध्ये अतिशय ढोबळपणे माहिती दिली गेलेली आहे. प्रत्येक गुंतवणूक पर्याय निवडताना जर या गोष्टींचा पुरेपूर विचार केला तर चुकीची निवड नक्कीच टाळता येईल.

सर्वसाधारणपणे आपण आपल्या पोर्टफोलिओचे ४-५ भाग करतो – नियमित खर्चांची तरतूद, आपत्कालीन निधी, नजीकच्या मोठ्या खर्चाची तरतूद, निवृत्ती निधी आणि इतर मोठी आर्थिक ध्येय. आपले पर्याय निवडताना आपण खालीलप्रमाणे पोर्टफोलिओ तयार करू शकतो:

१. नियमित खर्चांसाठी – बँकेतील, पोस्टातील मुदत ठेव, चांगल्या रेटिंगचे डिबेंचर/बॉण्ड्स, घर किंवा दुकानातून मिळणारे भाडे, म्युच्युअल फंडातील एसडब्ल्यूपी (सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन.)
२. आपत्कालीन निधी – बँकेतील बचत खाते व मुदत ठेव, ओव्हरनाइट, लिक्विड आणि लो ड्युरेशन डेट म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड.

३. नजीकच्या गरजेसाठी – बँकेतील मुदत ठेव, इक्विटी आर्बिट्राज फंड, लो ड्युरेशन डेट म्युच्युअल फंड.

४. निवृत्ती निधी – इक्विटी म्युच्युअल फंड, शेअर्स, स्थावर मालमत्ता, सोने व चांदीतील गुंतवणूक, पीएमएस, एआयएफ, अनलिस्टेड बॉण्ड्स/शेअर्स.

५. इतर मोठी ध्येये – ध्येय पाच वर्षांच्या पलीकडे असल्यास निवृत्ती निधीसाठी वापरलेले सगळे पर्याय योग्य आहेत. परंतु ध्येय तीन वर्षांच्या आतल्या टप्प्यात आल्यावर त्यातील जोखीम कमी करून सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे तोवर जमा पैसा वळविणे योग्य राहील.

तृप्ती राणे
सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार/trupti_vrane@yahoo.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र ( Personal-finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 15:43 IST
ताज्या बातम्या