सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराला काही तरी दिशा मिळते, असा अनुभव आहे. सरकारच्या योजनांचे स्वागत किंवा निराशाजनक योजनांचा खरपूस समाचार बाजाराकडून घेतला जातो. या वर्षीच्या ‘कर्तव्य’ ही संकल्पना असलेल्या अर्थसंकल्पानंतर मात्र बाजारात असे काहीही दिसून आले नाही. उलट रोजचा दिवस आणि रोजची नवीन आव्हाने अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने अष्टावधानी असायला हवे, ते कसे? हे आजच्या लेखात समजून घेऊ या.
सर्वसाधारणपणे ज्या ‘मॅक्रो’ घटकांवर शेअर बाजाराचे भवितव्य अवलंबून असते, त्यातील महागाई, वित्तीय तूट, परकीय गंगाजळी या तिन्ही आघाड्यांवर भारतात परिस्थिती आलबेल आहे. ‘कॉर्पोरेट’ क्षेत्र अर्थात कंपन्यांचे अलीकडील तिमाही निकाल समाधानकारक आहेत. मग असे असताना बाजारामध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत नाही, उलट अनपेक्षितरीत्या शेअरमध्ये मोठे चढ-उतार दिसून येत आहेत.

या वर्षीच्या अर्थसंकल्पात भविष्यवेधी योजना मांडल्या गेल्या असल्या तरी एका विशिष्ट कंपनीला त्याचा फायदा होईल, असे सरळ सूत्र लावता येत नाही. मागच्या वर्षी सरकारने वस्तू आणि सेवाकर अर्थात ‘जीएसटी’मध्ये केलेल्या बदलानंतर हळूहळू खरेदीदारांमध्ये उत्साह परतू लागला आहे. दुचाकीच्या विक्रीमध्ये गेल्या तिमाहीत झालेली वाढ हे याचे निर्देशक आहे. हिरो मोटोकॉर्प या कंपनीने १०० सीसी क्षमतेच्या दुचाकीच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे नोंदवले आहे. भारतातील सर्वसामान्य वर्गाला परवडणारी ही दुचाकी आहे, हे लक्षात घेऊ या.

जागतिक अर्थव्यवस्थांच्या बाबतीत ‘मॅक्रो’ विचार करायचा झाल्यास तंत्रज्ञान आणि ‘एआय’ संबंधित कंपन्यांमुळे अमेरिकेतील बाजार वरच्या दिशेला जात आहेत. गेल्या वर्षात जपान वगळता जगातील सर्व प्रमुख मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात कपात केली. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने ०.७५ टक्के, युरोपियन युनियनने १ टक्का तर चीनमध्ये ०.८५ टक्के इतकी व्याजदर कपात झाली. वर्षभरापासून अमेरिकेच्या बाजूने व्यापार युद्ध थांबले नाहीये पण नरमाईची भूमिका नक्की येण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षीच्या ‘लोकसत्ता बाजाररंग’मधील एका लेखात या आर्थिक वर्षाअखेरीस अमेरिकेचे आडमुठे व्यापारी धोरण कुठे तरी नियंत्रणात येईल असे नोंदवले होते. गेल्या आठवड्यातच अमेरिकेशी भारताचा जो व्यापार करार होऊ घातला आहे, त्यामध्ये करात कपात करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

‘ॲसेट ॲलोकेशन’ची गोची

होय, ‘गोची’ हाच शब्द इथे अपेक्षित आहे. गुंतवणूक करायला सुरुवात केल्यानंतर एकाच प्रकारच्या गुंतवणूक पर्यायात पैसे गुंतवू नका, असे गुंतवणूकदारांना सांगण्यात येऊ लागले. शेअर त्यातही लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप, हायब्रीड, डेट (रोखे) आणि सोने-चांदी अशा सर्व पर्यायांमध्ये गुंतवणूक झाली पाहिजे अर्थात ‘ॲसेट ॲलोकेशन’ केले पाहिजे हे गुंतवणूकदारांना आता समजू लागले. पण गेल्या सहा महिन्यांत बाजाराचा परतावा इतका निराशाजनक आहे की, आपण कुठे चुकलो आहे का? असे गुंतवणूकदार सतत विचारत आहेत. वर्ष २०२० ते २०२४ या चार वर्षांत बाजाराने जी तेजी दाखवली त्यामध्ये क्वचित तिमाही आकडेवारीत नकारात्मक परतावा दिसला. त्यामुळेच की काय गुंतवणूकदारांना बाजार खाली जातात, जाऊ शकतात किंवा एकाच टप्प्यात फिरू शकतात असे वाटणे बंद झाले आहे. पण गुंतवणूकदारांनी ‘पॅनिक मोड’मध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही जोखीम विचारात घेऊन गुंतवणूक केली असेल आणि पोर्टफोलिओमध्ये सर्व प्रकारचे शेअर व फंड असतील तर गुंतवणूक सुरू ठेवायला हवी. गुंतवणुकीतील ‘एक्झिट’ अगदी हाताच्या ‘कीपॅड’वरून करता यायला लागली आहे. पण तो निर्णय घेताना सावधगिरीने विचार करायला हवा.

