– रणजित कुलकर्णी

व्यावसायिकांकरता विमा ही कल्पना खरे म्हणजे युरोप-अमेरिकेत शंभर वर्षांपासून आहे. किंबहुना जुन्या १९३०-४० च्या पेरी मेसन, जेम्स हेडली चेस अशा अनेक कांदबऱ्यांमध्ये ‘पार्टनरशिप इन्शुरन्स आणि एम्प्लॉयर एम्प्लॉई इन्शुरन्स’ यांचा नुसता उल्लेखच नव्हे, तर त्याभोवती बांधलेली कथानकेही आढळतात. वर्ष २००० ते २०१० या दरम्यान की-मॅन इन्श्युरन्स आणि नंतर एम्प्लॉयर एम्प्लॉई इन्शुरन्स स्कीम विम्याच्या संकल्पना बाजारात येऊन प्रचलित झाल्या. पण प्रामुख्याने त्याचा भर हा प्राप्तिकरासंबंधित सवलती आणि इतर गोष्टींवर होता. अर्थात आयुर्विमा संरक्षण घेताना व्यावसायिकाचा मृत्यू आणि त्याचे व्यवसायांवर होणारे परिणाम हे महत्त्वाचे आहेतच. म्हणूनच मुदत कर्ज, प्रकल्पासंबंधित कर्ज देताना बँकांकडून आयुर्विम्याचा आग्रह धरला जातो. तसेच ‘एम्प्लॉयर-एम्प्लॉई’ योजनेखाली ‘इम्प्लॉई रिटेन्शन’ अथवा ‘बेनिफिट’ म्हणून अनेकदा कंपनी आपले कामगार/कर्मचारी यांचा विमा काढते. या विमा हप्त्यास प्राप्तिकर सवलतीदेखील आहेत. म्हणजे कंपनी सदर विमा हप्ता खर्चात दाखवू शकते. इतकेच नाही तर असा कंपनीने भरलेला हप्ता उत्पन्न म्हणून कर्मचाऱ्याच्या प्राप्तिकरामध्ये आल्यावर तो ‘८० सी’ कलमांतर्गत त्या विमा हप्त्याचे लाभही घेऊ शकतो. अर्थात प्राप्तिकर हा माझा विषय नाही, त्याबाबत सनदी लेखापालाकडून सल्ला घेणे अधिक योग्य राहील.

विमा व्यवसायाच्या संदर्भात, ‘डॉक्टर्स इंडेम्निटी’, ‘कॉन्ट्रॅक्टर्स ऑल रिस्क’, ‘डायरेक्टर्स लायबिलिटी’ असे प्रकार सर्वांना माहीत आहेत. व्यवसाय आणि विमा यांची सांगड घालण्याची कल्पना जरा वेगळी आहे. मात्र व्यावसायिकांसाठी, लघु-मध्यम उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आयुर्विम्याची खास उपयुक्तता :

एखादी कंपनी/व्यवसाय आणि कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचे सर्वसाधारण टप्पे असतात ज्याला वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रात जीवनचक्र म्हणजेच इंग्रजीमध्ये ‘ह्युमन लाइफ सायकल’ आणि ‘कंपनी लाइफ सायकल’ असे म्हटले जाते. व्यक्तीच्या आयुष्याचे विविध टप्पे आणि एखाद्या कंपनीच्या वाटचालीचे टप्पे यांचे चक्र तुलना केली असता ते साधारणतः सारखेच असतात.

Insurance cover, professionals, Insurance,
Insurance cover, professionals, Insurance,

वरील आरेखने या चक्रांमधील सारखेपणा दर्शवतात. ‘ह्युमन लाइफ सायकल’च्या सुरुवातीला माणूस इतरांवर अवलंबून असतो. नंतर तरुणपणी तो स्वतंत्र होतो त्यानंतर थोड्या प्रौढ वयात तो इतरांसाठी कार्यरत होतो. म्हणजेच इतर लोक जसे आई-वडील, मुले त्याच्यावर अवलंबून असतात. तसेच तो समाजोपयोगी कार्यात सहभागी होत तो समजालाही आधार देतो. त्यानंतर पुढे निवृत्तीनंतर आयुष्याच्या संध्याकाळी तीन परिस्थितींची शक्यता असते. एक तर तो आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि त्याशिवाय समाजासाठी कार्य करणारा दाता असू शकतो किंवा फक्त स्वतःसाठी म्हणजे कुटुंब आणि समाजावर अवलंबून आहे हे त्याने केलेल्या बचत आणि गुंतवणुकीनुसार ठरते. उद्योग-व्यवसायाची ‘लाइफ सायकल’देखील अशीच असते. जेव्हा एखादी कंपनी सुरू केली जाते, तेव्हा ती विकासच्या टप्प्यात अर्थसहाय्यासाठी इतरांवर अवलंबून असते. त्यानंतर प्रस्थापित टप्प्यावर ती कंपनी इतरांना नोकरी, रोजगारसंधी निर्माण करून देते. मानवी आयुष्याप्रमाणेच ‘कंपनी लाइफ सायकल’च्या पुढील टप्प्यावर विविध शक्यता निर्माण होतात. त्या म्हणजे कंपनी ‘प्रोप्रायटरशिप’चे ‘पार्टनरशिप’मध्ये रूपांतर होणे, ‘पार्टनरशिप’चे ‘प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये रूपांतर होते. ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी पुढे ‘पब्लिक लिमिटेड’ होऊ शकते किवा दुसऱ्या कंपनीमध्ये विलीन होऊ शकते. यातल्या प्रत्येक टप्प्यावर मूळ उद्योजक/मालकाचा कंपनीवरील ताबा,नियंत्रण, हक्क कमी-कमी होत जातो. बदलत्या काळानुसार कंपनीची वृद्धी किवा ऱ्हासही होऊ शकतो.

