परवा एका (नव) गुंतवणूकदार मित्राचा फोन आला. गडी चांगलाच नाराज होता. कारण निवडक अशा मिडकॅप आणि स्मॉलकॅपचा त्याचा ‘ऑल स्टार’ पोर्टफोलिओ गेल्या वर्षभरापासून तोट्यात आहे. योग्य वेळी संपूर्ण पोर्टफोलिओ विकून चांदी आणि सोने न घेतल्याबद्दल तो स्वतःला (पर्यायाने मला) दूषणे देत होता.
मी याला ‘फ्रुटप्लेट’ मानसिकता म्हणतो. हंगामातील सर्वात चविष्ट (सध्या चांगली कामगिरी करणाऱ्या ) फळांचे निवडक काप नेहमी आपल्या थाळीमध्ये असायला हवेत, ही अपेक्षा आपण फळवाल्याकडून ठेवतो तशी पोर्टफोलिओकडून का नसावी असा हा ‘रोखठोक’ मामला!
गेल्या काही वर्षांतल्या बेबंद तेजीचा हा दुष्परिणाम
तेजीच्या वर्षांत ‘फ्रुटप्लेट’ पोर्टफोलिओ जास्त आकर्षक परतावा देतो. इथेच बहुतेक (नवशिके) गुंतवणूकदार फसतात. कारण बाजारातील पडझड ही पूर्वसूचना न देता आणि भावनिक तयारी नसताना येते आणि अशा गुंतवणुकीची चव चांगलीच बिघडवते. या पडझडीमुळे अशा गुंतवणूकदारांना वारंवार प्रवास थांबवून पुन्हा सुरू करावा लागतो, ज्यामुळे दीर्घकालीन परताव्यावर विपरीत परिणाम होतो.
शांततेच्या काळी करावी पुढील युद्धाची तयारी!
लष्करी क्षेत्रात एक जुनी म्हण आहे: ‘जे शांततेच्या काळात घाम गाळतात, त्यांना युद्धात कमी रक्त सांडावे लागते.’
गुंतवणुकीच्या क्षेत्रात आजच्या काळात ती तितकीच समर्पक आहे, कारण जागतिक भू-राजकारण अस्थिर होत आहे, राष्ट्रीय हितसंबंध वेगाने बदलत आहेत आणि बाजार अशा शक्तींना प्रतिसाद देत आहेत, ज्या ताळेबंदाच्या पलीकडे आहेत. अशा वातावरणात, केवळ आशावाद आणि भूतकाळातील चमकदार कामगिरीवर आधारलेले पोर्टफोलिओ मुळातच कमकुवत असतात.
पडझडीसाठी पोर्टफोलिओची बांधणी करणे म्हणजे नक्की काय?
१. खऱ्या वैविध्यतेचा अर्थच असा आहे की, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अशा काही गोष्टी असणे ज्या तुम्हाला कधी कधी आवडणार नाहीत.
जर तुमच्या पोर्टफोलिओमधील सर्व घटक एकत्रित वाढत असतील, तर ते एकत्रितपणेच कोसळतील. तेजीच्या काळात जी मालमत्ता काहीही करत नाही, असे वाटते, तीच मालमत्ता अनेकदा तेजी ओसरल्यावर तुमचे संरक्षण करते (उदाः सोने आणि चांदी).
तेव्हा गुंतवणुकीच्या मूल्यमापनाचे योग्य एकक ‘पोर्टफोलिओचा एकूण परतावा’ हेच असणे आवश्यक आहे.
२. ‘मी किती परतावा कमवू शकतो?’ याऐवजी ‘मी किती पडझड सहन करू शकतो?’ हा प्रश्न विचारा.
प्रत्येक मालमत्ता कठीण काळातून जाते. ‘इक्विटी’मध्ये म्हणजे समभाग संलग्न गुंतवणुकीमध्ये घसरण होते. महागाईच्या काळात कर्जरोखे म्हणजेच ‘डेट फंड’ निराश करतात. सोने बराच काळ स्थिर राहू शकते. रिट्स (रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) आणि इन्व्हिट्स (इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) भांडवली खर्च आणि आर्थिक चक्रांना प्रतिसाद देतात. पडझडीसाठी पोर्टफोलिओची बांधणी करणे, म्हणजे या वास्तवाचा आधीच स्वीकार करणे आणि हे सुनिश्चित करणे की कोणतीही प्रतिकूल परिस्थिती संपूर्ण पोर्टफोलिओ किंवा ताळतंत्र बिघडवू शकणार नाही.
