उदारीकरणानंतर भारतात उदयास आलेल्या कोणत्या क्षेत्राने भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला? याचे उत्तर अत्यंत सोपे आहे ते म्हणजे ‘माहिती तंत्रज्ञान उद्योग’. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनी अर्थात नॅसकॉमच्या अहवालानुसार भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांचा व्यवसाय आर्थिक वर्ष २०२२ अखेरीस २२७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. त्यामध्ये वार्षिक १५ टक्के दराने वाढ होत असून या वर्षभरात तो २५० अब्ज डॉलरवर पोहोचणार आहे. भारतातील आयटी उद्योगाने नव्वदच्या दशकात आपले पाय रोवायला सुरुवात केली. अमेरिकेत माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा विस्फोट होत असताना कंपन्यांनी आपली कामे करण्यासाठी प्रोग्रामिंग करणारे तरुण मिळवायला सुरुवात केली. संपूर्णपणे खासगी क्षेत्राने विकसित केलेला भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योग पहिला उद्योग ठरला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस, विप्रो, पटणी कॉम्प्युटर्स, इन्फोसिस या चार कंपन्या पहिल्या फळीतील उद्योगाच्या भरभराटीच्या लाभार्थी ठरल्या.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या नक्की काय करतात?

UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

· विविध व्यावसायिक प्रक्रिया सोप्या व्हाव्यात यासाठी सॉफ्टवेअर तयार करून देणे.

· सॉफ्टवेअर तयार झाल्यावर येणाऱ्या माहितीचे पृथक्करण करून त्यातून व्यावसायिक सल्ला देणे.

· कंपनीला बाजारात नवीन उत्पादन आणायचे असेल तर त्यासाठी संपूर्ण नेटवर्क स्थापन करून देणे.

· सरकारच्या विविध योजना राबवण्यासाठी पोर्टल इंटरफेस तयार करणे.

परदेशातील एखाद्या बलाढ्य बँकेच्या सगळ्या कामकाजाचे नियंत्रण भारतातील आयटीपार्कमधील एका ऑफिसमधूनसुद्धा होऊ शकते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस किंवा क्रिकेट सामन्याचे प्रत्यक्ष थेट प्रसारण होत असताना स्कोअर बोर्ड अर्थात धावफलक सतत बदलत असतो. त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअरसुद्धा भारतीय आयटी कंपनी तयार करते. आपण सर्वजण ज्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) माध्यमातून शेअरमध्ये वेगवान उलाढाल करतो तीसुद्धा एका भारतीय कंपनीने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमुळेच यशस्वीपणे पार पाडली जात आहे. थोडक्यात व्यवस्थापनाच्या व्याख्यानांमध्ये वापरला जाणारा पिन- टू-पियानो असा व्यवसाय आयटी कंपन्यांमुळे शक्य होतो.

हेही वाचा – Money Mantra : मार्ग सुबत्तेचा : आरोग्य निधीचे आर्थिक नियोजन

भारतीय आयटी व्यवसायाने तृतीयक क्षेत्र ही अख्खी नवी शाखाच अर्थव्यवस्थेत पुनरुज्जीवीत केली. निम्म्याहून अधिक लोकसंख्या ज्या शेतीत काम करते अशा भारतात निम्म्याहून अधिक जीडीपीचा वाटा अवघ्या २० टक्के सेवा क्षेत्रातून येऊ लागला याचे खरे श्रेय माहिती तंत्रज्ञान उद्योगाला जाते. आयआयटी कानपूरमधून संगणकशास्त्र शिकून पदवीधर झालेल्या तरुण अभियंत्यानी भारतीय आयटी कंपन्यांचा पाया रचला. नव्वदीनंतर बंगळुरू, म्हैसूर, हैदराबाद, पुणे आणि गुरगाव ही शहरे आयटी पार्कची शहरे म्हणून उदयास येऊ लागली. माहिती तंत्रज्ञान उद्योगाने अक्षरशः कोट्यवधी भारतीयांना रोजगाराची थेट संधी उपलब्ध करून दिली आहे. वर्ष २०२२ या आर्थिक वर्षाअखेरीस फक्त टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस या कंपन्यांकडून लाखभर नवीन तरुणांना रोजगार मिळाला. यामध्ये बीपीओ उद्योगाचा विचार केला तर ही आकडेवारी आणखीनच मोठी होईल. भारतातील संगणक क्षेत्रातील क्रांती ठरावे असे कोअर बँकिंग सोल्युशन्स म्हणजेच भारतातल्या सर्व बँकांचे जाळे संगणकाच्या सहाय्याने निर्माण करणे हे शिवधनुष्यसुद्धा भारतीय आयटी उद्योगाने पेललेले आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योगाने देशात प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीचा आलेख सतत वाढता ठेवला आहे.

