या आधीच्या लेखात आपण 'टर्म इन्शुरन्स' आणि 'एंडोमेंट इन्शुरन्स' या योजनांबाबत थोडक्यात माहिती घेतली होती. 'टर्म इन्शुरन्स' मध्ये फक्त डेथ बेनिफिट असतो. म्हणजेच पॉलिसीच्या कालावधीत विमेदाराचा मृत्यू झाला तरच नॉमिनीला विमा रक्कम मिळते. पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या दिवशी विमाधारक जिवंत असेल तर कोणतीही रक्कम देय होत नाही. एंडोमेंट इन्शुरन्स पॉलिसी मध्ये मात्र डेथ बेनिफिट आणि मॅच्युरिटी बेनिफिट हे दोन्ही फायदे उपलब्ध असतात. म्हणजेच पॉलिसीच्या मुदतीत विमेदाराचा मृत्यू झाला तर विमा रक्कम नॉमिनीला मिळते आणि मुदतपूर्तीच्या दिवशी विमेदार जिवंत असेल तरी विमा रक्कम विमेदाराला दिली जाते. मनी बॅक योजना मनी बॅक योजनेमध्ये एंडोमेंट पॉलिसी प्रमाणेच डेथ बेनिफिट आणि मॅच्युरिटी बेनिफिट हे दोन्ही फायदे उपलब्ध असतात. म्हणजेच मुदतपूर्ती पूर्वी विमेदाराचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम नॉमिनीला मिळते आणि मुदतपूर्तीच्या दिवशी विमेदार हयात असेल तर क्लेम रक्कम विमेदाराला दिली जाते. पण मग यामध्ये एंडौमेंट पेक्षा वेगळे काय आहे? एंडोमेंट पॉलिसीमध्ये स्वतः विमेदाराला रक्कम केव्हा मिळणार, तर मुदतपूर्ती नंतर. म्हणजेच २० वर्षे २५ वर्षे असा पॉलिसी कालावधी संपल्यानंतर. पण मग या मधल्या काळात त्याला पैशाची जरुरी असेल तर रक्कम उपलब्ध होऊ शकते का? तर याचे उत्तर 'नाही' असेच आहे. या पॉलिसीवर जरूर तर कर्ज उपलब्ध होऊ शकते. पण कर्ज हे शेवटी कर्जच असते. त्यावर व्याज भरावे लागते. ते भरण्यात दिरंगाई झाली तर चक्रवाढ पद्धतीने व्याज आणि कर्जाचा बोजा वाढत जातो. मनी बॅक प्रकारच्या पॉलिसीमध्ये ही गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मनी बॅक पॉलिसीमध्ये पॉलिसी कालावधीत ठराविक अंतराने विमेदाराला विमा रकमेचा काही भाग टप्प्याटप्प्याने दिला जातो, ज्यामुळे पॉलिसी काळात उद्भवणाऱ्या आर्थिक गरजांसाठी विमेदाराला पैसा उपलब्ध होऊ शकतो. मुदतपूर्तीच्या वेळी उर्वरित विमा रक्कम (बोनससह) दिली जाते आणि करार संपतो. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुदतपूर्तीच्या क्षणापर्यंत विमा संरक्षण मात्र संपूर्ण विमा रकमेसाठी चालू राहते. आणखी वाचा: Money mantra: रिव्हर्स मॉर्गेज पद्धती आहे तरी कशी? मनी बॅक पॉलिसीचे उदाहरण एक उदाहरण घेऊन आपण मनी बॅक ही योजना समजावून घेऊ. समजा, क्ष या व्यक्तीने पाच लाख विमा रकमेची, २० वर्षे मुदतीची एक मनी बॅक पॉलिसी घेतली आहे. पॉलिसी तरतुदीनुसार सर्व्हायवल बेनिफिट, मॅच्युरिटी बेनिफिट आणि डेथ बेनिफिट खालीलप्रमाणे आहेत. सर्व्हायवल बेनिफिट पॉलिसी