आयटीसी लिमिटेड (बीएसई कोड ५००८७५) वेबसाइट: www.itcportal.com
प्रवर्तक:
बाजारभाव: रु. ३०७/
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: सिगरेट्स/ एफएमसीजी
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १२५२.९२ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक
परदेशी गुंतवणूकदार ३६.११ बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ४८.९४ इतर/ जनता १४.९५
पुस्तकी मूल्य: रु. ५६.७
दर्शनी मूल्य: रु. १/-
लाभांश: १४३५%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १६.४ किंमत उत्पन्न गुणोत्तर: १८.६
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४४.५
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०१
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ४१९
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (ROCE): ३६.८
बीटा : ०.७
बाजार भांडवल: रु. ३,८४,३४१ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४४४/२८७ गुंतवणूक कालावधी: ३६ महिने
वर्ष १९१० मध्ये स्थापन झालेली आयटीसी ही देशातील सिगारेटची सर्वात मोठी उत्पादक आणि विक्रेता कंपनी आहे. आयटीसी चार प्रमुख व्यावसायिक विभागांमध्ये कार्यरत आहे. सिगारेट, ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी इतर उत्पादने), कृषी व्यवसाय आणि पेपरबोर्ड्स व पॅकेजिंग. सिगारेट व्यवसाय हा दीर्घकाळ कंपनीचा ‘कॅश फ्लो इंजिन’ राहिला आहे; मात्र आता ‘एफएमसीजी’ आणि इतर व्यवसायांवर भर देत कंपनी दीर्घकालीन पुनर्मूल्यांकन साधण्याचा प्रयत्न करत आहे.
संशोधन आणि विकास
बंगळुरू येथे स्थित कंपनीचे संशोधन आणि विकास तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांचे केंद्र, आयटीसी लाइफ सायन्स अँड टेक्नॉलजी सेंटर यामुळे कंपनीला आरोग्य आणि पोषण, स्वच्छता, संरक्षण आणि निगा, तसेच ‘सोयीस्कर आणि प्रवासादरम्यान वापरता येणारी उत्पादने’ यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये नवीन उत्पादने बाजारात आणणे शक्य झाले आहे. कंपनीने विविध ‘पेटंट’ अर्थात स्वामित्व हक्कासाठी अर्ज केला आहे.
व्यावसायिक विभाग
१) सिगारेट: संघटित क्षेत्रात देशांतर्गत सिगारेट बाजारपेठेत कंपनीचा ८० टक्के हिस्सा आहे. कंपनी इंडिया किंग्स, इन्सिग्निया, क्लासिक, गोल्ड फ्लेक, अमेरिकन क्लब, विल्स, प्लेएर्स, सीजर्स, कॅपस्टन, इत्यादी नाममुद्रांची विक्री करते. हा विभाग कंपनीचा सर्वात फायदेशीर व्यवसाय असून कंपनीच्या नफ्यामध्ये या विभागाचे योगदान ७५ टक्के आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात लादलेला ४० टक्के वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आणि उत्पादन शुल्कामध्ये केलेली मोठी वाढ नजीकच्या काळात नफा कमी करण्याची शक्यता असेल.
२) ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी -इतर उत्पादने): कंपनी भारतातील एक अग्रगण्य एफएमसीजी उत्पादक आणि विक्रेता आहे. पाकीटबंद अर्थात पॅकेज्ड खाद्यपदार्थ, वैयक्तिक निगा उत्पादने, शिक्षण आणि स्टेशनरी उत्पादने, अगरबत्ती आणि काड्यापेट्या इत्यादी क्षेत्रांमध्ये कंपनीची मजबूत उपस्थिती आहे. कंपनीने गेल्या वर्षी श्रेस्टा नॅच्यरल बाय प्रॉडक्ट खरेदी करून २५ मुख्य नाममुद्रांचा समूह ताब्यात घेतला, ज्यांची पोहोच २५ कोटींहून अधिक घरांपर्यंत आहे. आशीर्वाद, सनफिस्ट, बिंगो, बी नॅच्यरल्स, योगा बार, यीप्पी, फियामा, विवेल, सॅवलॉन, क्लासमेट, पेपरक्राफ्ट आणि मंगलदीप यांसारख्या कंपनीच्या नाममुद्रांचा त्यांच्या संबंधित उत्पादनांच्या श्रेणींमध्ये मोठा बाजारहिस्सा आहे. कंपनीने गेल्या वर्षात मदर स्पर्श बेबी केयर या कंपनीत हिस्सा घेतला आहे.
३) कृषी व्यवसाय : तंबाखूची पाने, मसाले, कॉफी, गोठवलेले सागरी खाद्यपदार्थ, प्रक्रिया केलेली फळे इत्यादी कृषी उत्पादनांची निर्यात करणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ही एक आहे. कंपनी २२ राज्यांमध्ये आणि २० हून अधिक कृषी-मूल्य साखळ्यांमध्ये दरवर्षी सुमारे ३० लाख मेट्रिक टन मालाची हाताळणी करते.
