काही वर्षांपूर्वी एक गृहस्थ माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आले होते. आधी नोकरी करत होते, परंतु नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यात बऱ्यापैकी यश मिळवलं. स्थैर्य येईस्तोवर साधारणपणे वयाची चाळीशी उलटली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की, आपण फक्त व्यवसायाकडेच लक्ष दिलं आणि वैयत्तिक आर्थिक परिस्थितीचा विचार नाही केला. लागेल तसे पैसे व्यवसायात घातले आणि घरी जेव्हा लागतील, तेव्हा त्यातून पैसे काढले. इतर कुठेही गुंतवणूक केली नाही. कधी हे सुद्धा तपासलं नाही की, आपल्याला पुढे काय लागणार, त्यासाठी काय करायला हवं, मुलीचं शिक्षण-लग्न, स्वतःसाठी निवृत्ती पश्चात आर्थिक सोय, अडी-नडीसाठी लागणारा पैसा, हौस-मौज, वगैरे-वगैरे. शिवाय, उद्योगावर पूर्णपणे नियंत्रण त्यांचंच असल्याने, सगळं त्यांनाच बघावं लागत होतं. पण आयुष्यात पुढे जर विपरीत परिस्थिती आली तर त्यांच्याकडे कोणताच दुसरी कोणतीच योजना नव्हती. हा विचार जेव्हा त्यांच्या मनात आला तेव्हा ते अतिशय अस्वस्थ झाले. मग त्यांनी स्वतःचं आर्थिक नियोजन करायचं ठरवलं. असे अनेक व्यावसायिक आहेत ज्यांचं संपूर्ण कुटुंब एकाच व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणून आजचा लेख खास अशा उद्योगकर्मींसाठी.

उद्योग आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळायची म्हणजे तारेवरची कसरत. कुठल्याही एका बाजूला जास्त झुकलं तर दुसरीबाजू लुळी पडेल. म्हणून अशा व्यावसायिकांनी आर्थिक नियोजन करताना उद्योग आणि कुटुंबाच्या गरजांना वेगवेगळं करून दोन आर्थिक आराखडे मांडायचे आहेत. असे आराखडे तयार करताना खालील मुद्दे नक्कीच उपयोगी पडतील.

१. व्यवसाय आणि वैयक्तिक आर्थिक ध्येयं वेगळी ठेवायला हवीत. जेवढा व्यवसाय वाढवणं गरजेचं आहे, तेवढंच गरजेचं आहे तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवणं. जर कुटुंबासाठी हवे तेव्हा आणि लागतील तेवढे पैसे पुरवता आले नाही, तर त्या व्यवसायातून नक्की काय साध्य होणार?

२. प्रत्येक वेळी गरज लागली की, आपण कुटुंबासाठी असलेले पैसे हे उद्योगासाठी वापरतो. मात्र असे करताना कुठेतरी आपली वैयक्तिक आर्थिक परिस्थिती कमकुवत होतेय का? याबाबत जागरूक राहणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणायला जरी सोपं वाटलं तरी पाळायला फार कठीण आहे. कारण उद्योगामध्ये बुडालेल्यांना दुसरं काही दिसत नसतं. शिवाय एक अजून गोष्ट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की, उद्योग हा सुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. त्याला जर सतत कुटुंबियांसाठी राखलेले पैसे लागत असतील तर काहीतरी नक्की चुकतंय आणि ती चूक लवकर सुधारली पाहिजे.

३. उद्योगातून मिळणारा परतावा यावर नेहमीच लक्ष ठेवणं गरजेचं आहे. काही उद्योग भरपूर उलाढाल करतात, परंतु प्रत्यक्ष फायदा मात्र छोटा असतो. तर काही ठिकाणी उलाढाल कमी पण फायदा जास्त असतो. काही उद्योग सदाबहार असतात तर काहींमध्ये सतत बदल करावे लागतात. काही मोसमी असतात, तर काही बारमाही. काहींना भरपूर भांडवल लागतं, तर काहींना कमी. तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून कधी, किती आणि कसे परतावे सुरक्षित करता येतील यावर नक्की विचार केला पाहिजे. जर उद्योगातील परतावे कमी व्हायला लागले तर लवकरच नुकसान व्हायला लागेल. असं झाल्यास त्याचा परिणाम कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावर सुद्धा होईल.

