Money Mantra बदलत्या काळानुसार, बदलत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी प्रॉडक्ट्स बँका आणि फायनान्स कंपन्या बाजारात आणत असतात. यातील गेल्या काही वर्षात लोकप्रिय झालेले प्रॉडक्ट म्हणजे पर्सनल लोन किंवा वैयक्तिक कर्ज.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैयक्तिक कर्ज नेमके का घ्यावे?

आणीबाणीचा प्रसंग उद्भवला, अचानकपणे न टाळता येण्याजोगे काही खर्च आले तर; जे कर्ज घ्यावे लागते त्याला वैयक्तिक कर्ज किंवा पर्सनल लोन असे म्हणूया. उदाहरणार्थ घरातील आलेले आजारपण, घरातील अचानकपणे निर्माण झालेला न टाळता येण्यासारखा खर्च- प्रसंग, घराचे रंगकाम किंवा दुरुस्ती करताना अचानक खर्च वाढणे, घरात आवश्यक असणारे एखादे उपकरण एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन आयत्या वेळेला बंद पडल्याने नवीन विकत घेण्याशिवाय पर्याय नसणे, आपल्या हाताशी जेवढे पैसे आहेत त्यापेक्षा महागाईमुळे सणवार- वैयक्तिक कौटुंबिक प्रसंग यामध्ये जास्त खर्च करावा लागणे यामुळे पर्सनल लोन घेण्याची वेळ येते.

हेही वाचा – Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची – थर्ड पार्टी व्हेईकल इन्शुरन्स म्हणजे काय? तो बंधनकारक असतो का?

पर्सनल लोन आहे म्हणून गरज भागवायची का?

हा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न असला तरीही, मागील पाच वर्षात भारतातील कुटुंबांचे एकत्रित बचतीचे प्रमाण कमी झाले असून कर्जाचे प्रमाण वाढले आहे हे विचारात घ्यावे लागेल. इएमआय (EMI) वर वस्तू सेवा विकत घेता येत असल्यामुळे खिशात पैसे नसले तरीही आपली गरज भागू शकते हा चुकीचा आत्मविश्वास लोकांमध्ये येऊ लागला आहे. ‘चुकीचा आत्मविश्वास’ हा शब्द अशा करता वापरायचा की, गरजेला पैसे नसणे आणि पैसे नसणार, हे माहिती असूनही बिनधास्तपणे गरजा निर्माण करणे यातला फरक आपण ओळखणे आवश्यक आहे.

वैयक्तिक कर्ज घेऊन कुटुंबासमवेत परदेशात फिरायला जाऊन आलेल्यांना आपल्या खिशातील पैशातून एखादी छोटी टूर करता आली नसती का?

आपलं शिक्षण, आपली प्रोफेशनल गरज, आपला व्यवसाय लक्षात घेऊन २५ ते ३० हजार रुपयांचा फोन आपल्याला विकत घेणे शक्य असताना त्याच्या चौपट किमतीचा फोन का विकत घ्यायचा याचे उत्तर आपल्याकडे आहे का ?

अंथरूण पाहून पाय पसरावे अशी म्हण आता बदलावी लागेल, पर्सनल लोन उपलब्ध आहे म्हणून नसलेले अंथरूणही मोठे वाटू लागते, हा खूप मोठा हे समजून घ्यायला हवे

पर्सनल लोन मिळण्याची प्रक्रिया काय?

सर्वसामान्यपणे घरासाठी, गाडीसाठी, शिक्षणासाठी कर्ज घेताना जी कागदपत्रे बँकेकडून मागितली जातात, त्यापेक्षा खूपच कमी कागदपत्रावरून पर्सनल लोन मिळू शकते यामुळे ती ‘पैशाची खाण’च आहे असे वाटणे शक्य आहे, पण तो एक भविष्यातील धोका आहे. डिजिटल दुनियेत कोणत्याही ऑफिसमध्ये न जाता ऑनलाईन पर्सनल लोन मिळायची सोय ही खरोखर सोय आहे का धोका हे सामान्य माणसाला समजत नाही.

पर्सनल लोनचे व्याजदर किती?

पर्सनल लोन किती टक्के व्याजाने आकारले जावे? याचा सरकारने किंवा रिझर्व बँकेने ठरवलेला नियम नाही. मात्र एक निश्चितच की, घर विकत घेण्यासाठी ज्या दराने आपल्याला कर्ज मिळते त्यापेक्षा नक्कीच चढ्या दराने बँक आपल्याला पर्सनल लोन देत असते.

हेही वाचा – दीर्घ मुदतीत चांदी सोन्याहून पिवळी ठरेल?

पर्सनल लोन ट्रॅप कसा ठरतो ?

एकदा पर्सनल लोन घेऊन गरजा भागवायची सवय लागली की, एक कर्ज फिटत नाही तोवर दुसरं कर्ज डोक्यावर येऊन बसतं. पगारातून त्या कर्जाचा हप्ता जात असल्यामुळे आपण जास्त पैसे देतोय, ही भावनासुद्धा निघून जाते आणि अधिकाधिक कर्ज घेण्याची ‘लालसा’ तयार होते. जर एखाद- दोन महिन्यात आपण पर्सनल लोनवरचे व्याज आणि मुद्दल भरू शकलो नाही तर बँकांकडून दंड आकारला जातोच. पण आपली थकबाकीसुद्धा वाढते, जर हे कर्जच फेडता आले नाही तर तारण म्हणून ठेवलेल्या इन्व्हेस्टमेंट आपल्या हातून निघून जातात.

बऱ्याचदा बँक आणि कंपन्यांना यासाठी दोषी ठरवले जाते, पण स्वतःच्या अर्थनिरक्षर असण्याचा दोष त्यांच्यावर ढकलून चालणार नाही. आपली आर्थिक स्थिती जशी असेल त्यानुसार आपले खर्च बसत नसतील तर पैसे मिळवण्याचा नवीन स्रोत तयार करणे हा खरा मार्ग आहे, पर्सनल लोन हा उपाय नाही ती तात्पुरती सोय आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra when to take a personal loan when not to take mmdc ssb
First published on: 26-05-2024 at 17:36 IST