गौरव मुठे
Options Trading Strategies Marathi :
शेअर बाजारात ऑप्शन्स ट्रेडिंग (Options Trading) करताना अनेकदा एकाच वेळी खरेदी आणि विक्रीचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यवहार करावे लागतात. बाजारातील चढ-उताराचा फायदा घेऊन तोटा मर्यादित ठेवण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी ऑप्शन्स स्ट्रॅटेजींचा वापर केला जातो. बुलिश, बेअरिश, न्यूट्रल आणि व्होलाटाइल या चार मुख्य प्रकारांचा व्यवहारात कसा वापर करावा, हे सोप्या भाषेत समजून घेऊया.

आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण ऑप्शन्सबद्दल सर्व संकल्पना समजून घेतल्या आहेत. आता यापुढे आपण ऑप्शन्समधील विविध स्ट्रॅटेजी बघणार आहोत. मात्र यासाठीच काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. शेअर बाजारात विविध ऑप्शन्स स्ट्रॅटेजी करताना आपल्याला अनेक प्रकारे वेगेवगेळ्या किमतींना आणि वेळेला शेअरची किंवा निर्देशांकांची खरेदी-विक्री एकाच वेळी करावी लागते, त्यात कधी कॅश मार्केट, फ्युचर्स मार्केट आणि ऑप्शन्स मार्केट यामध्ये एकाच वेळी वेगवेगळे व्यवहार करावे लागतात. म्हणजेच खरेदी विक्री करावी लागते प्रथम ऑप्शन्समधील विविध स्ट्रॅटेजीज म्हणजे असतात तरी काय? हे समजून घ्यावे लागेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपण लोक अशा विविध स्ट्रॅटेजी दैनंदिन जीवनात देखील वापरत असतो. उदाहरणार्थ दैनंदिन जीवनातील एखादी वस्तू आपल्याला रोज लागते म्हणून आपण विकत घेतो. पण बऱ्याचदा वस्तूंच्या किमती सतत बदलत असतात. यामुळे किमती वाढतील म्हणून आपण त्या वस्तूंचा आधीच विकत घेऊन त्याचा साठा करून ठेवतो. शिवाय भविष्यात आपल्याला त्या वस्तूची आवश्यकता पुन्हा भासेल म्हणून दुकानदाराला आगाऊ पैसे देऊन भविष्यात त्या वस्तू किंमत वाढली तरी दुकानदाराकडून त्या वस्तू कमी किमतीत देण्याचे आश्वासन घेतो शिवाय वस्तूची किंमत आणखीनच जास्त वाढल्यास आपण ती वस्तू दुसऱ्या दुकानात किंवा कोणालाही जास्त किमतीला विकून नफा मिळवू शकतो.

म्हणजेच आपण एकाच वेळी अनेक गोष्टी करतो त्या म्हणजे, वस्तूची खरेदी करतो, साठा करतो, दुकानदारास आगाऊ पैसे देऊन कमी किमतीत भविष्यात मागणी करतो शिवाय किंमत जास्त वाढल्यास आपण ती इतरांना देखील विकतो. म्हणजेच आपण वेगवेगळ्या युक्त्या वापरून आपला फायदा करून घेण्याच्या दृष्टीने विचार करत असतो. ऑप्शन्स स्ट्रॅटेजी पण याच प्रकारे असतात. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास ऑप्शन्स स्ट्रॅटेजी करताना आपल्याला कधी कधी एखाद्या कंपनीच्या शेअरची खरेदी करावी लागते आणि त्याचवेळी त्या शेअरची ऑप्शन्स मार्केटअंतर्गत विक्रीचा करार देखील करावा लागतो. अशा परिस्थितीत आपण प्रत्यक्षात दोन व्यवहार करत असतो. तो म्हणजे कॅश मार्केटअंतर्गत त्या कंपनीचा शेअर खरेदी करतो आणि त्याचवेळी ऑप्शन्स मार्केटमध्ये त्या कंपनीच्या शेअरच्या विक्रीचा करार करत असतो. अशा एकाच वेळी खरेदी-विक्रीच्या अनेक विकल्पाचा वापर करून आपण फायदा कमवतो किंवा आपले नुकसान होत असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करत असतो, यालाच ऑप्शन्स स्ट्रॅटेजी म्हणतात.

ऑप्शन्स स्ट्रॅटेजी म्हणजे काय?

