भूषण महाजन
IPO Market Investment Formula: ‘आयपीओ’त मोठे पैसे कमावले, असा दावा करणारे अनेक आहेत. कोण खरे आणि कोण खोटे? ‘मान सांगावा जनांत आणि अपमान ठेवावा मनात’ अशी वृत्ती असल्यामुळे आपल्याला लॉटरीत मिळालेला शेअर आज किती खाली आहे, हे कुणीच सांगत नाही.
‘अनलिस्टेड शेअर्स’चा मोठा बाजार भारतात आहे. या बाजारात किंमत शोध प्रक्रिया नीट पूर्ण होत नाही. ही ‘प्राइस डिस्कव्हरी’ अत्यंत महत्त्वाची असते. अनेकदा केवळ व्यवस्थापन बघून अंधारात गुंतवणूक केली जाते.
सांख्यिकीशास्त्रानुसार, चारपैकी तीन आयपीओत लिस्टिंगनंतर नफा होण्याची शक्यता आहे. एकात तोटा होऊ शकतो, असे इतिहासही सांगतो. पण नेमका तोच आपण घेतला तर? फक्त पश्चात्ताप! नव्या तंत्रज्ञानासह वाजत गाजत येणाऱ्या कंपन्यांची गोष्ट आणखी वेगळीच…
शेअर बाजारात तेजी आली की ‘आयपीओ’चा मारा सुरू. पूर्वी असा मारा फार वाढला की, बाजार खाली यायचाच. नंतर कालचक्रानुसार वर्ष दोन वर्षांत नवी तेजी सुरू व्हायची. करोनानंतरच्या चार वर्षांत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा कल वाढला, मोठा पैसाही येऊ लागला. त्यामुळे आजकाल तेजी असो व मंदी, प्राथमिक भागविक्री जोरात असते. झटपट श्रीमंतीच्या ध्यासातून सामान्य गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आयपीओकडे आकृष्ट होताना दिसतात. ‘मान सांगावा जनांत आणि अपमान ठेवावा मनात’ अशी वृत्ती असल्यामुळे आपल्याला लॉटरीत मिळालेला शेअर आज किती खाली आहे, हे कुणी सांगत बसत नाही. अशावेळी मी शेअर ‘लाँग टर्म’साठी घेतला आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे. हे लाँग टर्म म्हणजे किती असावे याला काही उत्तर नाही. २००८ साली ४२५ रुपयांना घेतलेला रिलायन्स पॉवर, आजही ( ४० रुपयांच्या किमतीला ) छातीशी कवटाळून बसलेले गुंतवणूकदार आहेत. तसेच आयपीओत मोठे पैसे मिळाले आहेत असा दावा करणारे अनेक आहेत. कोण खरे आणि कोण खोटे! असो या निमित्ताने, प्राथमिक भागविक्रीत किंवा त्याआधी भांडवल टाकताना काय धोरण असावे याचा ऊहापोह करायचा हा प्रयत्न आहे.
खालील आकडेवारी पाहा. डोळे चक्रावून जातील. २०२४ साली १ लाख ६८ हजार कोटी रुपये नव्या इश्यूमधून कंपन्यांनी उभे केले. प्रत्यक्षात त्यासाठी अर्जाद्वारे ४२ लाख कोटींचा भरणा झाला होता. ही रक्कम पुढे वाढतच गेली. २०२५ मधे १ लाख ८७ हजार कोटींची निधी उभारणी झाली, तर २०२६-२७ म्हणजे एकूण चार लाख कोटी उभे राहतील असे दिसते. पुरवठ्यापेक्षा मागणी ही कितीतरी अधिक असल्यामुळे, पुढील वर्षी किमान ७० ते ८० लाख कोटींचा भरणा गुंतवणूकदारांकडून होईल असा अंदाज आहे.
आमराईला मोहर आला की कोकिळेचे कुंजन सुरू होते आणि पाठोपाठ सुरू होते व्रात्य मुलांचे कैऱ्या पाडणे. तसेच काहीसे भांडवल बाजारात चाललेले असते. भारताकडे आजतरी जगाच्या स्टार्टअप कॅपिटलचे नेतृत्व असल्यामुळे, सतत नवीन कल्पनांचे आणि नवीन कंपन्यांचे भांडार खुले होते. त्यात गुंतवलेले भांडवल अनेकपटीने वाढल्याच्या कहाण्या व्हॉट्सॲप विद्यापीठातून बाहेर येतात. साहजिकच एखाद्या कंपनीने भांडवल बाजारात पाय ठेवायचे ठरवले की, तो इश्यू बाजारात येणाच्या आधीच सहभागी होण्याचे प्रयत्न सुरू होतात. ‘अनलिस्टेड शेअर्स’चा मोठा बाजार भारतात आहे. ती एक लॉटरीच आहे. पण त्यातील धोके लक्षात घेतले पाहिजेत.