सुरू झाल्यापासून दर पाच वर्षांनी (विमाधारक हयात असल्यास) विमा रकमेच्या २० टक्के इतकी रक्कम विमाधारकाला मनी बॅक चा हप्ता ( सर्व्हायवल बेनिफिट) म्हणून दिली जाईल. मॅच्युरिटी बेनिफिट पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या दिवशी एकूण विमा रकमेपैकी दिल्या गेलेल्या सर्व्हायवल बेनिफिट ची ६० टक्के रक्कम वजा करून उर्वरित ४० टक्के विमा रक्कम (बोनससह) विमाधारकाला दिली जाईल आणि करार संपेल. डेथ बेनिफिट पॉलिसी सुरू झाल्यानंतर आणि मुदतपूर्तीच्या तारखेआधी केव्हाही विमाधारकाचा मृत्यु झाल्यास दिल्या गेलेल्या सर्व्हायवल बेनिफिटची रक्कम वजा न करता संपूर्ण विमा रक्कम (बोनससह) नॉमिनीला दिली जाईल आणि करार संपुष्टात येईल. याचाच अर्थ या उदाहरणात क्ष या विमाधारकाला पॉलिसी सुरू झाल्यापासून ५ वर्षे पूर्ण झाल्यावर एक लाख रुपये१० वर्षं झाल्यावर…..एक लाख रुपये१५ वर्षे झाल्यावर…..एक लाख रुपये अशा तीन सर्व्हायवल बेनिफिटची एकूण तीन लाख (मूळ विमा रकमेच्या ६०%) रुपयांची रक्कम मिळेल आणि २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच मुदतपूर्तीच्या दिवशी उर्वरित विमा रक्कम रुपये दोन लाख + बोनस अशी रक्कम मिळेल आणि करार संपेल.या संपूर्ण काळात केव्हाही विमाधारकाचा मृत्यु झाल्यास तोपर्यंत दिल्या गेलेल्या सर्व्हायवल बेनिफिट रकमेची कोणतीही वजावट न करता संपूर्ण विमा रक्कम+ बोनस एवढी रक्कम नॉमिनीला दिली जाईल. अगदी मुदतपूर्तीच्या एक दिवस आधी जरी विमाधारकाचा मृत्यु झाला तरी सुद्धा दिल्या गेलेल्या ६०% विमा रकमेबाबत कोणतीही कपात न करता संपूर्ण विमा रक्कम (बोनससह) नॉमिनीला मिळेल. म्हणजेच पॉलिसी कालावधीत उद् भवणाऱ्या गरजा भागविण्यासाठी रक्कम उपलब्ध करून देऊनही संपूर्ण रकमेचे विमा संरक्षण मात्र अबाधित राहते. प्रीमियम किती पडेल? आपण यापूर्वीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे टर्म इन्शुरन्स पॉलिसीमध्ये प्रिमियम सर्वात कमी असतो. कारण यामध्ये फक्त विमा संरक्षण असते. मॅच्युरिटीला कोणतीही रक्कम मिळत नाही. एंडोमेंट पॉलिसी हे विमा संरक्षण आणि बचत याचे मिश्रण असते. इथं डेथ बेनिफिट तर असतोच, पण मॅच्युरिटीच्या दिवशी संपूर्ण विमा रक्कम (बोनससह) विमाधारकाला दिली जाते. साहजिकच एंडोमेंट पॉलिसीसाठी अधिक प्रीमियम द्यावा लागतो. मनीबॅक पॉलिसीमध्ये आपण वर पाहिल्याप्रमाणे एंडौमेंट पॉलिसीचे दोन्ही फायदे उपलब्ध आहेतच, पण शिवाय पॉलिसी सुरू झाल्यानंतर ठराविक काळानंतर टप्प्याटप्प्याने पैसे परत मिळायला सुरुवात होते, तेही विमा संरक्षणाला धक्का न लावता. साहजिकच मनी बॅक पॉलिसीचा प्रीमियम एंडोमेंटपेक्षाही जास्त असतो.