कौस्तुभ जोशी
Nifty IT Index Crash Marathi : गेल्या महिन्याच्या मध्यावर अमेरिकेतील बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी असलेल्या अॅक्सेंच्युअर या कंपनीने पुढील वर्षासाठीचे नफ्याचे अंदाज वर्तवल्यावर अचानकपणे या क्षेत्रात खळबळ उडाली. कंपनीने पूर्ण वर्षासाठीचे उत्पन्नाचे आकडे तीन ते चार टक्क्यांनी कमी असतील, असे भाकीत वर्तवले आहे. अमेरिकेतील शेअर बाजाराशी संबंधित संशोधन संस्थांच्या अहवालानुसार चौथ्या तिमाहित कंपनीचा विक्रीचा आकडा १८ अब्ज डॉलर असायला हवा तो एक अब्ज डॉलरने कमी होणार आहे. कंपनीने चार अब्ज डॉलर गुंतवून सायबर सिक्युरिटीमधील एक कंपनी विकत घेण्याचे जाहीर केले. असे असून सुद्धा कंपनीचा शेअर तब्बल १४ टक्क्याने घसरला. ज्यावेळी हे अमेरिकेत घडत होते, त्यानंतर अर्थातच त्याचे परिणाम भारतातील आयटी कंपन्यांच्या शेअरवर दिसू लागले.
एकेकाळी भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांसाठी ‘वेल्थ क्रिएटर’ बनवणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्या नक्की कशा परतावे देणार आहेत? आगामी काळात हे बघणे औचित्याचे ठरणार आहे. अगदी मागच्या आठवड्यात क्षेत्रातील पडझडीचा विचार केल्यास अन्य सेक्टर मध्ये तेजी दिसून येत असताना किंवा आघाडीचे निफ्टीतील शेअर वाढत असताना आयटी क्षेत्राला मात्र तेजी टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. निफ्टी आयटी इंडेक्स बघितल्यास टीसीएस, इन्फोसिस, विप्रो अशा मोठ्या कंपन्यांमध्येच पडझड होते आहे असे नाही, तर टेक महिंद्र, टाटा एल्कसी, केपीआयटी, टाटा टेक्नॉलॉजी अशा सर्वच आघाडीच्या कंपन्या आपटताना दिसून आल्या.
तंत्रज्ञान कंपन्या आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्या यातील फरक
अमेरिकेतील शेअर बाजारांचा गेल्या पाच वर्षाचा अभ्यास केल्यास तंत्रज्ञान कंपन्यांनी बाजारावर कब्जा केल्याचे दिसते. तंत्रज्ञानात नवनिर्मिती आणि कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयचा वापर यामुळे मेटा, गुगल, एनव्हिडिया अशा कंपन्या घसघशीत परतावा देत आहेत, असे दिसते. भारतीय कंपन्यांचा विचार केल्यास तसे दिसत नाही. याचे कारण दोन्ही देशातील व्यवसायात असलेला फरक. तो नेमका काय आहे? अमेरिकन कंपन्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करतात तर भारतातील कंपन्या स्वस्त मनुष्यबळ वापरून दुसऱ्या कंपन्यांची कामे करून देतात. आपण ज्याला ‘आऊट सोर्सिंग’ म्हणतो ते भारतीय कंपन्यांचे बलस्थान आहे. जे काम करण्यासाठी परदेशात तिकडचा माणूस कामावर ठेवला तर जेवढे पैसे घेतो त्यापेक्षा अत्यंत कमी पैशात तेच काम भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून इकडे करून घेता येते. या सोप्या मॉडेलवर भारतीय कंपन्यांचा व्यवसाय चालू आहे.
निफ्टी आयटी इंडेक्स तब्बल २० टक्क्याहून अधिक घसरला
अलीकडे उदयास आलेल्या तंत्रज्ञानामुळे व्यावसायिक कामांमध्ये माणसांचा वापर कमी आणि यंत्रांचा वापर जास्त अशी स्थिती आहे. मग भारतीय कंपन्यांचा एकूणच व्यवसाय कमी होईल का? अशी भीती वाटू लागली आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा नफा परदेशातील कंपन्यांच्या माहिती तंत्रज्ञानावरील खर्चावर अवलंबून असतो. म्हणजेच अमेरिका युरोपमधील कंपन्यांनी आपल्या आयटीच्या बजेटला कात्री लावली तर आपोआप इकडच्या कंपन्यांना कमी कंत्राट मिळतात किंवा कमी पैसा मिळतो. त्यातून अलीकडील वर्षभरात जागतिक पातळीवर सुरू असलेली अस्थिरता आणि एकूणच नजीकच्या भविष्याबद्दल वाटणारी काळजी यामुळे नवीन उद्योगात कंपन्या पैसे गुंतवायला तयार नाहीत. परिणामी भारतातील आयटी कंपन्यांचे नफ्याचे आकडे जरी चांगले दिसले तरीही गुंतवणूकदार त्याकडे गांभीर्याने बघत नाहीत. गेल्या सहा महिन्यापासून निफ्टी आयटी इंडेक्स तब्बल २० टक्क्याहून अधिक घसरला आहे यातच सारे आले.