आउटसोर्सिंग ते नवे व्यवसायिक बदल

विदा व्यवस्थापन – व्यावसायिक उलाढाली जेवढ्या जोरात वाढतील आणि वेगवान होतील तेवढाच माणसांचा, ग्राहकांचा, उत्पादनाचा, खरेदी विक्रीचा, नफ्या*तोट्याचा असा प्रचंड डेटा जमा होतो आणि या जमा झालेल्या माहितीचे माहिती तंत्रज्ञान कंपन्या सॉफ्टवेअरच्या आधारे पृथक्करण करून त्यापासून नवीन नवीन उत्पादने बनवतात.

गेल्या वीस वर्षात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रसार भारतात होऊ लागल्यापासून भारतीय कंपन्यांचा माहिती तंत्रज्ञानावरील खर्चसुद्धा वाढला आहे. फक्त परदेशातील ग्राहकांच्या संख्येवर अवलंबून राहण्यापेक्षा भारतात सरकारी पातळीवरील प्रकल्पामध्येसुद्धा भारतीय आयटी कंपन्या काम करू लागल्या आहेत.

माहिती तंत्रज्ञान उद्योग आणि नवता

संगणक आणि सॉफ्टवेअर या क्षेत्रात सतत आपल्याला अद्ययावत ठेवणे आवश्यक असते आणि म्हणूनच माहिती तंत्रज्ञान उद्योगातील कंपन्यांची स्पर्धा ही स्वतःशीच आहे. नावीन्यपूर्ण व्यवसाय उपलब्ध करून देणे व त्यासाठी लागणारी बिझनेस सोल्युशन्स बनवून स्वतःचा व्यापार विस्तार करणे हे धोरण आयटी कंपन्यांना सतत सुरू ठेवावे लागते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, भांडवली बाजार, विमा कंपन्या, आरोग्य सुविधा, पेमेंट बँका, दूरसंचार, पुरवठा साखळी या सगळ्या उद्योगांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारे क्षेत्र आहे.

रोबोटिक तंत्रज्ञान, ब्लॉकचेन, संरक्षण क्षेत्र, अंतराळ संशोधन, शिक्षण, भूगर्भशास्त्र, पर्यटन, माध्यम आणि मनोरंजन, कृषी क्षेत्र, शेतमालाची अन्नपुरवठा साखळी अशा नवनवीन उद्योगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र येत्या काळात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अलीकडील काळात नव्याने उदयास आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत पातळीवर मोठी संधी प्राप्त होणार आहे. ई-कॉमर्स, वित्तीय संस्था, किरकोळ विक्री पुरवठा साखळी, विमा या व्यवसायात कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि हीच मोठी व्यवसाय संधी ठरणार आहे.

हेही वाचा – Money Mantra : नॉमिनेशन नुसार मिळालेल्या संपत्तीवर नॉमिनीचा कायदेशीर हक्क असतो का?

माहिती तंत्रज्ञान उद्योगांमध्ये सेवा पुरवणाऱ्या कंपन्या (Service Companies) उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या (Solution Companies) अशा दोन प्रकारचा व्यवसाय केला जातो. ॲपल, मायक्रोसॉफ्ट, गूगल, फेसबुक या कंपन्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातीलच आहेत. पण त्या स्वतःची उत्पादने बनवतात. याउलट सेवा पुरवणाऱ्या कंपन्या कोणत्याही कंपनीची कामे कंत्राटी तत्त्वावर स्वतः करून देतात व त्याचे पैसे घेतात. अर्थात एखाद्या परदेशी कंपनीचे काम परदेशात करावयाचे असल्यास जेवढा खर्च येईल त्याच्यापेक्षा अत्यंत कमी खर्चात ते काम भारतात होऊ शकते मग आवश्यक ते मनुष्यबळ घेऊन ते काम करून दिले जाते.

निफ्टी आयटी निर्देशांकामध्ये कोफोर्ज, एचसीएल टेक्नॉलॉजी, एमएफसीस, एल टी टेक्नोलॉजी, माईंडट्री, इन्फोसिस, पर्सिस्टंट, टाटा कन्सल्टन्सी, टेक महिंद्र आणि विप्रो या दहा कंपन्यांचा समावेश होतो. यांच्या व्यवसायाविषयी आणि या क्षेत्रातील गुंतवणूक संधीविषयी पुढच्या लेखात सविस्तर माहिती घेऊ.

लेखक अर्थ अभ्यासक आणि वित्तीय मार्गदर्शक आहेत.

joshikd282@gmail.com