म्युचुअल फंडातील गुंतवणुकीवर दोन प्रकारचे उत्पन्न मिळते. एक म्हणजे लाभांश आणि दुसरे फंडातील युनिटच्या विक्रीवर होणारा नफा. हे दोन्ही उत्पन्न करपात्र उत्पन्नात गणले जाते.
आता सुरुवातीला लाभांश उत्पन्नावरील कराबाबत माहिती घेऊ या.
लाभांश
फंडावरील लाभांश हे ‘इतर उत्पन्न’ या सदरात करपात्र आहे आणि गुंतवणूकदाराला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे त्यावर कर भरावा लागतो. या लाभांशावर १० टक्के उद्गम कर कापण्याची तरतूददेखील आहे. १०,००० रुपयांपेक्षा जास्त लाभांश असेल तर हा उद्गम कर कापला जातो. हा उद्गम कर टाळावयाचा असल्यास पात्र करदाता ‘फॉर्म १२१’ देऊ शकतो. गुंतवणूकदाराकडे पॅन नसेल तर त्यावर २० टक्के उद्गम कर कापला जातो.
लाभांशावरील कर कसा वाचवावा
म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक, ग्रोथ म्युच्युअल फंड आणि दुसरा नियमित उत्पन्न (डिव्हिडंड म्युचुअल फंड). या दोन्हीमध्ये फरक असा आहे की ग्रोथ म्युच्युअल फंड, दीर्घकालीन भांडवली वाढ आणि चक्रवाढ वाढवण्यासाठी नफ्याची पुनर्गुंतवणूक करतात, ज्यामुळे ते संपत्ती निर्मितीसाठी आदर्श ठरतात. डिव्हिडंड पर्याय नियमित उत्पन्न देतात, जे नियमित उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत, परंतु त्यात वाढ कमी असते आणि कर जास्त असतो.
जे करदाते इक्विटी म्युचुअल फंडाचा ‘ग्रोथ’ पर्याय निवडतात त्यांना त्यावर नियमित उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीत वाढ होते, ही गुंतवणूक त्यांनी दीर्घकालीन झाल्यावर विकल्यास त्यावर होणाऱ्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर त्यांना १२.५० टक्के इतका कर भरावा लागतो. करदात्याने म्युचुअल फंडाचा ‘डिव्हिडंड’ पर्याय निवडल्यास त्यांना मिळणाऱ्या लाभांशाच्या उत्पन्नावर त्यांच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार कर भरावा लागतो. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी ग्रोथ पर्याय चांगला आहे, तर नियमित रोख प्रवाहासाठी डिव्हिडंड पर्याय योग्य आहे.
‘इक्विटी’ आणि ‘डेट’ फंड
म्युच्युअल फंडातील युनिटच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा करपात्र आहे. यावरील करआकारणी फंडाच्या प्रकारावर आणि गुंतवणुकीच्या धारणकाळावर अवलंबून असते. करआकारणीसाठी फंड हे दोन प्रकारात विभागले जातात. एक म्हणजे इक्विटी फंड आणि दुसरा डेट फंड. जे फंड आपल्या गुंतवणुकीपैकी ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक ‘इक्विटी’मध्ये करतात ते फंड ‘इक्विटी’ फंड म्हणून समजले जातात. जे फंड ‘इक्विटी फंड’ नसतात ते ‘डेट फंड’ असतात. याशिवाय काही फंड हायब्रिड किंवा संतुलित फंड (बॅलन्स फंड) असतात. हेसुद्धा फंडाच्या गुंतवणुकीच्या स्वरूपानुसार ‘इक्विटी’ किंवा ‘डेट’ फंडामध्ये विभागले जातात.
फंडातील गुंतवणुकीचा धारणकाळ
गुंतवणुकीच्या धारणकाळानुसार त्यावर झालेल्या भांडवली नफ्यावर कर आकारणी केली जाते. हा धारणकाळ ‘इक्विटी फंड’ आणि ‘डेट फंडा’साठी वेगवेगळा आहे. ‘इक्विटी फंडा’तील युनिटची विक्री खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यानंतर केल्यास ती गुंतवणूक दीर्घ मुदतीची होते अन्यथा अल्पमुदतीची.
‘डेट फंडा’तील युनिट १ एप्रिल २०२३ पूर्वी खरेदी केले असतील तर, ‘डेट फंडा’तील युनिट खरेदी केल्या तारखेपासून २४ महिन्यानंतर विकल्यास ती संपत्ती दीर्घमुदतीची होते आणि त्यावर होणारा भांडवली नफा किंवा तोटा दीर्घ मुदतीचा होतो. ‘डेट फंडा’तील युनिट १ एप्रिल, २०२३ नंतर खरेदी केलेले असल्यास, या युनिटचा धारण काळ कितीही असला तरी, ती संपत्ती अल्पमुदतीचीच होते आणि त्याच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा अल्पमुदतीचाच होतो.
