-आशीष ठाकूर
डिसेंबर २०२५ च्या पहिल्या तारखेपासून आजतागायत आपण मंदीच्या गर्तेतच वाटचाल करत आहोत. अधेमध्ये तेजीही येते. पण आपल्याकडील रात्रीच्या वेळी ‘एक्स’वरील ‘रात्रीचा खेळ चाले’मधील प्रयोगाने ती धुऊन निघते. एका व्यक्तीच्या जागतिक ‘सुधारणे’च्या भाष्यामुळे संपूर्ण जगातील भांडवली बाजार मंदीत येतात. मग मध्येच दिसणारी तेजी ही अळवावरच्या पाण्यासारखी ठरते.
रात्रीच्या ‘ट्रम्पवाणी’ने उद्या सकाळी काय वाढून ठेवलंय या चिंतेतच झोपायला जायचं, असा आता नियमच बनला आहे. आजवरच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील मंदीचा आढावा घेतला, तर त्यात १९९२ची हर्षद मेहताची महामंदी, २००० ची केतन पारेखची, २००८ची जागतिक महामंदी, २०२०ची करोनाची महामंदी या मंदीच्या तऱ्हा परवडल्या अशी म्हणायची आता पाळी आली आहे.
आता चालू असलेली महामंदी ही गुंतवणूकदारांच्या आर्थिक आणि मानसिक भूमिकेलाच हादरा देत आहे. या मंदीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे गुंतवणूकदारांनी जी काही आर्थिक गणिते, आडाखे बांधून समभाग खरेदी केलेली असते ती नेमकी उलटताना आढळून येते. जसे की एखादा समभाग ५० रुपयांवरून ८० रुपयाला जाणार हे त्या गुंतवणूकदाराचे गणित असते, पण घडतं काय ट्रम्पवाणीने तो समभाग प्रथम ५० वरून ३० रुपयांवर येतो. गुंतवणूकदारांच्या मुदलातच घट येते, अल्पमुदतीची धारणा असलेला गुंतवणूकदार हवालदिल होऊन भांडवल वाचवण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ संकल्पनेचे पालन करतो. थोडे दिवस तो समभाग ३० रुपयांवर घुटमळल्यावर अवघ्या आठ ते १० दिवसांत तोच समभाग ३० रुपयांवरून ८० ते १०० रुपयांवर झेपावतो. अशा या आर्थिक व मानसिक आघातामुळे गुंतवणूकदार आज कोलमडून पडलेला आहे. आज त्याची मानसिक स्थिती ‘टू बी’ – या भांडवली बाजारात राहावं, की ‘नॉट टू बी’ – या बाजारातून बाहेर पडावं, अशा अवस्थेला निश्चितच पोहोचली आहे.
या व पुढील भागात आपण गुंतवणूकदारांची वरील आर्थिक, मानसिक स्थिती कशी हाताळावी, निफ्टी निर्देशांकाचे येणाऱ्या पाच महिन्याचं आलेखन, यात निफ्टी निर्देशांकाचा संभाव्य उच्चांक, नीचांक, महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर याचा विस्तृतपणे आढावा घेणार आहोत.
या वर्षीच्या सुरुवातीपासूनच निफ्टी निर्देशांकावर २४,००० हा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर असेल. २४,५०० ते २४,८०० हा तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा असेल, अशी संकल्पना आपण विकसित केलेली होती. युद्धाच्या परिस्थितील सकारात्मक बातम्या म्हणजे इराण-अमेरिका युद्धात तात्पुरती युद्धबंदी, खनिज तेल प्रति पिंप ८० डॉलरखाली घसरणे. अशा सकारात्मक बातम्यांवर, निफ्टी निर्देशांक २४,०००चा स्तर राखत, २१ एप्रिलला त्याने २४,६०१ आणि ७ जुलैला २४,५३० अशी वाटचाल करत, वरील वाक्याची प्रचीती दिली आहे.
आताच्या घडीला निफ्टी निर्देशांक २४,८०० स्तरावर सातत्याने १५ दिवस टिकल्यास, निफ्टी निर्देशांकावरील मंदीचे सावट दूर होऊन निफ्टी निर्देशांक २५,००० ते २५,३००, २५,८००, २६,३०० आणि तेजीचा कळस म्हणजे डिसेंबरपर्यंत २७ ते २८ हजार ही वरची लक्ष्य शक्य होतील.
तेजीमागील गृहीतक :
या वर्षी भारतात दुष्काळ असेल, असे हवामान खात्याचे भाकीत असताना, आतापर्यंत तरी पाऊस समाधानकारक राहिला आहे. पुढेही तो चांगलाच राहील, अशी आशा बाळगू या. यातून पीक-पाणी उत्तम होऊन, ग्रामीण अर्थव्यवस्था जोमाने बहरेल. दोन्ही देशांचे हित जपणारा भारत-अमेरिका व्यापार करार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात, सिनेटच्या (तिकडच्या लोकसभेच्या) निवडणुका असल्याने, सप्टेंबरपासून ट्रम्प यांच्या साहसवादी धोरणांना थोडी वेसण बसल्यास निफ्टी निर्देशांकावर तेजीचा बहार येईल, अशी आशा बाळगू या.
गेल्या महिन्यातील ६ जुलैच्या लेखात ‘माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) दहशतीमुळे’ हे क्षेत्रच कृत्रिम श्वासप्रणाली अर्थात व्हेंटिलेटरवर गेले असल्याचे भाष्य होते. तथापि या क्षेत्रातील प्रथितयश कंपन्यांचे मूल्यांकन अतिशय आकर्षक झाल्याने, त्या कंपन्यांमधील गुंतवणूक तीन ते पाच वर्षांसाठी आकर्षक परतावा देईल, असे सूचित केलेले होते. घडलेही तसेच, १० जुलैनंतर सर्व समाजमाध्यमांमध्ये या क्षेत्रातील कंपन्यांची शिफारस सुरू होऊन भांडवली बाजारात या कंपन्यांच्या समभागांचे भाव जोमात वधारले.
पुढील लेखात निफ्टी निर्देशांक, सेन्सेक्स, बँक निफ्टी मंदीत पण, स्मॉलकॅप, मिडकॅप निर्देशांकावर तेजी हे काय गौडबंगाल, निफ्टी निर्देशांकाने २३,५००चा स्तर तोडल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य, विविध समाजमाध्यमांवर निफ्टी निर्देशांक प्रथम २०,००० की ३०,००० असे मथळे सजवले जात आहेत, वगैरेचा आढावा घेऊ या. ‘इलियट वेव्ह’ संकल्पनेतून हा आढावा घेऊन ‘टू बी ऑर नॉट टू बी’ या प्रश्नाचे उत्तर आणखी विस्तृतपणे घेण्याचा प्रयत्न करू या. (क्रमशः)
(लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत. ashishthakur1966@gmail.com)
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