ऑप्शन्स स्ट्रॅटेजी करताना आपल्याला एकाच वेळी खरेदी आणि विक्रीचे दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यवहार करावे लागतात, या स्ट्रॅटेजी जी करताना आपल्याला कॉल व पुटची खरेदी-विक्री करावी लागते, त्यामुळे कॉल व पुट संकल्पना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण आधी त्याबद्दल जाणून घेतले आहे. कारण प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये कॉल व पुटची खरेदी किंवा विक्री करावी लागते. स्ट्रॅटेजी करताना फक्त कॉल बाय/सेल किंवा पुट बाय/सेल करा, असे सांगितले जाते. यामधील विविध स्ट्रॅटेजी या वेगवेगळ्या वेळी कराव्या लागतात म्हणजेच ज्यावेळी शेअर बाजारातील निर्देशांकात किंवा शेअरच्या किमतीत वाढ होईल, असे वाटत असेल म्हणजेच तेजीची परिस्थिती असेल त्यावेळी विशिष्ट स्ट्रॅटेजी वापराव्या लागतात, त्या प्रकारच्या स्टॅटेजी ‘बुलिश स्ट्रॅटेजी’ म्हणतात तर ज्यावेळी शेअर बाजारातील निर्देशांकात किंवा शेअरच्या किमतीत घट होईल असे वाटत असल्यास म्हणजेच मंदीची परिस्थिती असेल त्यावेळी ‘बेअरिश स्ट्रॅटेजी’ वापरतात. शिवाय ज्यावेळी निर्देशांकात किंवा शेअरच्या किमतीत फार चढ-उतार होणार नसतील किंवा कमी जास्त होत नसतील त्यावेळी ‘साईड बेज ट्रेंड’ असतो, अशा काळात देखील ऑप्शन्स स्ट्रॅटेजी वापरून पैसे कमवता येतात याला ‘न्यूट्रल स्टॅटेजी’ असे म्हणतात. तसेच ज्यावेळी निर्देशांक किंवा शेअरच्या किमतीत खूपच मोठी वाढ किंवा घट होणार असेल असे आपल्याला वाटल्यास त्यावेळी ‘व्होलाटाइल ऑप्शन्स स्ट्रॅटेजी’चा उपयोग करून नफा कमवता येतो.

आपण विविध प्रकारच्या स्ट्रॅटेजी शिकणार आहोत, पण प्रत्येक स्ट्रॅटेजी या पुढील चार मुख्य प्रकारात विभागली आहे.

  • १) बुलिश स्ट्रॅटेजी : या तेजीच्या काळातील स्ट्रॅटेजी असून ज्यावेळी निर्देशांकात किंवा एखाद्या कंपनीच्या शेअरच्या किमतीत वाढ होईल असे वाटते, त्यावेळी या प्रकारच्या स्ट्रॅटेजी वापरतात.
  • २) बेअरिश स्ट्रॅटेजी : या मंदीच्या काळातील स्ट्रॅटेजी असून ज्यावेळी निर्देशांकात किंवा एखाद्या कंपनीच्या शेअरच्या किमतीत घसरण होईल असे वाटत असल्यास या स्ट्रॅटेजी वापरतात.
  • ३) न्यूट्रल स्ट्रॅटेजी : निर्देशांकात किंवा एखाद्या शेअरच्या किमतीत खूप चढ-उतार होण्याची शक्यता नसल्यास किंवा किमती एकाच पातळीवर स्थिर राहणार असतील अशी शक्यता वाटत असल्यास न्यूट्रल स्ट्रॅटेजी वापरतात. बाजारात साईडवेज कल म्हणजे ट्रेंड असेल त्यावेळी ही स्ट्रॅटेजी वापरून नफा कमावता येतो.
  • ४) व्होलाटाइल स्ट्रॅटेजी : ज्यावेळी शेअर बाजारात अति तेजीची किंवा अति तेजीची परिस्थिती असेल म्हणजे निर्देशांकाच्या किंवा शेअरच्या किमतीत खूप मोठे चढ-उतार होणार असतील, असे वाटल्यास त्यावेळी व्होलाटाइल स्ट्रॅटेजी वापरून नफा मिळवता येतो.

