१ एप्रिल, २०२६ पासून नवीन प्राप्तिकर कायदा, २०२५ लागू झाला असला तरी करदात्यांना २०२५-२६ या वर्षाचे विवरणपत्र जे ३१ जुलै, २०२६ पूर्वी दाखल करावयाचे आहे, ते जुन्या प्राप्तिकर कायद्यानुसारच दाखल करावयाचे आहे आणि यासाठी जुन्या कायद्यात असलेल्या विवरणपत्रांच्या फॉर्मचा वापर करावयाचा आहे.

मागील काही वर्षात करदात्यांना कराव्या लागणाऱ्या अनुपालनात सुलभता आणण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात अनेक बदल करण्यात आले. यामध्ये मोठा बदल म्हणजे करदात्यांना कर भरण्यासाठी सोपी करप्रणाली लागू करण्यात आली. प्राप्तिकर कायद्यातील अनेक वजावटी, प्रत्येक वजावटीसाठी वेळ-वेगळे नियम, त्यातील अटींची पूर्तता आणि त्याचा तपशील ठेवणे हे जिकीरीचे होऊन बसले होते. अशात काही करदात्यांनी चुकीच्या वजावटी घेऊन अवैध रीतीने कर बुडविला होता. अशा चुकीच्या वजावटी शोधून काढणे प्राप्तिकर खात्यासाठी सुद्धा आव्हानात्मक आहे. यावर तोडगा म्हणजे या किचकट वजावटींना बगल देत कमी दराने कर भरण्याचा पर्याय देण्यात आला. माझ्यासाठी कोणती करप्रणाली फायदेशीर आहे? ती मी कधी निवडावी आणि कशी निवडावी? मला ती बदलता येते का? असे प्रश्न करदात्यांच्या मनात येतात.

आता नवीन करप्रणाली ही मुलभूत कर प्रणाली आहे. त्यामुळे करदात्याला जुन्या करप्रणालीनुसार कर भरावयाचा असेल तर त्याला जुनी करप्रणाली निवडावी लागेल. जे करदाते नोकरी करणारे आहेत किंवा ज्यांच्या उत्पन्नात ‘उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा’ समावेश नाही ते प्रत्येक वर्षी आपले उत्पन्न, वजावटी आणि त्यावरचा देय कर दोन्ही प्रणालीनुसार गणून जी प्रणाली फायदेशीर आहे ती ते निवडू शकतात. ज्यांच्या उत्पन्नात ‘उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा’ समावेश आहे त्यांना मात्र काही निर्बंध आहेत. अशा करदात्यांनी जुन्या करप्रणालीचा पर्याय एकदा निवडल्यास त्यांना तो पुढील वर्षांसाठी लागू होतो. परंतु या जुन्या करप्रणालीच्या पर्यायातून, पुढील कोणत्याही वर्षात, एकदा बाहेर पडल्यास पुन्हा तो कधीच, जो पर्यंत करदात्याच्या उत्पन्नात ‘उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा’ समावेश आहे तो पर्यंत, तो हा पर्याय निवडू शकत नाही. त्यामुळे अशा करदात्यांनी योग्य विचार करून आपली करप्रणाली निवडावी.

नवीन करप्रणाली स्वीकारण्याचे फायदे :

करदात्यांनी आपल्याला कोणती करप्रणाली फायदेशीर आहे कसे ठरवावे? यासाठी काही निकष आहेत का? हे जाणण्यासाठी नवीन करप्रणालीनुसार कोणत्या वजावटी मिळतात आणि करदात्याच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार किती कर आणि सवलती मिळतात हे समजून घेतले पाहिजे.

१. वाढीव प्रमाणित वजावट : ज्या करदात्यांना वेतनाचे उत्पन्न आहे किंवा निवृत्तीवेतन मिळते, अशांना ५०,००० रुपयांची प्रमाणित वजावट मिळते. परंतु नवीन करप्रणाली स्वीकारल्यास ७५,००० रुपयांची प्रमाणित वजावट मिळते.

