scorecardresearch

Premium

बाजाररंग: आयपीओमध्ये नशीब अजमावताय…?

साधारणतः बाजार तेजीत असताना, आयपीओमध्ये पैसे गुंतवणूक चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते.

IPO and investment, risk in share market
आयपीओमध्ये नशीब अजमावताय…? (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शेअर बाजारातून चांगली कमाई करण्याची इच्छा असलेल्यांना कायमच कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीची (आयपीओ) प्रतीक्षा असते. साधारणतः बाजार तेजीत असताना, आयपीओमध्ये पैसे गुंतवणूक चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते. शेअर बाजारातील तेजीच्या लाटेचा फायदा घेत अनेक कंपन्या बाजारात आयपीओ सादर करून नशीब अजमावत असतात.

आयपीओ म्हणजे काय?

जे नियमितपणे शेअर बाजारात पैसे गुंतवतात त्यांना ‘आयपीओ’ची संकल्पना माहिती असली तरी नवीन वाचकांसाठी ही प्रक्रिया थोडक्यात समजून घेऊया. एखाद्या कंपनीला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. ते भांडवल उभे करण्यासाठी कंपन्या आपले समभाग गुंतवणूकदारांना बाजारामध्ये उपलब्ध करून देतात. कंपनीच्या व्यवसायाचे प्रारूप, भविष्यात संभावणारे धोके आणि नफ्याची क्षमता याचा अंदाज घेऊन आयपीओमध्ये पैसे गुंतवायचे किंवा नाही याचा निर्णय घ्यायचा असतो. आयपीओच्या माध्यमातून कंपनी आपल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे जणूकाही आवाहन गुंतवणूकदारांना करते. जेवढे समभाग कंपनीला द्यायचे असतात त्याच्या तुलनेत समभागांना अधिक मागणी आली म्हणजेच अधिकाधिक लोकांनी समभाग खरेदी करण्याची इच्छा दर्शवली तर त्याला ‘ओव्हरसबस्क्राइब’ असे म्हणतात. अशा वेळी समभागांना मागणी जास्त असते हे त्यातून स्पष्ट दिसते. कंपनीचे समभाग एकदा सूचिबद्ध झाले की, ज्या गुंतवणूकदारांना आयपीओच्या माध्यमातून मिळत नाहीत ते आता बाजारमंचावरून खरेदी करू शकतात. अशा वेळी मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यास शेअरची किंमत सूचिबद्ध (लिस्टिंग) झाल्यावर लगेचच वाढते.

Shukra Gochar 2023
नोव्हेंबरपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? शुक्रदेव गोचर करताच माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता लखपती
kitchen tips in marathi potato use in fridge save electrictity light bill kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: फ्रिजमध्ये बटाट्याची कमाल! झोपण्याधी फक्त एकदा…पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
nifty share market
Money Mantra: आठवड्याअखेरीस विक्रीचा जोर कायम, निफ्टी १९७०० खाली
Sovereign Gold Bond Scheme 2023-24 Online Purchase
Sovereign Gold Bond Scheme 2023-24 : सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये पुन्हा गुंतवणूक करण्याची संधी, बाजारातून स्वस्त दरात सोने खरेदी करता येणार

हेही वाचा… Money Mantra: झटपट पैसा मिळवण्याचा मोह खाईत लोटणाराच!

गुंतवणूकदार दोन प्रकारच्या रणनीतीचा अवलंब करू शकतात.आयपीओच्या माध्यमातून मिळालेल्या समभागावर बाजार पदार्पणाच्या दिवशीच घसघशीत नफा होत असेल तर पहिल्याच दिवशी नफा कमावून बाहेर पडणे. दुसऱ्या रणनीतीमध्ये गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तो समभाग आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवतात. प्रत्येक गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीची रक्कम कमी-अधिक असल्यामुळे त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जातो.

सगळेच आयपीओ चांगले असतात का?

गेल्या दोन वर्षांत भारतीय शेअर बाजारामध्ये लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर आयपीओ येत आहेत. किचकट आकडेवारीच्या बेतात / फंदात न पडता त्यामागचे गणित समजून घेऊया. ज्या लघु आणि मध्यम उद्योजकांच्या कंपन्यांचे व्यवसाय दर्जेदार आहेत, त्यांच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. अभियांत्रिकी, खाद्यपदार्थ, प्रक्रिया, रसायने, तंत्रज्ञान (एआय) आणि तत्सम उद्योग यातील कंपन्यांमध्ये आयपीओद्वारे गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा मिळालेला दिसतो. काही कंपन्यांनी बाजार पदार्पणाच्या दिवशीच २५ ते ६० टक्क्यांपर्यंत घसघशीत परतावा मिळवून दिला. तसेच काही कंपन्यांच्या समभागांनी बाजार पदार्पणात घसघशीत परतावा मिळवून दिला नसला तरीही त्याचा भाव हळूहळू वाढू लागला. टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशनची किंमत (पदार्पणाच्या दिवशी फक्त दोन टक्के वाढ) सद्य:स्थितीत १५ टक्क्यांनी वाढला आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने पदार्पणाच्या दिवशी ६० टक्के परतावा दिला. याचाच अर्थ फक्त कंपनी नावाजलेली असेल तरच फायदा होतो किंवा कंपनी आकाराने लहान किंवा मोठी असेल तरच फायदा होतो असे नाही.

