गुंतवणूकदारांना वर्षानुवर्षे देण्यात येणारा पारंपरिक सल्ला प्रथमदर्शनी अगदी सरळधोपट आहे. तरुण असताना आक्रमक गुंतवणूक करा, ध्येय जवळ येताना हळूहळू जोखीम कमी करा आणि ठरावीक अंतराने ‘रिबॅलन्सिंग’ करत राहा. पण याची अंमलबजावणी करताना बहुतेक सामान्य गुंतवणूकदारांचा चांगलाच गोंधळ उडालेला दिसतो.
‘ॲसेट ॲलोकेशन’ समजावून करणे, ते नियमितपणे तपासणे, वेळोवेळी ‘रिबॅलन्सिंग’ करणे, आणि बाजाराच्या चढ-उताराच्या वेळी संयम राखणे, या प्रत्येक टप्प्यावर चुका होताना दिसतात. गुंतवणूकदार बऱ्याचदा अलीकडच्या परताव्यावर जास्त भर देतात, ‘रिबॅलन्सिंग’ पुढे ढकलतात, उशिरापर्यंत ‘इक्विटी’त अडकून राहतात किंवा बाजार पडल्यापडल्या घाबरून समभाग विकून टाकतात. परिणामी, सामान्य किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा फंड गटाच्या सरासरीपेक्षाही कमी परतावा मिळवून बसतात.
‘लाइफ सायकल फंड’ हा पर्याय या समस्येवरचा उपाय म्हणून सादर केला गेला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये औपचारिकरीत्या ओळख करून देण्यात आलेले हे फंड, ठरावीक ‘मॅच्युरिटी’ अर्थात मुदतपूर्ती वर्ष डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेले ‘ओपन-एंडेड’ म्युच्युअल फंड असणार आहेत. यामध्ये एक अनिवार्य ‘ग्लाइड पाथ’ असेल, जो फंडाची मुदत जवळ येत जाईल तसे पोर्टफोलिओमधील मालमत्ता वाटप आपोआप बदलेल. थोडक्यात, जी जोखीम कमी करण्याची प्रक्रिया गुंतवणूकदाराने स्वतः करणे अपेक्षित होते, ती या उत्पादनाच्या रचनेतच अंतर्भूत केली आहे.
‘लाइफ सायकल फंड’ कसे काम करतील?
१. मूळ संरचना: प्रत्येक ‘लाइफ सायकल फंड’ एका ठरावीक वर्षाशी जोडलेला असेल, ज्याचा उल्लेख फंडाच्या नावात असणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ, ‘लाइफ सायकल फंड २०४५’ किंवा ‘२०५५’. हे केवळ नाव नसून, गुंतवणूकदार किती काळासाठी गुंतवणूक करण्यास बांधील आहे, याचा तो स्पष्ट संकेत असेल.
- भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या नियमानुसार, हे फंड ५ ते ३० वर्षांच्या कालावधीसाठी, ५ वर्षांच्या फरकाने (उदा. २०२५, २०३०, २०३५) सादर केले जातील.
- स्पष्टता राखण्यासाठी, प्रत्येक फंड घराणे एकाच वेळी जास्तीत जास्त ६ ‘लाइफ सायकल फंड’ चालवू शकेल.
२. ‘ग्लाइड पाथ’: काळानुसार मालमत्तेचे वाटप या फंड गटाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘ग्लाइड पाथ’, म्हणजे एक पूर्वनिर्धारित वेळापत्रक, जे ‘मॅच्युरिटी’चे वर्ष जवळ येईल तशी पोर्टफोलिओमधील जोखीम टप्प्याटप्प्याने कमी करेल.
- सुरुवातीच्या काळात, गुंतवणुकीचा कालावधी मोठा असल्याने ‘इक्विटी’चे (समभाग) प्रमाण जास्त असेल.
- जसजशी मुदत जवळ येईल, तसतसे हे प्रमाण ‘डेट’ (कर्जरोखे) आणि कमी अस्थिरता असलेल्या साधनांकडे वळवले जाईल. शेवटच्या टप्प्यात मुद्दल सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य दिले जाईल.
