अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ फेब्रुवारीच्या रात्री भारतावरील आयात कर ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली आणला हे चांगलं घडलं. या चांगल्या घडलेल्या घटनेवर दुसऱ्या दिवशी निफ्टी निर्देशांकाने २६,३००च्या ऐतिहासिक स्तरावर कामकाजदेखील सुरू केलं. या कराराची घोषणा हवेत विरते न विरते तोच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे आयात कराचे शस्त्रच अवैध ठरवल्याने, न्यायालयाच्या आदेशाला शह देण्यासाठी ट्रम्प यांनी व्यापार करारातील तरतुदींचा आधार घेत जगावर १५० दिवसांसाठी १५ टक्के करांची नवीन घोषणा केली. ज्यांनी चांगलं झालेलं वातावरण पुन्हा बिघडलं आणि निफ्टी निर्देशांक २६,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरलं. तो २५,१७८पर्यंत खाली घरंगळत आला. या घडलंय – बिघडलंय चक्रात निफ्टी निर्देशांक १,१२२ अंशांच्या तेजी-मंदीच्या हिंदोळ्यावर वर खाली होत असून, भविष्यकालीन वाटचालीसाठी चाचपडत आहे.
आज आपण महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तराच्या आधारे निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल रेखाटूया. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २५,००० हा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर असून, हा निर्देशांक सातत्याने पंधरा दिवस २५,०००च्या स्तरावर टिकल्यास त्याचं भविष्यकालीन वरचं लक्ष २५,५००…२५,८०० ते २६,१०० असे असेल.
या महिन्यात निफ्टी निर्देशांक २५,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास त्याचं खालचं लक्ष्य हे अनुक्रमे २४,८००…२४,५००… २४,२०० ते २३,५०० असे असेल.
निफ्टी निर्देशांकावरील २४,००० ते २३,५०० च्या स्तरावरील मंदीच्या गर्तेत गुंतवणूकदारांना ‘आता सर्व संपल्यागत वाटेल.’ मात्र आज आपण या २४,००० च्या मंदीच्या काळ्या ढगांची, रुपेरी किनार शोधूया. सरलेल्या सप्ताहात सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वृद्धीदर हा ७.६ टक्के नोंदवला जाण्याचा अंदाज आला आहे. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीच्या काळात २००२ ते २००४ च्या काळात इतिहासात प्रथमच ८ टक्क्यांचा जीडीपीचा वृद्धीदर नोंदला गेलेला, आताच्या घडीला आपण त्याच्या समीप असा जीडीपी वृद्धीदर नोंदवला आहे. पुढील दोन वर्षात जीडीपी वृद्धी दर हा ८ टक्क्यांच्या पल्याड झेपावण्याची शक्यता आहे. याचं मुख्य कारण गेल्या वर्षी मेअखेरीस जो पाऊस सुरू झाला तो सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत टिकलेला. त्यामुळे या वर्षी जलसंधारण प्रकल्पात पाणी असल्याने रब्बी पिके जोमाने बहरतील. जी ग्रामीण अर्थव्यवस्था गतिशील ठेवण्यासाठी साह्यभूत ठरतील. जगभरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय’मुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला फटका बसणार याची चर्चा चालू असताना सरलेल्या महिन्यातील १९ फेब्रुवारीला भारतात कृत्रिम प्रज्ञा परिषदेचे आयोजन करत २० देशांचे राष्ट्रप्रमुख तसेच कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखांनी त्याला हजेरी लावली.
भारतीय माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांशी करार करत, जगातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना भेडसावणाऱ्या ‘एआय’च्या समस्येवर भारताने आपल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) कपातीमुळे तयार माल स्वस्त व आकर्षक झाल्याने अर्थव्यवस्थेच्या रथाची शहरी व ग्रामीण अशा दोन्ही चाकांत समतोलत्व निर्माण होत आहे. याची गतिमानता येणाऱ्या दोन वर्षात जीडीपी वृद्धीदर हा दोन आकडी संख्येत दिसण्याची शक्यता आहे, असे प्रत्यक्षात घडल्यास निफ्टी निर्देशांक २३,५०० ते २४,००० च्या स्तराचा आधार घेत येणाऱ्या वर्षांत २८,००० ते ३०,००० वर झेपावेल. आता या तेजीला खोडा घालण्यासाठी दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपशा गोष्टी बिघडायला हव्यात. त्यात झालंच तर इराण-अमेरिका, पाकिस्तान-अफगाणिस्तान यामधील युद्ध हे रशिया- युक्रेन सारखे दीर्घकाळ लांबणे. त्याचप्रमाणे ट्रम्प यांच्या ट्विटरवाणीमुळे निर्माण होणारे नवनवीन प्रश्न… हे असे घडल्यास निफ्टी निर्देशांक २४,०००च्या खाली राहील. त्यातून निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य २३,००० ते २१,८०० असेल.
बँक निफ्टी निर्देशांक: २७ फेब्रुवारीचा बंद भाव : ६०,५२९ / महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ६०,५००
बँक निफ्टीने ६०,५०० चा स्तर सातत्याने राखल्यास त्याचे प्रथम वरचे लक्ष्य ६१,२०० ते ६१,५०० असेल. बँक निफ्टी निर्देशांकाला ६०,५०० चा स्तर राखण्यास अपयश आल्यास बँक त्या निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य ६०,०००, तर द्वितीय खालचे लक्ष्य ५८,२०० ते ५६,७०० असेल. सेन्सेक्स: २७ फेब्रुवारीचा बंद भाव : ८१,२८७.१९ / महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ८१,०००
सेन्सेक्सने ८१,००० चा स्तर सातत्याने राखल्यास, सेन्सेक्सचे प्रथम वरचे लक्ष्य ८१,७०० आणि द्वितीय लक्ष्य ८३,००० असेल. मात्र सेन्सेक्स ८१,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास त्याचे खालचे लक्ष्य ७९,८०० असेल. सोन्याची वाटचाल (एमसीएक्स आधारित): महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,६०,००० रु.
एमसीएक्सवरील सोन्याच्या किमतीने १,६०,००० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास, सोन्याच्या किमतीचे प्रथम वरचे लक्ष्य १,६८,०००, द्वितीय वरचे लक्ष्य १,७५,००० असेल. एमसीएक्सवर सोन्याला १,६०,००० चा स्तर राखण्यास अपयश आल्यास सोन्याच्या किमतीचे खालचे लक्ष्य १,५०,००० असेल. चांदीची वाटचाल (एमसीएक्स आधारित): महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,६९,००० रु. एमसीएक्सवर चांदीच्या किमतीने २,६९,००० चा स्तर सातत्याने राखल्यास, तिच्या किमतीचे प्रथम वरचे लक्ष्य २,८०,००० ते ३,००,००० तर द्वितीय वरचे लक्ष्य ३,२३,००० ते ३,४६,००० असेल. एमसीएक्सवरील चांदीच्या किंमतीला २,६९,००० चा स्तर राखण्यास अपयश आल्यास, चांदीच्या किमतीचे प्रथम खालचे लक्ष्य २,६०,०००, द्वितीय खालचे लक्ष्य २,५०,००० असे असेल.
- आशीष ठाकूर
ashishthakur1966@gmail.com
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
