-केदार पत्की
Understand the core Life Insurance Benefits and actionable Financial Planning Tips: भारताच्या विकासाची नवी गोष्ट आता केवळ महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. निमशहरी भागांमध्येही कुटुंबे अधिक चांगल्या भविष्यासाठी धडपड करत आहेत. पालक आपल्या मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी गुंतवणूक करत आहेत, स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकारत आहेत, कौटुंबिक व्यवसाय आणि मागच्या पिढ्यांनी ज्याची केवळ स्वप्नं पाहिली अशा संधी मिळाल्यावर त्या प्रत्यक्ष साकारण्यासाठी झटत आहेत. आर्थिक प्रगतीमुळे महत्त्वाकांक्षा वाढल्या असल्या, तरी त्याचबरोबर आर्थिक जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत.
या स्वप्नांच्या पाठीमागे एक वास्तव दडलेले असते. बहुतेक वेळा संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी एका व्यक्तीच्या खांद्यावर असते. तो शिक्षक असो, व्यापारी, शेतकरी, वाहतूक व्यावसायिक, लघुउद्योजक किंवा पगारदार कर्मचारी; दैनंदिन खर्च भागवण्याबरोबरच कुटुंबाच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी निधी उभारण्याची जबाबदारी अनेकदा त्याच एका व्यक्तीवर असते.
मोठ्या शहरांच्या तुलनेत लहान शहरांमधील राहणीमानाचा खर्च कमी असू शकतो; मात्र आर्थिक असुरक्षितता तेवढीच गंभीर असते. एखादी वैद्यकीय आणीबाणी, दीर्घकालीन आजार, अपंगत्व, अपघात किंवा कुटुंबाच्या प्रमुख कमावत्या व्यक्तीचे अकाली निधन, या घटनांमुळे अनेक वर्षांची आर्थिक नियोजनाची मेहनत एका क्षणात मातीमोल होऊ शकते. अनेकदा एकच प्रतिकूल घटना दशकानुदशके साठवलेली बचत संपवू शकते आणि भविष्यातील स्वप्नांना धक्का देऊ शकते.
आरोग्यसेवा हे त्याचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. वैद्यकीय सुविधांची उपलब्धता वाढली असली तरी गंभीर आजारांच्या उपचारांसाठी अनेकदा मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. रुग्णालयाचा खर्च, औषधे, तपासण्या, प्रवास तसेच सोबत असलेल्या कुटुंबीयांच्या राहण्याचा खर्च यामुळे घरगुती अर्थकारणावर मोठा ताण येतो. आरोग्याशी संबंधित आव्हान काही काळातच आर्थिक संकटात रूपांतरित होऊ शकते. याचवेळी शिक्षणाबाबतच्या अपेक्षाही झपाट्याने वाढत आहेत. छोट्या शहरांमधील पालक आपल्या मुलांना पूर्वी सहज उपलब्ध नसलेल्या संधी मिळाव्यात यासाठी कटिबद्ध आहेत. व्यावसायिक शिक्षण, कौशल्यविकास कार्यक्रम, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन किंवा उच्च शिक्षण या सर्व गोष्टींसाठी सातत्यपूर्ण आर्थिक पाठबळ आवश्यक असते. घरातील उत्पन्नात खंड पडला की सर्वप्रथम पुढील पिढीची स्वप्ने धोक्यात येतात.
पारंपरिकरित्या भारतीय कुटुंबे कठीण काळात नातेवाईक, मित्र आणि समाजाच्या आधारावर उभी राहत आली आहेत. भावनिक आणि आर्थिक मदतीसाठी आप्तस्वकीय नेहमीच पुढे सरसावत आले आहेत. ही सामाजिक बांधिलकी आजही भारताची मोठी ताकद आहे. मात्र बदलत्या कौटुंबिक रचनेमुळे या अनौपचारिक आधारव्यवस्थेवर ताण वाढत आहे. लहान कुटुंबांची संख्या वाढत आहे, स्थलांतरामुळे कुटुंबातील सदस्य विविध शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये विखुरले आहेत, तसेच वाढत्या खर्चामुळे मदत करण्याची इच्छा असूनही अनेक नातेवाईक आर्थिक मदत करू शकत नाहीत.
