प्रवीण देशपांडे
Income Tax Heads Salary Income Rules :
प्राप्तिकर कायद्यानुसार करदात्याला त्याचे उत्पन्न पाच उत्पन्नाच्या स्त्रोतात विभागून दाखवावे लागते. यामध्ये पगाराचे उत्पन्न, घरभाडे उत्पन्न, उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न, भांडवली नफा आणि इतर उत्पन्न यांचा समावेश होतो. करदात्याने कोणत्याही प्रकारचा व्यवसाय किंवा उपक्रम केला असला तरी त्याचे उत्पन्न याच पाच स्त्रोतात विभागावे लागते.

उत्पन्न योग्य उत्पन्नाच्या स्त्रोतात दाखविणे हे खूप महत्त्वाचे आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतानुसार कर आकारणी, वजावटी, विवरणपत्राचा फॉर्म, तोटा, कॅरी-फॉरवर्डच्या तरतुदी लागू होतात. प्रत्येक प्रकारच्या उत्पन्नाच्या स्त्रोतासाठी विवरणपत्रात त्याच्याबद्दल द्यावयाची माहिती सुद्धा वेगवेगळी आहे. या प्रत्येक उत्पन्नाच्या स्त्रोतात कोणत्या प्रकारचे उत्पन्न दर्शविले जाते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

जे करदाते नोकरी करतात आणि त्यांना जो पगार मिळतो तो ‘पगाराचे उत्पन्न’ या स्त्रोतात करपात्र आहे. वेतन, निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी, रजेची भरपाई, पगाराच्या व्यतिरिक्त मिळणारे कमिशन, वेतनाच्या बदल्यात मिळणारा नफा, पगाराची आगाऊ रक्कम, मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधीच्या शिल्लक रकमेत होणारी वार्षिक भर, वगैरे उत्पन्न या स्त्रोतात दाखविले जाते. या संदर्भात काही मुद्दे खालीलप्रमाणे :

१ . या स्त्रोतात उत्पन्न दाखविण्यासाठी करदाता आणि मालक यांच्यात मालक-कर्मचारी संबंध असणे आवश्यक आहे. मालक-कर्मचारी संबंध नसल्यास उत्पन्न ‘पगाराचे उत्पन्न’ म्हणून समजले जात नाही. तो नोकर आहे की व्यावसायिक हे ठरविण्यासाठी काही निकष आहेत.
एखादा करदाता मालकाच्या थेट नियंत्रणाखाली किंवा देखरेखीखाली काम करत असेल तर त्यांचे संबंध मालक कर्मचारी असे समजले जातात. एखादा व्यावसायिक हा मालकाच्या थेट नियंत्रणाखाली किंवा देखरेखीखाली काम करण्याऐवजी, एक स्वतंत्र मुख्य व्यक्ती (प्रिन्सिपल) म्हणून काम करत असेल तर त्याला मिळणारे उत्पन्न हे पगाराचे उत्पन्न म्हणून न समजता ते ‘उद्योग-व्यवसायाचे’ उत्पन्न समजले जाते. उदा. एखादा वकील किंवा डॉक्टर कंपनीसाठी स्वतंत्रपणे काम करत असेल तर ते उत्पन्न ‘उद्योग-व्यवसायाचे’ उत्पन्न समजले जाते. बऱ्याच वेळेला कर्मचारी कंपनीतून निवृत्त होतो, कंपनीतून मिळणारे निवृत्तीचे लाभ सुद्धा घेतो. त्यानंतर कंपनी पुन्हा त्याला, त्याच्या अनुभवाच्या जोरावर, काही काळासाठी काम देते अशा वेळेला प्रश्न उद्भवतो की, त्याला मिळणारे ‘वेतन’ आहे की ‘व्यावसायिक उत्पन्न’. करदात्याने मालकाबरोबर करार कशा पद्धतीने केला आहे यावर हे अवलंबून आहे. यावर त्याचे करदायित्व ठरते. पगाराच्या उत्पन्नातून करदात्याला फक्त ७५,००० रुपयांची प्रमाणित वजावट मिळते आणि व्यावसायिक उत्पन्नातून त्याला प्रत्यक्ष खर्च वजा करता येतो.

एका प्रकरणात करदाता निवृत्तीनंतर त्याच कंपनीत रुजू झाला आणि त्याने त्याला मिळणारे उत्पन्न व्यावसायिक उत्पन्न दाखविले, प्राप्तिकर अधिकाऱ्याने हे उत्पन्न कर वाचविण्यासाठी व्यावसायिक उत्पन्न म्हणून दाखविले असे सांगून ते उत्पन्न ‘पगाराचे उत्पन्न’ दाखविले. प्राप्तिकर प्राधिकरणाने या प्रकरणात असा निवाडा दिला की हे उत्पन्न, कंपनी आणि करदात्याने केलेल्या करारावर अवलंबून आहे. करारानुसार करदाता स्वतंत्रपणे काम करत असेल तर ते उत्पन्न व्यावसायिक उत्पन्न समजले जाईल.

कंपनीने कर्मचाऱ्याला कामाबद्दल दिलेली भरपाई ही ‘पगार’ म्हणून दाखविला आहे की ‘व्यावसायिक खर्च’ हे सुद्धा तपासून बघितले पाहिजे. पगाराच्या उत्पन्नातून उद्गम कर कापताना त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार कर कापला जातो, करदात्याचे पगारातून मिळणारे उत्पन्न १२,७५,००० पेक्षा कमी असेल तर त्याच्या पगारातून उद्गम कर कापला जाणार नाही. व्यावसायिकाच्या उत्पन्नावर साधारणतः १० टक्के उद्गम कर कापला जातो.

