scorecardresearch

मिले सूर मेरा तुम्हारा, ताज्या अत्युच्च वाटचालीत, ‘निफ्टी’ला १९,००० पुढचे लक्ष्य गाठता येईल?

सेन्सेक्स व निफ्टीने त्या दिवशी उच्चांकासमीप वाटचाल करत तिघांचाही ‘मिले सूर मेरा तुम्हारा, तो तेजीका सूर बने हमारा’ अशी किमया घडून आली.

मिले सूर मेरा तुम्हारा, ताज्या अत्युच्च वाटचालीत, ‘निफ्टी’ला १९,००० पुढचे लक्ष्य गाठता येईल?
मिले सूर मेरा तुम्हारा, ताज्या अत्युच्च वाटचालीत, ‘निफ्टी’ला १९,००० पुढचे लक्ष्य गाठता येईल?

आशीष ठाकूर

एखाद्या देशाची आर्थिक, औद्योगिक प्रगतीच्या मोजमापासाठी भांडवली बाजाराच्या निर्देशांकाकडे बघितले जाते. आजच्या घडीला बीएसई सेन्सेक्स, एनएसई निफ्टी ५० आणि बँक निफ्टी अशी तीन निर्देशांक भावंडे ही आपल्याकडे आर्थिक, औद्योगिक प्रगतीच्या मोजमापासाठी वापरली जातात. इतके दिवस बँक निफ्टी नवीन उच्चांकाच्या निरभ्र आकाशात स्वच्छंदीपणे विहार करत आपल्या भावंडांना आर्जव करत होती. कधी तुमचा खडा, पहाडी तेजीच्या आवाजाचा सूर आसमंतात घुमत आपल्या तिघांचा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ एकत्रपणे गुंतवणूकदारांच्या कानामनांत रुंजी घालतील अशी त्यामागची आस. पण ती प्रतीक्षा सरलेल्या सप्ताहातील गुरुवारी संपली. सेन्सेक्स व निफ्टीने त्या दिवशी उच्चांकासमीप वाटचाल करत तिघांचाही ‘मिले सूर मेरा तुम्हारा, तो तेजीका सूर बने हमारा’ अशी किमया घडून आली. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ६२,२९३.६४ / निफ्टी: १८,५१२.७५

गेल्या लेखात निफ्टी निर्देशांकावर जी विश्रांती चालू होती तिचे स्वरूप जाणून घेताना, खालील वाक्य रचना केलेली होती – ‘येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकांने १८,००० चा स्तर सातत्याने राखल्यास, या घसरणीचे स्वरूप हे हलके-फुलके असेल. ही घसरण पूर्ण होत निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १८,६०० ते १८,९०० असे असेल.’ या वरच्या लक्ष्याची शक्यता आता बळावली आहे.

येणाऱ्या दिवसात उपरोक्त वरचे लक्ष्य साध्य केल्यावर पुन्हा हलकीफुलकी अशी पाचशे ते आठशे अंशांची घसरण गृहीत धरायला हवी. या मध्यावधी घसरणीत निफ्टी निर्देशांकाने १८,००० चा स्तर राखल्यास, निफ्टी निर्देशांक पुन्हा तेजीचा फेर धरत १९,२०० च्या लक्षाकडे झेपावेल.

‘शिंपल्यातील मोती’ / लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

‘जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी’अशी बिरुदावली गेली ६५ वर्षे मिरवणारी, भारतात विम्याच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवणारी, भारतात खासगी व सरकारी क्षेत्रात अवजड उद्योगधंदे उभारणीसाठी बीजभांडवल पुरविणारी ‘लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’. आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ एलआयसीचा समभाग असणार आहे, हे वाचल्यावर अनेकांच्या कपाळावर सूक्ष्म आठ्या उमटल्या असतील. त्या मागील मानसिक कारण… एखादी व्यक्ती दीर्घ मुदतीचा विमा उतरवते त्याचा मुख्य उद्देश, आपल्या पश्चात कुटुंबाची आर्थिक आबाळ होऊ नये म्हणून विमा कवच घेतले जाते. या प्रक्रियेत विमाधारकाचे जास्तीतजास्त आयुष्य हे विम्याचे हप्ते भरण्यातच सरते. विम्याची मुदत (पॉलिसीची मुदत) संपल्यानंतर जे पैसे येतात त्यात कुटुंबाची ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करण्यात हे पैसे वापरले जातात. त्यामुळे विमाधारकांना एकच प्रश्न पडतो ‘मने सू’ अर्थात मला काय? त्या दृष्टीने एलआयसीची प्रारंभिक समभाग विक्री ही तमाम गुंतवणूकदारांनी ‘कौन बनेगा करोडपती’ची संधी म्हणून बघितली. अपेक्षा ठेवली व त्यासाठी सरकारी क्षेत्रातीलच ‘आयआरसीटीसी’चा भांडवली बाजारातील इतिहास डोळ्यासमोर ठेवला गेला.

