scorecardresearch

Premium

दिव्याखाली अंधार

केवळ बचत असणे पुरेसे नसते, तर या बचतीच्या जोडीला मुदतीचा विमा आणि आरोग्य विमा असणे गरजेचे असते.

savings, term insurance, health insurance
आर्थिक नियोजनांत मुदतीच्या विम्याइतकाच आरोग्य विमासुद्धा महत्त्वाचा आहे. ( Image Source – Financial Express )

वसंत माधव कुलकर्णी

आज या सदरासाठी राधिका कुलकर्णी (४८) यांच्या आर्थिक नियोजनाची निवड केली आहे. ‘लोकसत्ता’च्या वाचक असलेल्या राधिका या पुण्यातील टिळक रोडवर राहतात. त्या त्यांचे पती सुशील (४८) आणि मुलगी आर्या (१७) हे कुटुंबाचे सदस्य आहेत. त्या खासगी जीवन विमा कंपनीत नोकरी करतात, तर पती सरकारी बँकेत नोकरी करतात. राधिका यांना सेवानिवृत्ती वेतन नाही, तर पती सुशील यांना ‘एनपीएस’च्या माध्यमातून सेवानिवृत्ती वेतन मिळणार आहे. राधिका कुलकर्णी यांच्या गुंतवणुकीत १८ म्युच्युअल फंड असून, या गुंतवणुकीचे ३१ मार्च रोजीचे मूल्यांकन ३६.४४ लाख रुपये आहे. गृह कर्ज वगळता राधिका आणि सुशील कुलकर्णी यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. दरमहा साधारण ६० हजारांची बचत हे कुटुंब करू शकते. या बचतीचा विनियोग कसा करावा हा त्यांचा प्रश्न होता.

कृती योजना

प्रत्येक कमावत्या आणि आर्थिक जबाबदारी असलेल्या व्यक्तीने मुदतीच्या विम्याची खरेदी करणे आवश्यक असते. आर्थिक नियोजनाची सुरुवात मुदतीचा विमा खरेदी करून करणे आवश्यक असते. दुर्दैवाने आर्थिक अल्पसाक्षरतेमुळे अनेक कमावते आणि आर्थिक जबाबदारी असलेली मंडळी मुदतीचा विमा खरेदी करीत नाहीत. राधिका कुलकर्णी जीवन विमा कंपनीत कामाला असूनसुद्धा त्यांनी किंवा सुशील कुलकर्णी यांच्याकडे मुदतीचा विमा नाही. भारतात अनेक जीवन विमा कंपन्या वेगवेगळ्या जीवन विमा योजना देतात. परंतु कमावत्या आणि आर्थिक जबाबदारी असलेल्या व्यक्तीने केवळ ‘टर्म प्लॅन’ची (मुदत विमा) निवड करावी. सर्वात कमी हप्त्यात सर्वात मोठे विमा छत्र केवळ मुदतीचा विमाच देऊ शकतो. मुदतीच्या विम्याच्या शेवटी काहीही परत मिळत नाही. म्हणून अनेक फायदे असूनही, मुदतीचा विमा खरेदी करण्याकडे नकारात्मकतेने पाहिले जाते. बरेच पर्याय उपलब्ध असल्याने, कोणते विमा उत्पादन त्यांच्यासाठी योग्य आहे याबद्दल लोक गोंधळून जातात. मुदतीचा विमा प्रत्येक कमावत्या व्यक्तीसाठी योग्य साधन आहे. विमा खरेदी केलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, कुटुंबातील सदस्यांना विमा छत्राइतकी रक्कम मिळेल. या रकमेतून दिवंगत विमा खरेदीदाराचे कुटुंबीय त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकतात. यासाठी दोघांनी प्रत्येकी १ कोटीच्या आणि १५ वर्षे मुदतीच्या मुदत विम्याची खरेदी करणे आवश्यक आहे.

Maruti Suzuki Dzire
मारुतीच्या ‘या’ स्वस्त सेडान कारची धडाक्यात विक्री; Verna, Amaze सह सर्वांना टाकलं मागे, मायलेज ३१ किमी, किंमत फक्त…
How To Control Diabetes Sugar level Blood sugar control made easy
Blood sugar control: रक्तातील साखर कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे व्यायाम…शुगर राहील नियंत्रणात
investments under 80c marathi news, 80c investments marathi news
Money Mantra : ८०सी अंतर्गत गुंतवणूक करताना
risk of cervical cancer can reduce if hpv infection prevented
एचपीव्हीचा प्रादुर्भाव रोखल्यास गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर मात करणे शक्य, जनजागृतीवर भर देणे आवश्यक

आर्थिक नियोजनांत मुदतीच्या विम्याइतकाच आरोग्य विमासुद्धा महत्त्वाचा आहे. आरोग्यसेवेचे मूल्य वाढत आहे आणि त्याचप्रमाणे आजकाल आरोग्याचे प्रश्नसुद्धा बिकट होत आहेत. वाढते प्रदूषण, धकाधकीची जीवनशैली यामुळे मधुमेह, किडनी आणि यकृताच्या समस्या आणि हृदयविकार यांसारखे जीवनशैलीशी निगडित आजारांना मोठ्या प्रमाणावर अनेकजण लहान वयात बळी पडलेले दिसत आहेत. शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण, केमोथेरपी आणि अशा इतर खार्चिक वैद्यकीय उपायांमुळे तुमच्या बचतीचा मोठा हिस्सा खर्च होण्याची शक्यता आहे. वैद्यक विज्ञान प्रगत झाले आहे आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने हे सुनिश्चित केले आहे की आजकाल जवळजवळ प्रत्येक रोगावर उपचार किंवा उपशामक उपचार उपलब्ध आहेत. तथापि, ते उपचार सर्वांच्या आवाक्यात नाहीत. भारतीय लोकसंख्येचा एक मोठा भाग केवळ पैशाच्या कमतरतेमुळे योग्य वैद्यकीय उपचार घेऊ शकत नाही. उपचाराचा खर्च लोक त्यांच्या बचतीतून भागवतात. किंवा महागडी कर्जे घेतात किंवा मालमत्ता विकतात. हे टाळण्यासाठी पुरेसा आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. तुम्ही १० लाखांचा ‘फॅमिली फ्लोटर प्लॅन’ खरेदी करणे गरजेचे आहे. तुमच्या नोकरीच्या ठिकाणाहून मिळणारा आरोग्य विमा पुरेसा नाही.

केवळ बचत असणे पुरेसे नसते, तर या बचतीच्या जोडीला मुदतीचा विमा आणि आरोग्य विमा असणे गरजेचे असते. विमा कंपनीत नोकरी करणाऱ्याकडे आणि जो आपल्या बँकेच्या ग्राहकांना विम्याची खरेदी (गुंतवणूक) करण्याचा सल्ला देतो त्याच्याकडेच पुरेसे विमाछत्र नसावे ही वस्तुस्थिती दिव्याखाली असलेला अंधार दर्शवते. असे दिव्याखाली अंधार असणारे कुलकर्णी कुटुंबीय एकच नाहीत. अशा चुका करणारे मोठ्या संख्येने दिसतात. अशा चुका टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

shreeyachebaba@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: It is not enough to have savings alone but these should be accompanied by term insurance and health insurance asj

First published on: 03-04-2023 at 10:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×