सध्याच्या युद्धजन्य वातावरणात ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड दोन प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय आहे. पहिल्या प्रकारचे गुंतवणूकदार ज्यांनी नव्याने गुंतवणुकीला सुरुवात केली आहे आणि दुसऱ्या प्रकारचे गुंतवणूकदार ज्यांना निवृत्त होण्यास अद्याप एक-दोन वर्ष शिल्लक आहेत आणि निवृत्तीपश्चात जे आपला पोर्टफोलिओ जास्त जोखमीच्या गुंतवणुका टाळून अधिक सुरक्षित पर्यायांकडे वळवू इच्छितात. जर तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या जगात नवीन असाल, तर समभाग गुंतवणूक करणे आव्हानात्मक वाटू शकते.

उच्च परताव्याचे आकर्षण टाळता येत नाही आणि अस्थिरता सहन होत नाही. त्यामुळे असा चुकीचा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो की, तुम्ही गूगलच्या मदतीने तुमची गुंतवणूक व्यवस्थापित करू शकता. याचा अर्थ असा नाही की नवीन गुंतवणूकदारांनी समभाग गुंतवणुकीपासून दूर राहावे. मात्र सावधगिरीने आणि आपल्या जोखीम सहिष्णुतेच्या क्षमतेबद्दल जागरूक राहून पाऊल उचलल्यास असे प्रसंग टाळता येतात, जिथे तुम्ही योग्य वेळी योग्य प्रकारे कृती करू न शकल्यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होते. भांडवली बाजारातील चढघट अत्यंत संवेदनशील असते. अनुभवी गुंतवणूकदारसुद्धा प्रत्येक वेळी बाजाराचा अचूक अंदाज लावू शकत नाहीत. जर तुम्ही अजूनही गुंतवणुकीचे व्यवस्थापन कसे करायचे हे शिकत असाल, तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हायब्रिड फंडांपासून सुरुवात करणे हा एक शहाणपणाचा दृष्टिकोन असू शकतो आणि त्यासाठी एक मार्ग म्हणजे ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडांमध्ये गुंतवणूक करणे. हे फंड अनुभवी तसेच नवशिक्या गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या फंडांपैकी एक म्हणजे महिंद्रा मनूलाइफ ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड. फंडाने स्थापनेपासून म्हणजे २३ जुलै २०१९ पासून वार्षिक १४.५८ टक्के दराने परतावा दिला आहे. सेबीच्या ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून एकूण मालमत्तेपैकी ६५ ते ८० टक्के समभाग गुंतवणूक आणि उर्वरित भाग रोख्यांत गुंतविला जातो. समभाग आणि रोखे यांचे वाटप समष्टी अर्थशास्त्राच्या निर्देशनानुसार सुनिश्चित होते. गेल्या पाच वर्षांत, बाजाराच्या परिस्थितीनुसार समभाग गुंतवणूक ६३ ते ७२ टक्क्यांच्या दरम्यान राहिली आहे.

या फंडाच्या समभाग गुंतवणुकीची जबाबदारी फातिमा पाचा, मनीष लोढा आणि कीर्ती दळवी यांच्याकडे तर रोखे गुंतवणुकीची धुरा राहुल पाल आणि अमित गर्ग यांच्याकडे आहे. समभाग गुंतवणूक असलेला पोर्टफोलिओ मल्टिकॅप धाटणीचा आहे. गुंतवणुकीत फंड वाजवी मूल्यांकन असलेल्या आणि सुदृढ ताळेबंद असलेल्या कंपन्या खरेदी करतात. हा फंड ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ रणनीतीचा अवलंब करतो. याव्यतिरिक्त, समष्टी अर्थशास्त्रानुसार अवलंबून असणारी उद्योग क्षेत्रे ओळखून त्या उद्योग क्षेत्रात मानदंड सापेक्ष कमी-अधिक गुंतवणूक करतो.

समभाग रणनीती

फंडाने सुरुवातीला म्हणजे २०१९ आणि २०२० मध्ये या फंडाने दूरसंचार (टेलिकॉम), विद्युत निर्मिती, धातू आणि खनिकर्म, तेल आणि वायू आणि अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली होती. सध्या फंडाच्या गुंतवणुकीत बँका आणि गैर बँकिंग वित्तीय कंपन्या मिळून ३३ टक्के गुंतवणूक आहे. त्याखालोखाल माहिती तंत्रज्ञान (७.३१ टक्के), ग्राहकोपयोगी वस्तू (६.१९ टक्के), तेल आणि वायू (५.९३ टक्के), स्थावर मालमत्ता (४.४७ टक्के) या आघाडीची गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे आहेत. या गुंतवणुकींनी गेल्या काही वर्षांत फंडाला स्थैर्य आणि परताव्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. सध्या, हा फंड ऊर्जा, दूरसंचार, आरोग्यनिगा आणि बँकिंग यांसारख्या क्षेत्रांकडे अधिक झुकलेला आहे, तर आयटी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये (एफएमसीजी) त्याची गुंतवणूक मानदंड सापेक्ष कमी आहे. स्मॉल-कॅप विभागात, फंड व्यवस्थापक बॉटम-अप रणनीती वापरून कंपन्यांची निवड करतात. स्मॉलकॅप विभागात प्रामुख्याने आदरातिथ्य आणि बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आहेत. या फंडाच्या पोर्टफोलिओत लार्ज-कॅप (५८.६० टक्के), मिड-कॅप (१६.२३ टक्के), स्मॉल-कॅप (२.४७ टक्के) आणि उर्वरित गुंतवणूक रोकड सदृश्य (२३.२५ टक्के) आहे.