आता ‘विमा पॉलिसी घेणे म्हणजे गुंतवणूक नव्हे’ या गुंतवणुकीच्या सोनेरी नियमाची आठवण करून देत, बाजाराची चमत्कारिक वागणूक या समभागाला मिळाली. ‘गुंतवणूक नाही तर परतावा कसा?’ या न्यायाने एलआयसीची प्रारंभिक समभाग विक्रीच्या किमतीलाच ९०० रुपयांच्या आसपास भांडवली बाजारात नोंदणी होऊन समभाग ५८८ रुपयांपर्यंत घसरला. मुद्दलातच खोट आली. (त्याच वेळेला बाजारदेखील कोसळला होता निफ्टी निर्देशांक १५,१८३ पर्यंत खाली आलेला) या सर्व अपेक्षाभंगाच्या आठवणीत, दाहक घसरणीत, आर्थिक जखमांवर नुकतीच कंपनीने हळुवार फुंकर आपल्या तिमाही आर्थिक कामगिरीच्या जोरावर घालायचा प्रयत्न केला. कंपनीने आपल्या निव्वळ नफ्यात घसघशीत अशी दहा पट वाढ केली, सप्टेंबर २०२१ मध्ये अवघा १,४३३ कोटींचा नफा सप्टेंबर २०२२ मध्ये १५,९५२ कोटींवर झेपावला. तर एकरकमी विम्याचा हप्ता (प्रीमियम) भरणाऱ्यांमध्ये ६२ टक्क्यांची वृद्धी झाली व आजही विमा क्षेत्रात कंपनीचा ६८ टक्के हिस्सा आहे.

आता ही दमदार आर्थिक कामगिरीला समभागाच्या किमतीच्या वाटचालीशी मेळ घालण्यासाठी, आपण त्या समभागाच्या अंतरंगात डोकावून पाहू. त्यासाठी शुक्रवार २५ नोव्हेंबरचा बंद भाव ६२७.७५ रुपये आधारभूत मानू या.

५८० ते ७२५ रुपयांच्या दरम्यानची वाटचाल: विमा कंपनीकडून, त्यांच्या प्रतिनिधींकडून निर्देशित तारखेच्या महिनाभर अगोदर स्मरणपत्र येऊनही कामाच्या अतिरिक्त व्यापामुळे इच्छा असूनही विम्याचा हप्ता शेवटच्या दिवशी अथवा वाढीव दिवसात (ग्रेस पिरीयडमध्ये) जसा भरला जातो तसा ५८० ते ७२५ रुपयांच्या दरम्यानची ही रटाळ वाटचाल आहे. पण ही वाटचाल दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी खरेदीची सुवर्णसंधी ठरेल. त्यासाठी गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतवता २० टक्क्यांच्या पाच तुकड्यात प्रत्येक घसरणीत हा समभाग दीर्घमुदतीसाठी खरेदी करावा.

७२५ ते ९२० रुपयांच्या स्तरावरील वाटचाल: भविष्यात समभागाची किंमत ७२५ रुपयांच्या स्तरावर पाच दिवस टिकल्यास, तसेच या स्तरावर उलाढालीचा (व्हॉल्यूम) भरभक्कम आधार लाभल्यास, ९२० रुपयांचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य असेल.

९२० रुपयांच्या स्तरादरम्यानची वाटचाल: ५८८ रुपयांचा खालचा भाव बघितल्यामुळे, ९२० रुपयांच्या आसपास मुद्दल मिळतं आहे ना बस! या स्तरावर समभाग विकून मोकळे व्हावे, जसे की विमा पॉलिसी समर्पण (सरेंडर) करायची भाषा. या न्यायाने ९२० रुपयांच्या स्तरावर समभाग समर्पित केला जाणार. या स्तरावर तुफान विक्री होणार.

पण भविष्यात ९२० रुपयांच्या स्तरावर समभागाची किंमत एक महिना टिकल्यास समभागाचे वरचे लक्ष्य १,०५० ते १,१५० रुपये असेल. दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी ५२५ रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवून हा समभाग टप्प्याटप्प्याने संग्रहित करीत जाणे श्रेयस्कर ठरेल.

महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची,अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांसाठी सादर केलेले आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’आणि ‘इच्छित लक्ष्य’ (टार्गेट प्राइस) या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र ( Personal-finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 11:36 IST

संबंधित बातम्या