प्रसन्न पाठक
दोन दशकांहून अधिक काळ एक गुंतवणूक व्यावसायिक म्हणून, मी अनेक आवर्तने पाहिली आहेत. जागतिक आर्थिक संकटे, महामंदी, भू-राजकीय धक्के. तरीही, सध्याचा टप्पा जो २०२६ च्या सुरू अमेरिका-इराण युद्धामुळे सुरू झाला आहे, तो विविध मालमत्ता वर्गांवर होणाऱ्या परिणामांच्या व्याप्तीमुळे आधीच्या धाक्यांपेक्षा वेगळा ठरतो. केवळ काही आठवड्यांत, खनिज तेलाच्या किमती १०० डॉलर प्रतिपिंपाच्या पुढे गेल्या आहेत. देशांतर्गत भांडवली बाजारांसह जगभरातील भांडवली बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. रोख्यांवरील परतावा वाढला आहे. अमेरिकी डॉलर निर्देशांक मजबूत झाला आहे आणि सोने व चांदीसारख्या पारंपरिक सुरक्षित गुंतवणुकीच्या साधनांमध्येही अनपेक्षित घसरण दिसून आली.

ही केवळ अस्थिरता नाही तर जागतिक जोखमीचे हे पूर्ण-प्रमाणात पुनर्मूल्यांकन आहे.

परिपूर्ण वादळ: तेल, व्याजदर, डॉलर आणि धातू

याचे कारण स्पष्ट आहे: ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्यय. जागतिक तेल वाहतुकीपैकी सुमारे २० टक्के वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होत असल्याने व्यत्यय निर्माण झाला आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून तेलाच्या किमती ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. तेलाच्या वाढलेल्या किमतींचा थेट परिणाम महागाईवर होतो. जागतिक महागाई मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका असल्याने आणि मध्यवर्ती बँका व्याजदर कपातीबाबत सावध झाल्या आहेत.

याचे परिणाम अनेक स्तरांवर आहेत:

  • व्याजदर: वाढत्या महागाईमुळे मध्यवर्ती बँकांना व्याजदर जास्त काळ सध्याच्या पातळीवर ठेवून चालणार नाही.
  • अमेरिकन डॉलर: सुरक्षित गुंतवणूक म्हणून मजबूत होतो.
  • समभाग गुंतवणूक वाढलेल्या अनिश्चततेमुळे मूल्यांकन कमी झाले आहे.
  • सोने आणि चांदी: वाढत्या वास्तविक उत्पन्नामुळे (महागाई – व्याजदर) आणि डॉलरच्या मजबुतीमुळे आश्चर्यकारकरीत्या कमजोर होतात. यामुळेच, पारंपरिकपणे अनिश्चिततेपासून संरक्षण देणारी मालमत्तेचीदेखील कामगिरी खालावलेली दिसत आहे.

निधी व्यवस्थापक म्हणून आम्ही या परिस्थितीतून मार्ग कसा काढत आहोत?

  • अशा काळात, अंदाजापेक्षा शिस्त अधिक महत्त्वाची असते.

आम्ही पुढील बाबींवर तत्त्वांवर लक्ष केंद्रित करत आहोत:

१. अविचारी प्रतिक्रिया टाळा

बाजारात आधीच लक्षणीय घसरण झाली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, सर्वात वाईट निर्णय घाबरलेल्या परिस्थितीत घेतले जातात.

२. कमाईतील लवचीकतेकडे कल

ज्यांना महागाईचा फायदा होतो, अशा क्षेत्रांमधील आमची गुंतवणूक वाढवत आहोत किंवा जे जागतिक धक्क्यांना कमी संवेदनशील आहेत. जसे की, देशांतर्गत उपभोग, मजबूत ताळेबंद असलेल्या वित्तीय कंपन्या आणि निवडक ऊर्जा कंपन्या.

३. रोख रकमेची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक

किमतींनी तळ गाठण्याची वाट पाहण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, आम्ही हळूहळू गुंतवणूक करीत आहोत. अस्थिरता हा धोका नाही. जर तिचे योग्य व्यवस्थापन केले तर ती एक संधी आहे.

४. ज्या क्षेत्रांचे आणि कंपन्यांच्या शेअरचे मूल्यांकन आकर्षक झाले आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे:

काही उच्च वाढीच्या क्षेत्रांचे/शेअरचे मूल्यांकन पूर्वी जास्त होते आणि आता ते गुंतवणुकीसाठी योग्य पातळीवर आले आहेत.