२. कलम ८७ए नुसार वाढीव कर सवलत : प्राप्तिकर कायद्यातील कलम ८७ए नुसार वैयक्तिक करदात्यांना करामध्ये सवलत देण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार करदात्याचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यांना देय असलेल्या करापासून संपूर्ण सवलत मिळून त्यांना कर भरावा लागत नाही. परंतु जे करदाते नवीन करप्रणालीनुसार (कलम ११५ बीएसी) कर भरतात त्यांच्यासाठी कर सवलतीसाठी उत्पन्नाची मर्यादा १२ लाख रुपये इतकी आहे. म्हणजेच जे करदाते नवीन करप्रणाली नुसार कर भरतात त्यांना १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तसेच जे पगारदार करदाते आहेत त्यांना प्रमाणित वजावट विचारात घेता १२,७५,००० रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. या कलमानुसार मिळणारी कर सवलत ही फक्त निवासी भारतीयांसाठीच आहे. ८७ ए कलमानुसार मिळणारी सवलत फक्त नियमित उत्पन्नासाठी आहे. ज्या उत्पन्नावर सवलतीच्या दरात कर भरला जातो, (उदा. भांडवली नफ्यावर १२.५ टक्के) त्या उत्पन्नासाठी करदात्याला ही कर सवलत मिळत नाही. ज्या करदात्याचे नियमित करपात्र उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा थोडेसेच जास्त आहे अशा करदात्यांसाठी या कलमानुसार सीमांत सवलत दिलेली आहे. उदा. एका करदात्याचा पगार १२,७६,००० रुपये आहे. प्रमाणित वजावट विचारात घेऊन त्याचे करपात्र उत्पन्न १२,०१,००० रुपये आहे त्याला ही सवलत मिळणार की नाही की त्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे ६०,१५० रुपये कर भरावा लागेल, त्याचे उत्पन्न १,००० रुपयांनी कमी असले असते तर त्याला काहीच कर भरावा लागला नसता. म्हणजे १,००० रुपयांच्या अतिरिक्त उत्पन्नासाठी त्याने ६०,१५० रुपयांचा भुर्दंड भरावा का? करदात्यांना हा भुर्दंड सोसावा लागू नये यासाठी या कलमात सीमांत सवलतीची तरतूद आहे. या तरतुदीनुसार करदात्याचे उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि त्याचा देय कर १२ लाखांवरील उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर, १२ लाख रुपयांच्या वर जे उत्पन्न आहे त्यापेक्षा जास्त कर करदात्याला भरावा लागणार नाही. त्यामुळे वरील उदाहरणात १२,०१,००० उत्पन्नावर करदात्याला फक्त १,००० रुपयेच कर भरावा लागेल. ही सीमांत सवलत जुनी करप्रणाली स्वीकारणाऱ्यांसाठी नाही.

३. सवलतीच्या दरात कर : करदात्याला जुन्या करप्रणालीनुसार पात्र वजावटी घेऊन करदात्त्याच्या उत्पन्नावर खालील प्रमाणे कर भरावा लागेल :

१. अति-ज्येष्ठ नागरिकांसाठी (८० वर्षांपेक्षा जास्त) प्रथम ५ लाख रुपयांच्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० ते ८० वर्षे) प्रथम ३ लाख रुपयांच्या आणि इतर करदात्यांसाठी २,५०,००० रुपयांच्या उत्पन्नावर – ०%,

२. ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख ते ५ लाख रुपयांवर आणि इतर करदात्यांसाठी २,५०,००० ते ५ लाख रुपयांवर – ५%,

३. ५ लाख ते १० लाख रुपयांच्या उत्पन्नावर – २०% ४. १० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर – ३०%

नवीन करप्रणालीनुसार करदात्याला त्याच्या उत्पन्नावर खालील प्रमाणे सवलतीच्या दरात कर भरावा लागेल :

१. प्रथम ४ लाख रुपयांच्या उत्पन्नावर – ०%

२. ४ लाख ते ८ लाख रुपयांच्या उत्पन्नावर – ५%

३. ८ लाख ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर – १०%

४. १२ लाख ते १६ लाख रुपयांच्या उत्पन्नावर – १५%

५. १६ लाख ते २० लाख रुपयांच्या उत्पन्नावर – २०%

६. २० लाख ते २४ लाख रुपयांच्या उत्पन्नावर – २५%

७. २४ लाख रुपयांच्या उत्पन्नावर – ३०%

४. अधिभारावर सवलत : जुन्या करप्रणालीमध्ये, उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी करावरील अधिभार ३७ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. परंतु, नवीन करप्रणाली नुसार अधिभाराचा कमाल दर २५ टक्के इतका मर्यादित करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या करदात्यांचे उत्पन्न ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना कराचा कमाल दर जुन्या करप्रणाली नुसार ४२.७४ टक्के तर नवीन करप्रणालीनुसार ३९ टक्के असेल.

जास्तीत जास्त करदात्यांनी नवीन करप्रणाली स्वीकारावी आणि सोप्या पद्धतीने कर भरावा यासाठी प्राप्तिकर कायद्यात या सवलती देण्यात आल्या आहेत.

जुनी करप्रणाली कशी निवडावी :

ज्या करदात्यांच्या उत्पन्नात ‘उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा’ समावेश आहे आणि त्यांना जुनी करप्रणाली निवडायची असेल तर त्यांना फॉर्म १० आयईए ऑनलाइन दाखल करून विवरणपत्र दाखल करता येते. जर त्यांनी हा फॉर्म १० आयईए विवरणपत्र दाखल करण्याच्या मुदतीत दाखल न केल्यास ते जुन्या करप्रणालीचा पर्याय निवडू शकत नाहीत. ज्या करदात्यांच्या उत्पन्नात ‘उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा’ समावेश नाही आणि अशांना जुन्या करप्रणालीनुसार कर भरावयाचा असेल तर त्यांना विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे, मुदतीनंतर विवरणपत्र दाखल केल्यास ते फक्त नवीन करप्रणाली नुसारच विवरणपत्र दाखल करू शकतात.

pravindeshpande1966@gmail.com