अगदी साखरेत घोळलेला आणि सिने तारे-तारकांची मांदियाळी असणारा हा चित्रपट म्हणजे बडजात्या कुटुंबाचा ‘हम साथ साथ है’.
साधा कौटुंबिक चित्रपट, पण खरेतर वेगळ्याच कारणासाठी नंतर प्रसिद्ध झाला. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेला सलमान खानने काळवीटांची शिकार केली, असा आरोप तेव्हा झाला. पुढे सलमानला अटक, लगेच जामीन, इतर सहकलाकारांनाही न्यायालयाच्या नोटिसा वगैरे सुरू राहिले. तरी हा चित्रपट आवडतो, कारण हा व्यवस्थापनातील एक अतिशय महत्त्वाचे तत्त्व तो शिकवून जातो. किंबहुना हा चित्रपट याच तत्त्वावर आधारित आहे. हे तत्त्व म्हणजे उत्तराधिकारी किंवा वारसा हक्क.
कुठल्याही उद्योगासाठी हे महत्त्वाचे असते की, मालक बदलले तरी उद्योग शाश्वत किंवा चिरंतन राहावा. मध्यमवर्गीयांमध्ये हा प्रश्न ‘इच्छापत्र (विल)’ करून सोडवला जातो. आपण आता कुठे याबाबत जास्त जागरूक झाले आहोत. पण हा प्रश्न सगळ्यात जास्त भेडसावतो तो त्या उद्योजकाला ज्याने अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केलेले असते.
चित्रपटातसुद्धा आलोकनाथ म्हणजे रामकिशन चतुर्वेदी यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे आणि त्यांची तीन मुले मोहनीश बेहल, सलमान खान आणि सैफ अली खान हे त्यांचे उत्तराधिकारी. पण तिघांपैकी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक (एमडी) कोण होणार यावर हा चित्रपट बेतलेला आहे. त्यात सावत्र आणि सख्खा अशी फोडणीसुद्धा आहे.
प्रत्यक्ष जीवनांत धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स समूहामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती उद्भवलेली होती. त्यावेळेला मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्या मातोश्री म्हणजे कोकिलाबेन यांनी धीराने परिस्थिती हाताळली आणि दोन्ही भावांमध्ये समेट घडवून आणला. या उद्योग समूहाचे इतके उद्योग होते की, दोन्ही भावांनी आपले आपले उद्योग वाटून घेतले आणि वाद शमला. पण चित्रपटात अलोकनाथ यांनी अनेक उद्योग उभारले नव्हते तर त्यांनी एकाच उद्योगाची उभारणी केली असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे अंबानी बंधूंसारखे उद्योग वाटून न घेता एकाच उद्योगातील विविध कार्ये वाटून घेण्याच्या बाबतीत त्यांची चर्चा होत असते.
आजसुद्धा कित्येक असे एकल उद्योग जेव्हा भावाभावांमध्ये वाटले जातात तेव्हा त्यांची कार्ये वाटून घेतली जातात. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ते नंतर गुण्यागोविंदाने राहतात आणि कंपनीची भरभराटसुद्धा होते. यात व्यवस्थापनातील एक सूत्र असे सांगते की, अशा वेळेला वारसदार कंपनीचे समभाग समप्रमाणात वाटून घेतील आणि मग कंपनीमध्ये आपापली कार्ये ठरवतील. यातसुद्धा कुठल्या वारासदाराने किती काम आधी केले आहे किंवा पुढे जाऊन करणार आहे यावर वाटणी ठरवली जाऊ शकते.
कंपनीचे मूल्यांकन करणे हल्ली सोपे झाले आहे, तेदेखील सूत्र वाटपासाठी वापरता येते. मुलांनासुद्धा लहानपणापासूनच याचे प्रशिक्षण देऊन किंवा संस्कार घडवून पुढे वाटणी केली जाते. पुढील काही पिढ्यांमध्ये तर कंपनी फक्त व्यावसायिक कंपनी चालवणाऱ्यांच्या हातात देऊन कुटुंबाचे वारसदार संचालक मंडळाचे सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून काम करतात. वाद तेव्हा होतात, जेव्हा त्या उद्योगपतींचा किंवा वारसदाराचा अचानक मृत्यू होतो आणि त्याचे इच्छापत्र वादात सापडते.
भारतात अशा अनेक उद्योजक घराण्यात वारसा हक्कावरून वाद झाले आहेत. काही सामोपचाराने मिटले, काही मध्यस्थीने, काही न्यायालयाच्या आदेशाने तर काही अजूनही सुरू आहेत. यात कल्याणी, के के मोदी, ओबेरॉय, दक्षिणेतील मुरुगप्पा, अपोलो समूहातील सिंग, वाडिया, बजाज इत्यादी घराण्यांचा समावेश होतो. जगातसुद्धा याआधी असेच वारसदारांवरून वाद झाले आहेत. इटलीतील गुच्ची, हॉंगकॉंगमधील सून हँग काई, दक्षिण कोरियामधील लोटे, हयात हॉटेल्स चालवणारी प्रिट्झकेर ही काही याची जागतिक उदाहरणे.
बऱ्याच वेळेला आपण जेव्हा अशा कंपन्यांच्या समभागात पैसे गुंतवतो तेव्हा कंपनीच्या पुढील वारसदाराचा विचारसुद्धा करणे गरजेचे असते. हम साथ साथ है चित्रपट बनवणाऱ्या बडजात्या कुटुंबातसुद्धा २०१६ च्या दरम्यान काही गडबड असल्याचे माध्यमांमध्ये छापून आले पण अगदी चित्रपटाप्रमाणेच त्यांनी शेवटी आपली एकी दाखवली आणि कुठलाही वाद नसल्याचे सांगितले.
ज्यांना कौटुंबिक उद्योगांविषयी अजून काही वाचायचे असेल तर साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते थॉमस मान यांची ‘बुडेनब्रुक’ ही कादंबरी नक्की वाचावी. तिसऱ्या पिढीत पोहोचलेल्या उद्योगांचे काय होते हे त्यांनी अतिशय रंजक पद्धतीने या कादंबरीत सांगितले आहे. चित्रपट राजश्री प्रॉडक्शनच्या यू-ट्यूबवर तुम्ही विनामूल्य बघू शकता. तुमचा अभिप्राय कळवत राहा कारण शेवटी आपणदेखील ‘साथ साथ’च!
