प्रवीण देशपांडे
Income Tax Loss Set Off Rules :
करदात्याला त्याचे उत्पन्न पाच स्त्रोतांमध्ये विभागावे लागते. यामध्ये पगाराचे उत्पन्न, घरभाडे उत्पन्न, उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न, भांडवली नफा आणि इतर उत्पन्न या पाच उत्पन्नांचा समावेश आहे. करदात्याला जे उत्पन्न मिळते ते याच पाच उत्पन्नाच्या स्त्रोतात विभागावे लागते. प्रत्येक उत्पन्नाच्या स्त्रोतात मिळणाऱ्या उत्पन्नासाठी नियम वेग-वेगळे आहेत, त्यातून मिळणाऱ्या वजावटी वेग-वेगळ्या आहेत तर काही उत्पन्नाच्या बाबतीत कराचा दर सुद्धा वेग-वेगळा आहे. त्यामुळे करदात्याला त्याचे उत्पन्न योग्य स्त्रोतात विभागणे गरजेचे आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार करदात्याला मिळालेल्या उत्पन्नातून, पात्र वजावटी घेऊन करपात्र उत्पन्न गणले जाते. काही आर्थिक व्यवहारात अशा वजावटी घेतल्यानंतर त्याला तोटा सुद्धा होऊ शकतो. असा तोटा झाल्यानंतर हा तोटा त्याच स्त्रोतांमध्ये विभागावा लागतो. काही अटींची पूर्तता केल्यास या तोट्याचा करदात्याला फायदा घेता येतो जेणेकरून त्याचे करदायित्व कमी होऊ शकते. तोटा झाल्यास करदाता, आपले करदायित्व कसे कमी करू शकतो? कोणत्या उत्पन्नातून तोटा वजा करू शकतो? तोटा कोणत्या वर्षी वजा करू शकतो? या विषयीची माहिती करदात्याला असणे गरजेचे आहे.

तोटा वजा करण्याचा क्रम :

करदात्याला एका उत्पन्नातून तोटा झाल्यास तो दुसऱ्या उत्पन्नातून वजा करता येतो. उत्पन्नातून असा तोटा वजा केल्यास करदात्याचा कर वाचू शकतो. हा तोटा इतर उत्पन्नातून वजा करण्यासाठी एक ठराविक क्रम आहे आणि त्या क्रमानुसार तो उत्पन्नातून वजा करता येतो किंवा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो. हा क्रम खालीलप्रमाणे :

१. त्याच उत्पन्नाच्या स्त्रोतातून प्रथम वजावट : करदात्याला ज्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये तोटा झाला असेल, तर तो प्रथम त्याच उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये झालेल्या नफ्यामधून वजा करता येतो. उदा. करदात्याला घरभाडे उत्पन्नाच्या स्त्रोतात तोटा झाल्यास तो तोटा दुसऱ्या घरभाडे उत्पन्नातून प्रथम वजा करावा लागतो. तो होत नसेल किंवा काही बाकी शिल्लक असेल तर तो इतर स्त्रोतातील उत्पन्नातून वजा करता येतो,

२. इतर स्त्रोतातील उत्पन्नातून वजावट : तोटा त्याच उत्पन्नाच्या स्त्रोतातून वजा होत नसेल तर तो इतर उत्पन्नाच्या स्त्रोतातून वजा करता येतो, यासाठी काही नियम आहेत. तोटा इतर स्त्रोतातील उत्पन्नातून सुद्धा वजा होत नसेल किंवा काही बाकी शिल्लक असेल तर तो पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो.

३. पुढील वर्षासाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ : तोटा उत्पन्नामधून सुद्धा वजा होत नसेल तर तो पुढील वर्षासाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो. हा पुढील वर्षासाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ केलेला तोटा पुढील वर्षातील उत्पन्नातून वजा करता येतो. यासाठी सुद्धा काही नियम आहेत.

