अजय वाळिंबे
Jammu And Kashmir Bank Share : भारतीय शेअर बाजारात सध्या अनेक शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत असली, तरी काही वेगाने वाढणाऱ्या बँकिंग स्टॉक्सवर तज्ज्ञांची विशेष नजर आहे. त्यापैकीच एक असलेली सरकारी क्षेत्रातील जम्मू अँड काश्मीर बँक (JK Bank) आपल्या दमदार आर्थिक निकालांमुळे आणि आकर्षक व्हॅल्युएशनमुळे गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत आहे.
जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेड (बीएसई कोड ५३२२०९)
संकेतस्थळ: jkb.bank.in
प्रवर्तक: जम्मू आणि काश्मीर राज्य सरकार
बाजारभाव: रु. ११७/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: बँकिंग
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ११०.१२ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५९.४०
परदेशी गुंतवणूकदार ११.६२
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ७.४२
इतर/ जनता २१.५६
पुस्तकी मूल्य: रु. १४६.२७
दर्शनी मूल्य: रु. १ /-
लाभांश: २१५ %
प्रति समभाग उत्पन्न: रु. २१.४५
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५.४६
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: १२.१
कॅपिटल अॅडीक्वसी गुणोत्तर: १४.७३%
नक्त अनुत्पादित कर्ज प्रमाण: ०.५१ %
रिटर्न ऑन इक्विटी (आरओई): १५.४ %
रिटर्न ऑन असेट्स: १.०७ %
नेट इंट्रेस्ट मार्जिन: ३.१७
बीटा : १.४
बाजार भांडवल: रु. १२,९०५ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २०२/९७
गुंतवणूक कालावधी: २४ महिने
वर्ष १९३८ मध्ये स्थापन झालेली जम्मू अँड काश्मीर बँक ही भारतातील एक सार्वजनिक मालकीची बँकिंग कंपनी आहे. बँक किरकोळ बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग आणि ट्रेझरी ऑपरेशन्ससह विविध प्रकारच्या बँकिंग सेवा पुरवते. ही देशातील एकमेव खासगी क्षेत्रातील बँक आहे, ज्यावर राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरीय बँकर्स समितीच्या बैठका आयोजित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बँकेने जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील १२ जिल्ह्यांमध्ये श्रीनगर, गांदरबल, बडगाम, बारामुल्ला, बांदीपोरा, कुपवाडा, अनंतनाग, कुलगाम, पुलवामा, शोपियां, पुंछ आणि राजौरी लीड बँक (मुख्य बँक) म्हणून आपली जबाबदारी समाधानकारकपणे पार पाडली आहे.
विस्तृत शाखा जाळे:
एकूण १००८ शाखा असून त्या पैकी ८३५ शाखा जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात, ३७ शाखा लडाख केंद्रशासित प्रदेशात आणि १३६ शाखा इतर २० राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहेत. बँकेची भारतभरात १४४५ एटीएम आहेत. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश सरकारची बँकेत बहुमताने भागीदारी असली, तरी बँकेला पूर्ण कार्यात्मक स्वायत्तता प्राप्त आहे. बँकेची ‘जेकेबी फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड’ नावाची उपकंपनी असून बँक जम्मू अँड काश्मीर ग्रामीण बँकेची प्रायोजक बँक देखील आहे. जेके बँकेची बाजारपेठेत भक्कम उपस्थिती असून, जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारी बँकिंग व्यवहार हाताळण्यासाठी रिझर्व्ह बँकेद्वारे बँकेला एजन्सी बँक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
व्यवसाय विभाग:
किरकोळ बँकिंग (रिटेल बँकिंग): ५७%
ट्रेझरी: २४%
कॉर्पोरेट बँकिंग: १९%
इतर: १%
बँक-विमा क्षेत्रात बँकेचे एलआयसी , पीएनबी मेटलाईफ, बजाज लाईफ, एसबीआय लाईफ आणि एचडीएफसी लाईफ सोबत जीवन विम्यासाठी, तर बजाज जनरल इन्शुरन्स, इफको टोकियो आणि न्यू इंडिया ॲश्युरन्ससोबत सामान्य विम्यासाठी करार आहेत.
महत्त्वाचे गुणोत्तर (दुसरी तिमाही, आर्थिक वर्ष २०२७):
उत्पन्न दर (यिल्ड): ८.५५%
निधीची किंमत : ४.९५%
निव्वळ व्याज मार्जिन (निम): ३.१७%
भांडवल पर्याप्तता प्रमाण : १६.५७%
एकूण अनुत्पादित मालमत्ता (जीएनपीए): २.२३%
निव्वळ अनुत्पादित मालमत्ता (एनएनपीए): ०.५१%
कर्ज पोर्टफोलिओ : (३० सप्टेंबर २०२७) बँकेची एकूण कर्ज १,३३,५५१ कोटी रुपये इतकी होती, प्रमुख कर्ज मिश्रण पुढील प्रमाणे:
वैयक्तिक वित्त : ३४.०६%
व्यापार आणि सेवा: १७.११%
कृषी: १०.७७%
वित्तीय बाजारपेठा: १८.९५%
उत्पादन क्षेत्र: ५.९५%
पायाभूत सुविधा: ९.२३%
ठेवी : आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसर्या तिमाहीपर्यंत , बँकेकडे एकूण १७६,७९६ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, तर आर्थिक वर्ष २०२६ च्या दूसऱ्या तिमाहीत हे प्रमाण १,५२,०३० कोटी रुपये होते. यापैकी मुदत ठेवीचे प्रमाण ५६ टक्के असून चालू आणि बचत खाती ४४ टक्के आहेत.
डिजिटल परिवर्तन : दोन वर्षांपूर्वी बँकेने इन्स्टंट क्यूआर हे नवीन डिजिटल उत्पादन सुरू केले आहे. याद्वारे ‘एमपे डिलाईट प्लस’ आणि इतर सर्व भीम, यूपीआय ॲप्सच्या माध्यमातून त्वरित आणि सुरक्षित पेमेंट स्वीकारता येते. सध्या बँकेचे सुमारे ९४ टक्के व्यवहार डिजिटल असून त्या करता बँकेला ‘नवभारत बीएफएसआय समिट’मध्ये नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर बँकेने मुख्य व्यवसायांमध्ये सातत्यपूर्ण वाढ नोंदवत २०२७ च्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत अपेक्षित कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसर्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न १४.५ टक्के वाढीसह १,८१७ कोटी इतके राहिले, तर कर-पूर्व नफा १३.१ टक्क्यांच्या वाढीसह ७१७ कोटी झाला; बँकेच्या अनुत्पादित कर्जात लक्षणीय घाट झाली असून नक्त एनपीए केवळ ०.५१ टक्क्यांवर आले आहेत. सुरक्षित कर्जवाटपावर धोरणात्मक लक्ष, शिस्तबद्ध पोर्टफोलिओ पुनर्रचना आणि सुधारलेली कार्यक्षमता यांमुळे हे यश शक्य झाले आहे.
बँकेच्या नेट इंट्रेस्ट मार्जिनमध्ये किंचित घट झाली असली तरी आगामी काळात यात वाढ होईल अशी अपेक्षा आहे. उत्तम आणि अनुभवी व्यवस्थापन तसेच बँकेचा आपल्या उपकंपन्यासह धोरणात्मक व्यवसाय विस्तार आणि उत्तम कर्जवसुली यामुळे सध्या ११५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतो.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com
- हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून तो गुंतवणूक सल्ला नव्हे
- प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही
गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा
कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
- लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा
सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
