सुमारे २६ वर्षांपूर्वी स्थापन झालेली गोदावरी पॉवर अँड इस्पात (जीपीआयएल), प्रामुख्याने लोहखनिज उत्खनन, लोहखनिज पेलेट्स, स्पंज आयर्न, स्टील बिलेट्स, वायर रॉड्स, एच.बी. वायर आणि फेरो अलॉयजचे उत्पादन आणि वीज निर्मिती क्षेत्रात आहे. कंपनीकडे दोन खाणी आहेत. एक अरी डोंगरी खाण (२.३५ दशलक्ष एमटीपीए) आणि बोरिया टिबू खाण (०.७ दशलक्ष एमटीपीए) ज्यामध्ये १६५ दशलक्ष टन साठा आहे. दोन्ही खाणी अजून ३५ वर्षे कार्यरत असतील असा अंदाज आहे. जीपीआयएल स्टीलच्या उत्पादनासाठी स्वतःच्या खाणींमधून लोहखनिजाच्या गरजांपैकी सुमारे ८५ टक्के गरज भागवते. सध्या कंपनीचे वार्षिक उत्खनन ३.०५ दशलक्ष टन असून पुढील आर्थिक वर्षापर्यंत ते ६.७ दशलक्ष टन होईल. कॅप्टिव्ह मायनिंगमुळे कच्च्या मालाच्या खर्चात मोठी बचत होते. कंपनीच्या तीन उपकंपन्या असून, एक सहयोगी आणि तीन संयुक्त उपक्रम आहेत. कंपनीचे छत्तीसगड (सिलतारा इंटिग्रेटेड प्रकल्प), उरला इंडस्ट्रियल एरिया आणि ओडिशा (पेल्टायझेशन प्रकल्प-आर्डेंट स्टील), ऊर्जा प्रकल्प: बायो मास आयपीपी (एचएफएएल-महासमुंड) आणि विंड मिल (कर्नाटक) येथे उत्पादन प्रकल्प आहेत.
गेल्याच वर्षात सीईसीबीने स्पोंज स्टील विभागाची क्षमता ४,९५,००० मेट्रिक टनांवरून ५,९४,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यासाठी संमती दिली आहे.
क्षमता विस्तार आणि भांडवली खर्च

१. कंपनी आपल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता १६५ मेगावॉटवरून २९० मेगावॉटपर्यंत वाढवणार आहे. यासाठी सुमारे ३९५ कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे.

२. बेमेटारा येथे ६० मेगावॅटचा ऊर्जा प्रकल्प असून त्याचा आणखी विस्तार करण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

३. ऊर्जा प्रकल्पामधील सध्याच्या स्टीलचे आधुनिकीकरण पूर्ण झाले आणि क्षमता ०.५२५ दशलक्ष टनांपर्यंत (आधीची क्षमता ०.४ दशलक्ष टन) वाढली.

४. पेलेट: प्रमुख उपकरणांसाठी कार्यादेश देण्यात आला आहे. प्रकल्प आर्थिक वर्ष २०२६च्या दुसऱ्या तिमाहीत पूर्ण होईल. एकूण प्रकल्प खर्च ६०० कोटी रुपये झाला असून त्याची क्षमता २.७ दशलक्ष टनांवरून ४.७ दशलक्ष टनांपर्यंत वाढणार आहे.

५. पोलाद प्रकल्प : क्षमता २.३५ दशलक्ष टनांवरून ६ दशलक्ष टनांपर्यंत वाढवली जात आहे. प्रकल्प यंदाच्या वर्षा अखेरीस पूर्ण होईल. .
मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने ५,३७६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८१३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला आहे. तर मार्च तिमाहीत १,४६८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २२१ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. हे दोन्ही निकाल गतवर्षीच्या तुलनेत तितकेसे आकर्षक नाहीत. मात्र विस्तारीकरण प्रकल्प पूर्ण झाल्यावर येत्या दोन वर्षांत कंपनी उत्तम कामगिरीचे प्रदर्शन घडवेल, अशी अपेक्षा आहे. जीपीआयएलने वर्षभरापूर्वी २१.५० लाख समभाग हे १४०० रुपये प्रतिसमभाग या दराने पुनर्खरेदी केले होते, त्यावेळी शेअरचे दर्शनी मूल्य ५ रुपये होते. सध्याच्या दरात कुठलेही कर्ज नसलेली आणि अनुभवी प्रवर्तक असलेली गोदावरी पॉवर एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून योग्य वाटते.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड (बीएसई कोड ५३२७३४)

प्रवर्तक: हिरा समूह, बी एल अगरवाल

संकेतस्थळ : godawaripowerispat.com

बाजारभाव: रु. १८६/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: स्टील / पॉवर

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ६६.९३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६३.५१

परदेशी गुंतवणूकदार ६.५८

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २.४४

इतर/ जनता २७.४७

पुस्तकी मूल्य: रु. ७३.४

दर्शनी मूल्य: रु. १/-

लाभांश: १००%

प्रति समभाग उत्पन्न: रु. १२.१

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १५.२

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २३.१

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०६

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २०.७

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): २३.३

बीटा : १

बाजार भांडवल: रु. १२,४३५ कोटी (मिड कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २५४/१४६

गुंतवणूक कालावधी: २४ महिने

अजय वाळिंबे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

stocksandwealth@gmail.com

  • हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे
  • प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
  • लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.