‘तुमचा म्युच्युअल फंड वितरक तुमच्या पोर्टफोलिओमधून गुपचूप पैसे काढून घेत आहे का? आजच ‘डायरेक्ट’कडे वळा आणि लाखो रुपये वाचवा.’
नुकतेच समाजमाध्यमावरील रीलमध्ये एका ‘फिनफ्लुएन्सर’ला असे ओरडून सांगताना पाहून मी क्षणभर थांबलो. वितरकाचे ‘कमिशन’ वाचवण्यामागचा त्याचा गणितीय दृष्टिकोन चुकीचा आहे, म्हणून नाही तर या विषयाचा केवळ एकच पैलू तपासून तो अतिशय आत्मविश्वासाने निष्कर्ष काढून मोकळा झाला होता, आणि आपण त्यामुळे गुंतवणूकदारांची एक प्रकारे दिशाभूल करतोय, हे त्याच्या गावीही नव्हते, हे पाहून मी थबकलो.
गेल्या काही वर्षांत, म्युच्युअल फंडामध्ये ‘डायरेक्ट प्लॅन’ निवडणे हा एक बौद्धिकदृष्ट्या ‘मिरवण्याचा’ निर्णय वाटू लागला आहे. हे केल्यावर बेड्या तोडल्यासारखे वाटते, पैशाची कार्यक्षमता वाढवल्याचा अभिमान वाटतो आणि गुंतवणुकीचा धोपटमार्ग सोडून ‘प्रागतिक झालो’ असे वाटते.
यामागचे गणित मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी बरोबर आहे. ‘डायरेक्ट प्लॅन्स’मुळे खर्चात बचत होते. दीर्घकाळात, कमी ‘एक्सपेन्स रेशो’मुळे चक्रवाढ पद्धतीने लक्षणीयरीत्या जास्त परतावा मिळतो. त्यामुळे ‘डायरेक्ट जाणे’ एक तर्कसंगत निर्णय आहे. परंतु, अनेक तर्कसंगत निर्णयांप्रमाणेच, धोका त्या तर्कात नसतो, तो त्या तर्कामुळे हळूहळू बदलणाऱ्या आपल्या वर्तनात असतो.
‘मी चाणाक्षपणे बरेच पैसे वाचवले’ ही भावना हळूहळू (आणि आपल्या नकळत) ‘मला गुंतवणुकीचे मर्म समजले आहे’ या अतिआत्मविश्वासात बदलते, तेव्हा चांगलाच धोका निर्माण होतो.
नसलेल्या अनुभवाची किंमत
एका मित्राच्या घरी अलीकडेच झालेले त्याचे संभाषण :
‘माझ्या बायकोच्या पोर्टफोलिओमध्ये २०२२ मध्ये गोल्ड फंड एसआयपी सुरू केली होती. आजघडीला ७० टक्के परतावा आहे. मी म्हटलं आता ‘गोल्ड ओव्हरवेट’ झालाय. आपण ही ‘एसआयपी’ बंद करून ‘इक्विटी’मध्ये सुरू करू या.
‘वेड लागलंय का?’ बायको म्हणाली. ‘७० टक्के परतावा अर्थात रिटर्न्स देणारी ‘एसआयपी’ बंद करताय आणि १० टक्के परतावा देणारी सुरू करू या म्हणताय. भिकेचे डोहाळे लागले आहेत तुम्हाला.’
येथे किती गोष्टी चुकत आहेत हे तुमच्या लक्षात येतंय का?
१. एखाद्या मालमत्तेची (ॲसेट) अलीकडील कामगिरी आणि पोर्टफोलिओमधील तिची भूमिका यात झालेली गफलत.
२. अलीकडे ज्या गोष्टीने चांगला परतावा दिला, तीच पुढेही सर्वोत्तम कामगिरी करेल, असा ठाम विश्वास.
३. एका ‘ॲसेट क्लास’च्या केवळ १-२ वर्षांच्या यशाने गुंतवणूक धोरणात नकळत घडवून आणलेला बदल.
४. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्याकडून चूक होत असावी याची पुसटशी जाणीवही नसणे.
५. याउलट, थांबून विचार करण्यास किंवा विरोधी मत विचारात घेण्यास दिलेला स्पष्ट नकार.
६. सल्लागाराची काहीही गरज वाटत नसणे.
असे अनेकदा घडताना आम्ही पाहतो. कारण बाजार चांगल्या काळात परताव्याच्या बाबतीत अतिउदार असतो. आपण घेतलेला प्रत्येक निर्णय योग्य ठरल्याचे ढळढळीत दिसते. यामुळे वर वर्णन केलेला ‘माझी ती पूर्व दिशा’ ही मनोभूमिका नकळत तयार होते.
अति-आत्मविश्वासाला बळकटी देणारी परिसंस्था
आजचे गुंतवणूक वातावरण या समस्येला आणखी गडद करते. ‘फिनटेक प्लॅटफॉर्म’ घेतलेल्या (एकांगी) निर्णयाची तडकाफडकी अंमलबजावणी सुलभ बनवतात. प्रभावशाली ‘इन्फ्लुएन्सर’ जटिल निर्णयांना ‘स्मार्ट विरुद्ध कालबाह्य’ किंवा ‘डायरेक्ट विरुद्ध रेग्युलर’ अशा सोप्या रूपात मांडतात. सल्ल्यासाठी पैसे देणे हे आता उधळपट्टी म्हणून पाहिले जाते.