४) पेपरबोर्ड्स, कागद आणि पॅकेजिंग: कंपनी भारतातील सर्वात मोठी आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत अशी कागद व पेपरबोर्ड उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी १०० टक्के ‘व्हर्जिन’ पेपरबोर्ड्स; नूतनीकरणक्षम आणि शाश्वत स्रोतांपासून बनवलेले ‘फूड-ग्रेड’ बोर्ड्स; पुनर्वापर केलेले बोर्ड्स; विद्युत निरोधक कागद; जैव-आधारित ‘बॅरियर-कोटेड’ बोर्ड्स; सजावटीसाठी वापरले जाणारे लॅमिनेट बेस पेपर्स इत्यादी उत्पादने उपलब्ध करून देते.
५) हॉटेल व्यवसाय : आयटीसी हॉटेल्स ही विभाजन केलेली कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध असून यात आयटीसीचा ४० टक्के हिस्सा आहे. कंपनी ‘ॲसेट-राईट’ मॉडेलवर कार्यरत असून, तिच्याकडे १३० हून अधिक मालमत्ता आणि १२,००० हून अधिक खोल्यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत पोर्टफोलिओमध्ये २८ नवीन हॉटेल्स जोडण्याची या कंपनीची योजना आहे.
६) इतर – माहिती तंत्रज्ञान : कंपनी आयटीव्ही इन्फोटेक या उपकंपनीद्वारे, बँकिंग व वित्तीय सेवा, आरोग्यसेवा, उत्पादन क्षेत्र, ग्राहक वस्तू प्रवास आणि आदरातिथ्य इत्यादी विविध क्षेत्रांतील उद्योगांना माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवते.
वितरण जाळे कंपनीने माहिती तंत्रज्ञान तसेच कृत्रिम प्रज्ञा अर्थात ‘एआय’ यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून ‘व्यापार विपणन आणि वितरण’ जाळे एका ‘स्मार्ट ओम्नीचॅनेल’ नेटवर्कमध्ये रूपांतरित केले आहे. यामुळे कंपनीने बाजारपेठेतील व्याप्तीमध्ये दुप्पट वाढ साध्य केली असून, ७५ टक्के किरकोळ विक्रेते आता कंपनीची ‘एफएमसीजी’ उत्पादने आपल्या दुकानांमध्ये उपलब्ध करून देतात. तसेच कंपनीने ६ नवीन डी टू सी (थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे) मंच सुरू केले आहेत; कंपनीचा उन्नती हा मंच जवळपास ७ लाख विक्री केंद्रांपर्यंत पोहोचला आहे. कृषी-व्यवसाय क्षेत्रात, आयटीसी मार्स या उपक्रमाने आपल्या नाविन्यपूर्ण फिजिटल (भौतिक आणि डिजिटल यांचा मेळ घालणाऱ्या) उपक्रमाद्वारे १० राज्ये आणि १८,००० गावांमधील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सहाय्य पुरवले आहे.
उत्पादन क्षमता
कंपनी संपूर्ण भारतभर २०० हून अधिक उत्पादन प्रकल्प चालवते. कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या आयटीसी इंडिविजन लिमिटेडने निकोटीन आणि निकोटीन-व्युत्पन्न उत्पादनांचे उत्पादन व निर्यात करण्यासाठी एक नवीन सुविधा उभारली आहे. ही सुविधा अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या औषधनिर्माण मानकांशी सुसंगत आहे.
संशोधन आणि विकास
बंगळुरू येथे स्थित कंपनीचे संशोधन आणि विकास तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांचे केंद्र असलेल्या आयटीसी लाइफ सायन्स अँड टेक्नॉलजी सेंटर यामुळे कंपनीला आरोग्य आणि पोषण, स्वच्छता, संरक्षण आणि निगा, तसेच ‘सोयीस्कर आणि प्रवासादरम्यान वापरता येणारी उत्पादने’ यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये नवीन उत्पादने बाजारात आणणे शक्य झाले आहे.
डिसेंबर २०२५ अखेर सरलेल्या तिसर्या तिमाहीत कंपनीने २०,०४७ कोटी रुपयाच्या उलाढालीवर (६ टक्के तुलनात्मक वाढ), ५,२७९ कोटी रूपयांचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो १२ टक्क्याने अधिक आहे. उत्तम व्यावसायिक व्यवस्थापन, अत्यल्प कर्ज पूर्णत्वाला आलेले विस्तारीकरण प्रकल्प आणि वैविध्यपूर्ण उत्पादनाना असलेली देशांतर्गत वाढती मागणी या मूळे आयटीसीचे भवितव्य उज्वल वाटते. सध्या नीचांकी पातळीवर उपलब्ध असलेला हा शेअर तुम्हाला दीर्घकाळात उत्तम फायदा देऊ शकेल.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्याटप्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com
हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
