गौरव मुठे
Long Put Option Strategy Marathi :
शेअर बाजारात तेजी असताना नफा कमवणारे अनेक असतात, पण खरा हुशार ट्रेडर बाजार कोसळत असतानाही सुरक्षितपणे मोठा नफा कमावतो. बाजारात नेहमीच तेजी राहील असे नाही. अनेकदा जागतिक घडामोडी, कंपन्यांची असमाधानकारक आर्थिक आकडेवारी किंवा नकारात्मक वृत्त यामुळे बाजारात मोठी घसरण किंवा मंदीची शक्यता निर्माण होते. अशा वेळी सामान्य गुंतवणूकदारांना नुकसान सोसावे लागते, मात्र ऑप्शन ट्रेडर मात्र ‘लाँग पुट ऑप्शन्स’ (Long Put Option) स्ट्रॅटेजीचा वापर करून या मंदीला नफ्याच्या परिस्थितीत बदलतात.

लाँग पुट म्हणजे सोप्या भाषेत – कमीत कमी जोखीम (मर्यादित नुकसान) घेऊन बाजारातील घसरणीचा पुरेपूर फायदा घेणे. ही स्ट्रॅटेजी ‘लाँग कॉल ऑप्शन’च्या अगदी विरुद्ध काम करते. तेजीच्या बाजारात जसा ‘कॉल’ (Call) खरेदी केला जातो, अगदी तसेच जेव्हा निफ्टी किंवा एखादा शेअर वेगाने खाली पडणार असा अंदाज असतो, तेव्हा ‘पुट’ (Put) ऑप्शन खरेदी केला जातो.

म्हणजेच शेअर बाजारात ज्यावेळी मंदीची परिस्थिती असेल किंवा मंदी येणार असेल त्यावेळी लाँग पुट ऑप्शन स्ट्रॅटेजी केले जाते. समजा, निफ्टी निर्देशांक ८१४३.४० पातळीवर आहे. आता आपण ८२०० स्ट्राईक प्राईसला १४१.५० रुपये प्रिमियम देऊन पुट ऑप्शन खरेदी करायचा आहे. पुट ऑप्शन खरेदीसाठी आपण येथे प्रिमियम दिला आहे.

स्ट्राईक प्राईस ८२००
प्रिमियम १४१.५
A B C D = A B C
निफ्टी समाप्ती वेळी (Nifty at Expiry) करार अधिमूल्य (A) (Premium Paid) निफ्टीची खरेदी (B) (Buy Nifty at) निफ्टीची विक्री (C) (Sell Nifty at) नफानुकसान (A B C) (Net Payoff)
७८०० -१४१.५ -७८०० ८२०० २५८.५ (नफा)

७८५० -१४१.५ -७८५० ८२०० २०८.५ (नफा)
७९०० -१४१.५ -७९०० ८२०० १५८.५ (नफा)

७९५० -१४१.५ -७९५० ८२०० १०८.५ (नफा)
८००० -१४१.५ -८००० ८२०० ५८.५ (नफा)

८०५० -१४१.५ -८०५० ८२०० ८.५ (नफा)
८१०० -१४१.५ -८१०० ८२०० -४१.५ (तोटा)

८१५० -१४१.५ -८१५० ८२०० -९१.५ (तोटा)
८२०० -१४१.५ -८२०० ८२०० -१४१.५ (मॅक्स लॉस)

८२५० -१४१.५ -८२५० ८२५० -१४१.५ (मॅक्स लॉस)
८३०० -१४१.५ -८३०० ८३०० -१४१.५ (मॅक्स लॉस)

८४०० -१४१.५ -८४०० ८४०० -१४१.५ (मॅक्स लॉस)

वरील तक्त्यात दिसत असल्याप्रमाणे ८२०० या स्ट्राईक प्राईसला पुट ऑप्शनची खरेदी केली होती. त्यासाठी १४१.५ अधिमूल्य दिले होते. म्हणजे ८२०० – १४१.५० = ८०५८.५० हा आपला ब्रेक इव्हन (ना नफा-ना तोटा बिंदू) आहे. म्हणजे निफ्टी निर्देशांक या पातळीखाली घसरल्यास आपल्याला नफा होईल. मात्र निफ्टीच्या पातळीत किती जरी वाढ झाली तरी होणारे नुकसान मर्यादित असेल. निफ्टी निर्देशांक ८३०० किंवा ८४०० झाला तरी आपले होणारे नुकसान आपण जेवढा प्रिमियम पुट ऑप्शन खरेदी वेळी दिला आहे तेवढाच असेल. मात्र निफ्टी निर्देशांक जेवढा कमी होत जाईल तेवढा नफा वाढत जाईल. लाँग पुट ऑप्शन हे लाँग कॉल ऑप्शनच्या अगदी विरुध्द आहे. आपण आधीच बघितले की तेजीच्या परिस्थितीत लाँग कॉल ऑप्शन वापरतात. त्यात निफ्टी निर्देशांकात जेवढी वाढ होईल तेवढा नफा वाढत जातो. मात्र उलट लाँग पुट ऑप्शन मंदीच्या परिस्थितीत केले जाते, निफ्टी निर्देशांकात जेवढी घसरण होत जाईल तेवढा नफा वाढत जाईल. वरील तक्त्यामध्ये निफ्टी निर्देशांक ८०५० पातळीपासून ८०००, ७९५० जसजशी कमी होत जाते तसतसा नफा वाढत गेल्याचे दिसते आहे.

लाँग पुट हा मंदीच्या काळातील विम्यासारखी आहे, जो तुमच्या पोर्टफोलिओचे रक्षण तर करतोच, शिवाय घसरणाऱ्या बाजारात नफा कमावण्याची संधीही देतो. यामध्ये तोटा मर्यादित आणि नफा अमर्याद होत असल्यामुळे नवीन गुंतवणूकदारांसाठीही ही एक सुरक्षित स्ट्रॅटेजी मानली जाते. पोर्टफोलिओ हेजिंग स्ट्रॅटेजी म्हणून सुद्धा ओळखली जाते, जर तुमच्याकडे पोर्टफोलिओमध्ये एखाद्या कंपनीचे भरपूर समभाग पडून आहेत आणि बाजारात पडझड होण्याची भीती वाटत असेल, तर अशावेळी आपल्या पोर्टफोलिओचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षितता म्हणून लाँग पुट स्ट्रॅटेजी केली जाऊ शकते.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.