महत्त्वाचे म्हणजे बहुतेकदा असे दिसून येते की, सुरुवातीच्या विकासाच्या काळात जेव्हा उद्योजक, भागीदार आणि सर्व कुटुंब कंपनी उभी करण्यासाठी झटत असतात तेव्हा कर्जे घेताना भांडवल उभे करताना अनेकदा ‘पर्सनल गॅरंटी’ दिली जाते, घरदार तारण ठेवले जाते. परंतु या सुरुवातीच्या विकासाच्या धामधुमीच्या काळात ‘कंपनी लाइफ सायकल’चे पुढील टप्पे लक्षात घेण्याची बरेचदा जाणीव होत नाही किंवा उसंत मिळत नाही. त्यामुळे एखाद्या टप्प्यावर जर भागीदार किंवा प्रवर्तकाचा मृत्यू झाला तर कंपनीमधील त्याचा भाग/वाटा हा त्याच्या वारसदारांना द्यावा याची कुठलीही तरतूद करण्याचे राहून जाते.

किंबहुना ‘डेप्रिसिएशन’ ही जशी केवळ ‘बुक-एन्ट्री’ राहते, प्रत्यक्षात ती रक्कम बाजूला काढली जात नाही हे जसे वास्तव आहे. तसेच एखाद्या टप्प्यावर जर भागीदार किंवा प्रवर्तकाचा मृत्यू झाला तर कंपनीमधील त्याच्या वाट्याची रक्कम देण्याकरता अनेकदा कंपनीमध्ये दुसरा भागीदार किंवा प्रवर्तक घ्यावा लागतो किंवा इतर मार्गांनी पैसे उभे करावे लागतात. या परिस्थितीत प्रत्येक भागीदार किंवा प्रवर्तकाचा पुरेसा विमा काढला असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या भागाची रक्कम त्याच्या कुटुंबीयांना देणे कंपनीसाठी सहज सुलभ होऊ शकते.

‘कंपनी लाइफ सायकल’च्या परिपक्व टप्प्यावरील दुसरी शक्यता अशी की भागीदार किंवा प्रवर्तक निवृत्त होऊ इच्छितो, अशा वेळेसदेखील त्याचा वाटा देण्याकरता जमवाजमव करणे इतर भागीदार आणि प्रवर्तकांना भाग पडते. अशा वेळी ती कंपनी संरक्षण म्हणून कंपनीच्या खर्चाने विमा योजना घेऊ शकते आणि सदर विमा योजनेचे पैसे हे रोख सुलभता देतात. उदाहरणार्थ, एका भागीदारीतील कंपनीचे उदाहरण घेऊ. पुण्यामधील एक सॉफ्टवेर भागीदारी फर्म. वीस वर्षांपूर्वी दोन सॉफ्टवेअर अभियंता मित्रांनी सुरू करून आज प्रस्थापित झालेली कंपनी. आज दोघांपैकी एक साठीच्या वयाच्या भागीदाराला कंपनीतून निवृत्त होऊन परदेशी स्थायिक असलेल्या मुलींकडे जाऊन राहण्याची इच्छा असते. या परिस्थितीत कंपनीचे मूल्यांकन सुमारे २० कोटी असल्याने त्या भागीदारास त्याचे १० कोटी रुपये द्यावे लागतील. या कंपनीने वीस वर्षांपूर्वीच व्यवसायाच्या टप्प्यावर जर १५ लाख प्रीमियम देऊन तीन कोटी रुपयांचा मुदतीचा विमा घेतला असेल तर आज निवृत्त भागीदारास देण्यासाठी जवळजवळ ६-७ कोटी रक्कम त्या पॉलिसीतून उभी राहू शकते. परंतु ही तजवीज नसेल तर मात्र त्या कंपनीला इतर मार्गानी पैसे उभे करावे लागतील. लघु-मध्यम उद्योगक्षेत्रात अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर विमा योजनांसाठी लागू असलेल्या अटी, नियम व तरतुदी यांच्या तपशिलाची माहिती वाचकांनी विमा एजंट अथवा विमा कंपन्यांकडून घेणे आवश्यक आहे.