३. जास्तीत जास्त किती घसरण सहन करणार (मॅक्सिमम टॉलरेबल ड्रॉडाउन) ते निश्चित करा.
संस्थात्मक पोर्टफोलिओ या संकल्पनेवर आधारित असतात, म्हणजेच तोटा अशा पातळीपर्यंत मर्यादित ठेवणे जिथे गुंतवणूकदाराला त्याचे धोरण किंवा वर्तन बदलण्याची वेळ येणार नाही. जर पोर्टफोलिओ ३० टक्के पडण्याची शक्यता असेल, पण गुंतवणूकदाराची मानसिक स्थिती १५ टक्के घसरणीवरच डळमळीत होत असेल, तर तो पोर्टफोलिओ त्या गुंतवणूकदारासाठी योग्य नाही. मग त्याची दीर्घकालीन परतावा देण्याची क्षमता कितीही का असेना.
४. वाढीसाठीचा भाग (ग्रोथ मनी) आणि सुरक्षित राखण्याचा भाग (स्टॅबिलिटी मनी) वेगळा ठेवा.
संपत्ती निर्माण करण्यासाठी ‘ग्रोथ ॲसेट्स’ असतात, तर तुमच्या स्थैर्यासाठी ‘स्टॅबिलिटी ॲसेट्स’ असतात. एका सुदृढ पोर्टफोलिओमध्ये दोघांनाही स्थान असते. जर बाजारातील घसरणीमुळे तुमची झोप उडत असेल, तर तुमचे वय, उत्पन्न किंवा तयारीच्या दृष्टीने तुमचे धोक्याच्या गुंतवणुकीचे वाटप (ॲलोकेशन) खूप जास्त आहे, असे समजावे.
५. किमान एक ‘आधारवड’ तयार करा जो काहीही न करता स्वस्थ बसण्यासाठी आश्वस्त करेल.
पडझडीच्या काळात, अनेकदा काहीही न करणे हाच सर्वोत्तम निर्णय असतो. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा पोर्टफोलिओचा काही भाग उत्पन्नाद्वारे, स्थिरतेद्वारे किंवा रोख रकमेद्वारे तुम्हाला आश्वस्त करतो. जे पोर्टफोलिओ वाईट काळात तुम्हाला चुकीचे पाऊल उचलण्यास भाग पाडतात, ते अयोग्यपणे बांधणी केलेले असतात.
६. अनुभवी गुंतवणूकदार कसे वागतात, यातून धडे घ्या.
तज्ज्ञ गुंतवणूकदार नवीन कल्पनांच्या मागे धावण्यापेक्षा पोर्टफोलिओची रचना व्यवस्थापित करण्यावर जास्त वेळ घालवतात. ते कठीण काळासाठी पोर्टफोलिओची चाचणी (स्ट्रेस टेस्ट) करतात आणि हे सुनिश्चित करतात की, आपल्या विविध गुंतवणुकी म्हणजे केवळ वेगवेगळ्या नावाखाली घेतलेली एकसारखीच जोखीम तर नाही.
७. हे स्वीकारा की, पडझडीसाठी पोर्टफोलिओ बांधणी करणे भावनिकदृष्ट्या कठीण असते.
आजूबाजूचे लोक पटापट श्रीमंत होत असल्याचे उघड दिसत असताना (किंवा त्यांनी बहुधा समाजमाध्यमावर असा आभास निर्माण केलेला असताना) आपण सावधगिरी बाळगणे भावनिकदृष्ट्या अस्वस्थ करणारे असू शकते. ही अस्वस्थता अपरिहार्य परंतु दिर्घकालीन यशासाठी आवश्यक आहे. अशा वेळी (मनाच्या शांततेसाठी का असेना) व्यावसायिक सल्ला मोलाचा ठरतो.
शेवटचेः शीर्षकासाठी मूळ ओळीमध्ये केलेल्या फेरफाराबद्दल माफी मागून मी असे म्हणेन की, गुंतवणुकीच्या जगातही ‘घटाघटांचे रूप आगळे आणि प्रत्येकाचे दैव वेगळे’ असल्यामुळे कधी कोणत्या मालमत्ता वर्गाच्या मुखी ‘लोणी’ पडेल आणि कोणाच्या ‘अंगार’ हे सांगता येत नाही. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळी ‘मडकी’ असणे अत्यावश्यक आहे. किंबहुना ते गुंतवणूकदाराच्या ‘शहाण’पणाचे व्यवच्छेदक लक्षणच आहे.
