संदीप वाळुंज

क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे।
“तुम्हाला काय वाटतं ते नको; तुमच्या पोर्टफोलिओत काय आहे, ते सांगा.”
नसीम निकोलस तालेब
“Don’t tell me what you think, tell me what you have in your portfolio.”
Nassim Nicholas Taleb

मार्च-एप्रिलच्या दरम्यान मी जागतिक इक्विटी गुंतवणुकीवर तीन भागांची लेखमाला लिहिली होती. त्यामध्ये, भारतीय गुंतवणूकदारांनी आता देशांतर्गत इक्विटीच्या परिघाबाहेर पडण्याचा विचार केला पाहिजे आणि भौगोलिक एकाग्रतेची जोखीम कमी करण्यासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये हळूहळू जागतिक विविधीकरणाचा समावेश केला पाहिजे, असा युक्तिवाद केला होता. अपेक्षेप्रमाणे या लेखमालेला भरभरून प्रतिसाद मिळाला. पण वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना एक अतिशय वेधक विरोधाभास जाणवल्याशिवाय राहिला नाही. तो जवळपास दीड महिना माझ्या ईमेल इनबॉक्समध्ये “नवीन गोष्टी समजत आहेत. तुम्ही आम्हाला असेच उचित मार्गदर्शन करीत राहा” हा सूर अखंड उमटत होता. लेखमालेच्या शेवटी, मी काही वाचकांना एक अतिशय साधा आणि थेट प्रश्न विचारला, “तर मग तुम्ही प्रत्यक्षात कुठे आणि किती गुंतवणूक केली? बहुतेक उत्तरे होती की, “करतोय ना, विचार करतोय.” ही उत्तरे पूर्णपणे प्रामाणिक होती. हेतूही मनापासूनचा होता. फक्त त्या हेतूचे कृतीत रूपांतर झाले नव्हते.

मानवी स्वभावातला हाच विरोधाभास मला नसीम निकोलस तालेब यांच्या आजच्या लेखासाठी निवडलेल्या टोकदार विधानात प्रतिबिंबित झालेला दिसतो. खरं तर त्यांनी हे वाक्य वेगळ्याच संदर्भात उच्चारले होते. एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील थेट कार्यक्रमात त्यांना एका विशिष्ट शेअरबद्दल मत विचारण्यात आले असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला, कारण तो शेअर त्यांच्या स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये नव्हता. हा संदर्भाचा परिघ बाजूला ठेवला तरी त्यांनी सहजपणे उच्चारलेले हे वाक्य आपल्या स्वतःच्या गुंतवणुकीच्या संदर्भातही लाखमोलाचे आहे.

ज्ञान सहज मिळते, कृती ठरवून करावी लागते

जागरूक गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची मूलतत्त्वे बऱ्यापैकी माहीत असतात. परिसंवाद, लेख, पुस्तके, सामाजिक माध्यमे किंवा आर्थिक तज्ज्ञांकडून ती पुन्हापुन्हा त्यांच्या कानावर पडत असतात. तरीही, त्यांना असलेले ‘पुस्तकी’ ज्ञान आणि ते प्रत्यक्ष करीत असलेली कृती, यामध्ये एक मोठी दरी कायम दिसून येते. दीर्घकालीन परताव्यावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा हा ‘मालमत्ता वाटपा’चा (अॅसेट अलोकेशन) असतो हे ठाऊक असूनही, ते फंडनिवडीसाठी आठवडेन्आठवडे डोकेफोड करत बसतात.

भूतकाळातील उत्कृष्ट कामगिरी ही भविष्यातील परताव्याची हमी नसते हे माहीत असूनही, त्यांच्या पोर्टफोलिओतील सर्वात मोठी गुंतवणूक बहुधा कालपर्यंत सर्वाधिक परतावा देणाऱ्या मालमत्तेतच असते. विविधीकरणाचे (डायव्हर्सिफिकेशन) महत्त्व मान्य असूनही, सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी त्यांची झुंबड कमॉडिटी सायकल अगदी शिखरावर असतानाच उडते. भावनांमुळे परताव्याचे अतोनात नुकसान होते हे चांगलेच ठाऊक असते, पण निर्देशांकांत पाचशे अंशांची जरी घसरण झाली तरी ते लगेच आपल्या आर्थिक सल्लागाराला फोन लावतात.

