‘गरजेला कर्ज घ्यावं आणि जमेल तेवढं लवकर फेडावं’ असं आपल्या सर्वसाधारण कुटुंबामध्ये म्हटलं जातं. उसनवारी हा प्रकार एकेकाळी अपमानास्पद वाटायचा. जे काही करायचं ते आपल्या पैशांनी असा समज खूप ठाम होता. अर्थात त्या काळात सहजासहजी कर्ज मिळत पण नसायचं आणि व्याजदरसुद्धा भरपूर होते. परंतु गेली १५-२० वर्षांपासून जसजसे व्याज दर कमी होत गेले आणि बँकांचा पसारा वाढला तसे कर्ज घेणं सहज होऊ लागलं. शिवाय कुटुंबाच्या आर्थिक आराखड्यामध्ये व्याजावर व्यवहार करणं वाढू लागलं. आधी घरासाठी शक्यतो कर्ज घेतलं जात होतं. यानंतर दुचाकी- चारचाकी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पुढे शिक्षणासाठी कर्ज मिळू लागली आणि आता तर अगदी भटकंती करण्यासाठीदेखील कर्ज मिळते म्हणजेच हप्त्याने पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. अतिशय महागड्या सौंदर्य उपचारांसाठी कर्ज मिळतं. यातून अनेकांनी चांगल्या प्रकारे कर्ज वापरून स्वतःची आर्थिक प्रगती साधली आहे. स्वतःचं घर उभं केलं, उच्च शिक्षण घेतलं, व्यवसाय वाढवला आणि आर्थिक ध्येय पूर्ण केले. कर्ज हे दुधारी तलवारीसारखं असतं. नीट वापरलं तर भरभराट होऊ शकते. परंतु हेच कर्ज जेव्हा डोईजड होऊ लागतं, तेव्हा त्यातून नुकसान आणि मनस्ताप याशिवाय दुसरं काही मिळत नाही.

मागील काही वर्षात मिळकत वाढली, खर्च वाढले आणि अपेक्षा तर त्याच्यापेक्षा जास्त वाढल्याचं लक्षात येऊ लागलंय. अनेक जणांना तर पहिला पगार झाल्या झाल्या क्रेडिट कार्ड कंपन्या आणि बँक जणू छळू लागतात. कोणत्याही खरेदीसाठी आता कर्ज मिळवणं सोप्पं झालंय. दुकानातून असो, वा ऑनलाइन खरेदी, मासिक हप्त्याचं प्रयोजन हमखास असतं. एक फॉर्म भरला किंवा क्रेडिट कार्ड वापरलं की, काम झालं. वर्षातून किमान तीन ते चार वेळा तरी वेगवेगळ्या प्रकारचे सेल दुकानांमध्ये आणि ऑनलाइन लागतात आणि तिथे खरेदी करताना ‘शून्य टक्के दराने कर्ज’ असं सांगून गरजेपलीकडे खरेदी करण्यास भाग पडले जाते. तर अशा प्रकारे स्वस्त झालेल्या आणि सहज मिळणाऱ्या कर्जाच्या बाबतीत प्रत्येकाने जागरूक राहायला हवं. म्हणून आजचा हा लेख.

retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Dev Plastics Industries Limited,
माझा पोर्टफोलियो : उच्चतम मानके, बहुविध प्रस्तुती
My Portfolio, Avanti Feeds Limited,
माझा पोर्टफोलियो : भाव वधारलेल्या कोळंबीची अव्वल निर्यातदार
badoda bnp paribas large and mid cap fund
‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ हेच गुंतवणूक सूत्र!
Changing opportunities in the retail sector
बाजार रंग: साखळी दुकाने ते ई कॉमर्स – रिटेल क्षेत्रातील बदलत्या संधी
Ajay Walimbe article Portfolio Market Structure Mutual Funds print eco news
शेअर बाजार, माझा पोर्टफोलियो: बाजार संरचनेतील अत्यावश्यक ‘कोठार’- सीडीएसएल!
bajaj housing finance ipo gets bids worth rs 3 25 lakh crore
Bajaj Housing Finance share: बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर मिळाला तर गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल; वाचा कधी लिस्टिंग होणार?

