Premium

Money Mantra: आयुर्विम्याच्या पारंपारिक योजना- टर्म इन्शुरन्स की, एन्डोव्हमेंट अशुरन्स?

Money Mantra: विमा कंपन्या अनेक आकर्षक योजना आपल्यासमोर सादर करतात पण मुळात दोनच योजना या मूळ योजना आहेत. त्यातील नेमकी फायदेशीर कोणती हे आपण वेळीच समजून घ्यायला हवं.

Life and term Insurance
विम्याबद्दल संभ्रम आहे? (फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्स्प्रेस)

विमा कंपन्या त्यांच्या विविध योजना आकर्षक नावाने मार्केटमध्ये आणत असतात. अर्थात ‘नावात काय आहे?’ या उक्तीप्रमाणे केवळ नावावरून आपल्याला ती योजना म्हणजे नेमकं काय आहे, हे समजणार नाही. त्यासाठी त्या योजनेच्या अटी, मिळणारे फायदे तपासून पहावे लागतील. आयुर्विम्याच्या शेकडो योजना बाजारात प्रचलित असल्या तरी मूळ योजना मोजक्याच असतात आणि त्यांचं वेगवेगळ्या स्वरूपात मिश्रण करून कंपन्या आपल्या विविध योजना तयार करत असतात. आज आपण अशा दोन मूळ पारंपारिक योजनांची थोडक्यात माहिती घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: आयुर्विमा पॉलिसी फ्री लूक पिरियड म्हणजे काय महत्त्वाचा आहे | money …

टर्म इन्शुरन्स हाच शुद्ध विमा

टर्म इन्शुरन्स: ही आयुर्विम्याची मूळ योजना आहे. या योजने अंतर्गत पॉलिसीच्या कालावधीत विमेदाराचा मृत्यू झाला तर विम्याची संपूर्ण रक्कम वारसाला / नॉमिनीला दिली जाते. मुदतपूर्तीच्या दिवशी विमेदार हयात असेल तर मात्र कोणतीही रक्कम देय होत नाही. म्हणजेच या योजनेत फक्त डेथ बेनिफिट आहे, मॅच्युरिटी बेनिफिट नाही. म्हणजेच ही केवळ विमा संरक्षण देणारी, केवळ जोखीम घेणारी शुद्ध विमा योजना आहे. बचतीसाठी ही योजना नाही. विमेदाराचं अकाली निधन झालं तर कुटुंबाला आर्थिक आधार देणे हाच एकमेव हेतू या योजनेचा असतो. अर्थात यामुळे या योजनेत फक्त विमा संरक्षण देण्यापुरताच अल्पसा प्रीमियम आकारलेला असतो. म्हणूनच अत्यल्प प्रीमियममध्ये कुटुंबाला भरभक्कम आधार देण्याच्या दृष्टीने ही अत्यंत सुयोग्य योजना आहे.

आणखी वाचा: Money Mantra : आयुर्विमा- ‘परम विश्वासाचे तत्व’ म्हणजे काय? ते कंपनी …

वार्षिक उत्पन्नाच्या दसपट विमा

अकाली निधनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केवळ दोन- पाच लाख रकमेचा विमा घेऊन काय साध्य होणार? सर्वसाधारणपणे वार्षिक उत्पन्नाच्या १० ते १२ पट रकमेचे विमा संरक्षण हे योग्य मानले जाते. उदाहरणार्थ: एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ८ ते १० लाख रुपये असेल तर त्या व्यक्तीने आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आधार मिळण्याच्या दृष्टीने १ कोटी रकमेचा विमा घेणं आवश्यक आहे. तरच त्या कुटुंबाला प्रमुखाच्या आकस्मिक निधनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत योग्य आर्थिक आधार मिळू शकेल.

आणखी वाचा: Money Mantra: रिटायरमेंट प्लानिंग- निवृत्तीवेतन साठीनंतर की, सत्तरीनंतर?

