निखिल चितळे
गेल्या दशकभरापासून भारत दूध उत्पादनात जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर आहे. आज आम्ही काळातही दूध उत्पादन क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करायचे झाल्यास तेरी क्षेत्राचा विकास आवश्यक आहे. त्यासाठी सर्वच पातळ्यांवर अधिक वेगाने काम होण्यास वाव आहे. जागतिक दूध उत्पादन दिनानिमित्त यावर टाकलेला प्रकाश.

दूध आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक असून, यातून अनेक पोषणमूल्य मिळतात. दुधापासून दही, ताक, लस्सी, लोणी, तूप, पनीर, चीज आदी अनेक पदार्थ बनतात. त्यामुळेच दूध आता एक बाजारपेठ असून, त्याता व्यावसायिकता आहे. भाराताच्या आर्थिक विकासात दुधाचे योगदान ५ टक्के असून, देशातील कृषी क्षेत्रातील सर्वांत मोठे उत्पादन म्हणून दूध आहे.

नॅशनल अकाउंट्स स्टॅटिस्टिच्या आकडेवारीनुसार, देशाच्या ग्रामीण भागातील आठ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंब यातून थेट अर्थाजन करीत आहेत. तसेच, लाखो अप्रत्यक्ष रोजगार संधींबरोबर शाश्वत उत्पन्नाचा स्रोत, अशी दूध उत्पादनाची ओळख आहे. केंद्र सरकारचे धोरण, सहकार व खासगी क्षेत्राच्या योगदानामुळे भारत जागतिक पातळीवर गेल्या अनेक वर्षांपासून दूध उत्पादनाबाबत पहिल्या क्रमांवर आहे. आज कृषीप्रधान असणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेत दूध आणि दुग्धउत्पादन गेल्या दहा वर्षांत सरासरी ५.७ टक्के वाढले आहे. उत्पादन मूल्यात बोलायचे झाल्यास २०२४ मध्ये देशातील डेअरी उद्योग १८.९८ लाख कोटी रुपयांचा पोचला.

पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडील माहितीनुसार जगाच्या एकूण दूध उत्पादनात भारताचा वाटा २५ टक्कांवर असून, २०२३-२४ मध्ये २३.९३ कोटी टन दुधाचे उत्पादन झाले, तर हेच प्रमाण २०१४-१५ मध्ये १४.६३ कोटी टनांवर होते. सरकार, प्रशासन, सहकार, खासगी क्षेत्र व शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून साकारले आहे. पण, जागतिक पातळीवर प्रति जनावर दूध उत्पादकता लक्षात घेता आपल्याला अनेक सुधारणा करणे आवशक्य आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे झाल्यास पशूपालन हा शाश्वत उत्पन्नासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्यासाठी शेतीव्यतिरिक्त दुधाळ विशेषतः गाय-म्हैस यांच्यापासून मिळणाऱ्या दुधाचा उतारा दुपटीने वाढण्याची गरज आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशनअंतर्गत प्रयत्न सुरू झाले आहे. पण, आपण दूध उत्पादना पहिल्या क्रमांकावर कसे पोचलो, हेही जाणणे तितकेच महत्त्वाचे असून, भविष्यात वाढीसाठी काय केला पाहिजे त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

धवलक्रांती योजना

स्वातंत्र्यानंतरच्या दूध उत्पादन वाढीचा वार्षिक दर १.६४ टक्क्यांवरू घसरून होता १९६० च्या आसपास १.१५ टक्क्यांवर आला होता. दुधाचे उत्पादन घटल्याने प्रति व्यक्ती सेवन १९७० मध्ये दिवसाला १०७ ग्रॅमपर्यंत खाली आले होते. तसेच, जगातील सर्वांत कमी प्रमणांबरोबर किमान पोषणमानापेक्षा खाली होते. देशाचे वार्षिक दूध उत्पादनही २.१ कोटी टनांपेक्षा कमीच होते. तत्कालीन लोकसंख्या, भविष्यातील गरज आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी यात वाढ करणे आवश्यक होते. त्यामुळेच यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने ऑपरेशन फ्लड ही धवल क्रांती योजना तयार केली. यात प्रशासन, सहकार आणि तेव्हा हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच असणाऱ्या खासगी दुग्ध उत्पादकांना त्यासाठी एकत्रित करण्यात आले.

तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी १९६४ मध्ये गुजरातमधील आणंदला भेट दिल्यावर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या स्थापनेबरोबर ऑपरेशन फ्लड कार्यक्रम टप्प्याटप्प्याने देशाच्या ग्रामीण भागात आमलात आणण्याचे निश्चित झाले. ऑपरेशन फ्लड (धवल क्रांती) योजनेसाठी प्रशासन, सहकारी संस्था यांच्या खांद्याला-खांदा लावून खासगी संस्था या दुग्ध उत्पादन व व्यवसाय वृद्धीसाठी शेतकऱ्यांबरोबर काम करीत होत्या. त्या पैकी मे. बी. जी. चितळे अर्थात चितळे डेअरी महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत होती. शेतीबरोबर दूध उत्पादनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, हा विश्वास माझे पणजोबा भास्कर व आजोबा नानासाहेब (परशुराम) चितळे यांना होता. त्यांना साथ मिळाली ती त्यांचे बंधू काकासाहेब चितळे यांची.