बाजाराचा अचूक अंदाज कोणीच सातत्याने लावू शकत नाही हे ठाऊक असूनही, इन्स्टाग्राम रील्समध्ये नवनवीन ‘मार्केट टिप्स’ शोधण्याचे काम अखंड सुरू असते. जोखीम व्यवस्थापनाच्या (रिस्क मॅनेजमेंट) अभ्यासू चर्चांमध्ये ते हिरिरीने सहभागी होतात, परंतु त्यांच्या स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये त्याचा मागमूसही दिसत नाही.

‘कोणीही पाहत नसताना तुम्ही जे करता, तेच तुमचे चारित्र्य’ अशा अर्थाचे एक इंग्रजी वचन आहे. गुंतवणूकदारांच्या वागणूकीला ते तंतोतंत लागू पडते. शिकल्यासवरलेल्यांकडूनही या चुका होतात याचे प्रमुख कारण असे, की मानवी स्वभावच अतिशय गुंतागुंतीचा आहे. एखाद्या शहाणपणाच्या विचाराशी आपण सहमती दाखवली की लगेच आपण एक मानसिक समाधान अनुभवतो. जणू काही आपण त्या विचारानुसार कृतीही केली आहे, अशी भावना निर्माण होते. आपले मन आपल्याला एका अशा निर्णयाचे श्रेय देते, जो प्रत्यक्षात आपण घेतलेलाच नसतो. अर्थतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांना हे चांगलेच ठाऊक आहे, म्हणून ते नेहमी ‘प्रकट पसंती’’ (रिव्हील्ड प्रेफरन्स) शोधत असतात. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा, ते प्रत्यक्षात काय निवडतात, यावरूनच त्यांच्या खऱ्या प्राधान्यक्रमांची ओळख होते.

ही उक्ती आज अधिक महत्त्वाची का ठरते?

तालेब यांनी हे वाक्य सोशल मीडिया, डिजिटल विश्वाचा उदय आणि माहितीच्या महापुरापूर्वी उच्चारले होते. तरीही त्यांचा हा इशारा आज एखाद्या भविष्यवाणीसारखा तंतोतंत लागू होतो. याचे पहिले कारण म्हणजे सध्याची ‘भाष्य अर्थव्यवस्था’ (कॉमेंटरी इकॉनॉमी).

इतिहासात कधी नव्हे इतके लोक आज प्रत्येक विषयावर मत व्यक्त करत आहेत. प्रत्येक मालमत्ता, प्रत्येक गुंतवणूक, प्रत्येक बाजारचक्र, प्रत्येक वळण—सर्वकाही आत्मविश्वासाने आणि तावातावाने समजावून सांगणाऱ्या लोकांनी आपल्याला आज चहुबाजूंनी वेढले आहे. त्यांचे सादरीकरण आकर्षक असते. आलेख सुंदर असतात. कथानक प्रभावी असते. पण त्या व्यक्तीने स्वतः एक रुपयाही गुंतवलेला असणे आवश्यक नसते. आणि सल्ला चुकीचा निघाला तरी त्याला कोणतीही किंमत मोजावी लागत नाही.

दुसरे कारण सहजासहजी लक्षात येत नाही पण ते संभाव्यतः अधिक हानिकारक आहे. असे पहा, की संपूर्ण जग सध्या सातत्याने अनिश्चिततेच्या गर्तेत आहे; आणि ही अनिश्चितता आता बाजारपेठेचा नवा स्थायीभाव बनली आहे. जागतिक अर्थव्यवस्था बदलत आहे आणि त्याबरोबर गुंतवणुकीच्या चौकटीदेखील बदलत आहेत. अशा वेळी गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन प्रवाह आणि अल्पकालीन गोंधळ यांच्यातील फरक ओळखून योग्य वेळी आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

पण प्रत्यक्षात मात्र बरेच लोक एखाद्या चांगल्या कल्पनेचे कौतुक करण्यातच अडकून पडतात. थोडी किंमत कमी होऊ दे…अजून थोडी खात्री वाटू दे…अजून एक तिमाहीचे निकाल येऊ देत…अजून एक संकेत मिळू दे…यात वेळ जातो. आणि गंमत म्हणजे, पूर्ण खात्री बहुतेक वेळा किमती गगनाला भिडतात तेंव्हाच मिळते. आजच्या लेखातून मला नेमका हाच धोका अधोरेखित करायचा आहे.