हेही वाचा – बँक बुडवणारा कर्मचारी भाग २ – डॉ. आशीष थत्ते

मुळात कर्ज कधी घ्यावं यावर तर दुमत नक्कीच नसावं. गरज असेल आणि परतफेड करण्याची ऐपत असेल, तेव्हाच कर्ज घ्यावं. उद्योगासाठी, पहिलं घर घेताना, अडीअडचणीला कर्ज घ्यावं. जिथे कर्ज घेतल्यामुळे एखादं आर्थिक ध्येय साध्य होत आहे, तिथे कर्जाचा योग्य वापर होतोय असं समजावं. परंतु जिथे कर्ज हे फक्त मौजमजे पुरतं वापरण्यात येतंय किंवा सतत कर्ज घेण्याची वेळ येतेय तिथे मात्र याबाबतीत सखोल विचार करणं गरजेचं आहे. अनेकदा असं लक्षात येतं की, एक कर्ज फेडायला दुसरं कर्ज आणि मग ते फेडायला तिसरं कर्ज असं दुष्टचक्र चालूच राहतं. काही ठिकाणी तर सणवार, घरातील लग्नकार्य अशा वैयक्तिक समारंभासाठी, इतरांना दाखवण्यासाठी किंवा सामाजिक दबावामुळे कर्ज घेतली जातात. ही परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा मानसिक, आर्थिक, भावनिक आणि सामाजिक पातळीवर खूप त्रास होऊ शकतो.

पुढे प्रश्न येतो तो कर्जाचं प्रमाण किती असावं. साधारणपणे आपल्या मासिक मिळकतीच्या ३० टक्क्यांपर्यंत हप्ता बसेल इतकंच कर्ज घ्यावं. मासिक मिळकत तपासताना किमान मिळकत पाहावी. कमाल किंवा अशाश्वत असेल अशा मिळकतीला ग्राह्य धरू नये. पुढे पगार वाढेल, उद्योगात भर पडेल किंवा दुसरीकडून पैसे येतील, या आशेवर आज कर्ज घेऊ नये. व्याजदर कमी आहेत म्हणून कर्ज घेऊ नये. ‘शून्य टक्के दराने कर्ज’ अशी पाटी जिथे असते, तिथे खर्चीक वस्तू विकल्या जातात असा अनुभव प्रत्येकालाच आला असेल. याचा अर्थ तुम्ही व्याज देत नाही असं नाही. एखादी किमती वस्तू जेव्हा अशा प्रकाराने घेतली जाते तेव्हा कर्ज देणाऱ्या कंपनीकडून तुमच्या वतीने त्या वस्तूची किंमत ‘डिस्काउंट’पश्चात विकणाऱ्याला दिली जाते. १०० रुपयाच्या वस्तूसाठी ९० रुपये देऊ, १० रुपये वस्तू विकत घेणाऱ्याकडून मासिक हप्त्यातून वसूल केले जातात. विकत घेणाऱ्याला वाटतं की, आपल्याला काहीच व्याज भरावं लागलं नाही. या जगात कुठेही पैसे फुकट मिळत नाहीत. तेव्हा व्याज पडत नाही अशा चुकीच्या समजात नको ती खरेदी करू नये.

कर्ज कुठून घ्यावं हा आपला पुढचा प्रश्न. शक्यतो कर्ज हे बँकेतून घ्यावं, कारण तिथे ते स्वस्त मिळतं. परंतु अनेकदा असं होतं की, काही ना काही कारणांमुळे बँकेतून कर्ज मिळत नाही किंवा कमी मिळतं. अशा वेळी खासगी फायनान्स कंपन्या आपल्याला कर्ज देऊ शकतात. यांचे कर्ज व्याजदर हे बँकांपेक्षा जास्त असते. बँकांकडून कर्ज मिळत नसेल तर पुढे पतपेढ्या आणि काही खासगी संस्थांमधूनसुद्धा कर्ज घेता येऊ शकतं. परंतु यांचे व्याजदर अजूनसुद्धा जास्त असतात. शिवाय अनेकदा घर, दागिने, गाडी इत्यादी गहाण ठेवावं लागतं. अनेकदा लोक विशेषतः स्त्रिया, सोन्याचे दागिने बनवताना कर्जावर व्यवहार करतात. अशा वेळी तिथे व्याजदर ३० ते ४० टक्क्यांपर्यंतसुद्धा असू शकतो. आपण जे दागिने विकत घेतोय त्याच्यावर नक्की किती मजुरी आणि किती व्याज भरतोय हे त्यांच्या लक्षात येत नाही.