‘इक्विटी फंडा’तील युनिटच्या विक्रीवरील भांडवली नफा
‘इक्विटी फंडा’तील युनिट खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यानंतर विकल्यास त्यावर होणारा दीर्घमुदतीचा भांडवली नफा १,२५,००० रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यावर कर भरावा लागत नाही. आणि हा नफा १,२५,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यानंतरच्या रकमेवर १२.५० टक्के कर आकारला जातो. दीर्घमुदतीचा भांडवली नफा गणताना महागाई निर्देशांकाचा लाभ घेता येत नाही. उदा. ‘इक्विटी फंडा’तील युनिट जून, २०२२ मध्ये ३ लाख रुपयांना खरेदी केले असतील आणि ते मार्च, २०२६ मध्ये ५ लाख रुपयांना विकले असतील तर त्यावर २ लाख रुपयांचा (विक्री ५ लाख वजा खरेदी ३ लाख रुपये) दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला, या नफ्यावरील पहिल्या १,२५,००० रुपयांवर कर भरावा लागणार नाही, त्यावरील ७५,००० रुपयावर १२.५ टक्के म्हणजेच ९,३७५ रुपये (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर) इतका कर भरावा लागेल.
‘इक्विटी फंडा’तील युनिट खरेदी केल्याच्या तारखेपासून १२ महिन्याच्या आत विकल्यास त्यावर होणाऱ्या अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्के इतका कर (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर) भरावा लागेल.
करदात्याने ‘इक्विटी फंडा’तील गुंतवणूक १ फेब्रुवारी २०१८ पूर्वी केली असेल तर त्याच्यासाठी दीर्घमुदतीचा भांडवली नफा गणण्यासाठी वेगळी तरतूद आहे. अशा फंडातील युनिटच्या विक्रीवरील भांडवली नफा गणताना त्याचे खरेदी मूल्य पुढील (१) आणि (२) मधील जे जास्त आहे ते (१) युनिटचे खरेदी मूल्य, आणि (२) (अ) ३१ जानेवारी, २०१८ रोजीचे वाजवी बाजार मूल्य आणि (ब) विक्री मूल्य, या (अ) आणि (ब) मधील जे कमी आहे ते. यानुसार खरेदी मूल्य गणून दीर्घमुदतीचा भांडवली नफा गणावा लागतो.
‘डेट फंडा’तील युनिटच्या विक्रीवरील भांडवली नफा
‘डेट फंडा’तील युनिट १ एप्रिल २०२३ पूर्वी खरेदी केले असल्यास आणि हे युनिट खरेदी केल्याच्या तारखेपासून २४ महिन्यांनंतर विकल्यास त्यावर दीर्घमुदतीचा भांडवली नफा होतो. त्यावरील भांडवली नफा गणताना महागाई निर्देशांकाचा लाभ घेता येत नाही आणि त्यावर १२.५० टक्के (अधिक ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य कर) कर भरावा लागतो. ‘डेट फंडा’तील युनिट १ एप्रिल, २०२३ नंतर खरेदी केलेले असल्यास, त्यावर होणारा भांडवली नफा हा अल्पमुदतीचाच असेल. या नफ्यावर करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल.
भांडवली नफ्यावरील कर कसा वाचवावा
जे करदाते पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे (एसआयपी) गुतंवणूक करतात, त्यांनी ही गुंतवणूक विकताना विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी यातील गुंतवणूक विकल्यास, जी प्रथम केलेली गुंतवणूक असेल ती प्रथम विकली असे समजले जाते. उदा. एका करदात्याने ‘इक्विटी फंडा’तील पद्धतशीर गुंतवणूक योजनेत एप्रिल, २०२४ पासून दरमहा प्रत्येकी १०० युनिट गुंतविले असे त्याच्याकडे एप्रिल, २०२६ पर्यंत त्या फंडाचे २४०० युनिट् जमा झाले. त्यातील काही किंवा सर्व युनिट त्याने मार्च २६ मध्ये विकल्यास एप्रिल, २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीमध्ये खरेदी केलेले युनिट दीर्घमुदतीचे असतील आणि त्यावर होणारा नफा दीर्घमुदतीचा असेल आणि त्यानंतर एप्रिल, २०२५ नंतर खरेदी केलेले युनिट अल्पमुदतीचे असतील आणि त्यावरील विक्रीवर करदात्याला २० टक्के इतका कर भरावा लागेल.
‘इक्विटी फंडा’तील विक्रीवरील दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर प्रथम १,२५,००० रुपयांवर कर भरावा लागत नाही. त्यामुळे करदात्याने आपली गुंतवणूक अशा प्रकारे विकावी जेणेकरून ती दीर्घमुदतीची होईल आणि दीर्घमुदतीचा भांडवली नफा दरवर्षी १,२५,००० रुपयांपर्यंत मर्यादित ठेवल्यास त्यावर कर भरावा लागणार नाही.
दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी करदात्याकडे नवीन घरात गुंतवणुकीचा (अटींची पूर्तता केल्यास) पर्याय उपलब्ध आहे. अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय नाहीत.
प्रवीण देशपांडे
pravindeshpande1966@gmail.com
