गेल्या महिन्यात या स्तंभातील (अर्थवृत्तान्त, ६ एप्रिल) लेखात निफ्टीने नीचांक नोंदवायचा शब्द दिलेला. तांत्रिक विश्लेषणातील खालील प्रमेयांवर तो बेतलेला आहे आणि त्यामागचे गृहीतक असे होते.
१) साप्ताहिक आलेखावर ‘आरएसआय’ ३० अंशावर आलेला. जो मंदीचे आवर्तन संपून तेजीचे संकेत देत होता.
२) अस्थिरता निर्देशांक अर्थात ‘विक्स’ हा २८ ते ३०च्या उच्चांकावर पोहोचलेला. जो तळ गाठण्याचे सूतोवाच करत होता.
३) ‘गॅन कालमापन’ पद्धतीप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात नीचांक प्रस्थापित होण्याचे संकेत मिळत होते.
जे झालं तेदेखील या गृहीतकांप्रमाणेच. २ एप्रिलला निफ्टी निर्देशांकाने २२,१८२ चा नीचांक हा दिलेल्या शब्दाप्रमाणे नोंदवला. निफ्टीने तिच्यात केलेली ही २,४०० अंशाची सुधारणा दर्शवली. त्यावेळचे एकंदर वातावरण उदास, रखरखीत. पण त्यातही निश्चिततेचा दाखला असलेला निफ्टीचा शब्द हा अमृतासारखे, नवसंजीवनी देणारे होते. त्याचे प्रत्यंतर आज आपण अनुभवत आहोत.


आता चालू असलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आर्थिक आघाडीवरच्या अनिश्चिततेच्या वातावरणात आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, इराण, इस्रायल यामध्ये शाश्वत स्वरूपातील युद्धसमाप्ती होऊन शांतता प्रस्थापित होइल का? ११५ डॉलर प्रति पिंपाच्या पल्याड उकळी मारणारे खनिज तेल पाहता, आपल्याकडे पेट्रोल, डिझेलचे प्रति लिटर किती भाववाढ होणार? भाव एकदाच वाढणार की वारंवार? या तेलाच्या उकळीमुळे किती टक्क्यांच्या चलनवाढीची ग्राहकांच्या पाकिटाला फोडणी बसणार? असे एक ना अनेक प्रश्न आज आ वासून उभे ठाकले आहेत. या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी ‘तांत्रिक विश्लेषणातील महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेचा आधार घेऊ या.

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २४,००० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ आहे. येणाऱ्या दिवसातील चांगल्या, वाईट घटना या निफ्टी निर्देशांकावरील २४,०००च्या स्तरावर ‘तावून सुलाखून’ बाहेर पडल्या पाहिजेत. जसे की आज विधानसभेच्या जाहीर होणाऱ्या प्रत्यक्ष निकालात विशेषतः पश्चिम बंगाल या राज्यात केंद्रातील भाजपला बहुमत मिळाल्यास निफ्टी निर्देशांक २४,०००चा स्तर राखत, त्याचे २४,३००, २४,६००, २४,९००, २५,२०० हे स्तर दृष्टिपथात येतील. निफ्टी निर्देशांक २५,५०० स्तरावर सातत्याने एक महिना टिकल्यास, वरील सर्व अप्रिय घटना बासनात बांधून निफ्टीची स्थिती ही ‘फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश’ या वर्णनागत होईल. ही शाश्वत तेजीची सुरुवात असेल.
ही नाण्याची एक बाजू असेल. वरील सर्व अप्रिय घटना या ‘भय इथले संपत नाही’सारख्या पुनरावृत्तीस्वरूपात पुन्हा उभ्या ठाकल्या तर, निफ्टी निर्देशांक २४,००० स्तराखालीच टिकून, निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य २३,५००, २३,१००, २२,८०० ते २२,५०० असेल.

बँक निफ्टी निर्देशांक
३० एप्रिलचा बंद भाव : ५४,८६३.३५

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ५४,३५०
बँक निफ्टी निर्देशांकाने ५४,३५०चा स्तर सातत्याने राखल्यास बँक निफ्टीचे प्रथम वरचे लक्ष्य ५५,५००, द्वितीय लक्ष्य ५६,२५० असेल. बँक निफ्टी निर्देशांक ५४,३५०चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास, त्या निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य ५२,८००, तर द्वितीय खालचे लक्ष्य ५१,१०० असेल.

सेन्सेक्स

३० एप्रिलचा बंद भाव: ७६,९१३.५०
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ७६,२५०

सेन्सेक्सने ७६,२५०चा स्तर सातत्याने राखल्यास, सेन्सेक्सचे प्रथम वरचे लक्ष्य ७८,००० आणि द्वितीय लक्ष्य ७८,५०० असेल. सेन्सेक्स ७६,२५०चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास त्याचे खालचे लक्ष्य ७४,७००असेल.

सोन्याची वाटचाल

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,५०,०००
एमसीएक्सवरील सोन्याच्या किमतीने १,५०,००० ॉचा स्तर सातत्याने राखल्यास, सोन्याच्या किमतीचे प्रथम वरचे लक्ष्य १,५५,०००, द्वितीय वरचे लक्ष्य १,६१,००० असेल. मात्र एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीला १,५०,०००चा स्तर राखता आला नाही, तर सोन्याचे खालचे लक्ष्य १,४०,००० असेल.

चांदीची वाटचाल
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,३५,०००

एमसीएक्सवर चांदीच्या किमतीने २,३५,०००चा स्तर सातत्याने राखल्यास, तिच्या किमतीचे प्रथम वरचे लक्ष्य २,४५,०००, तर द्वितीय वरचे लक्ष्य २,५३,००० असेल. एमसीएक्सवर चांदी २,३५,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास, चांदीच्या किमतीचे प्रथम खालचे लक्ष्य २,२५,०००, द्वितीय खालचे लक्ष्य २,१५,००० असेल.

(लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

संपर्क ई-मेल: ashishthakur1966@gmail.com)

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.