एक उदाहरण घेऊयात. उद्गीर हे तसे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरचे छोटे शहर. तिथेच एका खासगी अनुदानित शाळेत शिक्षक रमेश पाटील काम करत. पाटील गुरुजी त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांची पत्नी घर सांभाळत असे. तर दोन मुले शिक्षण घेत होती. सगळे ठीक चालले होते. अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय समस्येमुळे त्यांची दृष्टी कायमची गेली आणि त्यांना नोकरी सोडावी लागली. अचानक उद्धभवलेल्या या घरातील उत्पन्नात मोठी घट झाली.
घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय खर्च सुरूच होते; पण उत्पन्नाचा स्रोत बंद झाला होता. अशा वेळी रमेश यांनी काही वर्षांपूर्वी घेतलेल्या अपंगत्व लाभ (डिसॅबिलिटी रायडर) असलेल्या जीवन विमा पॉलिसीने मोठा आधार दिला. पॉलिसीमधून मिळालेल्या लाभामुळे थांबलेल्या उत्पन्नाची काही प्रमाणात भरपाई झाली. मुलांचे शिक्षण अखंड सुरू राहिले, आवश्यक खर्च भागवता आला आणि बचत संपवण्याची किंवा नातेवाईकांवर अवलंबून राहण्याची वेळ आली नाही. पाटील कुटुंबासाठी ही पॉलिसी केवळ आर्थिक मदत नव्हती; ती त्यांचा आत्मविश्वास, स्वाभिमान आणि पुढे जाण्याची क्षमता जपणारी ठरली.
आणखी एक उदाहरण नाशिकमधील स्नेहल कुलकर्णी (नाव बदलले आहे) यांचे उदाहरण यासाठी बोलके ठरते. टियर-२ शहरांतील अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांप्रमाणे त्या आणि त्यांचे पती खासगी क्षेत्रात नोकरी करत होते. उत्पन्न स्थिर असले तरी एक प्रश्न त्यांना सतावत होता.
नियमित पगार थांबल्यानंतर आर्थिक सुरक्षितता कशी टिकवायची?
आर्थिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहल यांनी दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरू केली. मात्र कालांतराने त्यांना जाणवले की, केवळ गुंतवणूक करून निवृत्तीसाठी निधी तयार होईल, परंतु भविष्यासाठी अधिक निश्चितता आणि संरक्षण आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी गुंतवणुकीबरोबरच पेन्शन योजनेचाही अवलंब केला. आज स्नेहल निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत अधिक आत्मविश्वासाने विचार करू शकतात. आर्थिक स्वावलंबन टिकवून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाचा जीवनमान कायम राखण्यासाठी त्यांनी योग्य पावले उचलल्याची त्यांना खात्री आहे.
जीवन विमा म्हणजे केवळ मृत्यूनंतर मिळणारी आर्थिक भरपाई, अशी सर्वसाधारण समजूत असते. प्रत्यक्षात त्याची भूमिका यापेक्षा खूप व्यापक आहे. जीवन विम्याचा मूलभूत उद्देश म्हणजे आर्थिक सातत्याचे संरक्षण करणे. अनपेक्षित संकट आले तरी कुटुंबाचा आर्थिक प्रवास थांबू नये, याची तो खात्री देतो.
निमशहरी भागातील कुटुंबांसाठी जीवन विमा हे केवळ एक आर्थिक साधन नाही; तर तो स्वाभिमान, स्थैर्य आणि स्वप्नांचे संरक्षण करण्याचे प्रभावी माध्यम आहे. आयुष्यातील अनिश्चिततेला अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची ताकद कुटुंबांना देतो.
आर्थिक साक्षरता वाढत असताना जीवन विमा आर्थिक लवचिकतेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे. बचत आणि गुंतवणूक कुटुंबांना संपत्ती निर्माण करण्यास मदत करतात; तर संरक्षणात्मक साधने त्या संपत्तीचे जतन करतात. या दोन्हींच्या संगमातून दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेचा पाया मजबूत होतो. अखेरीस, जीवन विमा हा केवळ जीवनाचे संरक्षण करणारा करार नाही. तो स्वप्नांचे रक्षण करणारा, स्वाभिमान जपणारा आणि भविष्यास सुरक्षित करणारा विश्वास आहे.
लेखक इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्सचे मुख्य महसूल अधिकारी आहेत.
