Investment Portfolio Strategy : कालपरवाची गोष्ट. मित्राच्या पार्टीत त्याच्या मुलाचा मित्र माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘तुम्ही गुंतवणूकीविषयी मार्गदर्शन करता. मी नुकतीच सुरुवात करतोय. पोर्टफोलिओ कसा असावा?’ मी त्याला उदाहरण म्हणून एक इंडेक्स फंड, एक फ्लेक्सीकॅप फंड, एक डेट फंड आणि एक गोल्ड फंड सुचवला. माझे उत्तर ऐकून त्याने माझ्याकडे अशा नजरेने पाहिले, जणू काही मी माझी जबाबदारी झटकत होतो. ‘एवढ्या बाळबोध पोर्टफोलिओने काय होणार?’ असा त्याचा अविर्भाव होता. असा अनुभव मला वारंवार येतो; गुंतवणूकदार गुंतागुंतीच्या आणि किचकट उत्तरांच्या शोधात असतात. एखादे साधेसरळ उत्तर मिळाले की, त्यांची निराशा होते, त्यांच्यासाठी ते उत्तर योग्य असले तरीही!

गुंतागुंत ‘हुशारी’ असल्याचे का वाटते?

याचे कारण बरेचसे मानसशास्त्रीय आहे. गुंतागुंतीचा संबंध अधिक ज्ञान आणि कौशल्याशी जोडण्याकडे माणसाचा स्वाभाविक कल असतो. दोन गुंतवणूकदार तुमच्याशी बोलताहेत अशी कल्पना करा. एक म्हणतोय, ‘मी नियमित एसआयपी करतो, इक्विटी आणि डेटचे योग्य प्रमाण राखतो, गुंतवणुकीत विविधता ठेवतो, खर्च कमी ठेवतो आणि अधूनमधून पोर्टफोलिओ रिबॅलन्स करतो.’ दुसरा गुंतवणूकदार मोमेंटम फॅक्टर्स, सेक्टर रोटेशन, टॅक्टिकल ॲसेट ॲलोकेशन, व्याजदरांची चक्रे, चलनातील चढ-उतार वगैरे शब्दफेक करत आपल्या बारा वेगवेगळ्या फंडांबद्दल बोलतोय. या दोघांतला दुसरा अधिक सखोल आणि जाणकार गुंतवणूकदार आहे, असे आपल्याला नकळत वाटते.

गुंतवणुकीच्या जगात आपण या भ्रमात फार लवकर फसू शकतो, कारण आपण ज्या आर्थिक बाजारात वावरतो ते खरोखरच गुंतागुंतीचे आहे. महागाईमुळे व्याजदर बदलतात; व्याजदरांचा चलन आणि मूल्यांकनावर परिणाम होतो; तेलाच्या किमती महागाई आणि कंपन्यांच्या मार्जिनवर परिणाम करतात; निवडणुकांमुळे धोरणे बदलतात; भू-राजकीय घडामोडींमुळे व्यापार विस्कळीत होतो; एखादे नवे तंत्रज्ञान उद्योगांची संपूर्ण समीकरणे बदलून टाकते. एवढ्या प्रचंड गुंतागुंतीच्या यंत्रणेसमोर नियमित बचत करा, विविधीकरण करा, रिबॅलन्स करा आणि चक्रवाढीला पुरेसा वेळ द्या. इतकी साधी रणनीती भाबडेपणाची वाटणे साहजिक आहे.
पण आपली चूक नेमकी इथेच होते. जग कमालीचे गुंतागुंतीचे आहे; म्हणून आपला पोर्टफोलिओही तितकाच किचकट असण्याची गरज नाही.

धावपळ करित राहण्यातले समाधान

यामागे आणखी एका छुप्या प्रवृत्तीचाही हात आहे. काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करत राहणे आपल्याला नेहमीच योग्य वाटते. बाजारात मोठी उलथापालथ झाली की आपल्या सहजप्रवृत्ती आपल्कृया ताबडतोब क्रुती करायला सांगतात. रिबॅलन्स करा, सेक्टर बदला, हेज करा, हे विका, ते वाढवा, बाहेर पडा,- मग त्या क्षणी काहीही न करणे हाच सर्वात योग्य निर्णय का असेना.

एखादा नवा पर्याय निवडला किंवा बदल केला की, आपल्याला गोष्टी आपल्या ‘नियंत्रणात’ असल्याचा आभास होतो. चित्रविचित्र गोष्टींनी भरलेला पोर्टफोलिओ म्हणजे एका अर्थाने सतत काहीतरी करण्याची संधी निर्माण करणारे यंत्रच! आपल्या चिंतांचे रूपांतर आपसूकच कृतीत होते आणि आपण व्यग्र, सतर्क आणि सुरक्षित असल्याचे समाधान मिळते. या सततच्या कृतीमुळे खर्च, कर आणि चुकीच्या वेळेला घेतलेल्या निर्णयांच्या रूपाने परतावा हळूहळू कमी होत असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला सोपे जाते. कारण शहाणपणाने काहीही न करण्याच्या समाधानापेक्षा काहीतरी केल्याचे समाधान आपल्याला अधिक सुखावते.