  • ज्या वर्षी तोटा झाला आहे तो तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करावयाचा आहे, त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे. हा नियम घर-भाडे उत्पन्नांतर्गत तोट्याच्या ‘कॅरी-फॉरवर्ड’साठी लागू नाही. या वर्षी तोटा नाही परंतु मागील वर्षीचा तोटा पुढील वर्षासाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करावयाचा असेल तर विवरणपत्र मुदतीत दाखल करण्याची अट नाही.
  • ‘सट्टा व्यवसायातील तोटा’ हा त्याच वर्षीच्या सट्टा व्यवसायाच्या नफ्यातून वजा न झाल्यास पुढील ४ वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो.
  • घरभाडे उत्पन्नाच्या स्त्रोतातील तोटा हा पुढील ८ वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो आणि पुढील वर्षी फक्त घरभाडे उत्पन्नातूनच वजा करता येतो.
  • उद्योग-व्यवसायातील तोटा हा पुढील ८ वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो आणि पुढील वर्षी फक्त उद्योग-व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो,
  • भांडवली तोटा हा पुढील ८ वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो. पुढील वर्षी दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो आणि अल्पमुदतीचा भांडवली तोटा पुढील वर्षी दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो.
  • करदात्याला झालेला तोटा दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही.
  • करदाता ‘कॅरी-फॉरवर्ड’ केलेला तोटा पुढील ४ वर्षात (सट्टा व्यवसायातील तोट्यासाठी) आणि या व्यतिरिक्त तोटा पुढील ८ वर्षातील उत्पन्नातून वजा करू शकला नाही तर तो रद्द होतो. या मुदतीनंतर तो उत्पन्नातून वजा करता येत नाही किंवा ‘कॅरी-फॉरवर्ड’ सुद्धा करता येत नाही.

करदात्याला याच क्रमामध्ये तोट्याची वजावट घेता येते. परंतु या प्रत्येक क्रमासाठी काही नियम आणि अपवाद आहेत.

घरभाडे उत्पन्नावरील तोटा : करदात्याला मिळालेल्या घरभाड्याच्या उत्पन्नातून करदाता मालमत्ता कर, ३० टक्के प्रमाणित वजावट, व्याज, वसूल न झालेले भाडे, याची वजावट घेऊ शकतो. अशी वजावट घेतल्यानंतर गणलेले उत्पन्न सकारात्मक आल्यास करपात्र उत्पन्नात गणले जाते आणि नकारात्मक आल्यास तो तोटा इतर घरभाडे उत्पन्नातून वजा करता येतो किंवा तो न झाल्यास तो इतर उत्पन्नातून वजा करता येतो. परंतु फक्त २ लाख रुपयांपर्यंतचाच तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो. करदात्याने नवीन करप्रणाली स्वीकारल्यास हा २ लाख रुपयांचा तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

गुंतवणुकीवरील तोटा : करदात्याने कोणत्याही संपत्तीची विक्री केल्यास होणारा नफा हा ‘भांडवली नफा’ या उत्पन्नाच्या स्त्रोतात करपात्र असतो. संपत्तीच्या धारणकाळानुसार हा अल्पमुदतीचा किंवा दीर्घमुदतीचा असतो. दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो, अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येत नाही. अल्पमुदतीचा भांडवली तोटा मात्र दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. उदा. करदात्याला सोन्याच्या विक्रीतून दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला आणि समभागाच्या विक्रीतून दीर्घमुदतीचा किंवा अल्पमुदतीचा भांडवली तोटा झाल्यास हा तोटा सोन्याच्या दीर्घमुदतीच्या नफ्यातून वजा करता येतो. भांडवली तोटा हा इतर स्त्रोताच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही.

उद्योग व्यवसायातील तोटा : करदाता जर उद्योग-व्यवसाय करत असेल आणि त्याचा खर्च, वगैरेच्या वजावटी या उत्पन्नापेक्षा जास्त असतील तर त्याला तोटा होतो. हा तोटा त्याला त्याच्या इतर उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून वजा करता येतो. उदा. करदाता एक घाऊक विक्रीचा उद्योग करतो आणि त्याचा शिवाय त्याचा बांधकाम व्यवसाय सुद्धा आहे, त्याला घाऊक विक्रीच्या उद्योगात तोटा झाल्यास तो तोटा, बांधकाम व्यवसायाच्या नफ्यातून वजा करू शकतो. याला अपवाद आहे सट्टा व्यवहारातील (ज्या व्यवहारात मालाचा ताबा घेतला जात नाही) तोटा, जो इतर उद्योग-व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही, तो फक्त सट्टा व्यवहारातील नफ्यामधूनच वजा करता येतो. उद्योग-व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही.

इतर तोटा : घोड्याच्या व्यवसायातील तोटा हा फक्त घोड्याच्या व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो, लॉटरी, शब्दकोडे, पत्तेखेळ, किंवा जुगार, बेटिंगमधील तोटा इतर कोणत्याही उत्पन्नातून वजा करता येत नाही. कोणत्याही उत्पन्नाच्या स्त्रोतामधील तोटा हा लॉटरी, शब्दकोडे, पत्तेखेळ, किंवा जुगार, बेटिंगमधील उत्पन्नातून वजा करता येत नाही. कोणत्याही उत्पन्नाच्या स्त्रोतामधील तोटा हा घोड्याच्या व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही. आभासी चलनाच्या व्यवहारात झालेला तोटा हा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

प्रवीण देशपांडे

pravindeshpande1966@gmail.com