नानासाहेबांनी सुरुवातीस भिलवडीपासून काम सुरू केले व पुढे ती व्याप्ती सांगली जिल्ह्यात पोचली. शेतीबरोबर डेअरीचे ज्ञान घेऊन दूध उत्पादन केल्यास आर्थिक स्थिती सुधारू शकते हा विश्वास होता. त्यामुळे नानासाहेबांनी गावोगावी जाऊन याबाबत जागरूकत करण्यास सुरुवात केली. सांगली जिल्ह्यात १९५० ते १९७० पर्यंत जनावरांसाठी पुरेशा पशुवैद्यकीय सुविधा नव्हत्या. नानासाहेबांनी याबाबत प्रशिक्षण घेतलं आणि लोकांना ते ज्ञान देण्याबरोबर अनेकांना ते घेण्यासाठी बेंगळूरूला देखील पाठविले. त्याचबरोबर अधिक दूध देणाऱ्या म्हशी व गायी अन्य राज्यांतून आणून दिल्या. दूध उत्पादन वाढण्यासाठी जनावरांचे आरोग्य, उत्तम वळूंचे संगोपन आदींबाबत गावोगावी जाऊन जनजागृती केली. त्याबद्दल चितळे डेअरीला चार वेळा केंद्र सरकारचे राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक मिळाले.

केवळ दूध उत्पादन करून चालणार नाही त्यासाठी दुधाळ जनावरे पाहिजेत, परदेशाप्रमाणे आपल्याकडे कृत्रिम रेतनाची सुविधा असायला हवी, याबाबत चितळे डेअरी पहिल्यापासून आग्रही होती. त्यामुळे शेतकऱ्यांना अन्य राज्यांतून दुधाळ गायी-म्हशी आणून दिल्या. तसेच, कृत्रिम रेतनाची सुविधा उभारण्यापासून ते आता आशियातील सर्वांत मोठे सेक्सेल सीमन सुविधा केंद्र सुरू करण्यापंर्यंत काम केले आहे. देशातील दुग्ध उत्पादन वाढाण्याबरोबर देशी वळू आणि गोवंश यांचे पुनरूज्जीव करण्याच्या हेतून जगातील सर्वांत मोठी जेनेटिक्स सुविधा देणाऱ्या जीनस एबीएस या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. भिलवडी येथील ब्रह्मा फॅसिलिटीमध्ये ११० पेक्षा जास्त वळू असून, त्या पैकी ४० टक्के आयात केले आहेत. वर्षाला पन्नास लाख सीमन स्ट्रॉ तयार होतात व देशपातळीवर त्या उपलब्ध आहेत. शेतकऱ्या उच्च वंशावळीच जनवार मिळावीत, हा या केंद्राचा हेतू आहे.

राष्ट्रीय गोकुळ मिशन

देशी गोवंशच्या विकास व संवर्धनासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन (आरजीएम) डिसेंबर २०१४ पासून राबविण्यात येत आहे. दुधाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि देशातील ग्रामीण शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय अधिक किफायतशीर बनविण्यासाठी दूध उत्पादन आणि गोवंशाची उत्पादकता वाढविण्यासाठी ही योजना महत्वाची आहे.

पशुपालनातील ७० टक्क्यांहून अधिक कामे महिलांकडून केली जात असल्याने विशेषत: महिलांना या कार्यक्रमाचा फायदा होणार आहे. प्रजननासाठी उच्च अनुवांशिक गुणवत्तेच्या वळूंच्या वापराचा प्रसार करणे, प्रजनन नेटवर्क बळकट करून आणि शेतकऱ्यांच्या दारात कृत्रिम रेतन सेवा पुरवून कृत्रिम रेतन कव्हरेज वाढवणे, वैज्ञानिक आणि सर्वांगीण पद्धतीने देशी गायी आणि म्हशींचे संगोपन आणि संवर्धनाला प्रोत्साहन देणे आदी या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत. जागतीक पातळीवर दिवसाला प्रति व्यक्ती ३२२ ग्रॅम दूध मिळते, तर भारतात आता दिवसाला प्रति व्यक्ती ४७१ ग्रॅम दूध मिळते आणि हेच आपल्या धवलक्रांतीचे यश आहे. पण, यात वाढीस मोठा वाव आहे.