प्रत्येक ऑप्शन्स स्ट्रॅटेजीची स्वतःची जोखीम आणि परतावा असतो. साधारणपणे बाजारात खालील प्रकारची परिस्थिती दिसून येते:

-मर्यादित नफा आणि अमर्यादित तोटा
-मर्यादित तोटा आणि अमर्यादित नफा

आपण याआधी कॉल आणि पुटबद्दल सविस्तर माहिती घेतलीच आहे. ऑप्शन्स स्ट्रॅटेजी करताना अनेकदा सांगितले जाते की, कॉल बाय/सेल करा किंवा पुट बाय /सेल करा, पण असे सांगताना ते बाय-सेल करताना विशिष्ट किमतीला किंवा निर्देशांकातील विशिष्ट पातळीला करावे लागतात. म्हणजेच ‘एटीएम’ – ‘ऍट द मनी ऑप्शन्स’, ‘आयटीएम’ – ‘इन द मनी ऑप्शन्स’ किंवा ‘ओटीएम’ – ‘आऊट ऑफ द मनी ऑप्शन्स’ अशा किंमत किंवा पातळीला खरेदी/विक्री करावे लागतात.

‘एटीएम’, ‘आयटीएम’ आणि ‘ओटीएम’ याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलीच आहे, पण प्रत्यक्षात याचा वापर ऑप्शन्स स्ट्रॅटेजी करताना कसा केला जातो ते बघूया. ऑप्शन्स स्ट्रॅटेजी करताना फक्त असे सांगितले जाते की, आपल्याला कोणत्या किमतीला खरेदी/विक्री करायची आहे.

उदाहरणार्थ एखाद्या स्ट्रॅटेजीमध्ये ‘ओटीएम’ कॉल ऑप्शन्स खरेदी करा आणि एक ‘आयटीएम’ ऑप्शन्स विका असे सांगितले असेल तर अशावेळी बाजारात निर्देशांक किंवा शेअरची काय किंमत सुरू आहे ते बघावे लागते. समजा विप्रो कंपनीचा एक ‘ओटीएम’ कॉल ऑप्शन्स विकत घ्यायचा आणि एक ‘आयटीएम’ कॉल ऑप्शन्स विकायचा आहे. सध्या विप्रो कंपनीच्या शेअरची किंमत सहाशे रुपये आहे असे गृहीत धरूया. आता ‘ओटीएम’चा एक कॉल विकत घ्यायचा म्हणजे विप्रोचा एक कॉल ६१०,६२० किंवा ६३० रुपयांना विकत घ्यायचा म्हणजे सध्याचा जो शेअरचा बाजारभाव चालू आहे, त्यापेक्षा जास्त किमतीने घेणे म्हणजे ‘ओटीएम’-

‘आऊट ऑफ द मनी’ कॉल ऑप्शन असतो. निर्देशांक ६,२०० पातळीवर असेल आणि ‘ओटीएम’ कॉल खरेदी व विक्री करायचा असल्यास तो ६,२०० च्या वरच्या पातळीवर म्हणजे ६,२१०, ६,२५०, ६,३०० या वरच्या ‘स्ट्राइक प्राइस’वर खरेदी-विक्री करणे म्हणजे ‘ओटीएम’ होय. आता ‘एटीएम’ म्हणजे काय ते बघूया विप्रोचा एक कॉल ‘आयटीएम’ कॉल ऑप्शन्स विकायचा म्हणजेच सध्या विप्रोचा बाजारभाव ६०० रुपये चालू आहे आणि त्याचा ‘एटीएम’ कॉल विकायचा म्हणजे ६०० रुपये या चालू किमतीपेक्षा कमी किमतीला विकायचा म्हणजेच ५९०,५८०,५६० किंवा ५०० या किंमत पातळीवर असताना विक्री करायचा यालाच ‘आयटीएम’ म्हणतात. शिवाय ‘एटीएम’ला कॉल विकायचा अथवा खरेदी करायचा म्हणजे, जो शेअरचा बाजारभाव चालू आहे, त्या किमतीला खरेदी-विक्री करणे होय. समजा विप्रोचा सध्याचा बाजार भाव ६०० रुपये असताना एक ‘एटीएम’ कॉल ऑप्शन्स खरेदी करायचा म्हणजे ६०० या किमतीलाच खरेदी करायचा. आता निफ्टीचा ‘आयटीएम’ कॉल ऑप्शन्स खरेदी करायचा असल्यास निफ्टी निर्देशांक ज्या पातळीला असेल, त्याच पातळीला एक कॉल ऑप्शन्स खरेदी करायचे. समजा निफ्टी सध्या ६,१०० पातळीवर असल्यास त्याच ६,१०० या पातळीवर निफ्टी निर्देशांकाचा एक ‘एटीएम’ कॉल खरेदी करायचा यालाच ‘एटीएम’ असे म्हणतात.
gaurav.muthe@expressindia.com