४. कुठलाही उद्योग फक्त चांगला नफा कमावतो म्हणून यशस्वी आहे, असं म्हणता येत नाही. त्या नफ्यामुळे जर वैयक्तिक परिस्थिती सुधारली आणि बँकेतील ठेवी आणि इतर संपत्ती वाढली तरच खटाटोप केल्याचं चीज झालं असं म्हणता येईल. नाहीतर फायदा तर दिसतोय पण हाताळायला पैसे नाही. असे उद्योग सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात.

५. स्वतःचं निवृत्ती नियोजन करताना आपल्या व्यवसायाचं स्वरूप ध्यानात असणं महत्त्वाचं आहे. काही व्यवसाय वयाच्या मर्यादा पाळत नाही, परंतु काही वेळ एखाद्या विशिष्ट वयानंतर व्यवसाय करणं झेपत नाही. म्हणून जशी नोकरीच्या ठिकाणी वयोमर्यादा असते, तसंच निवृत्ती कधी घ्यायची हे लक्षात ठेवायला हरकत नाही.

६. एका ठराविक कालावधीनंतर व्यवसाय आणि वैयक्तिक व्यवहार पूर्णपणे वेगळे करून घ्यायला हवे. जसा नोकरीतून पगार मिळतो आणि त्यातून घरच्या गरजा भागवल्या जातात, त्याच प्रमाणे व्यवसायातून सुद्धा नियमित पैसे बाजूला काढून वैयत्तिक गुंतवणूक झाली पाहिजे.

७. एकाच प्रकारच्या व्यवसायावरचे अवलंबित्व कमी कसे होईल यावर वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे. म्हणून वैयक्तिक आर्थिक नियोजन तर व्हायलाच हवं, पण त्याही पुढे, इतर उद्योग पर्याय सुद्धा लक्षात घेता आले तर त्याचा फायदा नक्की होईल.

८ . व्यवसायाची देणी ही शक्यतो वैयक्तिक पैशातून देण्याची वेळ येऊ नये. अर्थात अगदी तातडीच्या गरजेवेळी असं केलं तर चालू शकतं. पण हे जर वारंवार होत असेल तर पुन्हा एकदा व्यवसायाकडे टीकाकाराच्या दृष्टीने बघणं अत्यंत गरजेचं आहे.

९. कुठलाही व्यवसाय म्हटलं की जोखीम ही आलीच. परंतु या जोखीमीचा तुमच्या संपूर्ण आर्थिक स्तिथीवर काय आणि किती परिणाम होणार याची तरतूद आर्थिक नियोजनातून करता येऊ शकते.

१०. आपल्यानंतर आपला व्यवसाय पुढे कसा जाणार, कोण नेणार, कुटुंबावर त्याची काय जबाबदारी असेल? या सर्व प्रश्नांची यादी करून त्यावर सखोल विचार करून तोडगा शोधायला हवा. कारण वेळ सांगून येत नाही. असं व्हायला नको की, तुम्ही मेहेनतीने उभा केलेला व्यवसाय तुमचा पश्चात कुटुंबासाठी डोके दुखी होईल.

११. वैयक्तिक आर्थिक नियोजनामध्ये वारसाहक्क नियोजन करणं महत्त्वाचं आहे तसंच ते उद्योगाच्या बाबतीतही आवश्यक आहे. तेव्हा योग्य सल्ला घेऊन याबाबतचे निर्णय वेळेवर घ्या.

१२. नोकरीमधून नियमित मिळकत वगळता इतर फायदे ही असतात. जसे, निर्वाह निधी, आयुर्विमा, आरोग्य विमा, राहण्याची सोय, तातडीचे कर्ज इत्यादी. परंतु व्यावसायिकांना हे मिळत नाही, परंतु या सर्वांची सोय त्यांनाच करावी लागते. तेव्हा १ लाखाचा पगार आणि १ लाखाचा फायदा याची तुलना होऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवा.

१३. व्यवसाय ही २४ तासांची आणि ३६५ दिवसांची नोकरी आहे. म्हणून त्यातून फायदा हा नोकरीपेक्षा जास्त झालाच पाहिजे. वेळोवेळी आपला व्यवसाय हवा तेवढा फायदा देतोय की नाही हे तपासा आणि योग्य वेळी बदल करा.

नोकरी असो की व्यवसाय, आर्थिक नियोजन हे आलंच. तेव्हा वेळीच योग्य दिशेकडे पाऊल उचला आणि आपल्या आयुष्यामध्ये दोन्ही बाजूने भरभराटीचा अनुभव घ्या.
तृप्ती राणे
सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
trupti_vrane@yahoo.com