काही दिवसांपूर्वी लोकसत्तेत ‘बाँड’बाजा हा अग्रलेख वाचला आणि ‘तस्करी’ची आठवण झाली. त्याची आठवण अजून होण्याचे कारण म्हणजे, कधीतरी दिल्ली विमानतळावर होतो तेव्हा त्याचे ‘शूटिंग’सुद्धा बघण्याचा योग आला होता. इम्रान हाश्मीला पाहिल्यावर थोडा वेळ थांबून चित्रीकरणसुद्धा बघितले. त्याचे कारण विचारू नका! असो, तेव्हा माहीत नव्हते की, ही वेबसिरीज आहे, पण जेव्हा ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर आली तेव्हा कळले की, खरेतर तस्करीवर आधारित कथा आहे. भारतीयांचे सोन्याचे प्रेम अपरंपार आहे. तुम्ही सार्वभौम सुवर्ण रोखे (गोल्ड बॉण्ड) काढा किंवा अजून काहीही, जोपर्यंत हातात सोने दिसत नाही तोपर्यंत त्याची भारतीयांना मजा येत नाही.

तस्करी बघून एका गोष्टीची माहिती नक्की घ्यावीशी वाटली, ती म्हणजे सोन्याच्या भावात भारतात आणि आखाती देशात नक्की काय फरक असतो? चोराला जर तस्करी करायची असेल तर अमली पदार्थ (ड्रग्स), कोकेन किंवा इतर प्रतिबंधित वस्तू आणणे ठीक आहे, पण सोनेच का? सोन्याचा भावात इतका फरक आहे की, लोक तस्करी करून सोने देशात आणतात. काहीतरी आर्थिक नफा असल्याशिवाय सोने आणण्यात काही अर्थ नाही. ही वेबसिरीज आणि अर्थातच सोन्याची तस्करी पूर्णतः या तत्त्वावर अवलंबून आहे. तस्कर आणि त्यांना पकडणारे सीमाशुल्क अधिकारी (कस्टम्स) यांच्या पाठशिवणीचा खेळ म्हणजे तस्करी ही वेबसिरीज.

३ मे २०२६ रोजी १० ग्रॅम शुद्ध २४ कॅरेट सोन्याचा भाव दुबईमध्ये १,४०,२२७ आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३३,०५० रुपये होता तर भारतात हाच दर विविध शहरात १,५१,००० आणि १,३८,००० होता म्हणजे प्रत्येक १० ग्रॅममागे अंदाजे ५ ते १० हजार रुपयांचा फायदा. विमानातून अधिकचे पैसे न देता ३० किलो वजन आणण्याची परवानगी असते, म्हणजे १० किलो जरी सोने आणले तरी पन्नास लाख ते एक कोटी रुपयांचा फायदा नक्कीच होऊ शकतो. कित्ती सोपे आहे श्रीमंत होणे! पण या स्वप्नांच्या आड येतो, तो भारतीय सीमा शुल्क विभाग. जो भारतीय सीमा शुल्क, १९६२ या कायद्याचे पालन करतो आणि कायद्याअंतर्गत ‘बॅगेज रुल्स’ २०२६ हे नियम आहेत.

वेबसिरीजमध्ये पहिल्या भागात स्पष्ट केले आहे की, ५०,००० रुपयांपर्यंतच्या वस्तू आपण ड्युटी फ्री अर्थात कोणतेही सीमा शुल्क न देता आणू शकतो. वर्ष २०२६च्या नवीन नियमानुसार ही मर्यादा आता ७५,००० रुपयांपर्यंत वाढवली आहे. आपण परदेशी गेल्यावर तेथील गोळ्या चॉकलेटांबरोबरच इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा भुरळ पाडतात. त्या सगळ्याची मिळून नवीन मर्यादा ७५,००० रुपये आहे. अनिवासी भारतीयांना ही मर्यादा त्यांच्या परदेशातील वास्तव्यावरून दीड लाख, तीन लाख आणि साडेसात लाख रुपये आहे.

आता येऊया सोन्याकडे, जर आपल्यासारखे परदेशी जाणारे प्रवासी असतील तर महिला प्रवाशांना ४० ग्रॅमपर्यंत सोने तेही फक्त आभूषण म्हणजे ज्वेलरी म्हणून वैयक्तिक वापरासाठी आणायला परवानगी आहे. पुरुष प्रवाशी असतील तर त्यांना ही मर्यादा २० ग्रॅम आहे. यात सोन्याची बिस्किटे, पत्रे, पावडर, चिपा यांचा समावेश होत नाही. तस्करीच्या एका भागात एक प्रवासी लॅपटॉपमध्ये सोन्याचे छोटे पत्रे बनवून आणताना दाखवले आहे. फक्त आभूषणे असल्यास करमुक्त २० ग्रॅम किंवा ४० ग्रॅम सोने आपण आणू शकतो.

अशी कुठलीही वस्तू आणताना त्याची पावती किंवा बीजक सांभाळून ठेवणे गरजेचे असते. आपण विमानतळावर ग्रीन चॅनेल आणि रेड चॅनेल अशा दोन पट्ट्या बघतो. बहुतेक वेळेला आपण ग्रीन चॅनेलमधूनच येतो, कारण गरीब मध्यमवर्गीय बिस्कीट, गोळ्या आणि चॉकलेटव्यतिरिक्त फार काही आणत नाही. पण जर तुम्ही काही खरेच जास्त किमतीची वस्तू आणली असेल तर तुम्ही विमानतळावर किंवा आधी ऑनलाइन पद्धतीने ती जाहीर करू शकता. अधिकच्या सोन्यावर तुम्हाला सुमारे ३६ टक्के सीमाशुल्क भरावे लागते तेसुद्धा जास्तीत जास्त तुम्ही १ किलोपर्यंत आणू शकता. कन्नड अभिनेत्री रान्या रावने मार्च २०२५ मध्ये बंगळूरु विमानतळावर १४ किलो सोने तस्करी स्वरूपात आणल्याने अटक झाली होती.

तिच्यावर तोपर्यंत १०० किलो सोने आणल्याचा आरोप होता. म्हणजे तस्करी फक्त पडद्यावर नाही तर प्रत्यक्षातसुद्धा होते. सीमा शुल्क विभाग दरवर्षी अशा पकडलेल्या वस्तूंचा अहवाल प्रसिद्ध करतो. वेबसिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे काही प्रवासी हे जिवंत प्राणीसुद्धा आणण्याचा प्रयत्न करतात. वेबसिरीजमध्ये सौदी अरेबियातील अल डेरा नावाचे शहर दाखवले आहे. पण आखातातील बहुतेक शहरांमध्ये सोने भारतापेक्षा स्वस्तात मिळते, जेथून तुम्ही कायद्याच्या मर्यादेत राहून सोने आणू शकता.

मागच्या वेळेला मी दुबईमधून असेच सोने आणले होते, घरी आल्यावर बायकोला म्हटले की, चला आता ही आभूषणे विकूया आणि थोडासा नफा मिळवूया. त्यावर तिने स्पष्ट सांगितले एक वेळ तुला विकेन पण घरातील सोने विकणार नाही! भारतीयांचे हे सोन्याचे प्रेम खऱ्या तस्करीला आणि तस्करी नावाच्या वेबसिरीजला जन्म देते. अमृता खानविलकर, शरद केळकर, शैलेश दातार आणि कित्येक मराठी चेहरे असणारी ही वेबसिरीज नक्की बघा पण वित्तीय नजरेतून!