प्रवीण देशपांडे
शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जाणारे आणि परदेशात स्थायिक होणारे यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जे नागरिक भारताबाहेर वास्तव्य करून आहेत ते अनिवासी भारतीय म्हणून ओळखले जातात. भारतात करआकारणी आणि करपात्र उत्पन्नाची व्याप्ती ही करदात्याच्या निवासी दर्जावर अवलंबून असते. प्राप्तिकर कायद्यानुसार, निवासी दर्जासाठी, करदात्यांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, ते म्हणजे (१) निवासी आणि (२) अनिवासी. निवासी करदात्यांचे पुढे दोन उप-प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते: (१) निवासी आणि साधारणपणे निवासी आणि (२) निवासी परंतु साधारणपणे निवासी नाही.
निवासी दर्जा कसा ठरविला जातो
प्राप्तिकर कायद्यानुसार, करदात्याचा निवासी दर्जा हा त्याच्या आर्थिक वर्षातील भारतातील वास्तव्यावर अवलंबून असतो. हा दर्जा ठरविण्यासाठी प्राप्तिकर कायदा कलम ६ मध्ये काही निकष दिलेले आहेत. या निकषानुसार त्याच्या भारतातील वास्तव्यानुसार ती व्यक्ती या कायद्यासाठी “निवासी” आहे की “अनिवासी” आहे हे ठरविता येते. हा दर्जा ठरविण्यासाठी आर्थिक वर्षातील (१ एप्रिल ते ३१ मार्च) भारतातील वास्तव्य विचारात घेतले जाते. निवासी दर्जाचे मूल्यांकन प्रत्येक कर-वर्षासाठी स्वतंत्रपणे केले जाते. त्यामुळे जे करदाते भारताबाहेर वास्तव्य करतात त्यांनी हा दर्जा दरवर्षी तपासून बघितला पाहिजे. करदात्यांनी आपला योग्य निवासी दर्जा ठरविणे गरजेचे आहे कारण या निवासी दर्जावर प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी अवलंबून आहेत.
कोणते उत्पन्न करपात्र आहे
या प्रमाणे निवासी दर्जा ठरल्यानंतर त्या करदात्याचे कोणते उपन्न करपात्र आहे ते ठरते. निवासी भारतीयांना जागतिक उत्पन्न करपात्र आहे. भारतात किंवा भारतातून उत्पन्न मिळवणाऱ्या अनिवासी भारतीयांना ते भारतीय कायद्यांनुसार कर भरावा लागतो. अनिवासी भारतीयांच्या भारताबाहेरील उत्पन्नावर कर आकारला जात नाही. उदा. भारतातील स्थावर मालमत्तेवर मिळालेले उत्पन्न हे भारतात करपात्र आहे, तसेच, भारतीय कंपनीने जाहीर केलेल्या लाभांशावर करदात्याला भारतातच कर भरावा लागतो.
अनिवासी भारतीयांसाठी विवरणपत्राचा फॉर्म
अनिवासी भारतीयांसाठी फॉर्म २ किंवा फॉर्म ३ मध्ये विवरणपत्र दाखल करता येते. ज्या करदात्यांच्या उत्पन्नात उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही असे अनिवासी करदाते फॉर्म २ मध्ये विवरणपत्र भरू शकतात आणि ज्या करदात्यांच्या उत्पन्नात उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश आहे असे अनिवासी करदाते फॉर्म ३ मध्ये विवरणपत्र दाखल करू शकतात.
अनिवासी भारतीयांसाठी काही खास तरतुदी
प्राप्तिकर कायद्यानुसार अनिवासी भारतीय. वजावटी आणि सवलती उत्पन्न आणि करातून घेऊ शकतो. परंतु काही वजावटी आणि सवलती अनिवासी भारतीयांना मिळत नाहीत.
- १. निवासी आणि अनिवासी भारतीयांसाठी कर-टप्प्यांचे दर समान आहेत. जुन्या करप्रणालीनुसार ज्येष्ठ (वय वर्षे ६० ते ८०) आणि अति ज्येष्ठ नागरिकांना (वय ८० वर्षांपेक्षा जास्त) कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अनुक्रमे ३ लाख आणि ५ लाख रुपयांची अनिवासी भारतीयांना मिळत नाही. त्याच्यासाठी ही मर्यादा २,५०,००० रुपये इतकीच असेल, यासाठी त्याचे वय विचारात घेतले जात नाही.
- २. नवीन करप्रणाली नुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कलम ८७ एच्या तरतुदीनुसार मिळणारी कर सवलत विचारात घेऊन करदात्याला नियमित उत्पन्नावर १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही. ही सवलत अनिवासी भारतीयांना मिळत नाही.
- ३. ज्येष्ठ निवासी भारतीय करदात्याला बचत खात्यातील व्याजावर १०,००० रुपये (जुना कायदा कलम ८० टीटीए आणि नवीन कायदा कलम १५३) आणि बँकेतील ठेवींवरील व्याजावर ५०,००० रुपयाची वजावट (जुना कायदा कलम ८० टीटीबी आणि नवीन कायदा कलम १५३) मिळते. अनिवासी भारतीयांना ही ५०,००० रुपयांची वजावट घेता येत नाही.