तातडीने करायच्या चार सुधारणात्मक कृती:

  • सर्वप्रथम, कृती करण्याची सवय स्वतःमध्ये जाणीवपूर्वक विकसित करा. अनेकदा उशिरा घेतलेला योग्य निर्णय हा वेळेवर घेतलेल्या चुकीच्या निर्णयापेक्षाही अधिक नुकसानकारक ठरतो. जर तुम्हाला वाटत असेल की बाजारातील काही क्षेत्रांमध्ये मूल्यांकन अवाजवी वाढले आहे, तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ती गुंतवणूक लगेच कमी व्हायला हवी. जागतिक विविधीकरण हा व्यापक आर्थिक जोखमीविरुद्धचा योग्य बचाव आहे, असा तुमचा विश्वास असेल, तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही दिसली पाहिजे.
  • दुसरे म्हणजे, तरलतेकडे (लिक्विडिटी) बारकाईने लक्ष ठेवा. तेजीच्या बाजाराच्या उत्तरार्धात तरलतेचा एक भास निर्माण होतो. एका क्लिकवर कोणतीही मालमत्ता सहज विकता येईल, असा आत्मविश्वास तयार होतो. पण बाहेर पडण्यासाठी सगळेच एकाच वेळी एकाच अरुंद दरवाज्याकडे धाव घेतात, तेव्हा तरलता क्षणार्धात नाहीशी होते. त्यामुळे शेवटचा दहा टक्के परतावा मिळवण्याचा हव्यास न धरता, थोडे आधी बाहेर पडणे अनेकदा अधिक शहाणपणाचे ठरते.
  • तिसरे म्हणजे, भावनिक अस्वस्थतेला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. रणभूमी स्पष्ट दिसण्यापूर्वीच चाल करणे स्वभावतःच अस्वस्थ करणारे असते. त्यासाठी सध्या तेजीत असलेल्या मालमत्तेतील गुंतवणूक कमी करून तुलनेने दुर्लक्षित, कंटाळवाण्या किंवा रोखीसमान मालमत्तांकडेही वळावे लागते. काही काळासाठी इतरांच्या नजरेत तुम्ही ‘चुकीचे’ही ठरू शकता. पण दीर्घकालीन आर्थिक अस्तित्वासाठी मोजावी लागणारी ती एक आवश्यक मानसिक किंमत आहे.
  • चौथे म्हणजे, तुमच्या निर्णयांना आव्हान देऊ शकणारा मार्गदर्शक जवळ ठेवा. वर्तनातील ही दरी एकट्याने भरून काढणे फार कठीण असते. एखाद्या सक्षम आर्थिक सल्लागाराबरोबर किंवा वित्तीय नियोजकाबरोबर नियमित चर्चा करा. असा कोणी नसेल, तर तो शोधण्याची हीच योग्य वेळ आहे. अनेक बाजारचक्रे अनुभवलेली आणि तुम्हाला ऐकायला आवडेल ते नव्हे, तर ऐकणे आवश्यक आहे ते सांगणारी व्यक्ती सोबत असणे गुंतवणूकीच्या क्षेत्रात अनेकदा अमूल्य ठरते.

निष्कर्ष
बाजार हा अत्यंत कठोर पण प्रामाणिक न्यायाधीश आहे. तुमचे गुंतवणुकीचे ज्ञान किती अद्ययावत आहे, अर्थव्यवस्थेबद्दलची तुमची मते किती प्रगल्भ आहेत किंवा तुमचे अर्थविश्लेषण किती प्रभावी आहे, याच्याशी त्याला काहीही कर्तव्य नाही. स्वच्छता आणि टापटीपीसाठीही तो कोणतेही अतिरिक्त गुण देत नाही. तो फक्त तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नेमके काय आहे ते पाहतो, त्या मालमत्तांना त्या वेळचे बाजारभाव लावतो आणि तुमच्या हाती हिशेब ठेवतो. म्हणून आजच स्वतःच्या पोर्टफोलिओचे निर्विकारपणे आणि प्रामाणिकपणे मूल्यमापन करा- कारण तुम्ही काय विचार करता, काय बोलता किंवा तुमचा हेतू काय आहे याला काहीही महत्त्व नाही; तुमच्या पोर्टफोलिओत जे आहे, त्यावरच तुमच्या आर्थिक भविष्याचा डाव लागलेला आहे!

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.