२. वेतन उत्पन्नावर ‘देय आधारावर’ किंवा ‘प्राप्ती आधारावर’, यापैकी जे आधी असेल त्यानुसार कर आकारला जातो. या वर्षादरम्यान करदात्याला त्याच्या मालकाकडून मिळणे बाकी असलेले वेतन, मग तो दिलेले असो वा नसो तरी ते करपात्र उत्पन्नात गणले जाते.
३. या वर्षात, वेतन देय होण्यापूर्वी, मालकाकडून करदात्याला दिलेला पगार हा करपात्र उत्पन्नात गणला जातो.
४. या वर्षादरम्यान मालकाकडून करदात्याला दिलेली वेतन थकबाकी, जर ती आधीच्या कोणत्याही वर्षात उत्पन्नात दाखविली नसल्यास ती या वर्षात करपात्र असेल. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या पगाराचा काही भाग थकबाकीच्या स्वरूपात किंवा आगाऊ मिळाला, अथवा पगाराच्या बदल्यात नफा मिळाला, तर तो कलम १५७ नुसार सवलतीचा दावा करू शकतो.
५. भागीदाराला फर्मकडून मिळालेले वेतन, बोनस किंवा कमिशन हे ‘पगार’ या स्त्रोतात करपात्र नसते, तर ते ‘उद्योग-व्यवसायाच्या’ उत्पन्नाच्या स्त्रोतात करपात्र असते.
६. ज्या ठिकाणी कर्मचारी सेवा पुरवितो, त्या ठिकाणी, वेतन मिळवलेले आहे असे मानले जाते, मग त्याचे प्रदान भारताबाहेर केले असले तरी, परकीय सरकारद्वारे भारतात कार्यरत असलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्याला दिलेले वेतन भारतात ‘पगार’ या स्त्रोतात करपात्र असते.
७. भारतात घेतलेल्या रजेची भरपाई परदेशात जरी दिली असेल तरी ती भारतातच करपात्र असेल.
८. जर भारताचा एखादा नागरिक भारताबाहेर सेवा बजावत असेल आणि त्याला भारत सरकारकडून वेतन मिळत असेल, तर ते वेतन भारतातच मिळवलेले मानले जाते आणि त्यावर भारतात कर आकारला जातो.

पगारातून मिळणाऱ्या वजावटी :

करदात्याने जुन्या करप्रणालीचा स्वीकार केल्यास प्राप्तिकर कायद्यात अस्तित्वात असलेल्या वजावटींचा लाभ घेऊन तो कर भरू शकतो. यात प्रामुख्याने भविष्य निर्वाह निधी, विमा हफ्ता, गृहकर्जाची परतफेड, गृह कर्जावरील व्याज, मेडिक्लेम, शैक्षणिक कर्जावरील व्याजाची वजावट, घरभाडे भत्याची वजावट, वगैरेंचा समावेश होतो.

करदाता नवीन कर प्रणालीनुसार कर भरणार असेल तर त्याला मर्यादित वजावटी मिळतात, उदा. ७५,००० रुपयांपर्यंतची प्रमाणित वजावट, राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत मालकाने केलेले योगदान, अग्निवीर फंडाला केलेले योगदान, वगैरे,

पगारदार कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या किंवा राजीनाम्याच्या वेळी मिळणाऱ्या सेवानिवृत्ती लाभांवर, जुन्या आणि नवीन अशा दोन्ही करप्रणालीनुसार मोठी कर सवलत मिळते. यामध्ये सेवानिवृत्तीनंतर दिली जाणारी ग्रॅच्युइटी (सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्णपणे करमुक्त आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना २० लाख रुपयांपर्यंत वजावट), रजेची भरपाई (सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्णपणे करमुक्त आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना २५ लाख रुपयांपर्यंत वजावट), निवृत्तीच्या वेळी किंवा सलग ५ वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचाऱ्याने, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातून काढलेली एकरकमी रक्कम कर्मचाऱ्यांना दिले जाणारे ‘ईसॉप’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी कर्मचारी समभाग मालकी योजना (ईसॉप) अस्तित्वात आली. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना समभागाच्या स्वरुपात कंपनीची मालकी दिली जाते. या योजनेत कंपनी, समभाग, मोफत किंवा अल्पदराने वितरीत करते. कर्मचाऱ्याला या योजनेत दोन टप्प्यात कर भरावा लागतो.

पहिला, कर्मचारी जेव्हा हा विकल्प ‘एक्सरसाईज’ करतो तेव्हा आणि दुसरा, या समभागाची विक्री करतो तेव्हा. पहिल्या टप्प्यात ज्या दिवशी हा विकल्प ‘एक्सरसाईज’ केला त्या दिवशीचे योग्य बाजार मूल्य आणि कर्मचाऱ्याने दिलेली रक्कम या दोन्हीच्या फरकाएवढी रक्कम कर्मचाऱ्याचा लाभ (परक्विझिट) म्हणून समजले जाते आणि ती पगाराच्या उत्पन्नात गणली जाते. यावर कंपनी उद्गम कर (टीडीएस) सुद्धा कापते. पात्र नवउद्यमींकडून अर्थात ‘स्टार्ट-अप’कडून ‘ईसॉप’ प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्याला विकल्प एक्सरसाईज करण्याच्या वर्षात कर भरण्याची गरज नाही. त्यांना काही सवलती दिलेल्या आहेत. कर्मचाऱ्याने समभागाची विक्री केल्यास त्यावर होणारा नफा किंवा तोटा ‘भांडवली नफा’ या स्त्रोतात करपात्र असतो.
pravindeshpande1966@gmail.com