Mutual Fund SIP 1 Crore Portfolio Strategy : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीद्वारे १ कोटी रुपयांचा निधी जमा करायचा म्हटलं की, किमान ५० हजारांची एसआयपी हवी, असं अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात श्रीमंत होण्यासाठी मोठं उत्पन्न नाही तर केवळ सातत्य महत्त्वाचे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुण्यातील ३५ वर्षीय मयुरेश जाधव या तरुणाने अवघ्या २,५०० रुपयांच्या एसआयपीने सुरुवात करुन आज १ कोटी ३ लाख रुपयांचा फंड जमा करण्यात यश मिळवले आहे. त्याच्या या आर्थिक प्रवासात अनेक प्रकारच्या अडचणी झाल्या. मात्र, त्याने केवळ १० सोपे नियम पाळून या सर्वांवर यशस्वी मात केली.
२,५०० रुपयांपासून ७०,००० रुपयांपर्यंतचा टप्पा
मयुरेश यांचे २०१३ मध्ये वार्षिक उत्पन्न केवळ २ लाख ४० हजार रुपये होते. २०१७ मध्ये त्यांनी दरमहा २,५०० रुपयांची पहिली एसआयपी सुरू केली. त्यानंतर जसजसे उत्पन्न वाढत गेले, तसतसा गुंतवणुकीचा आकडा ५,०००, १०,०००, २५,००० आणि ४०,००० करत आज दरमहा ७०,००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
१. सुरुवात महत्त्वाची
अनेकजण उत्पन्न वाढले की गुंतवणुकीला सुरुवात करू, असा विचार करुत काही वर्षे वाया घालवतात. मयुरेश म्हणतात, गुंतवणूक किती रुपयांची आहे, यापेक्षा ती नियमित सुरू करणे महत्त्वाचे असते. लहान रकमेने सुरुवात करुन तुम्ही नंतर एसआयपीची रक्कम वाढवत नेऊ (Step-up SIP) शकता.
२. उत्पन्नातील वाढ ही गुंतवणुकीची खरी ताकद
त्यांनी दुसरा महत्त्वाचा नियम सांगितला की केवळ गुंतवणूक केली म्हणजे संपलं असं नाही. तर तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणेही आवश्यक आहे. मयुरेश यांचे वार्षिक उत्पन्न २.४ लाखांवरून आज ४० लाख रुपयांवर पोहोचले आहे. उत्पन्न वाढल्याशिवाय दरमहा मोठी गुंतवणूक शक्य होत नाही.
३. ‘लाइफस्टाइल इन्फ्लेशन’वर नियंत्रण
अनेकजण पगार वाढला की राहणीमानही त्याप्रमाणे अपग्रेड करतात. म्हणजे छोटी कार असेल तर एसयूव्ही घ्या. महागडे घर, हॉटेलिंग. याला लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतात. मयुरेश यांचा सल्ला आहे, की राहणीमानाचा खर्च मर्यादित ठेवून वाढीव रकमेतील मोठा हिस्सा गुंतवणुकीकडे वळवणे गरजेचे आहे.
४. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि गुंतवणूक सोबतच
आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर गुंतवणुकीचा विचार करणारे कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. मयुरेश यांनी पालकांना आर्थिक मदत करत, बहिणीच्या लग्नासाठी ७-८ लाख रुपयांचे योगदान दिले. हे सर्व सुरू असताना त्यांनी गुंतवणूक कधीही थांबवली नाही.
५. न समजणारे आर्थिक उत्पादन कधीही खरेदी करू नका
मयुरेश यांनी ओळखीतून एका पारंपरिक एलआयसी पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली होती. प्रॉडक्ट न समजल्याने ८-९ वर्षांनंतर जेव्हा ते यातून बाहेर पडले, तेव्हा त्यांना गुंतवलेल्या रकमेच्या अवघे ७०% पैसे परत मिळाले. यातून मोठा धडा मिळाल्याने “जे उत्पादन सोप्या शब्दांत समजून सांगता येत नाही, त्यात पैसे गुंतवू नका,” असा सल्ला त्यांनी दिला.
६. EPF ची संथ पण भक्कम साथ
म्युच्युअल फंड चांगला परतावा देत असला तरी यातील गुंतवणूक शेअर बाजाराच्या जोखमीशी निगडीत आहे. त्यामुळे कधीही एका पर्यायात सर्व पैसे गुंतवू नये. म्युच्युअल फंडाव्यतिरिक्त मयुरेश यांच्या ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी’मध्ये आज सुमारे ३२ लाख रुपये जमा झाले आहेत.
७. परिपूर्ण पोर्टफोलिओची गरज नसते
गुंतवणुकीच्या प्रवासात चुका होतात. मयुरेश यांनी पुण्यात ५७ लाख रुपयांचा फ्लॅट घेतला, ज्याचे मूल्य आज ७५ लाख रुपये आहे. इक्विटीच्या तुलनेत रिअल इस्टेटचा परतावा मर्यादित राहिला, तरीही संपूर्ण पोर्टफोलिओच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम झाला नाही.
८. प्रत्येक मालमत्तेचा उद्देश केवळ परतावा नसतो
शेअर बाजाराच्या तुलनेत पुण्यातील मालमत्तेची किंमत वाढली नाही. पण, यातून दरमहा २८,००० हजारांचे भाडे मिळते. काही गुंतवणुकींचा उद्देश केवळ ‘कॅश फ्लो’ किंवा सुरक्षितता हा असू शकतो.
९. कर्जमुक्त होणे म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य
मयुरेश यांनी पुण्याच्या घराचे गृहकर्ज पूर्णपणे फेडले आहे. सध्या ते ठाण्यात ३८,००० रुपये महिना भाड्याने राहतात. कर्जमुक्त झाल्याने त्यांना पुढील मोठे आर्थिक निर्णय मोकळेपणाने घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.
१०. आर्थिक प्रवासात टिकून राहणे महत्त्वाचे
उशिरा केलेली सुरुवात, चुकीच्या योजनेतील गुंतवणूक आणि कौटुंबिक अडचणी यांपैकी कशानेही मयुरेश यांचा गुंतवणुकीचा प्रवाह थांबला नाही. आर्थिक नियोजन १००% अचूक असण्यापेक्षा त्यात सातत्य असणे अधिक महत्त्वाचे आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. लोसकत्ता ऑनलाईनमध्ये शेअर बाजाराशी संबंधित वृत्त केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केले जाते. याला गुंतवणुकीचा समजू नये. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी, वाचकांनी पात्र आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