अर्थव्यस्था गती मान होईल

अमेरिका व ब्राझीलमध्ये संघटीत स्वरूपात मिल्क फार्मिंग होत असल्याने दुधाचे उत्पादन प्रति जनावर खूप अधिक आहे. इस्राइलसारखा छोटा देश चारा, पाणी व जेनेटिक्सवर नियंत्रण करीत असल्याने तेथील प्रति जनावर उत्पादकता आपल्यापेक्षा तिप्पट आहे. आपल्याला वाढ करायची झाल्यास शेतीपूरक व्यवसायामध्ये भावनीक न होता व्यावहारिकतेतून लक्ष देणे आवश्यक आहे. कारण भारतात आजही शेतीबरोबर पूरक व्यवसाय म्हणून पशूपालनाकडे पाहिले जाते. प्रत्यक्षात तो प्रमुख उत्पन्नाचा शाश्वत स्रोत होऊ शकतो. त्यासाठी भारतातील गायी-म्हशींचे जेनेटिक्स सुधारणे आवश्यक आहे. ते सुधारल्यास त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. कारण प्रति जनावर दूध उत्पादकता वाढले, खर्च कमी होईल आणि शेतकऱ्याच्या हाताच अधिक पैसे येतील. यामुळे ग्रामीण भागात थेट व अप्रत्यक्ष रोजगार वाढ होण्यास मोठी हातभार लागण्याबरोबर गावातून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण घटण्यास मदत होईल.

परिणामी शहरी व ग्रामीण भागातील जीवन सुधारण्याचा मार्ग प्रशस्त होईल. देशाचा एकूण विचार केल्यास शहरी भागापेक्षा ग्रामीण भाग खूप मोठा असून, व्याप्ती व्यापक आहे. त्यामुळेच शेतकरी जेवढा सधन होईल तेवढे त्याचे अर्थव्यवस्थेतील योगदान वाढेल आणि आपली अर्थव्यवस्था पायाभूतपणे भक्कम व मोठी होण्यास गती मिळेल. ग्रामीण अर्थव्यस्थेत शेतकऱ्याचे उत्पन्न वाढल्यास आपले प्रति व्यक्ती उत्पन्न वाढेल. देशाचा तीन ट्रिलियन,-पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो.

भारताचे जागतिक योगदान

ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात पशूपालन केले जाते. त्यात गेल्या अडीच दशकांत आमूलाग्र बदल झाला आहे. ब्राझीलच्या पशूधन दुग्ध उत्पादन वाढीमध्ये भारताचा वाटा मोठा आहे. यासाठी आपल्याला पुन्हा थोडे मागे जावे लागेल. ब्राझीलमध्ये भारतातील गोवंश खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

भावनगरच्या महाराजांनी ब्राझीलच्या सेल्सो गार्सिया सिद यांना १९६० मध्ये गोवंशातील गीर प्रजातीचा कृष्णा नावाचा उमदा वळू भेट म्हणून दिला होता. ब्राझीलमधील सुमारे ८० टक्के गायी या कृष्णाच्या वंशज असून, गेल्या २० वर्षांमध्ये ब्राझीलमध्ये दुग्ध उत्पादन चौपट झालं आहे. यातील ८० टक्के दूध गिरोलँडो गायींपासून मिळते. गाईचा हा वंश गीर गायीपासूनच पुढे आला आहे. ब्राझीलला हे शक्य झाले ते आर्टिफियल इन्सिमनेशन प्रोसेसमुळेच. येथील मेनास रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जेनेटिक पद्धतीने गायींचे प्रजनन केले जाते. त्यामुळे येथे मादी-नर प्रमाणाच्या संख्येचे दूध उत्पादनाच्या दृष्टीन शास्त्रीय पद्धतीने नियमन होत असल्याने ब्राझीलला लाभ होत आहे.

‘एनडीडीबी’च्या अहवालानुसार, सुधारित वशांमुळे प्रति जनावर वार्षिक उत्पादन १९२४ किलोपर्यंत गेले असून, सरकारचे लक्ष्य प्रति वर्ष ३००० किलो आहे. त्यासाठी आपल्याकडे शास्त्रीय पद्धतीने व्यापक स्वरूपात प्रजोत्पादन आवश्यक आहे. भारतात गीर (गुजरात), सहिवाल (पंजाब), लाल सिंधी (पंजाब) व थारपारकर (राजस्थान) या दूध अधिक देणाऱ्या जाती दुधाळ वर्गात मोडतात. देशातील एकूण ५० गायींच्या जातींपैकी महाराष्ट्रात मुख्यतः ६ देवणी, डांगी, गवळाऊ, खिल्लार, लाल कंधारी आणि कोकण कपिला या जाती आहेत. भारतीय वंशांबरोबर दुधाळ असलेल्या अन्य जनावरांचा वंशही आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

(लेखक चितळे डेअरीचे मॅनेजिंग पार्टनर आहेत.)