वर्ष १९७६ मध्ये स्थापन झालेली तेगा इंडस्ट्रीज ही खनिज, खाणकाम आणि बल्क सॉलिड उद्योगासाठी एक आघाडीची उत्पादक आणि वितरक कंपनी आहे. जागतिक स्तरावर, तेगा इंडस्ट्रीज पॉलिमर-आधारित मिल लाइनर्सचे दुसरे सर्वात मोठे उत्पादक आहेत. कंपनी विक्रीपश्चात सेवेसह क्रशिंग, स्क्रीनिंग, ग्राइंडिंग, मटेरियल हँडलिंग आणि खनिज प्रक्रिया उपकरणे तयार करून विपणन करते.

कंपनीचे जगभरात १० उत्पादन प्रकल्प आहेत, ज्यात सात भारतात आहेत आणि तीन चिली, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील प्रमुख खाणकाम ठिकाणी आहेत.

उत्पादन पोर्टफोलिओ

कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ५५ हून अधिक खनिज प्रक्रिया आणि साहित्य हाताळणी उत्पादने समाविष्ट असून त्याशिवाय उच्च-कार्यक्षमता असलेले मिल लाइनर्स, वेअर-रेझिस्टंट सोल्यूशन्स, कन्व्हेयर घटक, स्क्रीन आणि ट्रॉमेल्स आणि हायड्रोसायक्लोन्ससह ९३ हून अधिक उत्पादने आहेत. कंपनीच्या महसुलापैकी सुमारे ९६ टक्के महसूल हा उत्पादन विक्रीतून येतो तर ४ टक्के महसूल सेवेतून येतो. कंपनी ९० हून अधिक देशांमध्ये उपस्थित आहे, तिच्या ८५-९० टक्के महसूल भारताबाहेरून येतो. कंपनीचे जगभरात ७०० हून अधिक ग्राहक आहेत. परदेशी उपकंपन्या महसुलात मोठे योगदान देतात. कंपनी तिच्या चिली प्रकल्पासह इतर ठिकाणी क्षमता वाढविण्यासाठी २५० कोटी रुपये खर्च करत आहे. चिली येथील प्रकल्पामध्ये उत्पादन यंदाच्या आर्थिक वर्षांत लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

वितरण विस्तार

कंपनी उत्पादनांची थेट विक्रीचे काम करते. तेगाकडे सध्या १६० विक्री आणि विपणन अधिकारी आहेत आणि प्रमुख ग्राहकांच्या जवळ असलेल्या १८ जागतिक आणि १४ देशांतर्गत विक्री कार्यालयांचे वितरण जाळे आहे. कंपनीकडे स्वतःचा विकास आणि संशोधन (आरअँडडी)विभाग आहे. कमी वेळेत कार्यादेशाप्रमाणे डिझाइन करण्यासाठी तसेच खाणकाम आणि खनिज प्रक्रिया लाइनर्समध्ये वापरण्यासाठी पॉलीयुरेथेन वेअर घटकांचा विकास आणि इतर व्यापक उपाय विकसित करण्याचे काम या विभागाकडून केले जाते. कंपनी विद्यमान बाजारपेठांमध्ये (यूएसए, चिली, पेरू आणि मेक्सिको) आपली उपस्थिती वाढवण्यावर भर देत असून, संशोधन खर्च १ टक्क्यांवरून वरून ३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

कंपनीने फेब्रुवारी २०२३ मध्ये कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेच्या माध्यमातून तेगा मॅकनॅली मिनरल्स लिमिटेडला (टीएमएमएल) १६५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. टीएमएमएल उपकरणे आणि सेवा घटकावर लक्ष केंद्रित करते. या अधिग्रहणामुळे कंपनीला नवीन बाजारपेठ ‘द ग्लोबल इक्विपमेंट बिझनेस’ मिळवण्यास मदत होत आहे.

कंपनीचे आर्थिक वर्ष २०२४-२५ ची आर्थिक कामगिरी असून जाहीर झालेली नाही. डिसेंबर २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीमध्ये कंपनीने उलाढालीत २० टक्के वाढ साध्य करून ती ४०९ कोटींवर नेली आहे. तर याच काळात ५४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे, तो गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ५२ टक्के अधिक आहे. तर नऊमाहीसाठी मात्र कंपनीने उलाढालीत (१,१०३ कोटी) १२ टक्के वाढ नोंदवली असली तरीही नक्त नफ्यात मात्र ६ टक्के घट होऊन तो ९८ कोटींपर्यंत खाली आला आहे.

दोन वर्षांपूर्वी, मार्च २०२३ मध्ये याच स्तंभातून तेगा इंडस्ट्रीज ६८४ रुपयांना सुचवला होता. ज्या वाचकांनी हा शेअर खरेदी केला असेल त्यांना भरपूर फायदा झाला आहे. दोन वर्षांत हा शेअर २,२२९ पर्यंत जाऊन सध्या १,४५० रुपयांवर व्यवहार करतो आहे. अनुभवी प्रवर्तक, उत्तम गुणवत्ता आणि उत्पादनांची वाढती मागणी यामुळे तेगा इंडस्ट्रीज अजूनही खरेदीसाठी आकर्षक वाटतो.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

तेगा इंडस्ट्रीज लिमिटेड

वेबसाइट: http://www.tegaindustries.com/

प्रवर्तक: मदन मोहन मोहन्का

बाजारभाव: रु. १४४२

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: इंजिनीयरिंग

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ६६.५४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ७४.८०

परदेशी गुंतवणूकदार १.६८

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १९.०२

इतर/ जनता ४.५०

पुस्तकी मूल्य: रु. १८८

दर्शनी मूल्य: रु.१०/-

लाभांश: २० %

प्रति समभाग उत्पन्न: रु.२८.२

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५१.२

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३६.१

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.२३

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: १०.२

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): १९.२

बीटा : ०.७

बाजार भांडवल: रु. ९,६०२ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २,३२९/१,२१४

गुंतवणूक कालावधी : २४ महिने

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.