Long Put Option Strategy Marathi : सध्या शेअर बाजारात मंदीचे वातावरण असून अनिश्चिततेच्या काळात गुंतवणुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरते. बाजारात मंदीचा कल असतानाही नफा कमावता यावा यासाठी अनेक स्ट्रॅटेजी वापरल्या जातात; या शृंखलेत आपण अशाच तेजी-मंदी काळात करता येणाऱ्या विविध स्ट्रॅटेजी अभ्यास करणार असून, त्याची सुरुवात ‘लॉन्ग पुट’ स्ट्रॅटेजीने करत आहोत.

शेअर बाजारात तेजीच्या काळात शेअर किंवा निर्देशांक खरेदी करून नफा मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र बाजारात घसरण होण्याची शक्यता वाटत असेल, तर ऑप्शन ट्रेडिंगमधील लॉन्ग पुट स्ट्रॅटेजी गुंतवणूकदारासाठी उपयुक्त ठरू शकते. या स्ट्रॅटेजीमध्ये बाजार खाली गेल्यास नफा मिळवता येतो. विशेष म्हणजे, पुट ऑप्शन खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदाराचा कमाल तोटा आधीच निश्चित असतो, तो म्हणजे भरलेला प्रीमियम.

लॉन्ग पुट म्हणजे नेमके काय?

लॉन्ग पुट म्हणजे एखाद्या शेअरचा किंवा निर्देशांकाचा पुट ऑप्शन्स खरेदी करणे. एखाद्या गुंतवणूकदाराला एखाद्या शेअरमध्ये किंवा निफ्टीमध्ये घसरण होण्याची शक्यता वाटत असेल, तर तो ठरावीक स्ट्राईक प्राईसचा पुट ऑप्शन खरेदी करू शकतो.
पुट ऑप्शन्स खरेदी केल्यानंतर बाजार अपेक्षेप्रमाणे खाली गेला, तर त्या पुटची किंमत वाढू शकते आणि तो विकून नफा मिळवता येतो. उलट बाजार खाली न जाता वर गेला किंवा अपेक्षेइतका खाली आला नाही, तर पुटचे मूल्य कमी होऊ शकते आणि भरलेला प्रीमियम गमावण्याची शक्यता असते. म्हणूनच ‘बाजार पडेल’ एवढेच पुरेसे नाही; बाजार किती पडतो आणि ऑप्शन्सची मुदत किती शिल्लक आहे, हेही महत्त्वाचे ठरते.

ही स्ट्रॅटेजी कधी वापरायची?

बाजाराचा कल मंदीकडे असल्याचे वाटत असेल, तेव्हा लॉन्ग पुटचा विचार करता येतो. उदाहरणार्थ, निफ्टी किंवा एखाद्या शेअरचा महत्त्वाचा आधार (सपोर्ट) तुटण्याची शक्यता असेल किंवा बाजारातील काही संकेतावरून मोठी घसरण होण्याची शक्यता वाटत असेल, तर पुट खरेदी करता येतो.

ही स्ट्रॅटेजी दोन प्रकारे वापरता येऊ शकते:

पहिला मार्ग: निफ्टी किंवा एखादा शेअर खाली जाईल असा अंदाज असल्यास पुट खरेदी करून घसरणीतून नफा मिळवण्याचा प्रयत्न करता येतो.
दुसरा मार्ग: एखाद्या गुंतवणूकदाराकडे मोठ्या प्रमाणात शेअर असतील आणि बाजारात अल्पकालीन घसरणीची भीती असेल, तर पुट ऑप्शन काही प्रमाणात ‘हेजिंग’साठी वापरता येतो.