रोखे गुंतवणूक रणनीती

रोखे गुंतवणुकीत किमान २० टक्के गुंतवणूक कायम ठेवण्याच्या आपल्या उद्दिष्टानुसार, हा फंड आपल्या रोखे गुंतवणुकीचे सक्रियपणे व्यवस्थापन करतो. हा फंड अल्पकालीन आणि दीर्घकालीन मुदत असलेल्या रोख्यांमध्ये समतोल राखतो आणि व्याजदराच्या संभाव्य बदलांवर आधारित ‘अक्रूअल’ व ‘ड्युरेशन’ या धोरणांमध्ये गतिमान बदल करतो. व्याजदर वाढत असतानाच्या परिस्थितीत, हा फंड ‘ट्रिपल ए’पेक्षा कमी पत असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक वाढवून अधिक परतावा मिळवितो. हे रोखे आकर्षक व्याजदरावर उपलब्ध असतात. व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा असते, तेव्हा हा फंड ‘ड्युरेशन’मधील लाभांचा फायदा घेण्यासाठी सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक वाढवतो.

फंडाची १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत महिंद्र मनूलाइफ ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडाची कामगिरी लक्षणीय राहिली आहे. फंडाने वार्षिक १८.७३ टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. याचे श्रेय त्याच्या मूल्य-जागरूक गुंतवणुकीला आणि आवर्तनाशी सहसंबंध न राखणाऱ्या उद्योगात केलेल्या गुंतवणुकीला द्यावे लागेल. गेल्या सात वर्षांतील बहुतांश तिमाहीत फंड गटातील अन्य फंडांच्या तुलनेत या फंडाने ‘टॉप’ किंवा ‘अप्पर मिडल क्वारटाइल’मध्ये स्थान अबाधित राखले आहे. विशेष म्हणजे, या कालावधीतील ७८ टक्के वेळा ३ वर्षांचा ‘रोलिंग रिटर्न’ या फंड गट सरासरीपेक्षा अधिक आहे. गेल्या ५ वर्षांतील (१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२६) ३ वर्षांच्या ‘रोलिंग रिटर्न’ची आकडेवारी खाली दिली आहे.

सरासरीकमाल किमान १२ ते १५ टक्के१५ ते २० २० पेक्षा अधिक
महिंद्रा मनूलाइफ ॲग्रेसिव्ह हायब्रिड १६.८२२१.५३ १२.२७१६.८० ७८.८९ ४.३०
फंड गट सरासरी १३.४०१३.३७ ९.२६ ६३.३२ १६.६० ०.००

ही आकडेवारी या फंडाची लवचीकता आणि भविष्यातील चांगल्या कामगिरीची शक्यता दर्शवते.

एसआयपी आणि एकरकमी गुंतवणुकीचे पर्याय

तुमच्या आर्थिक गरजा आणि क्षमतेनुसार, तुम्ही ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडांमध्ये गुंतवणूक करताना एकरकमी गुंतवणूक करू शकता किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा (एसआयपी) मार्ग निवडू शकता. एसआयपी पद्धतीमुळे जर तुमच्याकडे एकाच वेळी मोठी रक्कम नसेल, तर नियमित अंतराने कमी रकमेची गुंतवणूक करणे सोपे होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अस्थिरतेत ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’चा फायदा घेता येतो. ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडांचा एक प्रमुख फायदा, विशेषतः नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी, हा आहे की मालमत्ता वाटप विहित मर्यादेत ठेवण्यासाठी फंड व्यवस्थापकांकडून वेळोवेळी कठोर पुनर्संतुलन केले जाते. सध्याच्या ‘सेबी’च्या नियमांनुसार या म्युच्युअल फंडांना किमान २० टक्के रोखे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यामुळे बाजाराच्या अस्थिरतेचा सर्वात कमी परिणाम होतो. सर्व ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड आपआपल्या परीने वेगळे आहेत. गुंतवणूकदारांनी ‘या वस्त्रांते विणीते कोण? एक सारखे नसती दोन’ असे विचारावे अशी परिस्थिती आहे. सध्याच्या अस्थिरतेच्या वातावरणात नवीन एकरकमी किंवा एसआयपी पद्धतीने गुंतवणुकीसाठी या इतरांपेक्षा वेगळा असणाऱ्या या फंडाची शिफारस करीत आहे.