हेही वाचा… Money Mantra : स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या किंमत, सवलत अन् शेवटची तारीख

भारतात तीन वर्षांपूर्वी बाजारात आयपीओची लाट आली होती. २०२१ मध्ये मोठ्या गाजावाजासह बाजारात पदार्पण केलेल्या पेटीएमच्या समभागाने गुंतवणूकदारांची निराशा केली. आयपीओच्या माध्यमातून २,१५० रुपयांना मिळविलेला समभाग सध्या ९०५ रुपयांवर व्यवहार करतो आहे. काही काळ तो ६०० रुपयांपर्यंत खाली आला होता. पेटीएमचे व्यवसाय प्रारूप वाईट आहे का? त्या कंपनीला सतत तोटाच होतो आहे का? असे असेल तर ज्या कंपन्यांचे आयपीओ घसघशीत नफा नोंदवत आहेत त्यांचे व्यवसायाचे स्वरूप असे काय वेगळे आहे? हा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात येईलच. शिवाय ज्या कंपन्या बाजारात आयपीओच्या माध्यमातून पदार्पण करतात त्या नफाक्षम असतात असे म्हटले जाते. मात्र याला छेद देत झोमॅटोने २०२१ मध्ये आपला आयपीओ बाजारात आणला. त्या वेळी कंपनी नफ्यात नसूनही कंपनीने आयपीओ आणला. जून २०२१ मध्ये कंपनीचा शेअर जवळपास निम्म्याने खाली आला. या वर्षीच्या जून महिनाअखेरीस कंपनीने पहिल्यांदा आपला नफा नोंदवला. त्यामुळे शेअरची किंमत वाढेल असा अदांज बाजारातील विश्लेषकांनी वर्तविला आहे. २०२१ मध्येच ‘कार ट्रेड डॉट कॉम’ या कंपनीने आयपीओ आणला, मात्र पुढच्या तीन महिन्यांत त्याचे मूल्य ३५ टक्क्यांनी घसरले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आयपीओला २० पट अधिक प्रतिसाद मिळाला होता. म्हणजेच गुंतवणूकदारांना बाजाराचा अंदाज आला नाही? की ते कंपनीच्या नाममुद्रेकडून बघून आयपीओकडे वळले?

हेही वाचा… Money Mantra: फिरायला जाण्याचं बजेटिंग

भारत सरकारच्या मालकीची आणि कायम नफ्यात असणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या नावाजलेल्या कंपनीनेदेखील भांडवली बाजारात निराशाजनक कामगिरी केली. एलआयसीच्या समभागाची किंमत बाजाराच्या अपेक्षेनुसार थोडी अधिक ठेवण्यात आली. म्हणून की काय हा समभाग अजूनही बाजाराच्या पसंतीला उतरलेला दिसत नाही. एकूण काय कंपनीचे व्यवसाय क्षेत्र चांगले आहे तरीही समभागाला गती नाही. आदित्य बिर्ला सन लाइफ असेट मॅनेजमेंट या कंपनीचा म्युच्युअल फंड व्यवसायात दबदबा आहे. अनेक वर्षांपासून म्युच्युअल फंड व्यवसायात कंपनी कार्यरत आहे. मात्र सप्टेंबर २०२१ मध्ये कंपनीने जेव्हा आपला आयपीओ बाजारात आणला, तेव्हा त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. ६९५ ते ७१२ रुपये या दरम्यान कंपनीने समभाग विक्रीसाठी आणले होते. सध्या या कंपनीचा समभाग बाजारामध्ये ४२२ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे.

सदर लेखातून आयपीओमध्ये गुंतवणूक करणे चुकीचे आहे असा छुपा संदेश देण्याचा कोणताही हेतू नाही. याउलट तुम्ही प्रत्येक समभाग विविध टप्प्यावर विकत घेताना तो किती वर्षांसाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवणार आहात? तुमची जोखीम घेण्याची क्षमता किती आहे? तुम्हाला किती परतावा हवा आहे? की दीर्घकालीन वृद्धीसाठी समभाग ठेवायचा आहे? एखाद्या कंपनीच्या भविष्यातील नेत्रदीपक कामगिरीचा तुम्हाला अंदाज घेता आला तर खाणीतूनच मिळणारा कोळसा आणि त्याच खाणीतून मिळणारा हिरा ओळखता येईल. पारख करणे हेच खरे कौशल्याचे काम…. नाही का!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipo and investment risk in share market print eco news dvr

First published on: 11-09-2023 at 11:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×