भारतीय अर्थव्यवस्थेत काही क्षेत्रांमध्ये गेल्या १५ ते २० वर्षात सरकारी धोरण आणि समाजरचनेत झालेल्या बदलांमुळे क्रांतिकारी म्हणावे असे बदल घडून आलेत. त्यापैकी एक क्षेत्र म्हणजे रिटेल अर्थात किरकोळ विक्री व्यवस्था.

भारतीय बाजारपेठेची रचना विकेंद्रीत दुकानदारी स्वरूपाची राहिली आहे. गाव असो वा शहर छोट्या-छोट्या दुकानातून वस्तूंची विक्री होणे आणि उत्पादक – ठोक विक्रेता – किरकोळ विक्रेता आणि विकत घेणारा ग्राहक राजा अशी मोठी पुरवठा साखळी अस्तित्वात आहे. वर्ष १९९१ नंतर घडून आलेल्या उदारीकरणाने या साखळीला बदलण्यास सुरुवात केली. लोकांकडे येणारा पैशाचा ओघ वाढला, त्यांना नवीन वस्तूंचे पर्याय उपलब्ध झाले. शिवाय परदेशी कंपन्यांना भारतीय बाजारपेठ खुली झाल्यामुळे उत्पादन – वितरण – वेष्टन या सगळ्यांमध्ये नावीन्यपूर्ण आणि आमूलाग्र बदल झाले.

आणखी वाचा-माझा पोर्टफोलियो: बाजार संरचनेतील अत्यावश्यक ‘कोठार’! – अजय वाळिंबे 

भारतातील रिटेल क्षेत्राची आधुनिक स्वरूपातील सुरुवात किशोर बियाणी यांच्या बिग बाजार या नाममुद्रेने सुरू झालेल्या साखळी दुकानाने सुरू झाली. बिग बाजार नंतर ‘फ्युचर ग्रुप’ या किशोर बियाणी यांच्या संस्थेने बदलत्या बाजारपेठेला अनुसरून आपली व्यवसाय रणनीती बदलण्याचा प्रयत्न केला खरा पण, वाढती स्पर्धा म्हणा किंवा बाजारपेठेतील फसलेली गणिते यामुळे फ्युचर उद्योग समूहाची वाढ मर्यादितच राहिली. नंतरच्या काळात राधाकृष्ण दमानी यांनी सुरू केलेल्या ‘डी मार्ट’ या नाममुद्रेच्या साखळी दुकानांनी शहरी आणि निमशहरी इतकेच काय ग्रामीण भागातील तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या दुकानांच्या स्वरूपात आपले व्यवसाय विश्व उभारायला सुरुवात केली आहे.

भारतातील किराणा बाजारपेठ पुढील दहा वर्षांत आठशे ते एक हजार अब्ज डॉलर एवढ्या मूल्याची होणार आहे. अमेरिका आणि चीन यानंतर या क्षेत्राच्या व्यवसायात भारताचा क्रमांक आहे. भारतातील या क्षेत्रातील प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक वाढत आहे. गेल्या पंचवीस वर्षांत या क्षेत्राने चार अब्ज डॉलर एवढी प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक आणली आहे.

आणखी वाचा-‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ हेच गुंतवणूक सूत्र!

क्षेत्राची भरभराट होण्यामागे पुढील कारणे :

ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यवसायाचे एकत्रीकरण किराणा बाजारपेठेत आपला ठसा उमटवताना कंपन्या विविध ठिकाणी असलेल्या दुकानांबरोबरच ऑनलाइन संकेतस्थळाच्या माध्यमातून आपला व्यवसाय पुढे नेत आहेत. ई-कॉमर्स भारतात वाढण्यामागे डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव हे मुख्य कारण आहे. दर दिवशी पाच अब्जाहून अधिक ऑनलाइन खरेदीचे व्यवहार नोंदवले जात आहेत. पुढे यात वाढच होणार आहे. यूपीआय व्यवहार ज्या वेगाने बाजारपेठ काबीज करत आहेत यावरून हे स्पष्टच होते. शहरी आणि ग्रामीण बाजारपेठेतील फरक कमी होताना दिसतो आहे

