भूषण पडकील
आजच्या वेगवान जगात कर्ज दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले आहे. नवीन मोबाईल घेणे असो, अचानक प्रवासाची योजना आखणे असो किंवा स्वतःमध्ये गुंतवणूक करणे असो. अगदी काही तासात मिळणाऱ्या कर्जामुळे अनेक गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य मिळते. पण आपण खर्च कसा आणि का करतो, यामागील खरी प्रेरणा काय असते?
आपल्या भावना, सवयी आणि आर्थिक निर्णयांच्या पद्धती विशेषतः कर्जाचा वापर आणि त्याची परतफेड यांचा अभ्यास केल्यास अधिक योग्य निर्णय घेता येतात. हे केवळ आकडे व्यवस्थापित करण्याबद्दल नसून पैशांसोबत निरोगी नाते निर्माण करण्याबद्दल आहे, जे इच्छित जीवनशैलीकडे नेऊ शकते.
तात्काळ समाधानाची भावना आणि कर्जाचा वापर
कर्जामुळे खर्च करण्याचा अनुभव अनेकदा बदलतो. खरेदीच्या क्षणात आणि प्रत्यक्ष पैसे खर्च होण्याच्या क्षणात एक अंतर निर्माण होते. ‘कार्ड स्वाइप’ करणे सोपे आणि जलद असल्याने व्यवहार सहज वाटतो. मात्र, खरेदी आणि देयक यातील हे अंतर काहीवेळा आपल्याला त्याक्षणी अत्यावश्यक नसलेल्या वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त करू शकते आणि पैसा न कळत खर्च होतो.
दिवसभराच्या ताणानंतर स्वतःला एखादी छोटीशी भेट देणे, छान जेवण करणे किंवा काहीतरी खरेदी करणे, याला अनेकदा ‘रिटेल थेरपी’ असे म्हणतात. हे क्षणिक समाधान देणारे असले तरी अशा सवयी वारंवार झाल्यास कर्जाची रक्कम हळूहळू वाढू शकते आणि पुढे अधिक नियोजनाची गरज भासू शकते.
पूर्वग्रह आणि कर्जवर्तन
आपले आर्थिक निर्णय अनेकदा संज्ञानात्मक पूर्वग्रहांमुळे प्रभावित होतात. हे सूक्ष्म मानसिक गोष्टी आपल्या विचारसरणीवर परिणाम करतात, विशेषतः कर्ज वापरताना. वर्तमान पूर्वग्रह तात्काळ समाधानाकडे आकर्षित करतो आणि दीर्घकालीन परिणामांकडे दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे आजची खरेदी भविष्यातील आर्थिक परिणाम न विचारता केली जाते.
‘अँकरिंग’ पूर्वग्रह तेव्हा दिसून येतो, जेव्हा आपण क्रेडिट कार्डवरील किमान देय रकमेवर लक्ष केंद्रित करतो. फक्त किमान रक्कम भरल्याने आपल्याला आर्थिक व्यवस्थापन योग्य वाटू शकते, पण त्यामुळे एकूण थकबाकी कमी होण्याचा वेग खूपच मंद राहतो. ‘बोनस’ मिळेल किंवा पुढील पगारातून सहज परतफेड करता येईल, अशी अपेक्षा आपण ठेवतो. यामुळे प्रत्यक्ष परतफेडीसाठी लागणारा कालावधी वाढू शकतो. मात्र आपल्याला लवकर कर्ज परतफेड भरण्याची जाणीव असल्यास अधिक जबाबदारीने कर्जाचा वापर करू शकतो आणि दीर्घकालीन आर्थिक सवयी मजबूत करू शकतो.
सुज्ञपणे कर्जाचा वापर
कर्ज योग्य प्रकारे वापरले तर ते एक प्रभावी आर्थिक साधन ठरू शकते. घर किंवा वाहन खरेदीसारखी मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ते मदत करू शकते. जबाबदारीने कर्ज वापरल्यास ‘सिबिल स्कोअर’ मजबूत होतो, ज्यामुळे भविष्यात अधिक चांगल्या कर्जदरांची आणि संधींची दारे उघडतात. जबाबदार कर्जवापर म्हणजे नियोजन. ठराविक ‘बजेट’ पाळणे, देयके वेळेवर भरणे आणि अनावश्यक खरेदी टाळणे. प्रत्येक खरेदी आपल्या आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. योग्य दृष्टिकोन ठेवल्यास कर्ज हे केवळ व्यवहाराचे साधन राहत नाही, तर दीर्घकालीन आर्थिक प्रगतीचा मार्ग बनते.
आर्थिक मनोवृत्तीवर प्रभुत्व
- भावनिक खर्चावर नियंत्रण मिळवणे कठीण वाटू शकते, परंतु योग्य मनोवृत्तीने ते शक्य आहे. पहिला टप्पा म्हणजे आत्मजागरूकता. कोणत्या भावना किंवा परिस्थितीमुळे अनियोजित खर्च होतो, हे ओळखणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तणावामुळे जास्त खर्च होत असेल तर व्यायाम, ध्यान किंवा इतर सकारात्मक पर्याय निवडणे उपयोगी ठरू शकते.
- स्पष्ट आर्थिक उद्दिष्टे निश्चित करणे देखील महत्त्वाचे आहे. कर्जफेड, स्वप्नातील प्रवासासाठी बचत किंवा आपत्कालीन निधी उभारणे. उद्दिष्ट स्पष्ट असल्यास निर्णय अधिक विचारपूर्वक घेतले जातात.
- आपत्कालीन निधी तयार ठेवल्यास अनपेक्षित खर्चासाठी पुन्हा कर्ज घ्यावे लागत नाही. जर थकबाकी असेल, तर शक्य तितकी किमान रकमेपेक्षा अधिक भरल्यास व्याजाचा भार कमी होतो आणि कर्ज लवकर फेडता येते.
- जाणीवपूर्वक खर्च, कर्जाची योग्य समज आणि शिस्तबद्ध सवयी यामुळे कर्जाच्या चक्रातून बाहेर पडू शकतो. कर्ज समस्यांपासून सुटका करण्याचे साधन नसून उद्दिष्टे साध्य करण्याचे माध्यम बनू शकते. अशा प्रकारे आपण आत्मविश्वास आणि स्पष्टतेसह आर्थिक भविष्यातील नियंत्रण आपल्या हातात ठेवू शकतो.
लेखक ट्रान्सयुनियन सिबिलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.