- ४. ज्या करदात्यांचा अंदाजित देय कर (उद्गम कर आणि गोळा केलेला कर वजा जाता) एका आर्थिक वर्षात १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना ४ हफ्त्यात अग्रिम कर भरावा लागतो. ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नात उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नसेल तर त्यांना आगाऊ कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. परंतु, ज्येष्ठ नागरिक, अनिवासी भारतीय असेल आणि त्याचे अंदाजित करदाइत्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना आगाऊ कराच्या तरतुदी लागू होतात.
- ५. अनिवासी भारतीय कलम ८०सी नुसार (नवीन कायदा कलम १२३) वजावट घेऊ शकतो, परंतु, काही गुंतवणुका तो करू शकत नाही, जसे, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एन.एस.सी.), ज्येष्ठ नागरिक बचत योजना.
- ६. स्थावर मालमत्तेच्या विक्रीवर भांडवली नफा गणतांना करदाता इंडेक्सेशनचा लाभ घेऊन २० टक्के इतका कर किंवा इंडेक्सेशनचा लाभ न घेता १२.५ टक्के इतका कर (जो त्याला फायदेशीर आहे) भरू शकतो. ही इंडेक्सेशनची तरतूद अनिवासी भारतीय करदात्याला लागू होत नाही.
- ७. करदात्याच्या उत्पन्नात भांडवली नफ्याचा (अल्प किंवा दीर्घमुदतीचा) समावेश असेल तर तो त्यातून कमाल करमुक्त उत्पन्न वजा करू शकतो. अनिवासी भारतीयांना दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यासाठी आणि सवलतीच्या दरात आकारल्या जाणाऱ्या अल्पमुदतीच्या नफ्यावर ही तरतूद लागू होत नाही. उदा. एका अनिवासी भारतीय करदात्याला २ लाख रुपयांचा दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला आणि त्याचे दुसरे कोणते उत्पन्न नाही, तर त्याला या दीर्घ मुदतीच्या नफ्यावर कर भरावा लागेल. हाच करदाता निवासी भारतीय असता तर त्याला काही कर भरावा लागला नसता.
- ८. जेव्हा एखादा अनिवासी भारतीय, भारतात मालमत्ता विकतो, तेव्हा खरेदीदाराने कलम १९५ (नवीन कायदा कलम ३९३(२)) अंतर्गत एकूण विक्री मूल्यावर (केवळ नफ्यावर नव्हे) उद्गम कर वजा करणे आवश्यक आहे. हा कर दीर्घमुदतीच्या नफ्यासाठी १२.५ टक्के किंवा अल्पमुदतीच्या नफ्यासाठी ३० टक्के दराने कापला जातो. हे टाळावयाचे असेल तर अनिवासी भारतीय, प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे शून्य किंवा कमी दराने उद्गम कर कापण्याची विनंती करू शकतो.
- ९. कलम ४४ एडी किंवा ४४ एडीए कलमानुसार (नवीन कायदा कलम ५८) करदाता अनुमानित कराच्या तरतुदीनुसार (काही अटींचे पालन केल्यास) कर भरू शकतो आणि लेखे ठेवणे आणि त्याचे लेखापरीक्षण करून घेणे यातून सुटका करून घेऊ शकतो. ही तरतूद अनिवासी भारतीयांसाठी नाही.
- १०. अनिवासी भारतीयांना विवरणपत्रात आपली परदेशातील मालमत्ता उघड करण्याची (किंवा त्याची माहिती देण्याची) आवश्यकता नाही. कारण याअंतर्गत माहिती देण्याची तरतूद केवळ ‘निवासी आणि साधारणपणे निवासी’ दर्जा असलेल्या व्यक्तींनाच लागू होते. करदात्याचा ‘अनिवासी’ किंवा ‘निवासी परंतु साधारणपणे निवासी नाही’ हा दर्जा बदलून ‘निवासी’ दर्जा झाल्यास, ही माहिती देणे अनिवार्य ठरते.
दुहेरी कर आकारणी टाळण्याचा करार
जेव्हा दोन वेगवेगळ्या देशांमध्ये समान उत्पन्नावर कर आकारला जातो तेव्हा दुहेरी कर आकारणी होते. एका देशात उत्पन्न मिळवणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी दुसऱ्या देशात नागरिकत्व राखून, दोन्ही ठिकाणी एकाच उत्पन्नावर कर भरावा लागतो. हे टाळण्यासाठी भारताने अनेक देशांसोबत दुहेरी कर टाळण्याचे करार (डीटीएए) केले आहेत. हे करार अनिवासी भारतीयांना एकाच उत्पन्नावर दोनदा कर भरणे टाळून ही समस्या टाळण्यास मदत करतात. या करारांचा फायदा होण्यासाठी, पुरावा म्हणून भारतात भरलेल्या करांच्या संपूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक आहे. या करारांतर्गत, त्यातील अटींनुसार अनिवासी भारतीय कर-सवलत, कर-मुक्ती किंवा कमी दराने कर आकारणीचा लाभ घेऊ शकतात.