गुंतागुंतीमुळे अधिक श्रीमंत होणारे उद्योगविश्व

गुंतवणूक उद्योगही या प्रवृत्तीला काही प्रमाणात बळ देतो. त्यामागे एक साधे आर्थिक कारण आहे. बाळबोध सल्ल्यासाठी भरघोस फी मोजण्याची कुणाचीच फारशी तयारी नसते. ‘काही योग्य फंड घ्या आणि वीस वर्षे त्यांना वेळ द्या,’ हा उत्कृष्ट सल्ला असू शकतो; पण त्याचे व्यावसायिक मूल्य निर्माण करणे तितकेसे सोपे नाही. त्यामुळे साधेपणापेक्षा नावीन्य विकणे अनेकदा सोपे जाते. एखादे विदेशी उत्पादन, एखादी किचकट रचना किंवा अशी काही डोक्यावरून जाणारी रणनीती जी समजून घेण्यासाठी आणि चालवण्यासाठी तज्ज्ञाची सतत गरज भासेल.
गुंतागुंत जेव्हा अशी छानपैकी पॅक करून विकली जाते, तेव्हा ती आपल्याला प्रगल्भता वाटते. कधी ती खरोखरच तशी असतेही; पण बहुतांश वेळा मात्र ते महागडा सूट घातलेले साधेपण असते.

पर्यायांची गर्दी, पोर्टफोलिओचा पसारा आणि विविधीकरणाचा भ्रम

आधुनिक वित्तविश्वाने सामान्य गुंतवणूकदारासाठी पूर्वी कल्पनाही करता येणार नाहीत इतक्या संधींची दारे खुली केली आहेत. दरमहा दहा हजार रुपये गुंतवू इच्छिणाऱ्या व्यक्तीलाही ॲक्टिव्ह की पॅसिव्ह, लार्ज-कॅप की मिड-कॅप की स्मॉल-कॅप, फ्लेक्सीकॅप की मल्टिकॅप, देशांतर्गत की आंतरराष्ट्रीय, ब्रॉड-मार्केट की फॅक्टर, ग्रोथ की व्हॅल्यू, सेक्टरल की थीमॅटिक असे असंख्य निर्णय घ्यावे लागतात. कृत्रिम प्रज्ञा (एआय), मॅन्युफॅक्चरिंग, डिफेन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, कन्झम्प्शन, हेल्थकेअर, मोमेंटम, क्वालिटी. बाजारातील जवळजवळ प्रत्येक आकर्षक कथानकाचे अखेर गुंतवणूक साधनांमध्ये रूपांतर होते. यापैकी काहीही मुळात चुकीचे नाही. उपलब्ध असलेली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी आवश्यक आहे, असे वाटू लागते तेव्हा खरी अडचण सुरू होते. खूप पर्याय समोर आले की गुंतवणूकदार अधिक सक्षम होईलच असे नाही; उलट तो अधिक गोंधळून जाऊ शकतो. आणि म्हणूनच साधेपणासाठी कमी नव्हे, तर अधिक समज आवश्यक ठरते. आपण नेमकी कोणती जोखीम टाळू इच्छितो? प्रत्येक मालमत्तेची पोर्टफोलिओमध्ये भूमिका काय आहे? आपल्याला किती जोखीमवजा परताव्याची गरज आहे आणि किती काळासाठी आपण गुंतवणूक करीत आहोत? या प्रश्नांची उत्तरे मिळाली की उरलेल्या अनेक पर्यायांचा गोंगाट आपोआप कमी होतो.

गुंतागुंतीची न दिसणारी किंमत

गुंतागुंतीची आणखी एक किंमत असते जी कोणत्याही ‘एक्स्पेन्स रेशो’मध्ये दिसत नाही. पोर्टफोलिओमध्ये वाढणारा प्रत्येक नवा घटक एक नवा निर्णय घेऊन येतो. चार गुंतवणुकी असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत चौदा गुंतवणुकी असलेल्या व्यक्तीकडे केवळ दहा गुंतवणुकी अधिक नसतात; त्याच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी, तुलना करण्यासाठी, मूल्यमापन करण्यासाठी, बदलण्यासाठी आणि काळजी करण्यासाठीही दहा गोष्टी अधिक असतात. हा फंड अजूनही चांगला आहे का? नफा काढून घ्यावा का? गेल्या वर्षीच्या मागे पडलेल्या फंडाऐवजी यंदाचा विजेता घ्यावा का?