साधारण आराखडा खालीलप्रमाणे असेल:
‘मॅच्युरिटी’साठी उर्वरित वर्षे समभाग (शेअर्स) कर्जरोखे (डेट) जोखीम श्रेणी
- १५–३० वर्षे जास्त (वाढीवर भर) कमी आक्रमक
- १०–१५ वर्षे तुलनेने जास्त मध्यम वृद्धीक्षम
- ५–१० वर्षे संतुलित संतुलित मध्यम
- ३–५ वर्षे कमी जास्त कमी
- १ वर्षापेक्षा कमी अत्यल्प प्रामुख्याने रोखे भांडवल रक्षण
येथे महत्त्वाचा मुद्दा असा की, हा बदल पूर्वनियोजित असेल, तो निधी व्यवस्थापकाच्या मर्जीवर किंवा बाजार परिस्थितीवर अवलंबून नसेल.
३. बहु-मालमत्ता गुंतवणूक (मल्टी-ॲसेट एक्सपोजर)
समभाग आणि रोख्यांव्यतिरिक्त, ‘लाइफ सायकल फंड’ सोने आणि चांदी ईटीएफ, इन्व्हिट्स आणि मौल्यवान धातूंशी संबंधित ‘कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह्ज’मध्येही गुंतवणूक करू शकतील. या बहु-मालमत्ता रचनेमुळे वैविध्य मिळेल आणि दीर्घकाळात महागाईविरुद्ध संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकेल.
रचनात्मक फायदे: हे उत्पादन काय उत्तम करते?
१. वर्तणूक स्वयंचलन (बिहेव्हियरल ऑटोमेशन): या फंड गटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे फेर-संतुलनाच्या निर्णयातील मानवी हस्तक्षेप काढून टाकणे. गुंतवणूकदार सहसा बाजार तेजीत असताना समभाग गुंतवणूक वाढवतात आणि मंदीत कमी करतात, जे चुकीचे आहे. ‘ग्लाइड पाथ’ याच्या नेमके उलट, म्हणजे शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने जोखीम कमी करण्याचे काम करेल.
२. कर-कार्यक्षम फेर-संतुलन : जर तुम्ही स्वतः पोर्टफोलिओ संतुलित केला आणि नफ्यात असलेले समभाग विकले, तर तुम्हाला भांडवली नफा कर अर्थात ‘कॅपिटल गेन्स टॅक्स’ भरावा लागतो. मात्र, ‘लाइफ सायकल फंडा’मध्ये हे अंतर्गत पातळीवर होत असल्याने गुंतवणूकदाराला उलाढालीवर कर भरावा लागणार नाही. २०-३० वर्षांच्या कालावधीत ही करबचत परताव्यामध्ये मोठी भर टाकू शकेल.
३. सोईस्करपणा: ज्यांना पोर्टफोलिओ व्यवस्थापन अवघड वाटते, त्यांच्यासाठी ही रचना अगदी सोईस्कर ठरेल: एक फंड, एक एसआयपी, एक कालमर्यादा. अनेक योजनांचे निरीक्षण, मालमत्ता-वाटपातील विसंगती शोधणे आणि वेळोवेळी पुनर्संतुलन करणे. हा संपूर्ण बोजा नाहीसा होईल.
मर्यादा आणि गुंतवणूकदारांनी विचारात घ्याव्यात अशा गोष्टी
१. प्रमाणीकरण विरुद्ध वैयक्तीकरण ‘ग्लाइड पाथ’ हे गृहीत धरतो की, गुंतवणुकीचा कालावधी हा मालमत्ता-वाटप ठरवणारा एकमेव घटक आहे. प्रत्यक्षात, एकाच वर्षी निवृत्त होणाऱ्या दोन व्यक्तींची आर्थिक स्थिती पूर्णपणे भिन्न असू शकते (उदा. निवृत्ती निधी, मालमत्ता किंवा इतर उत्पन्न). एक सरसकट नियम सर्वांना लागू पडेलच असे नाही.
२. नियोजनातला एकारलेपणा: आयुष्यात अनेकदा गोष्टी आपण ठरवतो तशाच घडतात असे नाही. निवृत्ती लवकर घ्यावी लागते किंवा नोकरीत मुदतवाढ मिळते. पाल्यांना शिक्षणासाठी प्रवेश पुढेमागे होऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये, एक निश्चित मार्ग गुंतवणूकदाराच्या बदलत्या परिस्थितीशी पूर्णपणे जुळेल असे नाही.
