पार्क मेडी वर्ल्ड लिमिटेड (बीएसई कोड: ५४४६४५)
वेबसाइट: http://www.parkhospital.in
प्रवर्तक: डॉ अजित गुप्ता / डॉ अंकित गुप्ता
बाजारभाव: रु. २९१ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : हेल्थकेअर, रुग्णालये व्यवस्थापन
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ८६.३९ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ८२.८९
परदेशी गुंतवणूकदार ०.८२
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ८.९५
इतर/ जनता ७.३४
पुस्तकी मूल्य: रु. ४६.८
दर्शनी मूल्य: रु. २/-
प्रति समभाग उत्पन्न: रु. ६.६४
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४५.२
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५१.३
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१८
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ८.१०
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (ROCE): १९.३
बीटा : १.१
बाजार भांडवल: रु. १२,५५६ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३०५/१३८
गुंतवणूक कालावधी : ३६ महिने
पार्क मेडी वर्ल्ड ही कंपनी प्रामुख्याने रुग्णालये, नर्सिंग होम्स, दवाखाने, प्रसूतिगृहे, तसेच बाल कल्याण आणि कुटुंब नियोजन इत्यादींची स्थापना, देखभाल आणि संचालन करण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. ही उत्तर भारतातील दुसरी सर्वात मोठी आणि हरियाणामधील सर्वात मोठी खासगी रुग्णालय साखळी असून कंपनी ‘पार्क’ या नाममुद्रेअंतर्गत (ब्रँड) १४ ‘एनएबीएच’ मान्यताप्राप्त ‘मल्टी-सुपर-स्पेशालिटी’ रुग्णालये चालवते.
पार्क मेडी वर्ल्ड अंतर्गत वैद्यकशास्त्र, न्यूरोलॉजी, युरोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, कार्डिओलॉजी, ऑन्कोलॉजी, ऑर्थोपेडिक्स आणि सामान्य शस्त्रक्रिया यांसारख्या तीसहून अधिक वैद्यकीय शाखांमध्ये सेवा पुरवते. यामध्ये मध्यम-उत्पन्न गटातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जातो. गेल्याच वर्षी कंपनीने प्रतिशेअर १६२ दराने आयपीओद्वारे ९२० कोटी रुपये उभारले होते.
३१जुलै २०२६ पर्यंत कंपनीची ६ राज्यातील १५ शहरात एकूण १७ कार्यरत रुग्णालये आहेत. यात पंजाब, हरयाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तरांचल या राज्यांचा समावेश आहे.
पायाभूत सुविधा ( ३० जुन २०२६ रोजी)
एकूण खाटांची क्षमता: ३,९६० खाटा
आयसीयू खाटा: ८७०
ऑपरेशन थिएटर्स (ओटी): ६७,
एमआरआय: १९
डायालिसीस: १२५ केंद्र
लिनियर ॲक्सिलरेटर्ससह कर्करोग उपचार विभाग: २
रोबोटिक सर्जरी: गुरुग्राम (सेक्टर ४७), पालम विहार आणि मोहाली येथे कार्यान्वित
सर्व रुग्णालये: ट्रॉमा सेंटर्स, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, २४/७ तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता
महसूल विभागणी
इन-पेशंट: ९५%
आउट-पेशंट: ५%
विस्तार योजना
कंपनीची आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत एकूण क्षमता ३,२६० खाटांवरून ४७४० तर २०२८ पर्यंत ५७४० खाटांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. कंपनीने आपल्या रुग्णालयांचे जाळे मोठ्या प्रमाणावर अधिग्रहणाद्वारे उभारले आहे.
१) रुद्रपूर (उत्तराखंड): ‘द मेडिसिटी हॉस्पिटल’चे १०० टक्के अधिग्रहण; व्यवहार मूल्य १७७ कोटी रुपये; यासह ‘सहाव्या राज्यात’ प्रवेश.
मालमत्तेचे स्वरूप: कुमाऊँ क्षेत्रातील ३३० खाटांचे, एनएबीएच-मान्यताप्राप्त, मल्टी-सुपर स्पेशालिटी रुग्णालय.
२) झिरकपूर (पंजाब ट्रायसिटी): मेहर हॉस्पिटलचे (१५० खाटा) अधिग्रहण; मूल्यमापन अंदाजे १०७ कोटी रुपये. नोव्हेंबर २०२६ मध्ये कार्यान्वित करण्याचे नियोजन.
३) गुडगाव: पालम विहार ‘पार्क प्लॅटिनम’ विस्तार. यामुळे गुडगावमधील एकूण क्षमता ७५० खाटांपर्यंत पोहोचेल.
४) नरेला (दिल्ली एनसीआर): दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे मिळवलेली २०० खाटांची सुविधा. ‘कार्यन्वित करण्याच्या दृष्टीने योग्य प्रगती’
या तिन्ही प्रकल्पांमधील एकूण ४५० खाटा नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ मध्ये कार्यान्वित होणार आहेत.
कॅलेंडर वर्ष २०२६ मधील वाढ: १,४९० खाटा (कॅलेंडर वर्ष २०२५ मधील ३,२५० खाटांच्या तुलनेत; एकूण क्षमतेत ४६% वाढ).
आर्थिक वर्ष २०२७ अखेर: ४,७४० खाटा
आर्थिक वर्ष २०२८ मधील वाढ: सुमारे १,००० खाटा
आर्थिक वर्ष २०२८ अखेर: ५,७४० खाटा
निधी उभारणीबाबतची भूमिका:
मुख्यत्वे अंतर्गत निधी आणि आयपीओमधून मिळालेल्या रकमेतून निधी उभारला जाईल; कोणत्याही नवीन कर्जाचा आधार घेतला जाणार नाही. कोणतेही मोठे नवीन कर्ज घेतले जाणार नाही. पार्क मेडी वर्ल्डने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीत उलाढालीत १९ टक्के वाढ होऊन ती ४७६ कोटींवर गेली आहे तर नक्त नफ्यात ३५ टक्के वाढ होऊन तो ८९ कोटींवर गेला आहे.
कंपनीच्या विस्तारीकरणाच्या योजनांचा प्रभाव आणि लाभ येत्या दोन वर्षात दिसू लागेल. भारताची लोकसंख्या पाहता छोट्या शहरातून अद्ययावत रुग्णालयांना वाढती मागणी राहील. भारतात सध्या इस्पितळातील खाटांचे प्रमाण दर १०००० ला केवळ १५ खाटा आहे जे सरासरी ३५ हवे. आपल्याकडे हे जागतिक तुलनेत निम्म्याहून कमी आहे. उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सरकारही आयुष्यमान भारत, डिजिटल हेल्थ (आभा) सारख्या योजनाचा विस्तार करेल तसेच पुढील अर्थसंकल्पात तरतूद वाढवेल अशी अपेक्षा आहे.
कंपनी व्यवस्थापनानुसार यंदाच्या आर्थिक वर्षात पार्क मेडी वर्ल्ड उलाढालीत २४ टक्के वाढ दाखवून सुमारे ३६० कोटी रूपयांचा नक्त नफा कमावेल अशी अपेक्षा आहे. सध्या २९० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर तीन वर्षात चांगला परतावा देऊ शकेल.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्या मूळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
(अजय वाळिंबे: stocksandwealth@gmail.com)
(प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.)
हा गुंतवणूक सल्ला नाही
लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
