Loan Against Property Risk Comparison : सध्याच्या काळात कधी आणि कशी पैशांची गरज भासेल, हे सांगता येत नाही. ही वेळ येऊ नये यासाठी अनेकजण आता आपात्कालीन निधी तयार करत आहेत. मात्र, प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. अशावेळी अचानक एखादं आर्थिक संकट आलं तर बहुतेक लोक स्वतःचे घर किंवा मालमत्ता तारण ठेवून कर्ज घेतात. पण, प्रॉपर्टीवर कर्ज घेण्याचा हा निर्णय खरंच फायदेशीर ठरतो का? की यामुळे तुमच्या मालकीच्या मालमत्तेवर संकट येऊ शकतं? चला तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
बँकेकडे सुरक्षितता, पण तुमच्यासाठी जोखीम?
प्रत्येक मोठा आर्थिक निर्णय घेताना त्याची चांगली आणि वाईट दोन्ही बाजू तपासणे आवश्यक आहे. कारण, एक चुकीचं पाऊल तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात ढकलू शकते. बँकेकडे जेव्हा तुम्ही तुमची मालमत्ता तारण ठेवून कर्ज घेता. तेव्हा बँकेची जोखीम कमी होते. म्हणूनच तारण कर्ज हे पर्सनल लोनच्या तुलनेत कमी व्याजाने मिळते. बहुतेक लोक यामुळेच हा पर्याय वापरतात. मात्र, या नाण्याला दुसरी बाजूही आहे. जर तुम्ही वेळेवर हप्ता (ईएमआय) भरू शकला नाहीत किंवा कर्जाची परतफेड करता आली नाही, तर बँक तुमची तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करू शकते.
प्रॉपर्टीवर कधी कर्ज घ्यावं?
आता तुम्ही म्हणाल प्रॉपर्टीवर कर्ज घेऊ नये का? तर काही परिस्थितीत नक्कीच या पर्यायाचा वापर करू शकता. जेव्हा तुम्हाला मोठ्या रकमेची गरज असते (उदा. मुलांचे उच्च शिक्षण, मोठा व्यवसाय किंवा वैद्यकीय आणीबाणी), तेव्हा हा पर्याय योग्य ठरतो. हे कर्ज दीर्घ कालावधीसाठी (उदा. १० ते १५ वर्षे) मिळत असल्याने महिन्याचा ईएमआय कमी बसतो. पण, लक्षात ठेवा तुमच्या कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल, तितके जास्त व्याज तुम्हाला एकूण कालावधीत भरावे लागते.
प्रॉपर्टीवर कर्ज घ्यावे की नाही? तज्ज्ञांचा सल्ला काय?
- तुमची गरज छोटी असेल किंवा कमी कालावधीसाठी असेल, तर थोडे जास्त व्याज देऊन पर्सनल लोन घेणे योग्य आहे. अशावेळी मालमत्ता तारण ठेऊन जोखीम घेऊ नये.
- कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यापूर्वी दोन्ही कर्जांचे व्याजदर, प्रोसेसिंग फी, लिगल चार्जेस आणि प्री-पेमेंटच्या अटींची सविस्तर तुलना करा.
- केवळ अतिशय महत्त्वाच्या आणि अनिवार्य कामांसाठीच कर्ज घ्या. फिरणे, शॉपिंग करणे किंवा मौजमजेसाठी कधीही प्रॉपर्टी तारण ठेवून कर्ज घेऊ नका.
- आपलं घर किंवा प्रॉपर्टी ही आपल्या आयुष्यभराची कमाई असते, त्यामुळे मालमत्ता तारण ठेवताना या सर्व गोष्टींचा विचार करुनच निर्णय घ्यावा.