या बाजारात किंमत शोध प्रक्रिया नीट पूर्ण होत नाही. ही ‘प्राईस डिस्कव्हरी’ अत्यंत महत्त्वाची असते. अनेकदा केवळ व्यवस्थापन बघून अंधारात गुंतवणूक केली जाते. दोन ठळक उदाहरणे डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे एचडीएफसी बँकेची उपकंपनी असलेली, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस. अनलिस्टेड बाजारात हा शेअर १२०० ते १५०० रुपयांना मिळत असे. भागविक्री झाली ७४० रुपयांनी आणि आजही भाव तिथेच आहे.
दुसरे उदाहरण म्हणजे टाटा कॅपिटलचे. ग्रे मार्केटमध्ये ८०० ते १२०० रुपये दर असलेला हा शेअर आयपीओत ३२८ रुपयांनी सादर झाला. अनलिस्टेड बाजारात शेअर खरेदी करणाऱ्यांची किती कुचंबणा झाली असेल याची यावरून कल्पना यावी. दुसरे म्हणजे इश्यू कधी येणार, कुठल्या भावाने येणार याची काहीही निश्चिती नसते. नुसतेच ताटकळत बसावे लागते आणि नंतर निराशाही पदरी पडू शकते.
इतर अनेक तोटे व किंचित फायदे आहेत. तात्पर्य एकच, अनलिस्टेड शेअर्सच्या नादी लागताना पूर्ण माहिती घेऊन, अभ्यास करून गुंतवणूक करावी. ग्रे मार्केटचा प्रीमियम (जीएमपी) कापरासारखा उडून जाऊ शकतो. म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलेले चांगले.
आता नव्या भागविक्रीकडे वळू
‘प्राप्तेतु षोडशे वर्षे गर्दभी अप्सरा भवेत’ या वचनाप्रमाणे – सोळा वर्षांची गाढवीणसुद्धा अप्सरेसमान भासते, प्रत्येकच नवा इश्यू आकर्षकच वाटतो. नवगुंतवणूकदार तेथे धाव घेतो. सांख्यिकीशास्त्रानुसार, चारपैकी तीन आयपीओत लिस्टिंगनंतर नफा होण्याची शक्यता आहे. एकात तोटा होऊ शकतो. पण नेमका तोच आपण घेतला तर ? फक्त पश्चात्ताप!
सहसा मोठ्या भागविक्रीमध्ये शेअर्स मिळण्याची शक्यता जास्त असते. पण तो पैसा मिळवून देईल असे नाही. उदा. पेटीएमने आयपीओ द्वारे १८,५०० कोटी रुपये उभे केले. २१५० रुपयांनी गुंतवणूकदारांना दिलेला हा शेअर लिस्टिंगनंतर बाजारात उघडलाच १९५० रुपयांना! त्यानंतर जसजसा भ्रमनिरास झाला, तसा तो खालीच येत गेला. आजही भाव १२०० च्या आसपास आहे. बहुसंख्य छोटे गुंतवणूकदार ‘मेरा तो लाँग टर्म है’ असे म्हणून तो सांभाळून आहेत ! एक मात्र खरे की फार गाजावाजा होत आलेला इश्यू सहसा निराशाच देतो.
कित्येकदा विश्लेषकांवर विश्वास ठेवावा की नाही ते कळत नाही. कधी बरोबर तर कधी ते सपशेल चुकतात. जसे, नऊ वर्षांपूर्वी, जेव्हा डीमार्टच्या आयपीओचा भाव ३०० रुपये ठेवला होता, तेव्हा विश्लेषक तो खूप महाग कसा आहे हे टीव्हीवर पुन्हा पुन्हा पटवून देत होते. हा शेअर ६०० रुपयांना उघडला आणि बहुसंख्य ‘नशीबवान’ गुंतवणूकदारांनी तो घाबरून विकून टाकला. जरी आज ना उद्या विकायला हवा हे खरे असले तरी थोडाबहुत संयम उपयोगी पडला असता. कारण महिनाभरात भाव ८०० आणि तीन महिन्यात १००० रुपयांवर पोहोचला. आजही तो ३८०० रुपयांवर आहे. अर्थात अशी उदाहरणे विरळाच!
प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, नवीन इश्यू जेव्हा बाजारात येतो तो काही तुम्हाला दोन पैसे मिळावे म्हणून नाही. जास्तीत जास्त किंमत आपल्या शेअरला मिळावी हे उद्दिष्ट असते. इन्व्हेस्टमेंट बँकर्सचे गणितही त्यावरच अवलंबून असते. पुढे शेअर कसा वर किंवा खाली जाईल ते कंपनीच्या कामगिरीवर आणि बाजाराच्या सेंटिमेंटवर ठरते.