महत्त्वाचा दृष्टिकोन: युद्धे तात्पुरती असतात, बाजारपेठा कायमस्वरूपी

इतिहासातून बऱ्याच गोष्टी शिकता येतात. खाडी युद्धापासून ते रशिया-युक्रेन संघर्षापर्यंत, भू-राजकीय धक्क्यांमुळे नेहमीच तीव्र परंतु तात्पुरते व्यत्यय आले आहेत. आजही, बाजारपेठा वाईट परिस्थितीचा सामना करत आहेत. तेलाच्या किमतीतील वाढ, महागाईचा सातत्यपूर्ण प्रादुर्भाव आणि व्याजदर कपातीस होणारा विलंब अशी प्रतिकूल परिस्थिती असली तरी यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

ही ‘थांबण्याची’ नव्हे, तर ‘खरेदी करण्याची’ वेळ का आहे?

चला, विविध आवर्तनांतील आकडेवारी पाहूया:

  • मोठ्या घसरणीनंतर, भांडवली बाजारांनी पुढील २-३ वर्षांत उत्तम परतावा दिला आहे.
  • २००८ च्या जागतिक आर्थिक संकटानंतर, देशांतर्गत भांडवली बाजार ३ वर्षांपेक्षा कमी काळात दुपटीहून अधिक वधारले
  • २०२० मधील करोनानंतरच्या घसरणीनंतर, बाजारांनी इतिहासातील सर्वात जलद गतीने सावरलेल्यांपैकी एक कामगिरी केली.
    कमाल निराशा कमाल संधी निर्माण करते. आज, आपण पुन्हा एकदा त्याच संधीच्या टप्प्यावर आहोत.

गुंतवणूकदारांसाठी सुचवलेले मालमत्ता वाटप काय करावे या विचारात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी, उत्तर केवळ दोनच पर्याय असलेले नाही. ते संतुलित वाटपाबद्दल आहे.

मध्यम गुंतवणूक कालावधी (४-५ वर्षांचा कालावधी):

  • ५०-६० टक्के इक्विटी म्युच्युअल फंड
  • लार्ज कॅप फंड (स्थिरता)
  • फ्लेक्सी कॅप फंड (अनुकूलनक्षमता)
  • स्मॉल / मिडकॅप फंड (वाढीसाठी चालना)
  • १०-१५% डेट फंड

कमी कालावधीचे (व्याजदरातील अनिश्चितता हाताळण्यासाठी)

  • २५-४०% हायब्रिड फंड
  • बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड (इक्विटीमध्ये गतिशील वाटप करून अस्थिरता कमी करतो)
  • मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंड (समभाग रोखे आणि सोने यांसारख्या मालमत्ता वर्गांमध्ये विविधता आणून अस्थिरता कमी करतो)

एसआयपी: तुमचा सर्वात मोठा फायदा

जर अस्थिरतेमध्ये यशस्वी होणारी कोणती एक रणनीती असेल, तर ती म्हणजे म्युच्युअल फंडातील शिस्तशीर मार्ग सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी.

जेव्हा बाजार कोसळतो:

  • तुम्ही अधिक युनिट्स जमा करता
  • तुमची सरासरी किंमत कमी होते
  • भविष्यातील परतावा लक्षणीयरीत्या सुधारतो
  • संकटाच्या काळात गुंतवणूक कायम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनीच खरी संपत्ती निर्माण केली आहे.

अंतिम सत्य : अस्थिरता स्वीकार

अनिश्चितता अस्वस्थ करणारी असते, पण याच परिस्थितीतून मोठा परतावा जन्माला येतो. सध्याचे वातावरण खनिज तेलाच्या वाढत्या किमती, वाढलेले व्याजदर, मजबूत डॉलर, धातूंच्या किमतीतील घसरण असे गोंधळाचे वाटू शकते. पण या गोंधळामागे एक परिचित नमुना दडलेला आहे, तो म्हणजे अल्पकालीन व्यत्यय, दीर्घकालीन संधी.

एक निधी व्यवस्थापक म्हणून, आम्ही माघार घेत नाही. आम्ही सावधपणे पण आत्मविश्वासाने यात अधिक पुढे जात आहोत. कारण वेळोवेळी, बाजाराने त्यांनाच फळ दिले आहे, ज्यांनी गुंतवणूक सोपी वाटत असताना नव्हे, तर सर्वात कठीण वाटत असताना केली. कदाचित, हीच गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी आहे.