३. पोर्टफोलिओ ‘ओव्हरलॅप’: ज्यांच्याकडे ‘लाइफ सायकल फंडा’सोबत इतरही म्युच्युअल फंड असतील, त्यांना एकूण ‘इक्विटी’ प्रमाणावर लक्ष ठेवावे लागेल. सुरुवातीच्या काळात, जेव्हा ‘लाइफ सायकल फंड’ ७०-९० टक्के ‘इक्विटी’ गुंतवणूक करतात, त्या वेळी अनवधानाने एकूण पोर्टफोलिओमधील जोखीम गरजेपेक्षा जास्त वाढू शकेल.
बांधिलकीचा विरोधाभास आणि भारतीय वास्तव
‘लाइफ सायकल फंड’ संकल्पनेतला सर्वात मोठा विरोधाभास वर्तणुकीशी संबंधित आहे. हे उत्पादन २० ते ३० वर्षांच्या दीर्घकालीन बांधिलकीसाठी बनवले आहे. मात्र, भारतीय गुंतवणूकदारांचा आजवरचा इतिहास वेगळीच कहाणी सांगतो.
- ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात बंद होणाऱ्या ‘एसआयपी’चे नव्या ‘एसआयपी’शी प्रमाण जुलै २०२४ मधील सुमारे ५१ टक्क्यांवरून डिसेंबर २०२४ मध्ये ८२.८ टक्क्यांपर्यंत वाढले आणि मार्च २०२५ मध्ये ते १२८ टक्क्यांपर्यंत पोहोचले. १०० टक्क्यांपेक्षा जास्त ‘रेशो’ म्हणजे नव्याने सुरू होणाऱ्यापेक्षा जास्त ‘एसआयपी’ बंद होत आहेत.
- एसआयपीच्या सरासरी कालावधीबाबत ‘ॲम्फी’ थेट आकडेवारी प्रकाशित करत नाही, पण सरासरी ‘एसआयपी’ दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत, असा अंदाज केला जातो. ‘लाइफ सायकल फंड’ पाच ते तीस वर्षांसाठी तयार केलेले असताना, हे अंतर काळजी करण्यासारखे आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने ‘२०५५’चा फंड निवडला, पण बाजारातील चढ-उतार पाहून ४-५ वर्षांतच पैसे काढले, तर या उत्पादनाचा फायदा त्याला मिळणार नाही. गुंतवणूकदार जर शेवटपर्यंत टिकून राहिला तरच ‘ग्लाइड पाथ’ त्याच्यासाठी यशस्वी ठरू शकेल.
लाइफ सायकल फंडांचा कोणी विचार करावा आणि कोणी करण्याची गरज नाही
यांच्यासाठी योग्य:
- स्पष्ट दीर्घकालीन ध्येय असलेले तरुण गुंतवणूकदार, विशेषतः जे आर्थिक सल्लागाराशिवाय गुंतवणूक करतात.
- स्वयं-निर्देशित गुंतवणूकदार जे आपल्या स्वतःच्या वर्तणूक पूर्वग्रहांना ओळखतात आणि ज्यांना एक शिस्तबद्ध यंत्रणा हवी आहे.
- पहिल्यांदाच गुंतवणूक विश्वात प्रवेश करणारे गुंतवणूकदार जे साधेपणा आणि रचना शोधत आहेत.
- गुंतवणूकदार ज्यांना एकाच साधनात दीर्घकालीन, स्वयंचलित, कर-कार्यक्षम बहु-ॲसेट गुंतवणूक हवी आहे.
यांना टाळता येईल:
- जे आधीच सक्षम आर्थिक सल्लागारासोबत काम करत आहेत.
- ज्यांची अनेक आणि गुंतागुंतीची आर्थिक ध्येये आहेत.
- ज्यांचा पोर्टफोलिओ खूप मोठा आहे आणि ज्यांना एकात्मिक व्यवस्थापनाची गरज आहे.
- ज्यांचा कालावधी १० वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांना यातील ‘ग्लाइड पाथ’चा पूर्ण लाभ घेता येणार नाही.
लाइफ सायकल फंड हे ‘गुंतवणूक करा आणि विसरून जा’ या धोरणासाठी एक उत्तम साधन ठरू शकतात. पण अट एकच, तुमची विसरून जाण्याची तयारी आणि तशी गरज असायला हवी.