पूर्वी ग्राहकांचे वर्तन शहरातील आणि ग्रामीण भागातील बाजारपेठांसाठी वेगवेगळे गणले जात असे. आता मात्र शहरीकरणाचा प्रभाव ग्रामीण भारतातही दिसतो आहे. त्यामुळे ब्रॅण्डेड वस्तूंच्या खरेदीकडे त्या बाजारपेठेचेही लक्ष लागून राहिले असल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील शहर आणि उपनगरांमध्ये रिटेल व्यवसायाने चांगलाच जम बसवला आहे.
वाढत्या साक्षरतेमुळे आणि नोकऱ्यांच्या उपलब्धतेमुळे अधिकाधिक तरुण वर्गाला आपली जीवनशैली चांगल्या प्रकारची असावी असे वाटू लागले आहे. त्यावर परदेशी बाजारपेठांचा प्रभाव आहे हे निश्चितच, त्याबरोबरच ग्राहकांच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षासुद्धा वाढताना दिसत आहेत.

आपल्या काम आणि वैयक्तिक जीवनामध्ये निर्माण होणारा असंतुलनाचा विचार नवीन पिढी करताना दिसत आहे, त्यामुळे जीवनशैलीजन्य आजारावर मात करण्यासाठी विविध वस्तू विकत घेणे, त्याच्याशी निगडित खाद्यपदार्थ, पेय-तरल पदार्थ, व्यायामाची साधने अशा नावीन्यपूर्ण वस्तूंनी भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा-बाजार रंग : चाचणी परीक्षा आणि कंपन्यांचा अभ्यास

खेळणी आणि भारतीय बाजारपेठ हे नवे समीकरण अलीकडील काळात उदयास येत आहे. देशांतर्गत खेळणी निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या सरकारी धोरणामुळे या क्षेत्रात अजून व्यवसाय वृद्धीची शक्यता आहे. अर्थात स्वस्त चिनीमालापासून ही बाजारपेठ वाचवणे हे आपल्या पुढील मोठे आव्हान ठरणार आहे.

रस्ते रेल्वे यांच्या जाळ्यामुळे भारतातील जवळपास कोणत्याही राज्यांतून कोणत्याही ठिकाणी तयार झालेली वस्तू पोहोचवणे शक्य झाल्यामुळे वस्तूची उपलब्धता नसणे हा प्रश्नच आता उरलेला नाही. भारतात उदयास आलेला नवा मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग आपल्या उत्पन्नाचा बराच मोठा हिस्सा सुखावह जीवनशैली देणाऱ्या वस्तू आणि सेवांवर खर्च करतो याचा थेट फायदा रिटेल उद्योगाला होतो.

घरगुती वापराच्या वस्तू विकत घेण्यासाठी आठवडी बाजाराला भेट देण्यापेक्षा आठवड्यातून एकदा मॉल किंवा सुपर मार्केटमध्ये जाणे या बदललेल्या जीवनशैलीमुळे या क्षेत्रात नव्हे व्यावसायिक संधीचे दालन उपलब्ध होणार आहे.

आयकिया या स्वीडिश कंपनीने गेल्या काही वर्षात भारतीय बाजारात आपले स्थान निर्माण करायला सुरुवात केली आहे. त्याच बरोबरीने रिलायन्स समूहाच्या रिटेल क्षेत्रातील कंपनीने आपला व्यवसाय विस्तार करायला सुरुवात केली आहे. आदित्य बिर्ला उद्योग समूह या व्यवसायात यशस्वी होत आहेच, त्यांनी परदेशी ब्रँड विकत घेऊन आपले बाजारातील स्थान बळकट करत आहे. तसेच स्वीडन या देशातील एचएनएम या कंपनीने आपला व्यवसाय भारतात वाढवण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे. या क्षेत्रात खाद्य पदार्थ, भाज्या, फळे, औषधे विक्री पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने , दागिने, घरातील फर्निचर, मोबाईल फोन, घरगुती वापराची उपकरणे यांचा समावेश होतो.

गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरू शकतील अशा कंपन्यांविषयी पुढील लेखात माहिती घेऊया.