IIFL Finance Share Price Target : भारतीय शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ-उताराच्या काळात चांगला परतावा मिळवण्यासाठी मूलभूतदृष्ट्या मजबूत असलेल्या कंपन्यांचे शेअर्स निवडणे अत्यंत आवश्यक आहे. देशातील आघाडीची बँक-व्यतिरिक्त वित्तीय कंपनी (NBFC) ‘आयआयएफएल फायनान्स लिमिटेड’ (बीएसई कोड: ५३२६३६) सध्या रु. ६०९ च्या आसपास व्यवहार करत असून, पुढील २४ महिन्यांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून हा शेअर गुंतवणुकीसाठी एक आकर्षक पर्याय म्हणून समोर येत आहे.
माझा पोर्टफोलिओ
- आयआयएफएल फायनान्स लिमिटेड (बीएसई कोड ५३२६३६)संकेतस्थळ: http://www.iifl.com
- प्रवर्तक: निर्मल जैन
- बाजारभाव: रु. ६०९/-
- प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: एनबीएफसी
- भरणा झालेले भाग भांडवल: रु.८५.०६ कोटी
- शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
- प्रवर्तक २४.८४
- परदेशी गुंतवणूकदार २३.८६
- बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ७.५०
- इतर/ जनता ४३.८०
- पुस्तकी मूल्य: रु. ३२७
- दर्शनी मूल्य: रु.२/-
- लाभांश: २००%
- प्रति समभाग उत्पन्न: रु. ४९.४४
- किंमत उत्पन्न गुणोत्तर: १२.३
- समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २०.८
- डेट इक्विटि गुणोत्तर: ४.९७
- कॅपिटल अॅडीक्वसी गुणोत्तर: २४.३%
- नक्त अनुत्पादित कर्ज प्रमाण: ०.८%
- रिटर्न ऑन इक्विटि (ROE): १९.५%
- रिटर्न ऑन असेट्स: ३.१%
- बीटा : १.६
- बाजार भांडवल: रु. २५,८९१ कोटी (मिड कॅप)
- वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६७५/४०९
- गुंतवणूक कालावधी: २४ महिने
आयआयएफएल फायनान्स लिमिटेड ही भारतातील एक वैविध्यपूर्ण बँकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) आहे. कंपनी आपल्या उपकंपन्यांसह कर्ज आणि तारण कर्ज (मॉर्गेज) व्यवसायात कार्यरत आहे. कंपनी तिच्या आयआयएफएल होम फायनान्स आणि आयआयएफएल समस्ता फायनान्स या उपकंपन्यांसह गृहकर्ज, सुवर्ण कर्ज, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) कर्ज, सूक्ष्म वित्त (मायक्रोफायनान्स) आणि भांडवली बाजार वित्तपुरवठा यांसारखी विविध प्रकारची कर्ज उत्पादने उपलब्ध करून देते. सुमारे ४,९३७ शाखांचे जाळे असलेल्या आयआयएफएलकडून, भारतातील सेवांपासून वंचित राहिलेल्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘फायजिटेल’ (भौतिक आणि डिजिटल यांचा मेळ घालणाऱ्या) कार्यपद्धतीचा प्रभावीपणे वापर केला जातो. आयआयएफएलची आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तीन महिन्यांत एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ९८,३३६ कोटी रुपये इतकी आहे.
आयआयएफएलचा व्यवसाय विभाग
१) गृहकर्ज: देशभरात ३१५ गृहकर्ज शाखा कार्यरत आहेत. या विभागामध्ये परवडणारी घरे आणि बिगर-मेट्रो क्षेत्रातील गृहकर्जांवर लक्ष केंद्रित केले जाते.
२) सुवर्ण कर्ज : पगारदार, स्वयंरोजगारित आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) ग्राहक वर्गाला २५ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे २,८२३ शाखांद्वारे सुवर्ण कर्जे दिली जातात.
३) एमएसएमई कर्ज
४) मायक्रोफायनान्स : कंपनी स्वयंरोजगारित महिलांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या उपक्रमांसाठी लहान रकमेची सूक्ष्म कर्जे पुरवते. मायक्रोफायनान्स ग्राहकांची संख्या २९.७ लाख इतकी होती आणि ही सेवा भारतभरातील १,६४८ शाखांमधून दिली जाते.
५) बांधकाम आणि गृहनिर्माण : हा समूह या क्षेत्रांमधील आपल्या कर्ज पोर्टफोलिओचे प्रमाण जाणीवपूर्वक कमी करत आहे. समूहाने यापूर्वी अर्थसहाय्य दिलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे आणि तसेच ‘आयआयएफएल होम फायनान्स’द्वारे परवडणाऱ्या बांधकामासाठी लहान रकमेचे कर्ज पुरवण्याचाही विचार करत आहे.
६) भांडवली बाजार वित्तपुरवठा : भांडवली बाजार क्षेत्रात, हा समूह ‘आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस’च्या किरकोळ ग्राहकांना वित्तपुरवठा करतो.
आयआयएफएलची भौगोलिक विभागणी
मुख्य व्यवसाय
उत्तर: २९%
दक्षिण: २६%
पश्चिम: ३१%
पूर्व: १४%
आयआयएफएल फायनान्सने आपल्या मुख्य व्यवसायांमध्ये सातत्यपूर्ण वाढ नोंदवत विद्यमान आर्थिक वर्षातील पाहिल्याच तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न ३४ टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह २,२०२.४ कोटी इतके राहिले, तर कर-पूर्व नफा १६१ टक्क्यांच्या वाढीसह ९२८.६ कोटी झाला; यावरून कंपनीचा मजबूत ‘ऑपरेटिंग लिव्हरेज’ आणि सुधारलेली मालमत्ता गुणवत्ता दिसून येते. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात १६० टक्क्यांची वार्षिक वाढ होऊन तो ७१३ कोटींवर गेला आहे. सुरक्षित कर्जवाटपावर धोरणात्मक लक्ष, शिस्तबद्ध पोर्टफोलिओ पुनर्रचना आणि सुधारलेली कार्यक्षमता यांमुळे हे यश शक्य झाले आहे.
कंपनी व्यवस्थापनानुसार आयआयएफएल आर्थिक वर्ष २०२७ च्या उर्वरित कालावधीत देखील अशीच दमदार गती आणि भक्कम ताळेबंदासह प्रवेश करत आहे. कंपनीचा स्पष्ट धोरणात्मक आराखडा असून, त्यात संपूर्ण वर्षासाठी ‘एयूएम’मध्ये सुमारे २५ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून कंपनीने १६-२०टक्के आरओईचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कंपनी व्यवस्थापन पुढील धोरणे राबवत आहे
- सुरक्षित कर्ज व्यवसायाचा विस्तार करणे
- बँकांसोबतच्या सह-कर्ज भागीदारी वाढवणे
- प्रस्तावित इक्विटी उभारणी
- मालमत्तेचा उत्कृष्ट दर्जा आणि भांडवली शिस्त राखणे.
उत्तम आणि अनुभवी व्यवस्थापन, देशभरात कंपनीचा आपल्या उपकंपन्यासह धोरणात्मक व्यवसाय विस्तार आणि उत्तम कर्ज वसूली यामुळे सध्या ६०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून आकर्षक वाटतो.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण स्वीकारावे.
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com - हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून तो गुंतवणूक सल्ला नव्हे
- प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
- लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
