NPS Swasthya Pension Scheme : दुपारी ऑफिसमध्ये जेवत असतानाच समीरचा फोन वाजतो. त्याचा ४ वर्षांचा मुलगा खेळताना पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. धावत पळत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी तातडीने पैसे भरण्यास सांगतात. कारण, त्याच्या आरोग्य विम्यात संपूर्ण कवच मिळत नाही. शेअर बाजार, म्युच्युअल फंडात त्याने पैसे गुंतवल्याने लगेच मिळणे शक्य होत नाही. अशा प्रसंगातून दरवर्षी लाखो भारतीय कुटुंबं जातात, जिथे त्यांना स्वतःची मालमत्ता किंवा दागिने विकण्याची वेळ येते. या आर्थिक तणावातून मुक्त करण्यासाठी आता ‘रिटायरमेंट’ आणि ‘हेल्थ फायनान्स’ या दोन गोष्टींना एकाच योजनेत गुंफण्यात आले आहे.

काय आहे NPS स्वास्थ्य स्कीम?

सोप्या भाषेत सांगायचे तर, नॅशनल पेन्शन सिस्टम मधील जमा निधीचा एक ठराविक हिस्सा गरज पडल्यास उपचारासाठी वापरता येतो. यामुळे अचानक आलेल्या हॉस्पिटलच्या बिलासाठी नातेवाईकांकडे हात पसरण्याची किंवा सुरू असलेली गुंतवणूक मोडण्याची गरज पडणार नाही. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, उपचाराचा पैसा थेट हॉस्पिटलला जमा केला जातो.

पायलट प्रोजेक्ट आणि विविध मॉडेल्स

  • सध्या ही योजना पूर्णपणे लाँच झालेली नसून प्रायोगिक तत्वावर तपासली जात आहे. कंपन्या सध्या या मॉडेलच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करत आहेत. सध्यातरी ही योजना दोन मुख्य मॉडेल्सवर काम करत आहे.
  • पहिले मॉडेल : यामध्ये ICICI प्रुडेन्शियल पेन्शन फंड आणि अपोलो हॉस्पिटल्स एकत्र आले आहेत.
  • दुसरे मॉडेल : यामध्ये ॲक्सिस पेन्शन फंड, टाटा पेन्शन फंड आणि आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स या कंपन्यांचा समावेश आहे.
  • या दोन्ही मॉडेल्सचा मुख्य उद्देश हाच आहे की, रुग्णालयात पोहोचल्यावर पैशांच्या चिंतेमुळे उपचारात वेळ जाऊ नये.

आरोग्य विम्याच्या पर्यायाचा संभ्रम

अनेकजण या योजनेला ‘हेल्थ इन्शुरन्स’चा पर्याय समजत आहेत. परंतु, तसे अजिबात नाही. हा एक अतिरिक्त बॅकअप आहे. अनेकदा विमा पॉलिसीमध्ये रूम रेंट लिमिट किंवा को-पेमेंटमुळे (उदा. ८० टक्के रुग्णालय आणि २० टक्के पेशंट) स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतात. अशा वेळी एनपीएस स्वास्थ्य योजना मदतीला येते. हा विम्याचा पर्याय नसून आपात्कालीन परिस्थितीत मोठा आधार आहे.

योजनेची पात्रता आणि अटी काय आहेत?

  1. जर तुमचे एनपीएस खाते असेल, तर तुम्ही या योजनेशी जोडू शकता. ज्यांचे खाते नाही, ते नवीन खाते उघडून याचा लाभ घेऊ शकतात.
  2. १८ ते ७० वर्षांपर्यंतचे नागरिक यात गुंतवणूक करू शकतात.
  3. ४० वर्षांनंतर वापरकर्ता आपल्या एनपीएस निधीतील सुमारे ३०% हिस्सा स्वास्थ्य पेन्शन योजनेत वर्ग करू शकतो.
  4. किमान ५०,००० रुपये जमा झाल्यानंतरच यातून पैसे काढता येतात.
  5. यात पैसे थेट हॉस्पिटलला जातात, त्यामुळे क्लेम करण्यासाठी लागणाऱ्या कटकटीपासून ग्राहकाची सुटका होते.

या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट म्हणजे “वेग”. म्युच्युअल फंडातून पैसे येण्यास २-३ दिवस लागतात, पण इथे काही क्लिकवर पेमेंटला मंजुरी मिळते, ज्यामुळे उपचारात विलंब होत नाही.

धोका आणि जोखीम घटक

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तशाच या योजनेलाही आहेत. निवृत्तीसाठी वाचवलेला पैसा उपचारावर खर्च करणे भविष्यासाठी महागात पडू शकते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही वारंवार यातून पैसे काढले, तर निवृत्तीनंतरचा मुख्य निधी कमी होऊ शकतो. तसेच, एनपीएस हे शेअर बाजाराशी जोडलेले असल्याने, बाजार खाली असताना पैसे काढल्यास नुकसान होण्याची शक्यता असते.

तुम्ही ही योजना निवडावी का?

जर तुमच्याकडे पुरेसा हेल्थ इन्शुरन्स आणि आपत्कालीन निधी असेल, तर ही योजना तुमच्यासाठी अत्यावश्यक नाही. परंतु, ज्यांचा विमा कमी आहे आणि बचत मर्यादित आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पूर्वी निवृत्ती निधीकडे केवळ पेन्शन म्हणून पाहिले जायचे, पण आता गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन ही नवी विचारसरणी समोर आली आहे. विशेषकरुन ही योजना मध्यमवर्गीयांसाठी आर्थिक कवच म्हणून काम करेल. मात्र, गुंतवणूकदारांनी आपल्या ‘रिटायरमेंट कॉर्पस’वर परिणाम होणार नाही, याची काळजी घेऊनच हा पर्याय वापरावा.