प्रत्येक अतिरिक्त घटक म्हणजे आणखी एक निर्णयबिंदू; आणि प्रत्येक अनावश्यक निर्णय म्हणजे भीती, लोभ, फोमो, रिसेन्सी बायस आणि अतिआत्मविश्वासाला पोर्टफोलिओमध्ये शिरण्यासाठी आणखी एक दार. म्हणूनच गुंतागुंतीची प्रत्यक्ष आर्थिक किंमत नगण्य वाटत असली तरी तिची वर्तनात्मक किंमत मोठी असू शकते. सतत निर्णयांची मागणी करणारा पोर्टफोलिओ सतत योग्य निर्णयक्षमतेचीही मागणी करतो आणि ती सातत्याने दाखवणे आपल्यापैकी फार थोड्यांना जमते.

आवश्यक आणि अनावश्यक गुंतागुंत यातला फरक

  • अर्थात, वॉरेन बफे यांच्या उक्तीचा अर्थ असा मुळीच नाही की सर्व प्रकारची गुंतागुंत वाईटच असते. काही प्रश्न मुळातच गुंतागुंतीचे असतात. काही व्यवसायांचे मूल्यांकन करणे अवघड असते. म्हातारपण, महागाई, टॅक्सचे जाळे आणि मिळणाऱ्या परताव्याचा क्रम या सगळ्यांचा मेळ घालून सेवानिवृत्तीचे गणित मांडणे सोपे नसते. अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांना बळजबरीने सोपे बनवणे हे सोप्या प्रश्नांना विनाकारण अवघड करण्याइतकेच जोखीमीचे ठरू शकते.
  • म्हणून खरी विभागणी सोपे विरुद्ध गुंतागुंतीचे अशी नाही; ती आवश्यक विरुद्ध अनावश्यक गुंतागुंत अशी आहे. एखाद्या नेमक्या जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी ‘डेरिव्हेटिव्ह’चा वापर योग्यच असतो; पण ज्यातून परतावा नेमका कसा मिळतो हे आपण दुसऱ्याला समजावून सांगूही शकत नाही, त्या वाटेला जाताना सावध राहायला हवे.

एखादा फंड, रणनीती, ॲसेट क्लास किंवा प्रॉडक्ट जोडण्यापूर्वी स्वतःला विचारा. यामुळे नेमका कोणता प्रश्न सुटणार आहे? कोणती जोखीम कमी होणार आहे? सध्याच्या पोर्टफोलिओपेक्षा खरोखर वेगळे ‘एक्स्पोजर’ मिळणार आहे का? आणि हेच उद्दिष्ट अधिक सोप्या मार्गाने साध्य होऊ शकते का? यांची समाधानकारक उत्तरे मिळत नसतील, तर कदाचित त्या गुंतागुंतीने पोर्टफोलिओमध्ये आपले स्थान अजून कमावलेले नाही.

१९८४ मध्ये बफे यांनी माणसाला सोप्या गोष्टी विनाकारण अवघड करून घेण्याचा असा विचित्र सोस का असतो, असा प्रश्न उपस्थित केला (ही विसंगती त्यांच्या साडेतीन शतके आधीच तुकोबांनी ओळखली होती- पहा शीर्षकाची ओळ). आज आपल्या हातात त्या काळी कल्पनाही करता आली नसती इतकी माहिती, संगणकीय क्षमता आणि गुंतवणुकीचे पर्याय आहेत. पण मूळ आव्हान अजूनही तेच आहे. आर्थिक जगातील प्रत्येक घटक समजून घेणे हे आपले उद्दिष्ट नसून आपल्या गुंतवणुकीच्या परिणामावर खरोखर प्रभाव टाकणाऱ्या मोजक्या गोष्टी ओळखून त्याभोवती पोर्टफोलिओ उभारणे हे आहे, हेच आपण सारखे विसरतो.
लक्षात ठेवा, गुंतवणुकीतील जाणकारीचे मोजमाप आपण किती गुंतागुंत समजू शकतो यावर होत नाही, तर किती अनावश्यक गुंतागुंत बाजूला सारण्याचे शहाणपण आपल्याकडे आहे, यावर होते.
There seems to be some perverse human characteristic that likes to make easy things difficult.

Warren Buffet

सोप्या गोष्टी विनाकारण अवघड करून घेण्याचा माणसाला जणू विचित्र सोस असतो.
वॉरेन बफे


(लेखक ‘इक्विरस’ समूहाचे मुख्य व्यवसायवृद्धी अधिकारी असून लेखात व्यक्त केलेली मते त्यांची वैयक्तिक आहेत.)