अशा परिसंस्थेत, आत्मविश्वास फक्त वाढत नाही. तो ताठ होतो.
‘डायरेक्ट प्लॅन’चे धोके – ज्याबद्दल कोणीच बोलत नाही
‘डायरेक्ट प्लॅन’ खर्च कमी नक्कीच करतात, पण ते ‘आवश्यक अडथळे’देखील काढून टाकतात
‘तुम्ही हे का करत आहात?’ असे विचारणारे कोणीही नसते.
तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणारा कोणताही ‘सर्किट-ब्रेकर’ नसतो.
बाजार कोसळत असताना तुम्हाला कठीण प्रश्न विचारणारे कोणी नसते.
‘डायरेक्ट प्लॅन’मध्ये तुमचे निर्णय – चांगले किंवा वाईट – त्वरित अमलात आणले जातात आणि ‘स्क्रीन’द्वारे प्रमाणित केले जातात. जर तुमच्याकडे स्थितप्रज्ञता आणि शिस्त असेल तर हा उत्तम पर्याय आहे. पण जर तुम्ही भावनिक असाल आणि लोभ आणि भीती यांसारख्या भावनांना बळी पडू शकत असाल तर गुंतवणुकीवर कोणाचेही नियंत्रण नसणे विनाशकारी ठरू शकते.
साकल्याने विचार केल्यासः
वैशिष्ट्य
डायरेक्ट प्लॅन (DIY)
सल्लागारासोबत गुंतवणूक
थेट खर्च
कमी (०.१% – ०.७५% TER)
जास्त (सल्लागार शुल्कासह)
अंमलबजावणी
विनासायास आणि त्वरित
विचारपूर्वक आणि चर्चेनंतर
बाजार कोसळताना
तुम्ही तुमच्या भावनांसोबत एकटे असता.
चुकीच्या निर्णयापासून रोखण्यासाठी तुमच्याकडे एक आधार असतो.
तेजीच्या काळात
अति-आत्मविश्वास हे ‘कौशल्य’ वाटतो.
पोर्टफोलिओ पुनर्संतुलन तुम्हाला सुरक्षित ठेवते.
जबाबदारी
१००% तुमच्या भावनिक परिपक्वतेवर.
एका व्यावसायिक धोरणकर्त्यासोबत विभागलेली.
वेळेची गुंतवणूक
संशोधनासाठी आणि ‘ट्रॅकिंग’साठी तुम्हाला स्वतःचा बराच वेळ द्यावा लागतो.
सल्लागार हे काम करतो, ज्यामुळे तुमचा वेळ वाचतो.
‘डायरेक्ट प्लॅन’ निवडण्यापूर्वी स्वतःची चाचणी घ्या
खालील प्रश्नांची प्रामाणिकपणे ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी उत्तरे द्या.
१. जेव्हा माझ्या पोर्टफोलिओमधील एखादा पर्याय खूप जास्त परतावा देतो, तेव्हा मला त्यात गुंतवणूक कमी करणे किंवा थांबवणे मला सोपे वाटते का?
☐ हो ☐ नाही
२. एखाद्या मालमत्तेची पोर्टफोलिओमधील भूमिका आणि तिचा अलीकडील परतावा यातील फरक मी स्पष्टपणे ओळखू शकतो का?
☐ हो ☐ नाही
३. माझ्याकडे एक लेखी मालमत्ता-वाटप चौकट आहे का, ज्यानुसार मी कठीण काळातही ‘रीबॅलेन्सिंग’ करतो?
☐ हो ☐ नाही
४. बाजारातील तीव्र घसरणीच्या वेळी, मी बाह्य सल्ल्याशिवाय शांत राहू शकतो का?
☐ हो ☐ नाही
५. मी बाजाराचे किमान एक पूर्ण चक्र (सायकल) पाहिले आहे का, ज्यात बराच काळ कशानेही परतावा दिला नव्हता?
☐ हो ☐ नाही
६. गुंतवणूक क्षेत्रातील माझा आत्मविश्वास कशामुळे आला आहे – दीर्घ अनुभव, की अलीकडील परतावा?
☐ अनुभव ☐ अलीकडील परतावा
बहुतेक उत्तरे ‘हो’ असल्यास, अभिनंदन, ‘डायरेक्ट प्लॅन्स’ तुमच्यासाठी योग्य आहेत. अनेक उत्तरे ‘नाही’ असल्यास – ‘डायरेक्ट प्लॅन्स’चा ‘अदृश्य खर्च’ तुमच्या शुल्क बचतीपेक्षा जास्त असू शकतो.
लक्षात ठेवा, ‘डायरेक्ट प्लॅन्स’साठी आपल्या कल्पनेपेक्षा जास्त भावनिक परिपक्वतेची गरज असते. विशेषतः जेव्हा सर्व काही चांगले चाललेले असते तेव्हा. जर तुम्ही वर उल्लेखलेल्या दुसऱ्या श्रेणीत येत असाल, तर एखाद्या अनुभवी सल्लागारासोबत काम करण्याचा विचार करा. हा एक असा निर्णय आहे जो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.