टर्म इन्शुरन्स सर्वात स्वस्त

आता त्या व्यक्तीने ज्या योजनेत डेथ आणि मॅच्युरिटी असे दोन्ही फायदे उपलब्ध असतात अशी एन्डोव्हमेंट योजना घ्यायचे ठरवले तर त्याला अंदाजे ५ लाख रुपये इतका प्रीमियम भरावा लागेल. आठ/दहा लाखांच्या उत्पन्नात इतका प्रीमियम भरू शकणं अर्थातच अशक्य आहे. अशा वेळी टर्म इन्शुरन्स योजना महत्वाची ठरते. कारण याच एक कोटी विमा रकमेचे संरक्षण ती व्यक्ती वार्षिक रु. २५ हजार ते ३० हजार इतक्या कमी प्रीमियममध्ये मिळवू शकते. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे वर उल्लेख केलेला प्रीमियम एक अंदाज यावा एवढ्याच उद्देशाने आणि केवळ एक उदाहरण म्हणून दिला आहे. कारण प्रीमियम हा विमेदाराचे वय, त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे आरोग्यमान, नोकरी/व्यवसायाचे स्वरूप, पॉलिसीचा कालावधी अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो.

विमा ही गुंतवणूक नव्हे

विमा घेताना एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे, ती म्हणजे विमा हा आर्थिक गुंतवणूक म्हणून नव्हे, तर जोखिमीपासून संरक्षण म्हणून घ्यायचा असतो. कारण एन्डोव्हमेंट सारखी पॉलिसी घेतली तरी त्यावर मिळणारा परतावा सुद्धा फारसा आकर्षक नसतो. त्यामुळे ‘टर्म इन्शुरन्स’ पॉलिसी घेऊन भक्कम विमा संरक्षण मिळविणं आणि गुंतवणुकीसाठी बचत योजना, म्युच्युअल फंड, शेअर्स वगैरे पर्यायांचा विचार करणं अधिक योग्य ठरतं.

एन्डोव्हमेंट अशुरन्स Endowment Assurance

यालाच हयातीचा विमा असेही म्हणतात. यामध्ये विमा संरक्षण आणि बचत यांचे मिश्रण केलेले असते. म्हणजेच यात डेथ आणि मॅच्युरिटी असे दोन्हींचे फायदे उपलब्ध असतात.
उदाहरणार्थ: एका व्यक्तीने १० लाख विमा रकमेची २० वर्षे मुदतीची एन्डोव्हमेंट पॉलिसी घेतली आहे. ही व्यक्ती २० वर्षे हयात असेल तर मुदतपूर्तीच्या दिवशी त्याला मूळ विमा रक्कम १० लाख + एकूण जमा झालेला बोनस एवढी रक्कम मिळेल. दुर्दैवाने पॉलिसी सुरू झाल्यानंतर आणि मुदतपूर्तीच्या आधी केव्हाही विमेदाराचा मृत्यू झाला तर नॉमिनीला मूळ विमा रक्कम १० लाख + मृत्यूच्या वर्षांपर्यंत जमा झालेला बोनस एवढी रक्कम मिळेल.

बोनसचा परतावा फारसा आकर्षक नसतो

अशाप्रकारे दोन्ही फायदे मिळत असल्यामुळे या योजनेचा प्रीमियमही जास्त असतो. टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियमपेक्षा तर तो कित्येक पटीने जास्त असतो. दुसरी गोष्ट या पॉलिसीमध्ये बोनस मिळत असला तरी एकूण मिळणारा परतावा फारसा आकर्षक नसतो. कारण विमाधारकांच्या पैशाची गुंतवणूक करत असताना विमा कंपनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत असते. कायद्यानेही ते बंधनकारक आहे. कारण विमा कंपनीने विमाधारकांसाठी विश्वस्त (ट्रस्टी) म्हणून भूमिका बजावणे अपेक्षित असते. त्यामुळे गुंतवणूक करताना रिस्क घेतली जात नाही. साहजिकच मिळणारा परतावाही आकर्षक नसतो.
अर्थात काही लोकांना असे वाटते की ‘कमी प्रीमियमचा टर्म इन्शुरन्स घेऊन वाचलेल्या पैशासाठी गुंतवणुकीचा अन्य पर्याय शोधावा’ हे काही आपल्याला जमणारे नाही. त्यापेक्षा ‘परतावा कमी असला तरी चालेल पण दुहेरी फायदा देणारी एन्डोव्हमेंट बरी’. अशा लोकांसाठी ही निश्चितच उत्तम योजना आहे.

पुढील एखाद्या लेखात ‘मनी बॅक’ आणि ‘होल लाइफ’ या योजनांची आपण माहिती घेऊ.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Money mantra life insurance term or endowment assurance what is more beneficial risk management mmdc vp

First published on: 22-09-2023 at 21:07 IST
Next Story
Money Mantra: रिटायरमेंट प्लानिंग- निवृत्तीवेतन साठीनंतर की, सत्तरीनंतर?