आजकाल प्रत्येकच नव्या भागविक्रीला अँकर इन्व्हेस्टर असतो. हा मोठा गुंतवणूकदार असतो व त्याला काही शेअर्स ठोक भावात नक्की ( १०० टक्के अलॉटमेंट) मिळतात. सेबीच्या नियमाप्रमाणे किमान ३० दिवस ही गुंतवणूक ठेवावी लागते. ३० दिवसानंतर त्यातील ५० टक्के शेअर्स बाजारात विकता येतात व ९० दिवसानंतर उरलेले सर्व. ही अँकर इन्व्हेस्टरची विक्री सामान्य गुंतवणूकदाराला महागात पडू शकते. बजाज हौसिंगचा शेअर बजाज समूहाच्या पुण्याईवर चांगला सूचिबद्ध झाला. पण अँकर इन्व्हेस्टर बाहेर पडल्यावर प्रथम ९ टक्के आणि नंतर अधिक खाली आला. स्विगी, ओला सारख्या पामरांची गोष्टच वेगळी. नव्या तंत्रज्ञानासह वाजत गाजत आलेला ‘ओला’ची कहाणी एक वेगळाच धडा देऊन जाते. व्यवस्थापनाची निस्पृहता शेअर बाजारात किती महत्त्वाची आहे हे त्यातून लक्षात येते. ओलाचे प्रमुख प्रवर्तक भावीश अगरवाल यांच्या नावे अटक वॉरंट निघाले आहे. ७६ रुपयांना नवीन इश्यूमध्ये मिळालेला शेअर आज २७ रुपयांवर सरपटतो आहे.असो!
नवीन भागविक्री होते तेव्हा काही शेअर्स ( कधीकधी सारेच ) ‘ऑफर फॉर सेल (ओएफएस)’ म्हणून दिले जातात. थोडक्यात प्रवर्तकांना किंवा एंजल गुंतवणूकदारांना स्वत:चा खिसा गरम करून बाहेर पडण्याची ती वाट आहे. कधी कधी ते चोरवाटेने, इश्यू बाजारात यायच्या आधी स्वत:ला बोनस शेअर्स देऊन बाहेर पडायचा रस्ता तयार ठेवतात. तेव्हा नीट अभ्यास केल्याशिवाय ओएफएसला हात लाऊ नये.
मग करावे तरी काय?
येणाऱ्या वर्षी चार लाख कोटी रुपये भांडवल बाजारातून उभे होतील. आपले धोरण काय असावे ?
प्रथम तर, संपूर्ण अभ्यास करून, कंपनी कुठल्या क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रातील बाजारात उपलब्ध असलेले इतर शेअरचे काय भवितव्य आहे ते बघावे. नंतर विश्लेषकांचा सल्ला घ्यावा ( सरासरीच्या नियमाप्रमाणे ते कधीकधी अचूक सल्ला देतील यावर विश्वास ठेवून) आणि संपूर्ण खात्री करूनच शेअर्ससाठी अर्ज करावा.
वरील गृहपाठ करणे शक्य नसेल तर सरसकट सर्वच भागविक्रीत तलवारबाजी करावी. चारपैकी तीनमध्ये पैसे मिळणार आहेत असे इतिहास सांगतो. नेमका आपण अर्ज केलेला शेअर खाली जावा आणि न मिळालेला वर जावा असे होऊ शकते. ते प्राक्तन म्हणून स्वीकारावे. शेअर सूचिबद्ध झाल्यावर थोडीफार वाट पाहिल्यावर नफा / तोटा न बघता विकून टाकावा. म्हणजे भांडवल अडकून राहत नाही व सर्व विक्रीमध्ये सहभागी होता येते.
बरेचदा रिटेल गुंतवणूकदारांची भाबडी समजूत असते की ज्या शेअरला अनेक पटीने मागणी असते तो चांगला. ‘जहा हम खडे है लोगों की लाईन लग जाती है’ या चालीवर हे घडत असते. नावात सोलर असल्यामुळे सोलरवर्ल्डच्या शेअरला ३५१ रुपयांच्या किमतीला ६८ पट मागणी होती. तो सूचिबद्ध झाल्यापासून घरंगळत २०० रुपयांवर अधिक खाली जाण्याची वाट पाहतो आहे.
सहसा रिटेल गुंतवणूकदाराला किरकोळ संख्येने शेअर मिळत असल्यामुळे तोटा सहन करायला धीर येतो. तो धीर आल्यामुळे गुंतवणूकदार वर्षानुवर्षे तोटा सहन करत राहतो. पण सूचिबद्ध झाल्यावर ते न पाहता विकणे योग्य. कंपनीचे तिमाही निकाल आल्यानंतर, योग्य वाटल्यास नव्याने त्याच शेअरमध्ये गुंतवणूक कधीही करू शकतो.
नव्या भागविक्रीत काही शेअर्स चांगलेच असतील असे सर्वच गुंतवणूकदारांना माहीत असते. जसे ह्युंदाई मोटर्स. अनेक वर्षांपूर्वी आलेला मारुतीचा शेअर, अगदी नुकताच आलेला आयसीआयसीआय एएमसी, नेटवेब, इरेडा वगैरे शेअर. अशा ठिकाणी सर्व कुटुंबीयांच्या नावाने अर्ज करणे चांगले!
नवीन भागविक्री होतच राहील, त्यात नवगुंतवणूकदार सामील होत राहतील. थोड्या सजगतेने गुंतवणूक केल्यास भांडवलात वाढ शक्य आहे, असे वाटते.
(लेखक, पुणेस्थित शेअर बाजार अभ्यासक आणि सल्लागार)