नंदन निलेकेणी यांचे मत काय?
इन्फोसिस या कंपनीच्या ४५ व्या वार्षिक सभेत बोलताना भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले नंदन निलेकेणी यांनी भारतीय आयटी कंपन्यांवर एआयच्या तंत्रज्ञानाचा प्रभाव पडेल मात्र स्वस्त मनुष्यबळाची गरज भागवण्याची भारतीय आयटी कंपन्यांची क्षमता अजूनही संपलेली नाही. जोपर्यंत अशी कामे करण्याची गरज आहे, तोपर्यंत भारतीय कंपन्यांना वाव आहे. नव्याने उदयाला आलेले यायचे तंत्रज्ञान भारतीय कंपन्यांमध्ये आणणे आणि त्याचा कार्यक्षम वापर करणे महाकाय कंपन्यांसाठी कठीण आहे. त्यामुळे इन्फोसिस सारख्या कंपन्यांना अधिक संधी मिळेल असेही ते म्हणतात. कंपनीच्या सध्याच्या ९० टक्के ग्राहकांबरोबर कृत्रिम प्रज्ञेच्या संदर्भात तंत्रज्ञान भागीदारी करण्यास सुरुवात झाली आहे, म्हणूनच कृत्रिम प्रज्ञा आयटी कंपन्यांसाठी आव्हानात्मक असेल, पण पर्याय म्हणून त्याकडे बघणे योग्य नाही.
इन्फोसिस, टीसीएस, विप्रो हवेच का?
भारतातील ९० च्या दशकात गुंतवणूक सुरू केलेल्या जवळपास सगळ्या यशस्वी गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी आणि विप्रो हे शेअर नक्कीच असतात. बक्षीस (बोनस), लाभांश आणि समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) अशा विविध प्रकारांनी या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. ९० च्या दशकात भारतीय आयटी कंपन्या ‘ड्रीम कंपन्या’ असायच्या. युरोप, अमेरिका अशा सर्वच महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये भारतीय आयटी कंपन्या आपले व्यवसाय जोमदारपणे करत होत्या आणि आहेतही, पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे शेअर पोर्टफोलिओमध्ये हवेच का? हा प्रश्न समोर येतो आहे. डोळे झाकून हे शेअर विकत घ्यावे, अशी परिस्थिती दिसत नाही. एकंदरीत या क्षेत्राचे ‘री-रेटिंग’ होते आहे अशी स्थिती आहे.
आयटी क्षेत्राचे मध्यमकालीन चित्र
- एकीकडे भारतीय आयटी कंपन्या परदेशी कंपन्या विकत घेत असतानाच नफ्याची पातळी कायम राखतात का? याचा अभ्यास पुढच्या तीन वर्षात करावा लागणार आहे.
- लार्ज कॅप आयटी कंपन्यांनी नफ्यातील वाढीचे आकडे अगदीच कमी पातळीवर दाखवले असले, तरीही अभियांत्रिकी आणि विशेष डिजिटल सेवा पुरवणाऱ्या मिडकॅप आयटी कंपन्यांनी चमकदार कामगिरी केली आहे त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे.
- बदलत्या एआय मॉडेल्समध्ये आपला व्यवसाय कोणती कंपनी टिकवून ठेवते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गेल्या दहा वर्षात कृत्रिम प्रज्ञा ज्या वेगाने बदलत गेली आहे तो वेग कंपन्यांना पकडणे अवघड होत आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे किती फायदेशीर आहे, याचाही विचार कंपन्या करणारच आहेत.
- मशीन लर्निंग सायबर सिक्युरिटी आणि एआयमधील कुशल मनुष्यबळ कंपन्या किती प्रमाणात आकर्षून घेतात? यावर व्यवसाय किती वाढेल हे ठरेल. एकीकडे अमेरिकेतून नोकरी गमावलेले अनुभवी तंत्रज्ञ आणि दुसरीकडे भारतातील नव्या दमाचे तरुण यांचा यांच्यातील संतुलन कंपनीला कंपन्यांना ठेवावे लागणार आहे.
- म्युच्युअल फंड कंपन्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आपली गुंतवणूक एकूण पोर्टफोलिओच्या सहा ते सात टक्क्यापर्यंत मर्यादित ठेवण्यास पसंती दिली आहे. एकेकाळी ही गुंतवणूक दहा ते पंधरा टक्के सुद्धा असायची! यावरूनच फंड मॅनेजरचा सावध पवित्रा स्पष्टपणे दिसून येतो.
लेखक अर्थ-अभ्यासक आणि वित्तीय नियोजनकार आहेत, joshikd28gmail.com