निफ्टी २६,००० वर असताना लॉन्ग पुटचे उदाहरण

समजा, निफ्टी सध्या २६,००० च्या आसपास आहे. बाजारातील काही संकेत पाहता पुढील काही काळात निफ्टीमध्ये घसरण होऊ शकते, असा गुंतवणूकदाराचा अंदाज आहे. निफ्टी २६,००० च्या खाली जाऊन २५,५०० किंवा त्यापेक्षाही खाली येऊ शकतो, असे त्याला वाटते.
अशा परिस्थितीत गुंतवणूकदार २६,००० स्ट्राइकचा पुट ऑप्शन खरेदी करू शकतो.
समजा, या पुट ऑप्शनचे प्रीमियम २०० रुपये आहे. निफ्टीच्या एका लॉटमध्ये ६५ युनिट आहेत असे गृहीत धरल्यास पुट खरेदीसाठी लागणारी रक्कम:
२०० × ६५ = ₹१३,०००
म्हणजे या व्यवहारात गुंतवणूकदाराची कमाल जोखीम १३,००० रुपये आहे. निफ्टी कितीही वर गेला तरी, करार मुदत समाप्तीपर्यंत (एक्स्पायरी) पुट ठेवला आणि तो मूल्यहीन झाला, तर जास्तीत जास्त १३,००० रुपयांचेच नुकसान होऊ शकते.

निफ्टी किती खाली गेला तर किती नफा?

एक्स्पायरीच्या वेळी निफ्टीपुटचे मूल्य प्रति युनिट निव्वळ नफाएकूण नफा/तोटा
२५,५००₹५००₹३००₹१९,५०० नफा
२५,०००₹१,०००₹८००₹५२,००० नफा
२४,५००₹१,५००₹१,३००₹८४,५०० नफा
२४,००० ₹२,०००₹१,८००₹१,१७,००० नफा
२६,०००₹० -₹२००₹१३,००० तोटा
२६,५०० ₹०-₹२००₹१३,००० तोटा
२७,०००₹०-₹२००₹१३,००० तोटा

ब्रेक-इव्हन कुठे?

लॉन्ग पुटचा ब्रेक-इव्हन काढण्याचे सूत्र:

  • ब्रेक-इव्हन = स्ट्राईक प्राईस – प्रीमियम म्हणजेच, येथे २६,००० − २०० = २५,८००. त्यामुळे निफ्टी एक्स्पायरीच्या वेळी २५,८०० च्या खाली गेला तरच निव्वळ नफा सुरू होतो.
  • उदाहरणार्थ, निफ्टी २५,५०० वर आला तर २६,००० पुटचे ‘इंट्रिन्सिक व्हॅल्यू’ ५०० रुपये असेल. गुंतवणूकदाराने मात्र २०० रुपये प्रीमियम दिलेले असल्याने निव्वळ फायदा: ५०० − २०० = ३०० प्रति युनिट. येथे लॉट ६५ चा असल्याने ३०० × ६५ = ₹१९,५०० नफा.

बाजाराचा अंदाज चुकला तर?

समजा निफ्टी २६,००० वरून खाली जाण्याऐवजी २७,००० वर पोहोचला. अशा वेळी पुट ऑप्शन आऊट ऑफ द मनी होईल. एक्स्पायरीला त्याचे मूल्य शून्य झाल्यास गुंतवणूकदाराने भरलेले संपूर्ण १३,००० रुपये प्रीमियम गमावले जाऊ शकते. यामुळे लॉन्ग पुटमध्ये तोटा मर्यादित असला तरी तोटा होण्याची शक्यता पूर्णपणे टाळता येत नाही.

लॉन्ग पुटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य काय?

या स्ट्रॅटेजीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तोटा मर्यादित असतो. निफ्टी कितीही वर गेला तरी पुट खरेदीदाराचा कमाल तोटा भरलेल्या प्रीमियमपुरताच मर्यादित राहतो. दुसरीकडे, बाजारात मोठी घसरण झाल्यास पुटमधील नफ्याची क्षमता मोठी असू शकते. मात्र याचा अर्थ लॉन्ग पुट ही पूर्णपणे जोखीममुक्त किंवा हमखास नफा देणारी स्ट्रॅटेजी आहे, असा होत नाही; प्रीमियम पूर्णपणे गमावण्याची शक्यता प्रत्यक्षात असते.