सोने व चांदी यांच्या भावात अभूतपूर्व वाढ अनुभवलेल्या गुंतवणूकदारांनी गेल्या दोन महिन्यांत जर सोने खरेदी करायला सुरुवात केलेली असेल तर त्यांना मानसिक धक्का बसण्याची शक्यता आहे. सोने आणि चांदी यांच्या भावामध्ये होणारी चढ-उतार फक्त किरकोळ खरेदी विक्रीमुळे नव्हे तर जागतिक स्तरावरील उलाढालीमुळे होत असते, हे सत्य स्वीकारल्यावर त्यातही अनिश्चितता असणार आहे हे ओघाने आलेच. ज्यांनी गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून गोल्ड फंड, ‘ईटीएफ’ या माध्यमातून पैसे गुंतवले आहेत त्यांनी दर महिन्याला ठरावीक रकमेचे नियोजन करावे. अचानकपणे सोने-चांदी यांच्या भावात वाढ होते अशा वेळी बाजाराचा फायदा करून घेऊ असा विचार मनात आणू नका. छोट्या गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओतील जास्तीत जास्त १५ ते २० टक्के भाग सोने-चांदी यांच्या गुंतवणुकीसाठी राखीव ठेवायला हवा. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी समभाग (इक्विटी) शेअर आणि समभाग संलग्न म्युच्युअल फंड हाच उत्तम मार्ग आहे, हे विसरून चालणार नाही.

म्युच्युअल फंड बदलायचे का?

अलीकडे समाज माध्यमातून व विविध ॲपमुळे गुंतवणूकदारांना माहितीचा एक नवीन स्रोत उपलब्ध झाला आहे. तुमच्या पोर्टफोलिओत असलेले फंड नीट परतावे देत नाहीत का? तर त्यातून ‘एक्झिट’ घेऊन नवीन फंडात पैसे गुंतवायला हवे का? अशा आशयाच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. तुम्ही मुळात निवडलेला फंड गेल्या पाच वर्षांपासून समाधानकारक परतावे देत आहे व गेल्या तीन ते चार महिन्यांपासून त्याचा परतावा स्पर्धक फंडांपेक्षा कमी आहे म्हणून लगेच त्यातून बाहेर पडावे हा विचार सुयोग्य नाही. म्युच्युअल फंड योजना प्रसिद्ध करणारे तारांकित निधी व्यवस्थापक (स्टार फंड मॅनेजर) एखाद्या फंड घराण्यातून बाहेर पडले तर फंडाचे भवितव्य कसे असेल? असा विचार पूर्वी होत असे आता मात्र बहुतांश सर्व फंड घराण्यांनी गुंतवणुकीतील स्वतःचा ‘फॉर्म्युला’ विकसित केला आहे व त्यानुसारच व्यूहरचना व पोर्टफोलिओची बांधणी होते. आपण गुंतवणूक करत असलेल्या फंडात सलग एक वर्ष असमाधानकारक परतावा आला तरच त्यातून ‘एक्झिट’ घेण्याचा विचार करावा.

नवीन ‘एआय टूल’ आणि भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्र

निफ्टी आयटी इंडेक्स गेल्या आठवड्यात जवळपास पाच टक्क्यांनी घसरला. इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी, विप्रो आणि एचसीएल टेक यांच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीचा सपाटा दिसून आला. भारतात हे असे तर अमेरिकेत ॲपल सुमारे ५ टक्के, मेटा २.८२ टक्के, एनव्हिडिया १.६१ टक्के, टेस्ला २.६९ टक्के असे तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर घसरले. नव्याने उदयास येत असणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे रूप एकूणच माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा व्यवसाय खाऊन टाकणार आहे, या वृत्तामुळे हे शेअर आपटले आहेत. इन्फोसिस या महाकाय आयटी कंपनीचे माजी मुख्य वित्त अधिकारी मोहनदास पै यांनी एका मुलाखतीत भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्र संकटात सापडले नसून ते कात टाकणार आहे, अशा आशयाचे विधान केले आहे. जन्माला आलेल्या एका ‘एआय टूल’मुळे एक क्षेत्रच संकटात सापडेल, हे विधान धाडसी ठरणार आहे. दरम्यान टीसीएससारखा शेअर बावन्न आठवड्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. असेच उत्तम व्यवसाय (बिझनेस मॉडेल) असणारे चांगले शेअर उत्तम किमतीत सध्या मिळत आहेत, बाजार प्रत्येकाला संधी देत असतात आपण ती कशी घ्यायची यातच सारे कौशल्य आहे.