-आशीष ठाकूर
आता चालू असलेली शेअर बाजारातील तेजी ही ‘तेजीची झुळूक की शाश्वत तेजी’ असा संभ्रम गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला आहे. ‘चित्रा-चित्रातील फरक’ या संकल्पनेतून आज आपण तो दूर करण्याचा प्रयत्न करूया.
सूर्योदयाचे टिपलेले छायाचित्र व सूर्यास्ताचे टिपलेले छायाचित्र ही दोन्ही बाजूबाजूला ठेवली तर कुठले चित्र सूर्योदयाचे आणि कुठले सूर्यास्ताचे हे ओळखता येणार नाही इतकी ती हुबेहुब सारखी दिसतात,पण दिशेचं काय?
सूर्योदय म्हणजे आशा, उमेद, उत्साहाने भरलेली ओतप्रोत सकाळ. हे सर्व प्रत्यक्षात आले तर ‘आज अपना दिन बन गया’ अन्यथा त्या उत्साहावर, उमेदीवर पाणी फिरलं, तर हताश होत मावळत्या सूर्याला साक्ष ठेवत ‘अपना भी टाईम आयेगा’ असं म्हणत सूर्यास्ताची प्रतिक्षा करत राहणं. जस सुर्योदयात आणि सूर्यास्तात दिशेला जे महत्व आहे ते तसंच माणसाच्या बाबतीत देखील आहे. जर माणसाला आयुष्यात दिशा सापडली नाही तर त्याच्या आयुष्याची दशा ठरलेली. हेच तत्व आपण निफ्टी निर्देशांकावर लावणार आहोत.
मंदीत देखील निफ्टी निर्देशांकावर १,००० ते १,५०० अंशांची तेजी येतेच की, पण ते सूर्योदयाचा चित्र आहे की सूर्यास्ताच हे जाणून घेणं नितांत गरजेचं आहे. ते आज आपण निफ्टी निर्देशांकावरील विविध स्तरांवरून जाणून घेणार आहोत.
तेजीचा सूर्योदय
निफ्टी निर्देशांक सातत्याने २४,०००च्या वर एक महिना टिकल्यास तेजीची पालवी फुटुन निफ्टी निर्देशांकावरील तेजी ही २५,०००, २६,३००, २८,००० ते ३०,००० च्या वटवृक्षात रूपांतरित होईल.
सूर्योदयाच्या अगोदरच तांबड फुटणं
निफ्टी निर्देशांक २२,५०० चा स्तर टिकवत, २३,००० ते २३,५०० च्या परिघात (बँण्ड) टिकल्यास तेजीचं तांबड फुटण्यास अनुकूल वातावरण आहे असं समजण्यास हरकत नाही.
तेजीची धुक्यातील वाटचाल
निफ्टी निर्देशांक २३,००० ते २३,५०० चा स्तर पार करण्यात अपयशीही ठरेल. अशी परिस्थिती म्हणजे सूर्य तर उगवलाय पण धुक्यात, ढगामध्ये हरवला आहे. निफ्टी निर्देशांक २३,००० चा स्तर पार करण्यात आणि २२,३०० चा स्तर राखण्यात अपयशी ठरला, तर ही स्थिती म्हणजे तेजीची वाट धुक्यात हरवली जाणे म्हणता येईल. हे धुकं २१,८०० ते २१,००० पर्यंत गडद होत, तेजीची धुक्यात हरवलेली वाटचाल ठरेल.
दिशा सापडली नाही तर होणारी दशा
निफ्टी निर्देशांक २१,०००च्या स्तराखाली राहिल्यास, त्याचे प्रथम खालचे लक्ष्य २०,५०० व त्या नंतर १९,००० पर्यंत पडझड अपरिहार्य दिसते.
बँक निफ्टी निर्देशांक:
३० ऑक्टोबरचा बंद भाव: ५४,६८६.९५
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ५४,९००
बँक निफ्टी निर्देशांकाने ५४,९०० चा स्तर पार केल्यास, त्याचे प्रथम वरचे लक्ष्य ५५,४५०, द्वितीय लक्ष्य ५६,५०० असे असेल. मात्र बँक निफ्टी निर्देशांक ५४,९०० स्तराखालीच राहिल्यास त्याचे प्रथम खालचे लक्ष्य ५४,०००, द्वितीय खालचे लक्ष्य ५३,६५० असे असेल.
सेन्सेक्स:
३० ऑक्टोबरचा बंद भाव: ७४,४५९.५३
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ७४,६००
सेन्सेक्सने ७४,६०० चा स्तर पार केल्यास, त्याचे प्रथम वरचे लक्ष्य ७५,४०० आणि द्वितीय लक्ष्य ७६,३०० असे असेल. सेन्सेक्स ७४,६०० स्तराखालीच राहिल्यास, त्याचे खालचे लक्ष्य ७२,७०० असेल.
सोन्याची वाटचाल (एमसीएक्स आधारित):
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,४०,०००
सोन्याच्या ‘एमसीएक्स’वरील किंमतीत सुधारणा सुरू आहे. त्यात जर सोन्याच्या किंमतीने १,४०,००० चा स्तर सातत्याने राखल्यास, सोन्याच्या किंमतीचे प्रथम वरचे लक्ष्य १,४६,०००, द्वितीय वरचे लक्ष्य १,४९,००० असेल. मात्र ‘एमसीएक्स’वर सोन्याच्या किंमतीला १,४०,००० चा स्तर राखता आला नाही, तर सोन्याचे खालचे लक्ष्य १,३४,३५० असेल.
चांदीची वाटचाल (‘एमसीएक्स’ आधारित):
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,९०,०००
याच स्तंभातील जुलै आणि ऑक्टोबरच्या लेखात चांदीच्या आलेखावर २,३०,००० ते २,२४,००० हे ‘महत्त्वाचे केंद्रबिंदू स्तर असतील’ म्हणून सातत्याने अधोरेखित केलेले होते. सप्टेंबर महिन्यात चांदीचा भाव २,४३,००० होता. त्यानंतर चांदीने २,२४,००० चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडल्याने, ‘एमसीएक्स’वर चांदीचे भाव कोसळण्यास सुरुवात झाली. आर्थिक नियतकालिकांमध्ये ‘चांदीचे भाव कोसळले’ ही ठळक मथळ्याची बातमी ठरली. सद्यःस्थितीत ‘एमसीएक्स’वर चांदीच्या किंमतीने १,७०,०००चा स्तर सातत्याने राखल्यास, तिच्या किंमतीचे प्रथम वरचे लक्ष्य १,९०,००० तर द्वितीय वरचे लक्ष्य २,२५,००० असेल. ‘एमसीएक्स’वर चांदीच्या किंमतीला १,७०,०००चा स्तर राखण्यास अपयश आल्यास, चांदीचे खालचे लक्ष्य १,५०,००० असेल.
(लेखक आशीष ठाकूर भांडवली बाजार विश्लेषक आहेत. ashishthakur1966@gmail.com)
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीनआहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी ‘स्टाँप लाँस’आणी इच्छीत लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