कर्ज घेते वेळी जी कागदपत्रे तयार केली जातात, त्यात नक्की काय लिहिलं आहे ते नीट तपासावं. कर्जाची मूळ रक्कम, व्याजदर, परतफेडीचा कालावधी, मासिक हप्ता, लवकर परतफेड करायच्या अटी व नियम, तारण ठेवलेल्या गोष्टीचा दाखला, परतफेड चुकल्यास भरावं लागणारं अतिरिक्त व्याज किंवा दंड, थकबाकी वसुलीचे नियम हे सर्व कर्जसंबंधी कागदपत्रांमध्ये नमूद असावे. कर्जाच्या कागदपत्रांमधील रिकाम्या जागेवर सही करू नका, ते पूर्ण भरा आणि मग सही करा. कर्ज घेताना स्वाक्षरी केलेल्या प्रत्येक कागदाची एक प्रत आपल्याकडे ठेवावी. जे काही तारण ठेवलं असेल त्याच्या मालकी संबंधितील सर्व कागदांची प्रत आपल्याकडे ठेवावी. जे कुणी हमीदार किंवा गॅरंटर म्हणून सही करतात त्यांनासुद्धा या सर्वांची माहिती असायला हवी. कारण मूळ कर्जदाराने जर पैसे फेडले नाही तर हमीदाराला ते फेडावे लागतात.

कर्जाची परतफेड झाल्यावर जिथून कर्ज घेतलं होतं तिथून ‘No Dues Certificate’ आणि सगळे मूळ कागद परत घ्यावे. स्थावर मालमत्ता आणि गाडी गहाण ठेवली असेल तर ‘Certificate of Satisfaction’ मिळवून योग्य कार्यालयात जाऊन तारण खोडून काढावं. जिथे कुठे विना तारीख चेक दिलेले असतील ते परत घ्यावे. वेळेआधी परतफेड झाल्यावर कोणी बँकेतील खात्यात हप्ता वसुली करतंय का यावर लक्ष ठेवावं. चांगल्या व्याज दरावर आणि योग्य संस्थेकडून कर्ज मिळवायचं असेल तर त्यासाठी आपली मिळकत व इतर गुंतवणूक तर चांगली असावी लागते पण त्याही पेक्षा आपला पतगुणांक (सिबिल स्कोर) चांगला असावा लागतो. आधी घेतलेली कर्ज जर वेळेवर फेडली असतील आणि सतत कर्ज घेतलेली नसतील तर हा ‘सिबिल स्कोर’ चांगला असतो. ७००/७५० च्या वर असणाऱ्या गुणांकासाठी कर्ज मिळवताना सोयीस्कर पडतं. ६८५ पेक्षा कमी गुणांक असल्यास शक्यतो बँकांकडून कर्ज नाही मिळत किंवा जास्त व्याजदराने मिळतं. क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जामुळेसुद्धा आपल्या पतगुणांकावर परिणाम होऊ शकतो. कर्ज घेऊन गुंतवणूक करत असाल तर व्याजदर आणि गुंतवणुकीतील परताव्याचा ताळमेळ सतत सांभाळावा लागतो. हल्ली लोक शेअर बाजारात कमी वेळेत भरपूर पैसे मिळतील अशा हव्यासापोटी कर्ज घेऊन इतर लोकांना ते गुंतवायला देतात. महिन्याला ४ ते ५ टक्के परतावा मिळेल, अशी भुरळ त्यांना घालण्यात येते. अनेकदा अशा लोकांना नुकसान सहन करावं लागतं. परतावे तर दूर राहिले, मूळ मुद्दलसुद्धा परत मिळत नाही. अशा वेळी मग घेतलेली कर्ज कशी फेडायची हा मोठा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो.

हेही वाचा – तांदूळ, साखर, मका; पुढे इथेनॉलचा धोका

दुर्दैवाने कधी जर अशी परिस्थिती आली की, कर्जाची परतफेड होत नाहीये, तिथे वेळीच कृती करावी. एक तर कर्ज देणाऱ्याकडे अधिक वेळेसाठी किंवा हप्ता कमी करण्यासाठी (Loan Restructuring) किंवा ‘One Time Settlement’ साठी पाचारण करावं. स्वस्त कर्ज फेडता येत नाही, म्हणून महाग कर्ज घेऊन ते फेडू नये. आत्महत्या हा कर्ज फेड करण्याचा मार्ग नाहीये. हतबल न होता, कोणत्या पद्धतीने या विळख्यातून बाहेर पडता येईल यावर लक्ष केंद्रित करावं. जिथे अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कर्जबाजारीपण आलं असेल, तिथे कदाचित तोडगा काढता येईल. परंतु जिथे चुकीच्या सवयीमुळे असं होत असेल तिथे काहीच आशा राहात नाही.

तेव्हा कर्जाचा उपयोग करताना खूपच खबरदारी बाळगायला हवी. आधी म्हटल्याप्रमाणे कर्जाच्या योग्य वापराने एका बाजूला दीर्घकालीन संपत्तीनिर्मिती होऊ शकते, पण गरजेपेक्षा जास्त घेतलेलं कर्ज हे आर्थिक विनाशाचं कारण ठरू शकतं.

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.